संघ परिवार हा शब्द अलिकडल्या काही वर्षात सर्वतोमुखी झाला. आता त्याला पर्यायवाची जनता परिवार असा एक शब्द तयार होतो आहे. म्हणजेच पुर्वाश्रमीच्या जनता पक्ष, जनता दल अशा राजकारणात सहभागी असलेल्या नेत्यांनी आपापल्या मालकी हक्काचे जे प्रादेशिक पक्ष निर्माण केले होते, त्यांचे विलीनीकरण करून एकच एक नवा पक्ष निर्माण करण्याचा घाट घातला आहे. त्यात बहुतांश जुन्या समाजवादी परंपरेतलेच लोक असल्याने, अशी एकजूट कितीकाळ टिकेल याची शंकाच आहे. कारण भारतीय राजकारणाच्या इतिहासात समाजवादी आंदोलन म्हणतात, त्यात सहभागी झालेल्या व नावाजलेल्या नेत्यांना सहसा फ़ारकाळ एकत्र नांदता आलेले नाही. मध्यंतरी अर्थसंकल्पावर बोलताना एका जुन्या समाजवाद्यानेच लोकसभेत त्याची ग्वाही दिलेली होती. सध्या भाजपात असलेल्या हुकूमदेव यादव यांनी म्हटले की गेली पंधरा वर्षे भाजपावाले मला सहन करू शकले, हेच नवल आहे. थोडक्यात आपल्यातल्या समाजवादी प्रवृत्तीला नांदवणे अशक्य असताना, भाजपाने करून दाखवले याचेच त्यांना कौतुक वाटलेले आहे. पण त्यापेक्षा महत्व आहे ते अशा विचारांनी प्रवृत्त झालेल्यांच्या मानसिकतेचे. ही माणसे एकाच विचारसरणीची असतात, पण ती कधीही एकदिलाने व एका सूरात बोलत-वागत नाहीत. किंबहूना कोणीही काहीही म्हटले, की तात्काळ त्याचा प्रतिवाद करण्याची खुमखुमी त्यांच्यात आढळून येते. असे सहा नेते व त्यांचे पक्ष जनता परिवार म्हणून एकत्र येणार आहेत. मोदी किंवा भाजपाचे आव्हान पेलण्यासाठी ते एकत्र येत आहेत. पण मुद्दा असा आहे, की ते आव्हान संपल्यावर पुढे काय? वेळोवेळी असेच राजकीय आव्हान उभे राहिले आणि विखुरलेले समाजवादी जनतावादी एकत्र आले. पण त्यातून यश मिळताच त्यांनी कर्तव्यबुद्धीने केलेली पहिली गोष्ट म्हणजे आपल्या मतभेद वा भांडणांना चव्हाट्यावर आणून वेगळ्या चुली मांडल्या. मग आताच्या एकजुटीचे आयुष्य किती असेल?
लालूप्रसाद यादव, मुलायमसिंग यादव, देवेगौडा, नितीशकुमार, ओमप्रकाश चौटाला अशी या नेत्यांची यादी आहे. त्यांनी एकत्र यायचा तात्विक निर्णय घेतला असून त्याची घोषणा करण्याचा अधिकार मुलायमसिंग यांना दिलेला आहे. पण त्याची पुर्तता होण्याआधीच लालूंच्या पक्षात हाणामारी सुरू झाली आहे. आपल्यानंतर आपला वारसा पुत्राकडेच जाईल, असे लालूंनी परवा आपल्या पक्षाच्या विलीनीकरण सभेत सांगून टाकले. पक्षाचेच आक्रमक खासदार पप्पू यादव यांनी लालूंना आव्हान दिले. ज्या कर्पुरी ठाकुर यांचा वारसा लालूंकडे आला, त्यांचे लालू रक्ताचे वंशज वा पुत्र नाहीत, असेही पप्पू यादव यांनी स्मरण करून दिले. ही बाब लालूंची. तर नितीशकुमार यांच्या पक्षातही आलबेल आहे असे मानायचे कारण नाही. त्यांनीच वारस म्हणून नेमलेल्या जीतनराम मांझी यांनी स्वतंत्रपणे चालायचा प्रयत्न करताच त्यांना हटवण्याची वेळ नितीशवर आली. आता तर त्यांनी डॉ. लोहियांच्या पुतळ्याला हार घातला म्हणून लालूंच्या सहकार्यांनी गंगाजल शिंपडून त्याचे शुद्धीकरण केले. ही एकूण समाजवादी विचारसरणीची आजची अवस्था आहे. यातून मार्ग काढून नवा जनता परिवार कसे राजकारण व समाजकारण करणार, त्याची शंका म्हणूनच घ्यावी लागते. सवाल इतकाच आहे, की ह्या परिवाराला एकत्र ठेवू शकेल असा कुठला धागा आहे? विचारांची बांधिलकी असे त्यातले सगळेच सांगतील. पण विचारांचा खरेच त्यांच्यावर प्रभाव असता, तर त्यांच्यात सत्तापदावरून इतक्या लाथाळ्या कशाला झाल्या असत्या? इतके पक्ष गट व तुकडे कशाला झाले असते? बाहेरचा कुणी आव्हान म्हणुन उभा राहिला, मगच एकत्र व्हायची बुद्धी कशाला होते?
मोदी हे आव्हान आहे म्हणून त्यांना एकत्र यायचे आहे. पण पुढे काय करायचे आहे, त्याची कल्पना त्यापैकी मांडावी असे कोणाला वाटलेले नाही. किंबहूना मागल्या काही वर्षात अशा विचारांचे म्हणवणार्यांना आपला असा कुठला कार्यक्रम वा धोरण बनवता आलेले नाही. त्यांची दिशा संघ परिवार किंवा मोदी ठरवतात, असे म्हणावे लागते. म्हणजे असे, की मोदी, भाजपा वा संघ परिवार जे काही करतील, त्याच्या विरोधात बोलणे, कृती वा मागणी करणे, हेच अशा जनता परिवाराचे एकमेव धोरण होऊन बसले आहे. तसे नसते तर यातले काहीजण अधूनमधून भाजपा वा मोदींच्या सोबत कशाला राहिले असते? आजही जनता परिवाराचे सदस्य असलेले रामविलास पासवान मोदी सरकारमध्ये मंत्री आहेत. वास्तविक त्यांचा लोकजनशक्ती पक्षही जनता परिवारातलाच आहे. पण पासवान विलीनीकरणाच्या वाटेला फ़िरकलेले नाहीत. पण बिहार उत्तरप्रदेश व हरयाणा कर्नाटकात उपरोक्त नेत्यांची दखलपात्र ताकद आहे. दोन राज्यात त्यांचे मुख्यमंत्री आहेत. दोन विधानसभेत बहुमत त्यांच्या पाठीशी आहे. म्हणूनच त्यांच्या एकत्र येण्याला राजकीय महत्व आहे. मुद्दा ती एकजुट किती टिकणार व कशामुळे टिकणार इतकाच आहे. मुळात फ़ाटाफ़ुट झालीच नसती आणि नेत्यांना अहंकाराने पछाडले नसते; तर भाजपाला आज इतकी मोठी मजल मारताच आली नसती. समाजवादी वा जनता परिवार हा मूळातच भारतातला कॉग्रेसला पर्याय म्हणून लोकांसमोर आलेला पक्ष किंवा चळवळ. त्यातील नेत्यांनी व्यक्तीगत कारणास्तव वा स्वार्थासाठी जे धरसोडीचे धोरण पत्करले, त्यातून ज्या मतदाराचा भ्रमनिरास होत गेला, त्याला भाजपा गोळा करत गेला. यांच्या निष्क्रीयतेने भाजपाला कॉग्रेसविरोधी राजकारणात जागा मोकळी करून दिली. प्रत्येकवेळी खरे राजकीय आव्हान कॉग्रेसचे असताना भाजपाला संपवण्यासाठी कॉग्रेसशी हातमिळवणी करून हे नेते व त्यांचे गट कॉग्रेसला जीवदान देत राहिले. कॉग्रेसला एकमेव पर्याय म्हणून भाजपा जनतेच्या नजरेत भरत गेला. हे लोक कॉग्रेसला वाचवू शकले नाहीत, की आपली शक्ती टिकवू शकले नाहीत. कारण त्यांच्यापुढे कुठलेही दिर्घकालीन राजकीय धोरण, डावपेच वा कार्यक्रम नव्हता. आताही तसे काही दिसत नाही. मग एकत्र येऊन जनता एकजुटीने काय साधायचे आहे?
कदाचित आता जनता परिवाराचे इतके तुकडे व फ़ाटाफ़ुट होऊन गेली आहे, की आणखी तुटण्याला वाव राहिलेला नसावा. त्यामुळे भविष्यात आणखी फ़ाटाफ़ूटीची संधी शिल्लक उरलेली नाही. पुन्हा फ़ुटायचे व वेगळे व्हायचे असेल, तर आधी एकत्र यायला हवे ना? म्हणूनच आता नव्या जनता परिवाराचा प्रस्ताव सर्वांनी मान्य केलेला असावा. मात्र असे लोकांना सांगून भागत नाही. काहीतरी उदात्त करीत असल्याचे सांगावे लागते. त्यासाठी एकजूटीची कल्पना समोर मांडलेली असावी. अन्यथा निर्णय झाल्यावर सर्वांनी एकत्र बसून विनाविलंब त्यानुसार कृती करायला काय अडचण होती? त्यांच्यात एकमत झाले हेही एकदिलाने जगाला सांगणे त्यांना अजून शक्य झालेले नाही. कारण एकमत होऊ शकत नाही, यावर ज्याचे एकमत होते; त्यांचाच जनता परिवाराच्या जुन्या समाजवाद्यात भरणा असतो, असे आजवरचा इतिहास सांगतो. हा ऐतिहासिक निष्कर्ष खोटा पाडण्यात या नेत्यांना यश मिळो, हीच त्यांना शुभेच्छा.
मी मराठी Live (खुसपट) ११/४/२०१५
No comments:
Post a Comment