नवी मुंबई व औरंगाबादच्या पालिका निवडणूकीचे निकाल लागल्यावर अनेक वृत्तपत्रातील बातम्यांनी मुद्दाम भाजपाला खिजवणार्या बातम्या दिल्या आहेत. त्यामध्ये भाजपाचा शक्ती वाढल्याचा फ़ुगा फ़ुटला असेही म्हटलेले आहे. आकडेच बोलके असल्याने अशा बातम्या खोडून काढणे शक्य नाही. ज्या नव्या मुंबईत भाजपाने स्वबळावर एक आमदार निवडून आणला होता आणि गणेश नाईक यांनाच पराभूत करून दाखवले होते, तिथे महापालिका काबीज करण्याची स्वप्ने त्या पक्षाच्या नेते कार्यकर्त्यांना पडली तर नवल नव्हते. पण अनेकदा प्रत्येक निवडणूकीतले वास्तव तितक्यापुरते असते आणि लाट ओसरली, मग आपापले खरे बळ समोर येत असते. लोकसभेत मोठे यश संपादन केल्यावर भाजपाला आपले राज्यातील बळ वाढल्याचा साक्षात्कार झाला होता. म्हणूनच मग महापालिकेतही स्वबळावर सत्ता संपादनाची भाषा अनेक स्थानिक भाजपा नेते बोलू लागले होते. त्यांना दोष देता येणार नाही. विधानसभेची युती मोडताना जी भाषा वरीष्ठ नेतेच बोलात होते, त्याची पुनरावृत्ती खालचे नेते करणारच. त्यांना विधानसभेसाठी वरीष्ठांनी केलेल्या खेळी व त्याचे तात्कालीन मिळालेले परिणाम दिसत होते. मग त्याचीच पुनरावृत्ती प्रत्येकवेळी होईल, असे खालच्या नेते कार्यकर्त्यांना वाटल्यास नवल नव्हते. पण विधानसभेसाठी मोठ्या संख्येने अन्य पक्षातून उमेदवार आयात करण्यात आलेले होते. अधिक तेव्हा मोदी लाट ओसरलेली नव्हती. त्याचा ओझरता परिणाम विधानसभेच्या निकालात दिसला. त्याचे तसेच विश्लेषण आम्ही तेव्हाही केलेले होते. मिळालेली मते व आयात नेते यातून भाजपाला फ़क्त लोकसभेतील यश टिकवता आले. याचा अर्थ असा होता, की लोकसभेचे यश टिकवण्यास भाजपाला उसने उमेदवार व नेते आयात करावे लागले होते. दिवस मागे पडतील तसे ते यश घटत जाणार असाच तो इशारा होता.
तेव्हा आमचे ते विश्लेषण अनेक भाजपाप्रेमींना आवडलेले नव्हते. पण आता विधानसभेत नव्या मुंबईतला एक आमदार असून भाजपाला सेनेच्या मदतीनेही तितके यशही टिकवता आलेले नाही. मंदा म्हात्रे या राष्ट्रवादीतून आयात केलेल्या उमेदवार होत्या आणि त्यांनी नाईकांना हरवून भाजपाला एक अधिक आमदार मिळवून दिला. पण ते यश महापालिका निवडणूकीत टिकवता आले नाही. म्हणजे काय झाले? जो मतदार तेव्हा राष्ट्रवादीला सोडून भाजपाकडे आलेला होता, तो माघारी नाईक व राष्ट्रवादी पक्षाकडे परत गेला, असेच त्यातून दिसते. याच्या उलट परिस्थिती शिवसेनेची आहे. सहा महिन्यापुर्वी सेनेला नव्या मुंबईत एकही आमदार मिळू शकला नव्हता. पण आज त्याच नव्या मुंबईत सेनेने युतीचा लाभ घेऊन मोठी झेप घेतली आहे. भले सत्ता परिवर्तन शक्य झाले नसेल. पण शिवसेनेच्या यशानेच गणेश नाईक यांची नवी मुंबईतील मक्तेदारी संपवण्यात यश आले. सेनेतून ऐनवेळी भाजपात गेलेले नाईक यांचे पुतणे वैभव नाईक व जिंकलेल्या मंदा म्हात्रे हे नाईक यांच्या मक्तेदारीला आव्हान देऊ शकल्या नाहीत. कारण त्यांना सहा महिन्यापुर्वी मिळालेली मतेही टिकवणे शक्य झालेले नाही. याचा अर्थ राज्यातील सरकारच्या विरोधातला हा कौल आहे, असेही समजण्याचे कारण नाही. विजयाच्या लाटेवर स्वार झाले असताना वास्तवाचे भान सुटल्याचा तो परिणाम आहे. देशातील सत्तांतर करण्यात ज्या मित्रांची मदत झाली, त्यांच्यावरच कुरघोडी करण्याच्या हव्यासाने ही पाळी आलेली आहे. पण ज्या पद्धतीने औरंगाबादेत वा वांद्रा-पुर्व इथे ओवायसींनी आव्हान उभे केले आहे, त्याचा संदर्भ लक्षात घेतला, तर युती मोडण्याचे परिणाम किती दुरगामी होऊ शकतात, त्याची थोडी कल्पना येऊ शकेल, लोकसभेतील मोदींचे यश हे निव्वळ भाजपाची वाढलेली मते वा मोदींच्या लोकप्रियतेचे फ़लित नव्हते.
लोकसभेत भाजपाने अवघी ३१ टक्के मते मिळवली अशी चर्चा महिनाभर चालू होती. ३१ टक्के मतांच्या बळावर २८३ जागा जिंकणे अशक्य होते. पण तेवढीच मते मोदींच्या पाठीशी नव्हती. मित्र पक्षांची आणखी १२ टक्के मते पाठीशी असल्याने ३१ टक्के मतांच्या बळावर २८३ चा पल्ला गाठता आलेला होता, ती १२ टक्के मते गमावल्यास भाजपाला स्वबळावर दिडशेचा पल्लाही पार करता आला नसता आणि बहूमत तर दूरची गोष्ट होती. विधानसभेला काहीशी तीच अवस्था होती २८ टक्केपेक्षा कमी मते असूनही भाजपा सव्वाशे जागांपर्यंत पोहोचू शकला. कारण लढती चौरंगी झाल्या होत्या. शिवाय मुस्लिम दलित मतांचे विभाजन भाजपाच्या पथ्यावर पडलेले होते. आता नव्या परिस्थितीत ते विभाजन टाळण्याचे समिकरण घेऊन ओवायसी बंधू मैदानात आलेले आहेत आणि काळजीपुर्वक आपला मतदारसंघ बांधत आहेत. त्याची किमया त्यांनी औरंगाबादेत दाखवली आणि आता युती होऊनही तिथे निर्विवाद बहुमत युतीला मिळवता आलेले नाही. दुसरीकडे नव्या मुंबईत भाजपाला आपले विधानसभेचे यशही टिकवता आलेले नाही. याचा एकत्रित विचार करणे भाजपाला भाग आहे. कारण त्याला आणखी चार वर्षांनी पुना लोकसभेला सामोरे जायचे आहे. तेव्हापर्यंत आपण जो स्वबळाचा रुबाब दाखवला होता, त्याची जादू काही प्रमाणात तरी टिकवावी लागेल. तिला आतापासूनच गळती लागली तर चार वर्षानंतर काय स्थिती होईल? किसन कथोरे यांना विधानसभेसाठी आयात केले होते. त्यांना बदलापुर अंबरनाथ नगरपालिकेतही सेनेच्या पुढे मजल मारता आलेली नाही. मंदा म्हात्रेंना सेनेच्या तुलनेने जागा जिंकता आलेल्या नाहीत. ह्याचा अर्थ आतापासून समजून घेतला, तर भविष्यातले धोके टाळता येऊ शकतील. अर्थात त्यासाठी चुका झाल्या ते मान्य करून सुधारण्याची तयारी करणे भाग असते.
एम आय एम कॉग्रेससाठी धोका आहे असाही समज करून घेण्यात धोका आहे. कारण आज ओवायसींचा हा पक्ष मुस्लिमांची मते बळकावून कॉग्रेसला नामोहरम करीत आहे. पण त्यातून मुस्लिम मतांचे सुसुत्रिकरण चालू आहे. तो पुढल्या काळात भाजपासाठी राष्ट्रीय धोका ठरू शकतो. लाटेमुळे पक्षाकडे आलेली अन्य पक्षांची मते तशीच टिकवण्यातले अपयश आणि विखुरलेल्या मुस्लिम मतांचे एकत्रिकरण, यांचा लोकसभेच्या समिकरणावर मोठा प्रभाव पडू शकेल. लोकसभेचे १८५ मतदारसंघ मुस्लिम प्राबल्याचे आहेत असे मानले जाते. तिथे भाजपा व मोदी जिंकणेच अशक्य असे तमाम जाणकारांचे ठाम गृहीत होते. मोदींनी त्यालाच धक्का दिला आणि लोकसभेत मोदींनी बहुमत मिळवले होते. त्यासाठी मोदींनी जी हिंदू व्होटबॅन्क बनवली होती, तिला शह देणारी व्युहरचना ओवायसी शांत डोक्याने करीत आहेत. तर दुसरीकडे कष्टाने उभी राहिलेली हिंदू व्होटबॅन्क भाजपाच्या राज्यपातळीच्या नेत्यांनी मोठ्या स्वत:च मोडीत काढाय़चे डावपेच मागल्या वर्षभरात खेळून ओवायसींचे काम खुप सोपे करून ठेवले आहे. आज महापालिका वा नगरपालिका अशा निवडणूकीतले हे अपयश नगण्य वाटेल. चार वर्षापुर्वी नांदेडचे अपयश अशोक चव्हाणांना तसेच नगण्य वाटले होते. आता तेच चव्हाण ओवायसींच्या नावाने शंख करीत असतात. युती मोडल्याचा लाभ उठवित ओवायसींनी दोनच आमदार निवडून आणले. पण त्यातून त्यांच्या मुस्लिम व्होट बॅन्क उभी करण्याच्या मोहिमेला किती मोठे बळ मिळाले, त्याची प्रचिती औरंगाबादेत आलेली आहे आणि नवी मुंबईत आमदार असतानाही अवघे सहा नगरसेवक युती करून मिळवताना भाजपाने काय गमावले, त्याचीही साक्ष मिळालेली आहे. आज इतके दिसते आहे. जिल्हा परिषदा तालुका पंचायतीच्या निवडणूका झाल्या, मग अधिक परिणाम समोर येतील. तेव्हा युती मोडल्याची खरी किंमत कळू लागेल.
No comments:
Post a Comment