आठवडाभर आधी कॉग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उपरोधिक कौतुक केले. पण त्याकडे फ़ारसे कोणी लक्ष दिलेले दिसले नाही. कदाचित माध्यताल्या जाणत्यांना राहुल गांधींचा उपरोध कळला नसावा किंवा त्यातला संदर्भच ठाऊक नसावा. आपण कॉग्रेस अध्यक्षा म्हणजे आई सोनियाकडे गेलो असताना, तिथे ‘टाईम’चा अंक पडला होता. त्यामध्ये अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींचे गुणगान करणारा लेख छापलेला होता. सहसा अमेरिकन असे कुणाचे कौतुक करत नाहीत. रशियाचे अध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्ह यांच्यानंतर अमेरिकेने कधी कुणा अन्य नेत्याचे इतके गुणगान केलेले नाही, असे राहुल यांनी सांगितल्याचे प्रसिद्ध झाले आहे. योगायोग असा की २२ एप्रिल रोजी राहुल यांनी असे म्हटले आणि दुसर्याच दिवशी २३ एप्रिल ही तारीख होती. तिला अधिक महत्व होते. कारण तीस वर्षापुर्वी नेमक्या त्याच दिवशी सोवियत युनियनचे सर्वेसर्वा नेते गोर्बाचेव्ह यांनी रशियात सुधारणांचा मुहूर्त केला होता. कम्युनिस्ट पक्षाची एकपक्षीय सत्ता व पोलादी पडद्याआड झाकलेल्या रशियन साम्राज्याची दारे खुली करण्याचा पवित्रा त्यांनी घेतला होता. अमेरिकेसह पाश्चात्य देशांनीही त्यांच्या लोकशाही प्रयत्नांचे कौतुक केलेले होते. मात्र त्यातून सोवियत साम्राज्य बुडाले आणि पंधरा लहानमोठी राष्ट्रे उदयास आली. कधीकाळी अमेरिकेला आव्हान असलेली महाशक्ती अशीच सोवियत युनीयनची ओळख होती. तिचा र्हास होणार म्हणूनच अमेरिकेने गोर्बाचेव्ह यांचे कौतुक केले होते आणि आता तीच अमेरिका मोदींचे कौतुक करीत असेल, तर त्यामागे भारतीय संघराज्य़ खिळखिळे होण्याचा धोका असल्याचेच राहुलना सुचवायचे असावे. मात्र त्यातला आशय माध्यमांच्या लक्षात आलेला नसावा, किंवा राहुलचे ते विधान उमजण्याइतका इतिहास आजच्या माध्यमकर्मींना ज्ञात नसावा.
गोर्बाचेव्ह यांनी पेरिस्त्रोइका व ग्लासनोस्त नावाच्या दोन संकल्पना सत्ता हाती आल्यावर रुजवण्याचा पवित्रा घेतला होता. त्यासाठी एकपक्षीय हुकूमत व सत्ता कमी करून भिन्न मताला स्थान निर्माण करण्याचे पवित्रे घेतले. त्याखेरीज शेजारच्या पंधरा लहानमोठ्या देशांना वॉर्सा करारातून मुक्त करीत आपापले निर्णय घेण्याची मोकळीक दिली होती. त्यातून सोवियत संघराज्यात अराजक माजत गेले आणि बघताबघता ही महाशक्ती कोसळून पडली. सहाजिकच जगात प्रभावशाली असा एकच देश उरला; तो म्हणजे अमेरिका आणि त्यासाठीच अमेरिकेने गोर्बाचेव्ह यांना प्रोत्साहन दिले होते. थोडक्यात अमेरिकन नेते आपल्या शत्रूंना संपवण्यासाठीच त्यांचे गुणगान करतात आणि आता ते मोदींचे कौतुक करीत आहेत. त्याचा अर्थ सुधारणा व विकास या नावाखाली मोदी जे करीत आहेत; त्यातून भारतीय संघराज्य रसातळाला जाईल, असेच राहुलना सुचवायचे आहे. आजच्या पिढीला त्याची फ़ारशी माहिती असणार नाही. पण ज्यांनी कोणी राहुलना हा दाखला द्यायला सुचवला आहे, त्यानेही अलिकडे भारतात काय झाले त्याचे भान ठेवलेले दिसत नाही. संदर्भ खरा असला तरी तो कोणाला व कशाला लावायचा, त्याचे भान नसल्याची ही खुण आहे. आजही अमेरिकेला भारत हे आव्हान नाही, की प्रतिस्पर्धी नाही. म्हणूनच भारताच्या विरोधात काही गंभीर कारवाया करण्याइतकी अमेरिकेची गरज नाही. तेव्हा भारतीय नेत्यामध्ये त्यांनी गोर्बाचेव्ह शोधण्याची वेळ आलेली नाही. मग मोदींच्या कौतुकात गोर्बाचेव्ह शोधण्याचा संबंधच कुठे येतो? शिवाय सुधारणांच्या नावावर गोर्बाचेव्ह यांनी आपल्या हातात केंद्रित झालेल्या अधिकाराचे विकेंद्रीकरण केलेले होते. मात्र मोदी सत्ता आपल्याच हाती केंद्रित करायचे प्रयास करतात; असा कॉग्रेसचा दावा आहे. मग गोर्बाचेव्ह आणि मोदी यांच्या काम व निर्णयात कुठली समानता आढळू शकते?
मोदींची तुलना गोर्बाचेव्ह यांच्याशी करण्यापुर्वी राहुलनी आधी स्वत:च तो इतिहास समजून घेतला असता तर बरे झाले असते. कारण तो इतिहास भारत वा मोदी यांच्यापेक्षा कॉग्रेस व राहुल यांनाच लागू होऊ शकतो. अमेरिकेने सोवियत ही कम्युनिस्ट सत्ता उलथून पाडण्यासाठी जंग जंग पछाडले हे सत्य आहे. कितीही कारस्थाने शिजवून आणि सीआयए नामक घातपाती हेरसंस्थेच्या कारवाया करूनही अमेरिकेला सोवियत सत्ता मानोहरम करता आलेली नव्हती. गोर्बाचेव्ह यांच्या आधीचे तमाम सोवियत रशियन नेते हे क्रांतीच्या कालखंडात जन्मलेले होते आणि त्यांनी पोलादी टाचेखाली मतभिन्नता व विरोध चेपून सत्ता टिक्वलेली होती. रशियन क्रांतीच्या नंतर जन्मलेला पहिला सोवियत सर्वोच्च नेता होऊ शकला ते गोर्बाचेव्ह. त्यांना नव्या युगाची मते पटलेली होती. पण पक्षाची व देशाची सर्व सुत्रे हाती येईपर्यंत त्यांनी मान खाली घालून काम केलेले होते. मात्र पक्षाचे सरचिटणिस झाल्यावर त्यांनी एकेक व्यवस्था व प्रथा बदलण्याचा पवित्रा घेतला. एकहाती पक्षाची हुकूमशाही मोडीत काढून भिन्न मताच्या राजकारणाला स्थान देण्याचे निर्णय घेतले व अंमलात आणले. त्याच्या विरोधात लष्करी नेते व केजीबी या गुप्तहेर हस्तकांनी बंडखोरीही केलेली होती. पण तिचा उपयोग झाला नाही. तोपर्यंत पोलादी हुकूमशाहीच्या अनाचार व भ्रष्टाचाराला कंटाळलेली जनता उठाव करून समोर आली आणि तिला चेपून काढण्याचे मनोधैर्य लालसेनेतही उरलेले नव्हते. म्हणूनच पुढल्या काळात सोवियत सत्ता ढासळत गेली. सोवियत कम्युनिस्ट पक्षाला अधिक लोकशाहीभिमूख बनवावे, अशी जी योजना गोर्बाचेव्ह यांनी राबवली, त्यातच त्यांचा पक्ष व पर्यायाचे सोवियत साम्राज्य खिळखिळे होत गेले. जगातली एक महाशक्ती नुसत्या कल्पनाविलासात गुरफ़टलेल्या नेत्याने रसातळाला नेली. त्याची तुलना आजच्या राहुल-कॉग्रेसशी होऊ शकते.
२००४ सालात जेव्हा युपीए सत्तेत आली, तेव्हा आधीच कॉग्रेस दुबळी झालेली होती. पण सोनियांनी अन्य पक्षांच्या मदतीने तिचे पुनरुज्जीवन केले होते. त्याच लोकसभा निवडणूकीत राहुल गांधी प्रथमच मैदानात आले आणि त्यांनी नेतृत्व करायला सुरूवात केली. पुढल्या पाच वर्षात थोडा अनुभव घेतल्यावर त्यांनी २००९ पासून पक्षाला एकविसाव्या शतकातला चेहरा प्रदान करण्याचा चंग बांधला. त्यासाठी अनेक नेत्यांच्या तरूण मुलांना पक्षात महत्वाच्या स्थानावर आणून यंग ब्रिगेड उभी करण्याचे छान नाटक रंगवले. मागल्या तीन वर्षात तर कॉग्रेस पक्षातले बहुतेक निर्णय राहुलच घेत होते आणि भावी काळात कॉग्रेसला स्वबळावर बहुमतात आणून पंतप्रधान होण्याच्या कामात राहुल गर्क होते. त्याचे फ़लित समोर आहे. मागल्या सहासात दशकात कुठल्याही विरोधी वा बिगर कॉग्रेसी पक्षाला कॉग्रेस नामशेष करण्य़ाचे मनसुबे प्रत्यक्षात आणणे शक्य झाले नव्हते, ते राहुलनी पक्षाची सुत्रे हाती घेऊन करून दाखवलेले आहे. मोदी भले कॉग्रेसमुक्त भारताच्या वल्गना करीत होते. पण ते त्यांच्यासाठी तितके सोपे काम नव्हते. राहुल गांधींनी कॉग्रेस पक्षाचा गोर्बाचेव्ह होऊन महत्वाची ऐतिहासिक कामगिरी बजावली नसती, तर आज मोदी भाजपाला स्वबळावर बहुमत मिळवून देऊ शकले असते काय? राहुलच्या हाती इतके अधिकार सोनियांनी दिलेच नसते, तर पक्षाची इतकी दयनीय स्थिती झाली असती काय? सव्वाशे वर्षे जुन्या कॉग्रेसला पराभूत करणे बाहेरच्या कोणालाही अशक्य होते. पण सोवियत युनियन जसे गोर्बाचेव्ह यांनी आतल्या आत नामशेष करून दाखवले, तसेच राहुलनी कॉग्रेसचे नेतृत्व हाती घेऊन राहुलनी तिचा बोर्या वाजवून दाखवला. म्हणूनच संदर्भ योग्य आहे. पण तो मोदींना नव्हेतर खुद्द राहुल गांधींनाच लागू पडणारा आहे. ज्याने कोणी तो सुचवला, त्यालाही तेच म्हणायचे असेल. पण त्याने सत्य राहुलच्याच तोंडी घातले म्हणायचे.
भाऊ एवढं कां राहुल गांधी ह्यांचे वक्तव्य गंभीरपणे घेता? ते नेहमीप्रमाणे मुर्खासारखे आणि संदर्भहीन बोलले झालं! मात्र एका महत्वाच्या अनुल्लेखाकडे आपले लक्ष वेधतो. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा ह्यांनी मोदींआधी दुसऱ्या कुठल्या राष्ट्रप्रमुखाची एवढी प्रशंसा केली असेल तर ते गोर्बाचेव्ह असे राहुल म्हणाले. मात्र ते खरं नव्हे. ह्याआधी ओबामांनी तोंडभर आणि दिलदार तारीफ केलेले दुसरे राष्ट्रप्रमुख म्हणजे आपले माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग आहेत. २००८ नंतर अमेरिकेमध्ये आणि इतर प्रगत देशांमध्ये आर्थिक मंदीचा काळ सुरु झाला. त्या काळात भारताला मात्र अनेक कारणांमुळे ह्या आर्थिक मंदीची झळ तितकीशी पोचली नाही. त्याला काही अंशी मनमोहन सिंग ह्यांचे नेतृत्व जबाबदार होते. ओबामांनी ह्याच नेतृत्वक्षमतेची प्रशंसा केली होती शिवाय इतर देशांनी मनमोहन सिंग ह्यांच्याकडनं प्रेरणा घ्यावी असेही म्हटले होते. आता राहुल हे साहजिकपणे विसरले का त्यांनी आपल्याच पक्षाच्या पण गांधी आडनाव नसलेल्या माजी पंतप्रधानांना अनुल्लेखाने मारले हा संशोधनाचा आहे.
ReplyDeleteअभिराम घडयाळपाटील
Abhiram Ghadyalpatil,
Deleteतुमचा मुद्दा ध्यानी आला. पण त्याचं काय आहे की राहुल गांधी स्वत: बोलत नाही. त्याचा बोलविता धनी वेगळाच आहे. त्यामुळे राहुलने केलेल्या विधानांची दखल घेणं क्रमप्राप्त आहे.
बाकी तुम्ही उद्धृत केलेली मनमोहन सिंगांची ओबामाने केलेली प्रशंसा डोक्यात धोक्याची घंटा वाजवून गेली.
आपला नम्र,
-बामा पैलवान
बिचार्या राहूल गांधीला जबरदस्तीने ओढून ताणून राजकारणात आणले आहे असे वाटते. दया येते त्याची. राजकारणी कसा असावा तर शरद पवारांसारखा. न लवंडणारा बाहूला कसा असतो तसा. कितीही पाडायचा प्रयत्न केला तरी परत सरळ होतो आणि हसत असतो. राहूलला ते जमणारे नाही.
ReplyDeleteहोय. तुम्ही नेमके आणि बरोबर विश्लेषण केले आहे. राहुल गांधींवर एक विनोदी टिपण्णी व्हाटसअपवर फिरते आहे. मोठ्या प्रेमाने राहुल गांधीचा मित्र त्याच्या कानात काही तरी विचारत आहे आणि राहुल त्याला हसून प्रतिसाद देत आहे. त्याच्या काॅमेंटस आहेत, सच बोल यार ! तू पैदाईशी मूर्ख है या कुछ बडा कोर्स किया है ? राहुल गांधींचे सध्याचे वर्तन त्याला साजेसे आहे.
ReplyDelete