Wednesday, April 15, 2015

‘शिवसैनिक’ राणे जिंकले, मग हरले कोण?



तासगाव-सांगली येथे आबांच्या पत्नीचा विजय सोपा होता. कारण तिथे समोर कोणी लढायला उभाच नव्हता. सर्वच प्रमुख पक्षांनी तिथे जागा सोडून दिलेली होती. सहाजिकच मतदानाचा उपचार पार पडण्यापुरती प्रतिक्षा होती. पण मुंबईत वांद्रे-पुर्व ही पोटनिवडणूक अतिशय अटीतटीची होती. म्हणजे तिथला निकाल वेगळा लागणार अशी अपेक्षा नव्हती. कारण ज्याप्रकारे तिथली लढत आकारास आली तिथेच शिवसेनेचा विजय निश्चीत होता. किंबहूना ओवायसी व नारायण राणे यांनी तिथे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे काम सोपे करून ठेवले, असे आम्ही आधीच स्पष्ट केले होते. एका बाजूला ओवायसी बंधूंनी वांद्रे येथेच मुक्काम ठोकला आणि हिंदूमुस्लिम असे धृवीकरण लौकर सुरू केले. तर दुसरीकडे कॉग्रेसतर्फ़े नारायण राणे यांनी उडी घेऊन मुंबईच्या तमाम शिवसैनिकांनाच वांद्रे येथे आपल्याला पराभूत करण्याचे जाहिर आव्हानच देवून टाकले. सगळा शिवसैनिक पेटून उठला, मग सेनेच्या पक्षप्रमुखाला त्याला वेसण घालण्यापलिकडे कुठले काम शिल्लक उरत नाही. म्हणजेच राडा करण्यापासून, निवडणूक जिंकण्यापर्यंत शिवसैनिक सर्वस्व पणाला लावतो. ओवायसी आणि राणे यांच्या आक्रमक शैलीने नेमकी तीच मोलाची कामगिरी उद्धव ठाकरेंसाठी पार पाडली. मग शिवसैनिकाला कार्यरत करण्यापेक्षा त्याच्यात उत्पन्न झालेली उर्जा नेमक्या दिशेने प्रवाहित करण्याखेरीज उद्धवना काम उरलेले नव्हते. त्यात पुन्हा मागल्या विधानसभेत फ़िसकटलेली सेना-भाजपा युती जुळलेली होती. म्हणजेच असलेली जागा जिंकायला मित्रही मिळालेला होता. माध्यमांना त्याचा अजिबात गंध नव्हता. म्हणून मग राणे यांनी ‘सेनेला घाम आणला, सेनेचा घामटा काढला’ इथपर्यंत भाषा गेलेली होती. पण शिवसैनिक अशाच स्थितीत कार्यरत होतो. अन्यथा आळशी पडून रहातो, ही वस्तुस्थिती कोणी लक्षात घेतली नव्हती.

शिवसैनिक आणि शिवसेना यांच्याबाबतीत इतकी गोष्ट लक्षात घेतली, तर नारायण राणे यांनाही समजून घेता येईल. राणे यांनी सेनेला ‘जय महाराष्ट्र’ करून कॉग्रेस पक्षात दाखल झाले त्याला आता दहा वर्षाचा कालावधी होत आला आहे. पण ते अजून स्वत:ला कॉग्रेसमन बनवू शकलेले नाहीत, की आपल्यातला शिवसैनिक संपवू शकलेले नाहीत. तीच त्यांची ताकद आहे आणि तीच सेनेच्या विरोधातली राणे यांची कमजोरी आहे. हा आजही कॉग्रेसमधला शिवसैनिक आहे. वांद्रे-पुर्व मतदारसंघातील ताज्या लढतीचा विचार करताना तोच मुद्दा विसरून बोलले लिहीले जात आहे. ती कॉग्रेस विरुद्ध शिवसेना अशी लढत नव्हती. शिवसेना विरुद्ध माजी शिवसैनिक अशी ती लढत होती. फ़रक होता एक शिवसैनिक विरुद्ध हजारो शिवसैनिक असा. राणे लढत होते शिवसैनिक म्हणून आणि पाठीशी फ़ौज होती कॉग्रेसजनांची. उलट तृप्ती सावंत निव्वळ उमेदवारी अर्ज भरून फ़िरत होत्या आणि बाकीचा सामान्य शिवसैनिक दिवंगत बाळा सावंतची लढाई तृप्ती यांच्यासाठी लढत होता. त्यात नारायण राणे नावाचा एकाकी शिवसैनिक कमी पडणारच ना? जशी मुसंडी कुठलाही शिवसैनिक मारतो, तशीच मुसंडी राणे यांनी मागल्या तीन आठवड्यात मारली होती. पण सोबत कोणीही सहकारी तितक्या जिद्दीने उतरलेले नव्हते. उलट तृप्ती सावंत यांच्यावतीने हजारो शिवसैनिक म्हणजे हजारो नारायण राणे मैदानात उतरले होते. त्या अर्थाने ही लढत विषम होती. एका बाजूला तृप्तीताई पतीची जागा कायम राखायच्या लढतीमध्ये होत्या, तर दुसरीकडे नारायण राणे यांनी कॉग्रेसने मागल्या दोन निवडणूकात तिथे गमावलेली भूमी पुन्हा मिळवायची झुंज चालवली होती. २००९ मध्ये युतीचा उमेदवार म्हणून बाळा सावंत तिथे जिंकले होते आणि सहा महिन्यापुर्वी सेनेला स्वबळावर त्यांनी हीच जागा भाजपाशिवाय जिंकून दिलेली होती.

मात्र सहा महिन्यापुर्वी विधानसभा आणि त्याच्याही आधी अकरा महिन्यापुर्वी लोकसभेत कॉग्रेसने याच भागात आपला मतदानाचा मोठा हिस्सा गमावला होता. त्यात ओवायसी या हैद्राबादी मुस्लिम नेत्याने घुसखोरी करून कॉग्रेसला चौथ्या क्रमांकावर फ़ेकलेले होते. राष्ट्रवादीने साथ सोडल्याने कॉग्रेस दुसर्‍या स्थानावरून चौथ्या जागी फ़ेकली गेली होती. तिथून थेट पहिल्या स्थानावर मजल मारणे अशक्य होते. म्हणजेच प्रयत्नांची कितीही पराकाष्ठा केली, तरी विजयाची अपेक्षा बाळगता येणार नव्हती. कुठलाही ज्येष्ठ नेता पक्षासाठी इतका मोठा धोका पत्करत नाही. सोनिया असोत वा मुलायम असो, असे अनोळखी मतदारसंघात जाऊन उभे रहात नाहीत. मग १९८५ सालानंतर मुंबईत कुठली निवडणूक न लढवलेल्या राणे यांनी वांद्रे-पुर्व लढवायची हिंमत करणे सोपे नव्हते. शिवाय त्यातून आपल्याला पराभूत करून उद्धव ठाकरे यांना मोठेपणा मिळेल, असाही धोका होता. तोही राणे यांनी पत्करला. थोडक्यात शहीद व्हायलाच राणे इथे उभे ठाकले होते. आणि पराभूत व्हायची हमी असलेली लढत इतक्या जिद्दीने लढवणे सोपे अजिबात नसते. कॉग्रेसमध्ये ज्येष्ठ नेता असूनही नारायण राणे इतके आंधळे धाडस करू शकले, हीच त्यांच्या आजही शिवसैनिक असल्याची सर्वात मोठी साक्ष आहे. म्हणूनच जागा शिवसेनेने जिंकली हे सत्य असले, तरी ‘शिवसैनिक’ नारायण राणे हरले, असेही कोणी म्हणू शकणार नाही. त्यांनीही आपल्या पक्षाला या लढतीमध्ये पुन्हा दुसर्‍या क्रमांकावर आणुन ठेवताना, मागल्या वर्षभरात कॉग्रेसने गमावलेले प्रभावक्षेत्र पुनर्स्थापित केले. हे यश झाकून चालणार नाही. थोडक्यात आपापल्या जागी राणे व शिवसेना जिंकले आहेत. तृप्ती सावंत यांनी शिवसेनेसाठी वांद्रे-पुर्वची जागा कायम राखली आणि राणे नामक शिवसैनिकाने त्याच्या पक्षाने गमावलेली वांद्रे-पुर्व येथील मते पुन्हा कमावली आहेत. मग हरले कोण?

राणे यांनी पराभूत होतानाही ३३ हजाराहून अधिक मते मिळवलेली आहेत. म्हणजे २२ हजार मते वाढवून मिळवलेली आहेत. किंवा तिप्पट मते पक्षाला मिळवून दिली आहेत. पण ते करताना त्यांनी मुस्लिम मतांची कॉग्रेसकडे असलेली मक्तेदारी पुन्हा प्रस्थापित केली आहे. त्यावर दावा करायला आलेल्या व सहा महिन्यापुर्वी यशस्वी झालेल्या ओवायसी बंधूंना धुळ चारली आहे. ओवायसींनी सहा महिन्यांपुर्वी मिळवलेली निम्मे मते आज गमावली आहेत आणि त्यातून राणे यांना नऊदहा हजार म्ते अधिक मिळाली. जवळपास तितकीच मते राष्ट्रवादीने पाठींबा दिल्याने राणेंना मिळालेली असू शकतात. पण साधारणपणे १५-१७ हजार मतदान कमी झालेले आहे. म्हणजेच तुलनेने प्रत्येक पक्षाला मागल्या वेळेइतकीच मते आली वा गमावली, असे म्हणता येत नाही. घटलेल्या मतांचा आकडा बघता आळस कोणी केला वा कोणी इतकी मते गमावली, त्याचा अभ्यास स्पर्धक पक्षांना करणे भाग आहे. त्यात ५ हजार मनसे व भाजपाच्या २५ हजार मतांचे गणित महत्वाचे ठरेल. त्यापैकी दहा हजार तृप्तीताईंना मिळालेली असतील तर उरलेले २० हजार मतदार घरी बसलेत किंवा त्यांनी बाजू बदलेली असू शकते. त्यात अमराठी भाजपाच्या मतांचा समावेश असू शकतो. हा भाग तसा भाजपाचे प्रभावक्षेत्र नव्हता. म्हणूनच मागल्या खेपेस मिळालेली २५ हजार मते मुळातच कॉग्रेसला जाणारी अमराठी मते त्यात असू शकतात. आणि या निमीत्ताने ती माघारी कॉग्रेसकडे गेली असतील, तर दिर्घकालीन राजकारणात भाजपासाठी धोक्याचा इशारा असू शकतो. हे विश्लेषण भाजपावाल्यांना आवडणारे नाही. पण दिल्लीत नेमके तेच घडले आणि पारंपारिक मते टिकली वा लोकसभेत वाढलेली मते जाताच ३२ वरून भाजपा ३ जागांपर्यंत घसरला, हे विसरता कामा नये. म्हणून वास्तवाकडे आवडते वा नावडते म्हणून बघून चालत नाही. थोडक्यात ‘शिवसैनिक’ राणे जिंकले आणि ओवायसीला हरवताना मतदाराने भाजपाला इशारा दिला आहे. त्यांनी विचारात घ्यावा किंवा निश्चींत राहून मुंबईतल्या ‘केजरीवाल’ची हेटाळणी करावी. तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे.

1 comment: