आम आदमी पक्ष आणि त्याचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांच्या बाबतीत नशीब किती उदार व्हावे, याचे कधीकधी नवल वाटते. भारतीय राजकारणात राहुल गांधी आणि केजरीवाल ही अलिकडल्या कालखंडातील दोनच अपवादात्मक उदाहरणे असतील, ज्यांच्यावर नशीबाने खैरात केली आणि त्यांनी त्यावर लाथ मारण्याचा पुरूषार्थ करून दाखवला आहे. अन्य कुठल्या राजकारण्याला अशी संधी वारंवार मिळाल्याचे दिसत नाही. एक चुक करावी आणि दुसरी संधीही नाकारून जनतेने त्यांना कठोर मनाने बाजूला ढकलले आहे. पण राहुल यांना जुना शतायुषी पक्ष आयता हाताशी मिळाला, तर श्रीमंताच्या शेफ़ारलेल्या पोराने महागडे खेळणे मोडून तोडून टाकावे, अशी राहुल गांधी यांची मानसिकता राहिलेली आहे. आपल्या पायाशी पक्षाचे ज्येष्ठ नेते व कार्यकर्ते कशाला लोळण घेतात, ते त्यांना कधीच समजले नाही. त्यामागची पुर्वज व मागल्या पिढ्य़ांची पुण्याई त्यांना अजून उमगलेली नाही. किंबहूना हातात असलेले यश त्यांनी कशाप्रकारे मातीमोल करून टाकले, त्याचेही भान इतक्या लज्जास्पद पराभवानंतर राहुलना आलेले नाही. जे त्यांनी कष्टाने मिळवलेलेच नव्हते, त्याची माती केल्यानंतर कष्टी व्हावे इतकी समजही त्यांच्यापाशी असू शकत नाही. परंतु केजरीवाल व त्यांच्या सहकार्यांविषयी तसे म्हणता येत नाही. कुठलीही पुर्वजांची पुण्याई पाठीशी नाही, तर प्रत्येक बाबतीत मेहनत करून केजरीवाल यांनी राजकारणात आपले एक स्थान निर्माण केलेले आहे. त्यासाठी अनेकांना किती कष्ट उपसावे लागतात, तरी इतके मोठे यश लौकर मिळत नाही, हे केजरीवाल यांनी मोदींच्या राजकीय अनुभवातून नुकतेच बघितले आहे. त्या पार्श्वभूमीवर केजरीवाल आपले यश संभाळून वापरतील अशी अपेक्षा करणे चुक नाही. पण त्याचे कुठलेच भान त्यांना असल्याचे दिसत नाही. जणू पोरखेळ करायला इथवर आलो, असेच त्यांचे वागणे दिसते.
दिड वर्षापुर्वी त्यांच्या पक्षाला अनपेक्षितरित्या दिल्लीत मोठे यश मिळाले होते. दिल्लीकरांनी त्यांच्यावर विश्वास दाखवला होता. त्याला लाथाडून आम आदमी पक्ष थेट देशाची सत्ता हस्तगत करायला धावत सुटला आणि त्याला दिल्लीतही दणका बसला. मात्र या नव्या नेत्याला व त्याच्या सहकार्यांना शुद्धीवर आणण्यासाठी लोकसभा मतदानात दणका देणार्या मतदाराने त्याला वार्यावर सोडलेले नव्हते. त्याच्याकडून अजून लोकांना अपेक्षा होत्या. म्हणूनच ‘केजरीवाल पाच साल’ या घोषणेला प्रतिसाद देऊन लोकांनी पुन्हा या पक्षाला अपुर्व यश दिले. तेव्हा पाच वर्षे दिल्लीकरांना सुसह्य जीवन बहाल करावे, इतकीच त्यांच्याकडून अपेक्षा होती. आणि यादव वा भूषण या नेत्यांचा देशव्यापी होण्याच्या आग्रह नाकारून केजरीवाल दिल्लीत उत्तम कारभार करतील, अशीच अनेकांची अपेक्षा होती. पण पक्षातल्या सहकार्यांना हुसकावून लावण्यापासून अन्य कित्येक घटना केजरीवाल अशा घडवत गेले आहेत, की लोकांना आम आदमी पक्षाला मते व सत्ता देण्याचा पश्चात्तापच व्हायला हवा. मागल्या वेळी लोकपाल विधेयक गैरलागू मार्गाने विधानसभेत आणण्याच्या हट्टापायी केजरीवाल यांनी सत्तेला लाथ मारली होती. आणि ते करताना लोकांच्या इतरही अपेक्षा आहेत, याची पर्वा केलेली नव्हती. आताही पुन्हा पोलिस खाते दिल्ली सरकारच्या हाती असावे असा अट्टाहास करून त्यांनी राजकीय कारभारात व्यत्यय निर्माण करण्याचा अजब पवित्रा घेतला आहे. त्याचे कारण उलगडत नाही. ही बाब पंतप्रधान वा दोन राजकीय पक्ष आपसात बसवून मिटवू शकतील अशी नाही. त्यासाठी कायदे बदलावे लागतील, त्यावर संसदेचे शिक्कामोर्तब व्हावे लागेल. पण त्यासाठी प्रयत्न करण्यापेक्षा केजरीवाल यांनी प्रशासनातच बेबनाव उत्पन्न व्हावा, असा आडमुठा पवित्रा घेतला आहे. म्हणजेच त्यांना कामापेक्षा आपत्ती निर्माण करण्यात अधिक स्वारस्य दिसते.
एका बाजूला दिल्लीकर आज कडक उन्हाळ्यात घुसमटला आहे. अनेक भागात लोकांना पाण्यासाठी वणवण करावी लागते आहे आणि साधा पंखा लावायचा तर विजेचा तुटवडा आहे. पाणी व वीजेचे दर अर्धे करण्यापेक्षा त्याचा पुरेसा व अखंडित पुरवठा, ही दिल्लीकरांची तातडीची गरज आहे. पण त्याकडे साफ़ पाठ फ़िरवून केजरीवाल व त्यांचे सहकारी भलत्याच गोष्टी व मागण्यांसाठी आपली सगळी शक्ती पणाला लावत आहेत. त्यातून त्यांच्याविषयी दिल्लीकर वा अन्य भागातील जनतेचा विश्वास वाढण्यापेक्षा भ्रमनिरास व्हावा, अशीच परिस्थिती दिवसेदिवस निर्माण होत आहे. जंतरमंतर मेळाव्यात एका राजस्थानी शेतकर्याने गळफ़ास लावण्यातून झालेली नाट्यमय आत्महत्या व त्यावरून उठलेले काहूर असो; किंवा कुमार विश्वास या नेत्याच्या विरोधात महिला आयोगाने बजावलेली नोटिस असो, यातून केजरीवाल काय मिळवतात हा अनुत्तरीत प्रश्न आहे. कारण त्या आत्महत्येने पक्षाची प्रतिमा कमालीची डागाळलेली आहे. एक माणूस मेळावा चालू असताना गळफ़ास लावून घेतो आणि नेते मात्र त्याला वाचवण्यापेक्षा भाषणे देत बसतात, हे थरारक नव्हे निर्दय दृष्य होते. त्यावरची टिका केजरीवाल यांना इतकी बोचली, की त्यांनी माध्यमांवरच तोंडसुख घेतलेले आहे. त्यामुळे त्यांची प्रतिमा उजळ होण्याची शक्यता नाही, किंवा लोकांचा विश्वास वाढण्याचीही अजिबात शक्यता नाही. त्यातच कुमार विश्वास या नेत्याच्या चारित्र्यावर कलंक चढला आहे. पक्षाच्याच एका महिला कार्यकर्तीने त्यात पुढाकार घेतला आहे. सहाजिकच या नव्या पक्षाविषयी लोकांच्या अपेक्षा मातीमोल ठरू लागल्या आहेत. आजवर असे आरोप वा आक्षेप इतर पक्षांबद्दल नेहमी घेतले गेले आहेत. पण त्यापासून मुक्त असलेला पारदर्शक व चारित्र्यसंपन्न नेत्यांचा पक्ष अशी आम आदमी पक्षाची प्रतिमा होती, ती आता शिल्लक उरली आहे काय?
मागल्या चार वर्षात विविध आंदोलने व चळवळी यातून जे काही राजकारणबाह्य तरूण नवे चेहरे राजकारणात आले, त्याला आम आदमी पक्ष म्हणून ओळखले जात होते. मात्र निवडणूका लढवताना व सत्तेच्या जवळ पोहोचल्यावर याच नव्या नेत्यांचे मुखवटे गळून पडल्यासारखा हिडीस ओंगळवाणा चेहरा समोर येऊ लागला आहे. काही करण्यापेक्षा नित्यनेमाने प्रसिद्धी झोतात रहाण्याच्या हव्यासाने पछाडलेल्यांची टोळी, अशी त्याची प्रतिमा बनू लागली आहे. अन्य कोणी छेडले नाही, तर आपणच काहीतरी करून वादग्रस्त होण्याचा हव्यास त्याला नडतो आहे, असे वाटण्याची परिस्थिती आहे. नेहमी काही घटना घडली, मग केजरीवाल अन्य पक्ष वा माध्यमावर त्याचे खापर फ़ोडतात. पण त्या घटनेचे धागेदोरे उलगडू लागले, मग त्यात केजरीवाल यांचेच कोणी निकटवर्तिय वा कार्यकर्ते गुंतल्याचे आढळून येते. आताही कुमार विश्वास यांच्यावरील गंभीर आरोप करणारी पहिला आम आदमी पक्षाचीच आहे. गळफ़ास लावून घेणार्या कार्यकर्त्याच्याच कुटुंबियांनी नेत्यांवर आरोप केले आहेत. नायब राज्यपालांच्या अधिकाराला आव्हान देण्याचा गैरलागू प्रकार खुद्द केजरीवाल यांनीच परिपत्रक काढून केला आहे. यादव-भूषण ह्याचे आरोप म्हणजे जुन्या सहकार्यांचे आक्षेप आहेत. थोडक्यात काम करण्यापेक्षा उचापती करण्याकडेच केजरीवाल टोळीचा भर दिसतो. एकदा लोकसभेत दिल्लीकरांनी दिलेला दणका यांना काहीच शिकवून गेलेला दिसत नाही, मिळालेला अधिकार व लोकांचा विश्वास सार्थ करून दाखवण्यासाठी चांगले काम करण्याची इच्छाच या मंडळींना दिसत नाही. उचापतीतून चळवळ आंदोलनाकडे लोकांचे लक्ष वेधून घेण्याच्या मानसिकतेतून हे लोक बाहेरच पडायला व कर्तव्य बजावण्यास तयार दिसत नाहीत. कुत्र्याचे शेपूट कितीही वेळ नळीत घालून ठेवले म्हणून सरळ होत नाही म्हणतात, त्यातलाच प्रकार नाही काय?
लेख पटला भाऊराव. फक्त एक गोष्ट खोप खटकते. केजरीवाल यांना मिळालेलं दुसरं यश निर्भेळ आहे ही समजूत पटली नाही. संघाच्या सहाय्याने मिळवलेलं यश वाटतं. शिवाय २०१५ साली मतदारसंख्या अचानक खूप वाढलीये. २०१३ आणि २०१४ च्या तुलनेने ती खूप फुगलीये. हा फुगवता अनैसर्गिक आहे. यामागे भाजप/संघ आहे.
ReplyDeleteआपला नम्र,
-गामा पैलवान
या मागे भाजप/संघ आहे याचा अर्थ यांनीच आम आदमी पक्ष आणि केजरीवाल यांना निवडून येण्यास मदत केली काय?
Deleteहोय, रामदास पवार. निदान माझातरी तसाच समज आहे.
Deleteआपला नम्र,
-गामा पैलवान
Gama Pailwan is right.
ReplyDelete