दाऊद इब्राहीम हे नाव आता बहुतेक प्रत्येक भारतीयाला ठाऊक झालेले असेल. तो प्रत्यक्षात किती खतरनाक वा भयंकर कारस्थानी आहे ते देवजाणे. पण माध्यमांवर विश्वास ठेवायचा, तर अवघ्या भारतीय कायदा व न्यायव्यवस्थेसह सुरक्षा यंत्रणेलाही दाऊद भारी असावा. अन्यथा त्याला भारतात आणणे वा त्याने भारताला शरण येण्यावरून इतके ढोलताशे कशाला वाजले असते? दर वर्षात एकदा तरी दाऊदचे असे मार्केटींग माध्यमे करीत असतात. कुणीही महत्वाच्या व्यक्तीने दाऊदविषयी काही बोलावे, की माध्यमांनी त्यावर काहूर माजवलेच समजा. आताही नीरजकुमार नावाच्या एका निवृत्त ज्येष्ठ पोलिस अधिकार्याने दाऊद शरण येण्याविषयी काही म्हटले आणि चहूकडे त्यावरून गदारोळ सुरू झाला. पण अशा माणसाला भारतात आणुन वा त्याने इथे येऊन काय होणार आहे, त्याबद्दल अवाक्षर बोलले गेले नाही. शरणागत होण्यासाठी त्याने भारताला कोणत्या अटी घातल्या होत्या आणि त्यावर भारत सरकारने कोणता निर्णय घेतला, याचा उहापोह आजवर कित्येकदा झालेला आहे. प्रसिद्ध वकील राम जेठमलानी यांनी त्याबद्दल वारंवार मतप्रदर्शन केलेले आहे. ते लंडनमध्ये असताना दाऊदने त्यांना तशी ऑफ़र दिल्याचे त्यांचे निवेदन जुनेच आहे. मग अशा जुन्या शिळ्या कढीला ऊत आणण्याचे आता कारण काय? समजा त्यात तथ्य असेल आणि आजही दाऊदला भारतात आणला, तर आपण त्याचे करणार काय? इथेच आपल्या ताब्यात असलेल्या टुंडा नामक जिहादी संशयिताला वर्षभरापुर्वी ताब्यात घेतलेला होता. त्याचे पुढे काय झाले? मशरत आलम नावाच्या काश्मिरी फ़ुटीरवाद्याला दिर्घकाळ गजाआड ठेवून काय साधले गेले आहे? ज्याच्यावर पंडितांना काश्मिर खोर्यातून पळवून लावण्याचा व हिंसेचा आरोप होता, त्या यासिन मलिकचे काय होऊ शकले आहे? मग दाऊदचे तरी काय होणार?
दाऊद जसा वॉन्टेड आहे, तसाच मौलाना अझहर महमूद भारताच्या तावडीत सापडला होता. त्याला कुठली शिक्षा आपण देऊ शकलो? काही वर्षे तो तुरूंगात राहिला आणि एक दिवस त्याच्या सुटकेसाठी भारतीय प्रवासी विमानाचे अपहरण झाले. मग नाक मुठीत धरून तीन तशा खतरनाक जिहादींना अफ़गाणिस्तानच्या भूमीत नेवून सोडण्याची नामुष्की भारताच्या वाट्याला आली. थोडक्यात जे भारतीय कायदा व प्रशासनाच्या ताब्यात आहेत, त्यांनाही खटले चालवून शिक्षा ठोठावण्यात आपली यंत्रणा तोकडी पडते, हाच आजवरचा अनुभव आहे. कसाबसारखा गुन्हेगार जगाच्या साक्षीने मुंबईत मोकाट मुडदे पाडत बोकाळला होता. त्याला शिक्षापात्र ठरवण्यात किती वर्षे खर्ची पडली? त्याची शिक्षा निश्चीत झाल्यावरही त्याला प्रत्यक्षात फ़ाशी देताना किती आढेवेढे घेतले गेले? तीच कथा संसद भवनावरच्या हल्ल्यातील सदोष ठरलेल्या अफ़जल गुरूची आहे. त्याच्यावरचा गुन्हा सिद्ध झाल्यावरही त्याच्या शिक्षेची अंमलबजावणी करताना किती वर्षे गेली? राष्ट्रपती भवन आणि गृह खात्याच्या अडगळीत किती वर्षे त्यांचे दयेचे अर्ज धुळ खात पडलेले होते? ज्यांना दया हा शब्दच ठाऊक नाही, इतकी निर्दयता असल्यामुळे कुप्रसिद्ध आहेत, अशा गुन्हेगारांचे दयेचे अर्ज निकालात काढायला भारतीय प्रशासन व न्याय व्यवस्थेला कित्येक वर्षे लागतात. अशा देशात दाऊद शरण आला, म्हणून त्याच्यावरचे गुन्हे सिद्ध करून तो शिक्षा भोगायला जाईल, अशी कोणी हमी देऊ शकतो काय? उलट उद्या त्यांच्या सुटकेसाठी भारतीय विमान पळवले, जाऊन त्यातल्या निरपराध प्रवाश्यांना ओलिस ठेवले जाण्याची शक्यता मात्र असू शकते. म्हणूनच दाऊदला आणणार किंवा शरण येणार हा मुद्दा दुय्यम असून, आलाच तर भारतीय कायदे त्याचे काय करतील हा मुद्दा महत्वाचा आहे. पण त्यावर कोणी चकार शब्द बोलत नाही.
जुना हरवलेला भाऊ वा विस्थापित कुटुंबातील कोणाची नव्याने भेट घडवून आणण्यासारखा हा विषय नाही. शेकडो लोकांच्या जीवाशी ज्याने खेळ केला आणि निष्पाप लोकांची हत्या घडवून आणली, अशा व्यक्तीला त्याच्या गुन्ह्याला शासन देण्याचा हा विषय आहे. म्हणूनच त्याला आणण्यापेक्षा व त्याने शरण येण्यापेक्षा, त्यानंतर काय करायचे हा विषय अगत्याचा आहे. अशा कुठल्याही गुन्हेगाराला तात्काळ वा अल्पावधीत शिक्षा देण्याची कुठली सज्जता भारतात आहे काय? आणि नसेल तर ती कशी सज्ज केली जाणार; हा मुद्दा अगत्याचा आहे. आजची न्यायव्यवस्था व कायदाप्रणाली गुन्हेगाराला खुप संरक्षण देते आणि पिडीत वा बळी पडलेल्यांविषयी तीच यंत्रणा कमालीची उदासिन आहे. त्याची चर्चा महत्वाची आहे. ती अधिक परिणामकारक व प्रभावी बनवली, तरच दाऊद वा तत्सम गुन्हेगारांना कायद्याच्या कचाट्यात आणण्याचा उपयोग होऊ शकतो. अन्यथा कुठलाही व कितीही खतरनाक गुन्हेगार शरण यायला वा पकडला जाण्याला घाबरण्याचे कारण नाही. उलट त्याला भारतीय कायद्याच्या तावडीत सापडणे अधिक सुखाचे व सुरक्षित वाटते ही वास्तविकता आहे. दाऊदही त्याला अपवाद नाही. म्हणूनच त्याने खुप पुर्वीच भारताला शरण येण्याचा विषय कोणाकडे छेडला असेल, तर नवल नाही. पाकिस्तानने त्याला आश्रय व संरक्षण दिलेले असले, तरी उद्या काम संपले तर पाकिस्तानच दाऊदचा खात्मा करण्याचे भय अधिक आहे. केव्हा आणि कुठे दाऊदला गायब करतील, त्याचा पत्ताही लागणार नाही. त्यापेक्षा भारतीय कायद्याच्या ताब्यात असणे नक्कीच सोयीस्कर असू शकते. इथे सोहराबुद्दीन सारख्या गुन्हेगाराच्या चकमकीतल्या मृत्यूसाठी बडेबडे पोलिस अधिकारी कित्येक वर्षे गजाआड खितपत पडू शकतात. पण दाऊदसारख्या क्रुर खतरनाक गुन्हेगाराला निसटण्याची संधी देणारे उजळमाथ्याने वावरू शकतात.
अशा भारताला शरण येण्याचे भय दाऊदला कशाला असेल? त्याचाच भाऊ मुस्तकीन दुबईतून भारतात आणला गेला. काय झाले त्याचे? कुठला गुन्हा सिद्ध झाला त्या मुस्तकीनच्या विरोधात? आज तो मुंबईत मुक्त वावरतो आहे ना? कुठल्या हत्याकांडात दाऊदची बहिण हसिनाबी आरोपी होती, तिला शिक्षा होऊ शकली आहे काय? कुठले एक उदाहरण वा दाखला आहे काय, की जिथे फ़रारी असलेल्या खतरनाक गुन्हेगाराला कठोर शिक्षा होऊ शकली? दहा वर्षे उलटून गेली सलमान खानवर दोन गुन्हे दाखल होऊन गाजत आहेत. राजस्थानातील काळ्या हरणाच्या शिकारीचा व मुंबईत पादचार्यांच्या अंगावर गाडी घालून माणसाची शिकार केल्याचा. त्यापैकी एका खटल्याचा तरी दहा वर्षात निकाल लागू शकला आहे काय? टोलवाटोलवी आणि दिरंगाईने खटलेही चालताना मानवी आयुष्य़ संपून जाते. साक्षीदार मरून जातात आणि जिवंत असले तरी त्यांची स्मृती दुबळी होऊन जाते. अशी आपल्या न्यायव्यवस्थेची गती आहे. इतक्या दिर्घकालीन कामकाजात दाऊद हयात तरी राहू शकेल काय? मुंबई बॉम्बस्फ़ोट खटल्यातील अनेक आरोपी मृत्यूनंतर दोषी ठरले. ठराविक वर्षे उलटून गेल्याने त्यांना जामीन द्यावा लागला होता. या संथगतीला वेगवान बनवण्याची गरज आहे. तरच गुन्हेगार व आरोपींना गुन्हा करण्याचे भय वाटावे, अशी स्थिती येऊ शकते. अन्यथा एकामागून एक गुन्हे करायची हिंमत यावी, अशी एकूण व्यवस्था आहे. त्यात दाऊद शरण आला तर त्याचा बंदोबस्त आणि तुरूंगातील व्यवस्था याचा मोठा बोजा बिचार्या जनतेला सरकारी तिजोरीतून उचलावा लागेल. त्यानंतरही तो दोषी ठरला, तरी शिक्षेच्या अंमलबजावणीची हमी देता येत नाही. मग दाऊद हवा कशाला? असल्या निरर्थक चर्चा करण्यापेक्षा कायदा व न्यायव्यवस्था परिणामकारक व्हायच्या दिशेने सहाय्य होईल, अशा चर्चा करणे अगत्याचे नाही काय?
दाऊद ला पकडून आणून वेळ आणि पैसा व्यर्थ करण्यापेक्षा त्याचे आपल्या देशातील सगळ्या क्षेत्रात असलेल्या देशद्रोही हितसंबंधी अशा प्रत्येक व्यक्तिवर करवाई करणे योग्य राहील !!! कारण आज दाऊदला ते मदत करताय उद्या दाऊद ला पकडून आणल तरी ते दुसऱ्या कोणाला ना कोणाला मदत करणारच !!!
ReplyDeleteBhau , mi tumachyashi sahmat nahi..... karan saddhya nasslelya nyayalayin sudharanemule aapan tyala thite MAJA maru dyayachi ka?
ReplyDeleteaapan tyala ithe aanun media ne kinva andolananni sarkarla tyala lavkarat lavkar fashi denyas bhag padu shakato..
Dawood tithe maja marat asla asa gruhit dharala tari te aplya deshala kavdihi kharch na padata ulat pakistanlach tyala sambhaloon pan lapvoon thevava lagtay.. ata Dubai ani sabyukta arab amirati madhe suddha tyachta hibdnya phirnyawar bandhane yenaar he lihoon ghya Deshpandeji.
ReplyDelete