Saturday, May 2, 2015

गजेंद्रच्या भगिनीचा लाजवाब सवाल



आम आदमी पक्षाच्या जंतरमंतर येथील मेळाव्याच्या प्रसंगी गजेंद्र सिंग या राजस्थानच्या कार्यकर्त्याने गळफ़ास लावून आत्महत्या केल्याचे प्रकरण गाजते आहे. त्यात उलटसुलट मुद्दे पुढे आणले जात आहेत. त्याचवेळी अज्ञातवासातून माघारी परतलेले राहुल गांधी यांनी कॉग्रेसतर्फ़े भूमी अधिग्रहण कायदा विरोधाचे नेतृत्व हाती घेतले आहे. त्यासाठी मग त्यांनी आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांच्या कुटुंबियांना भेटून सहानुभूती दाखवण्यापेक्षा सहानुभूती मिळवण्याचे नियोजन केलेले आहे. प्रत्येक राजकीय पक्ष आपापल्या परीने अशा नाजूक व गंभीर विषयाचे राजकीय लाभ उठवायला पुढे सरसावला आहे. अगदी माध्यमेही मागे नाहीत. इतक्या जीवघेण्या विषयाचा निचरा होण्यापेक्षा त्यातून सनसनाटी माजवण्याचाही प्रकार लपून राहिलेला नाही. मग यात कुणीच संवेदनाशील नाही काय? कोणी यातली खरी समस्या समजून घ्यायला तयार नाही काय? असेल तर जंतरमंतर येथे बळी पडलेल्या गजेंद्र सिंग याच्या भगिनीने त्यांच्यासाठी एक साधासरळ प्रश्न विचारला आहे. जमेल तसे प्रत्येकाने त्याचे उत्तर शोधायला हरकत नाही. त्या घटनेनंतर जे काहुर माजले, तेव्हा प्रत्येकजण आपापले स्वार्थ व हेतू बघूनच त्याविषयी मतप्रदर्शन करत राहिला आहे. पण कितीजण त्यातली खरी वेदना ओळखू शकले आहेत? प्रत्येकाने आपणच खरे दु:खीकष्टी झालोत असे भासवण्याचा यशस्वी प्रयत्न केला यात शंका नाही. पण त्यापैकी कोणीही गजेंद्रच्या भगिनीच्या प्रश्नाचे उत्तर देवू शकलेला नाही. कारण तिचा तो प्रश्नच निरूत्तर करणारा व तमाम सहानुभूतीदारांचे वस्त्रहरण करणारा आहे.

आम आदमी पक्षाचा हा मेळावा होता आणि गजेंद्र झाडावर चढून गळफ़ास लावून घेत असल्याचे दिसत असूनही पक्षाचा नेत्यांनी त्याला वाचवणे सोडून भाषणाचा रतीब चालूच ठेवला होता. मग दोन दिवसांनी पक्षाचे सर्वेसर्वा व मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी घटनेबद्दल माफ़ी मागितली. पुढे जाऊन गजेंद्रच्या कुटुंबियांना दहा लाख रुपये त्या पक्षातर्फ़े देऊ करण्यात आले. त्यावर मृताच्या भगिनीने काय प्रश्न विचारला होता? माझा भाऊ जीवंत करणार असाल, तर मीच तुम्हाला उलटे दहा लाख रुपये देते. तुमच्यापैकी कोणी दहा लाखासाठी मरायला तयार असेल, तरी आपण दहा लाख द्यायला तयार आहोत; असे त्या भगिनीने सांगितले आहे. कोणी मायका लाल अजून तिला उत्तर द्यायला धजावलेला नाही. तिथेच आपल्या प्रतिष्ठीत, राजकारणी व विश्लेषकांच्या तमाम शब्दांच्या बुडबुड्यांची किंमत लक्षात येते. शेतकरी असो किंवा अन्य कोणी कर्जबाजारी व्यक्ती असो, ती आत्महत्या करते, तेव्हा त्याची भरपाई कुठल्याही मार्गाने होऊ शकत नाही. मग त्यासाठी सरकारने देऊ केलेले लाखो रुपये असोत, किंवा त्या निमीत्ताने उठवलेला आवाज असो. मागल्या दिडदोन दशकात देशभरात पन्नास हजाराहून अधिक शेतकर्‍यांनी कर्जबाजारी होण्याला कंटाळून मृत्यूला कवटाळले आहे. त्यावर बौद्धिक चर्चा खुप झाल्या आणि राजकारणही खुप झाले. बारा वर्षापुर्वी त्याचे प्रमाण आंध्रप्रदेशात सर्वाधिक होते आणि त्यासाठी तात्कालीन कॉग्रेसनेते राजशेखर रेड्डी यांनी कित्येक महिने राज्य पिंजून काढले व सत्तांतर घडवले होते. संगणक व माहिती तंत्रज्ञान उद्योगाच्या आहारी गेलेल्या मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी शेतकर्‍याला व ग्रामीण जनतेला वार्‍यावर सोडल्याचा प्रचार करीत रेड्डी यांनी आंध्रात सत्तांतर घडवले होते. तेव्हा इतर राज्यात शेतकरी आत्महत्येचा विषय फ़ारसा नव्हता. त्याचवेळी देशात वाजपेयींचे एनडीए सरकार जाऊन युपीएचे सरकार सत्तेवर आले. पुढल्या अकरा वर्षात कर्जबाजारी शेतकरी व त्यांच्या आत्महत्या हा देशव्यापी विषय होऊन गेला. पण त्यावर काहुर माजवणार्‍या सर्वांनीच त्यावर कोणता उपाय शोधला व योजला; त्याचे उत्तर नकारार्थी आहे. आणि म्हणूनच गजेंद्रच्या भगिनीने विचारलेला प्रश्न अशा प्रत्येकाला हाणलेली सणसणीत थप्पडच आहे. कारण मृताच्या कुटुंबियांना भरपाई देण्यापलिकडे त्याच प्रश्नावर कुठलाही अस्सल उपाय, एक तप उलटून गेल्यावरही शोधला गेलेला नाही.

एक शेतकरी आत्महत्या करतो, तेव्हा तो कुटुंबप्रमुख असतो आणि म्हणूनच त्याच्या आत्महत्येसोबत एक संपुर्ण कुटुंबच उध्वस्त होऊन जात असते. लाखांच्या भरपाईने कदाचित त्याची देणी चुकती होत असतील, किंवा कुटुंबातल्या हयात लोकांच्या जगण्याला थोडा आधार मिळत असेल. पण त्या घराचे भावविश्वच उध्वस्त होऊन जाते, त्याचे पुनर्वसन कधी होऊ शकते काय? एक माणुस स्वत:ला कशामुळे मारतो आणि आपलेच कुतुंब कशासाठी उध्वस्त करतो, असा प्रश्न आहे. त्याच्या आयुष्यात सर्वच आशा व उमेद तो हरवून बसलेला असतो, म्हणूनच त्यापासून पळ काढायला प्रवृत्त होतो. ही त्याच्यापेक्षा एकूण समाजासाठी लाजीरवाणी बाब असते. त्याची किंचितही लाज जर समाजाचे कुटुंबप्रमुख म्हणून मिरवणार्‍यांना नसेल, तर देशाने कोणाच्या तोंडाकडे बघावे? आपल्या चारसहा लोकांच्या कुटुंबाला दोन वेळचे अन्न घालू शकत नाही आणि डोक्यावर चढलेले कर्ज फ़ेडू शकत नाही, याची शरम वाटल्याने असा शेतकरी आत्महत्या करत असतो. मग बारा वर्षात पन्नास हजार शेतकरी अशी आत्महत्या करतात, त्याची देश व समाजाच्या म्होरक्यांना किती लाज वाटायला हवी? ती कुठे दिसते आहे काय? गजेंद्रच्या भगिनीने तोच सवाल केला आहे. ती पैसे नको म्हणाली नाही, तर पैसे मोजून तुम्ही आत्महत्येला प्रोत्साहन देताय, अशी चपराक तिने हाणली आहे. ती जितकी पैसे देऊ करणार्‍यांना हाणली आहे, तितकीच ती त्यावर कोरड्या रसभरीत चर्चा करणार्‍यांना मारलेली थप्पड आहे. शिळोप्याच्या गप्पा मारल्यासारख्या चर्चा करायच्या, पण आत्महत्येपासून शेतकर्‍यांना परावृत्त करणे हा विषय पटावर येत नाही. याबद्दल तिने व्यक्त केलेला तो संताप आहे. उचलून दहा लाख रुपये मरणार्‍याला देऊ करण्याइतकी गजेंद्रची बहिण पैसेवाली नाही. म्हणून तिने उच्चारलेले शब्द शब्दश: घेता येत नाहीत. पण प्रत्येक गोष्ट व घटना पैशात मोजण्याच्या अमानुष वृत्तीवर तिने नेमके बोट ठेवलेले आहे.

सामान्य माणूस निव्वळ मरण्यासाठी जन्माला येतो आणि त्याने निमूट मरावे. बदल्यात भरपाई म्हणून किंमत घेऊन त्याच्या आप्तस्वकीयांनी त्याला विसरून जावे. ही अपेक्षा आजचे राज्यकर्ते वा समाजातले प्रतिष्ठीत करतात, त्याविषयी एका सामान्य महिलेने फ़ोडलेला तो टाहो आहे. उन्नीकृष्णन नावाचा कमांडो मुंबई हल्ल्यात ठार झाला, तर त्याच्याविषयी केरळचे तात्कालीन मुख्यमंत्री अच्युतानंदन यांनी असेच कोरडे भाव दाखवले होते. सीमेवर गर्दन छाटली गेल्यावर गावी आणलेल्या सैनिकाच्या मृतदेहाविषयी असेच भावनाशून्य वक्तव्य एका बिहारी मंत्र्याने केलेले होते. त्यापेक्षा आत्महत्येवर होणार्‍या चर्चा किंवा भरपाईचे धनादेश किती वेगळे असतात? गजेंद्रच्या भगिनीने त्याच सभ्य नागरी वर्तनावर लावलेले हे प्रश्नचिन्ह म्हणूनच गंभीर आहे.

मी मराठी  (खुसपट) २/५/२०१५

2 comments:

  1. भाऊ! या गजेंद्रसिंहच्या बहिणीचे तर असे मत होते की आम आदमी पक्षानेच माझ्या भावाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले. ती म्हणाली की मी टिव्हीवर पाहिले की केजरीवाल की त्यांच्या शेजारी बसलेला नेता स्वतःच्या गळ्यावर हात फिरवून विचारत होता की काम झाले का? तिला तिच शंका आहे.

    ReplyDelete
  2. Horrible kejri

    ReplyDelete