‘झुंडीच्या कृत्यामागील बर्याचशा प्रेराणा सुप्त स्वरूपात असतात. झुंडी नेहमी टोकाला जाऊन वागतात. धरसोड त्यांना माहित नसते. प्रत्येक कृती त्या मनापासून करतात. परंतु कोठलेच कृत्य त्या विचारपुर्वक करीत नाहीत. कारण झुंडी नेहमी प्रक्षुब्ध मनोविकाराचा दडपणाखाली जगतात. परिणामी ज्या कारणांमुळे त्या प्रक्षुब्ध होतात त्या कारणांचे प्रतिबिंब त्यांच्या कृत्यामध्ये दिसते. तसेच कोणत्याही कारणामुळे झुंडी प्रक्षुब्ध बनू शकत असल्याने झुंडीच्या वर्तनामध्ये कधीसुद्धा सातत्य आढळत नाही. झुंडींचे वर्तन अत्यंत चंचल असते. प्रत्येक झुंड बाह्य वातावरणाची गुलाम असते. एकेकट्या व्यक्ती स्वत:च्या प्रतिक्षिप्त कृत्यावर नियंत्रण ठेवू शकतात. झुंडींना ते शक्य नसते. कोठलीही प्रेरणा झुंडीला उत्तेजित करू शकते. औदार्य, क्रौर्य, शौर्य, धैर्य, भेकडपणा, झुंड यातल्या कोठल्याही प्रेरणांच्या आहारी जाऊ शकते व त्या प्रेरणेला साजेसे वर्तन करू शकते. झुंडीच्या प्रेरणा नेहमी अत्यंत प्रबळ असतात. इतक्या प्रबळ की स्वत:चे रक्षण करावे या उपजत प्रेरणेलाही त्या प्रसंगी छेद देतात. अनेक कारणांनी झुंडी क्षुब्ध होतात. त्यामुळे झुंडीचे स्वरूप नेहमी अस्थीर असते. त्यांना प्रक्षुब्ध बनवणार्या कारणांच्या अधीन झुंडी असतात. हिंसाचाराला उद्युक्त झालेल्या झुंडी पुढल्या क्षणी आत्मबलिदान करायला मागेपुढे पहात नाहीत. जुलूम करायला निघालेल्या झुंडी त्यागाचे कृत्य करायला कशा तयार होतत, याचा उलगडा यात होतो. फ़ाशी द्यायला निघालेल्या मांगाची भूमिका झुंडी जितक्या तत्परतेने करतात, तितक्याच तत्परतेने आत्मबलिदानासाठी फ़ाशीच्या तख्तावर चढलेल्या देशभक्ताची भूमिका सुद्धा त्या करू शकतात. जगामध्ये अनेक प्रकारच्या यशस्वी श्रद्धा आपल्याला दृष्टीस पडतात. त्या प्रत्येक श्रद्धेच्या विजयासाठी रक्त कोणी सांडले असेल तर या झुंडीनीच होय.’
विश्वास पाटील नावाचे दिवंगत चिकित्सक लेखक यांच्या ‘झुंडीचे मानशास्त्र’ या पुस्तकातील हा उतारा आहे. मागल्या आठ दिवसात ज्या घटनांचा प्रभाव भारतीय समाजमनावर पडला, त्याचे विश्लेषण करताना आपली माध्यमे व विचारवंतही गोंधळून गेलेले आहेत. गुन्हेगार असलेल्या व कोणातरी गरीबाचा जीव घेणार्या सलमान खान या लोकप्रिय अभिनेत्याचे समर्थन करणारा जमाव बघून विचारवंत विचलीत झाले. पत्रकार माध्यमे अशा जमावाची हेटाळणी करीत होती. पण तीच गुन्ह्याला पाठीशी घालण्याची वृत्ती तशीच्या तशी आपल्याला याच बुद्धीवादी वर्गातही दिसून येते ना? तीस्ता सेटलवाडची पाठराखण करणारा हाच बुद्धीजिवी वर्ग असतो, तेव्हा त्याला न्याय वा कायद्याची चाड नसते. कारण तेव्हा बुद्धीजिवी म्हणून मिरवणारा तोच वर्ग तितकाच झुंड झालेला असतो, जितका सलमानचा चहाता ताळतंत्र सोडून त्याचे कौतुक करतो आणि मारला गेलेल्या विषयी संपुर्ण संवेदनाशून्य असतो. नेहमी गुजरातच्या दंगलपिडीतांचाठी अश्रू ढाळुन त्यांच्या वेदनांचा टाहो फ़ोडणारे तेच ते पत्रकार तीस्ता प्रकरणात तक्रारदार दंगलपिडीताच्या तक्रारीविषयी कसे असंवेदनाशील होतात? कारण तीस्ता त्यांच्या झुंडीची प्रेरणा असते. तीस्ता मोदी व भाजपाची कट्टर विरोधक आहे म्हटल्यावर, तक्रार वा आरोपाविषयी अशा शहाण्यांची बुद्धी काम करीनाशी होते. नेमकी तशीच सामान्य जनतेची बुद्धी आपल्या लोकप्रिय नेता जयललिता वा सलमानच्या बाबतीत काम करीत नसते. थोडक्यात बुद्धीमंत असो किंवा सामान्य नागरिक असोत, त्यांच्यातली झुंडवृत्ती सारखीच असते आणि अगदी तशीच्या तशी कार्यरत होत असते. एक जमाव प्रेमाने उत्तेजित झालेला असतो, तर दुसरा द्वेषाने प्रेरीत झालेला असतो. अशा उत्तेजित झालेल्या झुंडीकडून कुठलीही कृती विचारपुर्वक होऊ शकत नसते. मग ती जनता असो किंवा बुद्धीमंत असोत.
ए्केकटे असताना अशा लोकांशी तुम्ही बोललात तर त्यांच्या प्रतिक्रिया व प्रतिसाद भिन्न असू शकतात. पण जेव्हा त्यांच्या त्यांच ठरलेल्या ‘भूमिका’ वा प्रेरणांचा विषय येतो, तेव्हा त्यांच्या समूह प्रतिक्रिया एकसारख्या असतात. पोलिसांकडे दंगलपिडीतांनी तीस्ता सेटलवाडच्या अफ़रातफ़रीचे पुरावे दिलेले आहेत आणि त्यानुसारच तिच्या विरोधात गुन्हा नोंदलेला आहे. त्यानंतर पोलिसांनी तिला अटक केली नव्हती, तर तपास सुरू केला होता. तीस्ता प्रामाणिक असेल तर तिथेच हिशोबाचे कागद व ताळेबंद देऊन विषय निकालात निघाला असता. पोलिसांना तिच्या अटकेचे निमीत्त मिळू शकले नसते. पण हिशोब व कागदपत्रे देण्याची टाळाटाळ झाली आणि तिला ताब्यात घेऊन तपास पुढे नेण्याची वेळ पोलिसांवर आलेली आहे. तसा सुगावा लागताच तीस्ताने जामिनासाठी धावाधाव सुरू केलेली आहे. दोन हायकोर्टांनी जामिन देणे नाकारले आणि तीस्ताला सुप्रिम कोर्टात धाव घ्यावी लागली. तिथेही तिला अटकपुर्व जामिन मिळू शकलेला नाही, तर अटकेला स्थगिती दिलेली आहे. पण तशी स्थगिती देताना त्याही कोर्टाने तीस्ताला अटी घातल्या आहेत. त्या अटी कोणत्या आहेत? तिने पोलिसांना अवश्यक ती कागदपत्रे व ताळेबंद दिला पाहिजे. असे असताना तीस्ताचे समर्थक काय म्हणतात? तीस्तावर सरकार व गुजरात पोलिस सूडबुद्धीने कारवाई करीत आहेत. तीस्ताने कधीच हिशोब दिलेला आहे. याला काय म्हणायचे? गुजरात पोलिस तसे काही करत असते आणि हिशोब आधीच दिलेले असते, तर सुप्रिम कोर्टाने तशी अट तीस्ताला स्थगितीसोबत कशाला घातली असती? पण हे वास्तव तीस्ताचे बुद्धीवादी समर्थक बघू शकत नाहीत, किंवा समजू शकत नाहीत. देशाच्या कानाकोपर्यात पसरलेले तीस्ताचे सेक्युलर बुद्धीमान समर्थक आणि जयललिताचे वा सलमानचे चहाते यांच्यात कितीसा फ़रक शिल्लक उरतो?
नरेंद्र मोदी यांचे समर्थक आहेत त्यांचीही कहाणी वेगळी नाही. आपला लाडका नेता कुठली चुक करू शकत नाही, अशी त्यांची ठाम श्रद्धा आहे. म्हणून मग हे सेक्युलर बुद्धीमंत त्या समर्थकांची मोदीभक्त अशी हेटाळणी करीत असतात. पण मग त्यांची तीस्ताभक्ती किती वेगळी आहे? ज्या तीस्तावर सुप्रिम कोर्टाने कागदपत्र देण्याची अट घातली, ती त्यांच्या डोक्यात शिरत नाही. याला अंधश्रद्धा नाही तर काय म्हणायचे? कुठे काही चुकले वा अडचण आली, मग विनाविलंब ग्रहदशा विपरित असल्याचा निष्कर्ष काढणार्यांना आपली कुठे चुक झाली वा वास्तव काय आहे, त्याची तपासणी करायची गरज नसते. गुरू वा शनि कुठे वाक्री आहे, त्याबद्दल त्यांना पुर्ण खात्री असते. अगदी त्याचेच प्रतिबिंब आपण दाभोळकर वा पानसरे हत्याकांडात बघू शकतो. नुसती बातमी कानी आली आणि प्रत्येक सेक्युलर बुद्धीने नथूरामवृत्ती यामागे असल्याचा सामुहिक निष्कर्ष काढला. तो सिद्ध करायला मात्र कुठला आधार नाही. ती जबाबदारी पोलिसांची असते. आता तीस्तावर पुराव्यानिशी आरोप झाले वा गुन्ह्याची नोंद झाली, तरी ती सुडबुद्धी असते आणि इथे कुठल्याही पुराव्याशिवाय हिंदूत्ववादीच खुनी असल्याचा आरोप केला, तर तो बुद्धीवाद असतो. असे आरोप करणारे मनापासून बोलत असतात, कारण त्यांची तशी ठाम समजूत असते. ते मनापासून बोलत असतात. पण विचारपुर्वक बोलत नसतात. कारण ते झुंडीच्या प्रेरणेने वागत व बोलत असतात. विज्ञान वा कायद्याला पुरावा लागतो, श्रद्धेला वा अंधश्रद्धेला पुरावा लागत नाही. आणि झुंड कधीच विचार करत नाही, विवेक वापरत नाही. मग त्यापैकी कोणी आपल्याला समर्थक, भक्त, चहाते म्हणावे किंवा बुद्धीमंत म्हणून मिरवावे. ते झुंडीच्या मानसिकतेचे बळी असतात. त्यांना आपली बुद्धी वापरता येत नसते. ते झुंडीचा एक घटक म्हणून समजुतीमध्ये जगत वागत असतात.
No comments:
Post a Comment