Saturday, May 2, 2015

वैवाहिक बलात्कारातला बुद्धीजिवी ‘पुरूषार्थ’



कुठल्याही शहाण्या व बुद्धीमान वर्गाची एक मोठी समस्या असते ती जाणतेपणाची. आपण बुद्धीमान आहोत म्हणून जगातल्या सर्वच प्रश्नांची व समस्यांची उत्तरे व उपाय आपल्याला गवसले आहेत, अशा समजूतीमध्ये हा वर्ग वागत असतो. तसे त्यांनी वागायला काहीही हरकत नाही. पण जेव्हा अशी मंडळी सर्वसामान्य लोकांच्या जीवनात आपली मते लादू लागतात, तेव्हा समस्या सुरू होत असतात. कारण अशा प्रतिष्ठीतांसाठी जी बाब तात्विक असते, ती सामान्यांच्या जीवनात वास्तविक असते. कालपरवा वैवाहिक बलात्कार असा एक विषय बर्‍याच वाहिन्यांवर चर्चिला जात होता. त्यामध्ये एकाहून एक जाणते व कायदेपंडित, आपापले पांडित्य कथन करीत होते. ते ऐकून सामान्य माणसाला कितपत काय उमगले, हा संशोधनाचा विषय आहे. पण असा काही बलात्काराचा वेगळा प्रकार असतो, हे आपल्या समाजातील जाणत्या बुद्धीमंतांना कधी उमगले, हा सुद्धा एक संशोधनाचा विषय व्हायला हरकत नाही. कुठल्याशा संशोधनात म्हणे ७५ टक्के विवाहिता महिलांना मनाविरुद्ध पतीच्या इच्छेचे बळी होऊन बलात्कार सोसावा लागतो, असे समोर आले. मग त्याही अनुभवाला कायद्याच्या कक्षेत आणायचा आग्रह झाला. कारण पुढारलेल्या देशात तसे कायदे आहेत आणि त्यावर कारवाईची तरतुद आहे. म्हणून मग इथेही अशी कायदेशीर तरतुद मागितली गेली. त्यावर कुणा मंत्र्याने विवाहाचे बंधन पवित्र असल्याने तशी कायदेशीर तरतुद भारतात होऊ शकत नसल्याचे उत्तर दिल्याने; हे तमाम विचारवंत व्यथित व संतप्त झाले होते. लगेच त्यांना आपला देश व समाज तद्दन मागास व मध्ययुगीन रानटी समाज वाटू लागल्याचे, या चर्चांमधून स्पष्ट जाणवत होते. मुद्दा इतकाच, की वैवाहिक जीवनात महिलेच्या वाट्याला जे शारिरीक अनुभव येतात, ते बलात्कार सादृष असतात हे या बुद्धीजिवींना कधी उमगले?

अर्थात त्याचे उत्तर आधीच आलेले आहे. कुठल्याशा संशोधनाने ते सिद्ध केले आहे. अशाप्रकारचे संशोधन अर्थातच लोकमत आजमावून केलेले असणार आणि संशोधन कार्याचे जे काही निकष आहेत, त्यानुसारच ही पहाणी झालेली असणार, याबद्दल शंका घ्यायचे कारण नाही. पण जे आपण नित्यनेमाने जीवनात अनुभवत असतो, ते संशोधनातून समोर येण्याची काही गरज असते काय? जे कोणी बुद्धीमंत अशा चर्चेत मतप्रदर्शन करत होते, त्यापैकी प्रत्येकाच्या घरकामासाठी मोलकरीण येतच असेल आणि तिचे अनुभव कथन होतच असतील. जे संशोधनाने समोर आले, तेच प्रतिष्ठीतांच्या घरच्या मोलकरणी दु:ख म्हणून बोलून दाखवतात. आणि तो अनुभव अगदी उच्चभ्रू सुखवस्तु कुटुंबातही नवा नाही. याविषयी कोणाच्या मनात शंका असेल, तर त्यांच्या स्मृती चाळवण्यासाठी एक गोष्ट सांगणे भाग आहे. मधल्या साडेतीन दशकात मराठी-हिंदी चित्रपटात एक अभिनेता खुप गाजला आणि अजूनही अशा सामाजिक विषयात त्याचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न होतो. त्याचे नाव नाना पाटेकर. नानाची कारकिर्द कशामुळे गाजली, त्याचे आजच्या बुद्धीमंत व पत्रकारांना स्मरण आहे काय? जयवंत दळवी यांचे ‘पुरूष’ नावाचे मराठी नाटक १९८० च्या दशकात रंगमंचावर आले. विजया मेहता यांनी दिग्दर्शित केलेल्या याच नाटकाने नानाला अफ़ाट प्रसिद्धी मिळवून दिली आणि त्याच्या अभिनयाने व भूमिकेने ते नाटक इतके व्यापले, की पुढल्या काळात त्याचे प्रयोग अन्य कोणी अभिनेता करू शकला नाही. त्यात पुरूषी अहंकार व रानटी मानसिकतेचाच विषय होता. बलात्काराचा विषयच त्या नाटकाने बोचर्‍या अविष्कारातून समोर आणला होता. आज बुद्धीमंत संपादक म्हणून मिरवणार्‍या बहुतेकांनी ते नाटक जरूर बघितलेले असेल. त्यात वैवाहिक बलात्काराचा विषय सर्वप्रथम चर्चिला गेला होता. तेव्हा यातल्या सर्वांची बुद्धी झोपा काढत होती काय?

आज पहाणी अभ्यास व संशोधन या मार्गाने जो वैवाहिक बलात्काराचा विषय पटलवर आला आहे, तो त्याच ‘पुरूष’ नाटकात अगदी सहजगत्या येऊन गेलेला आहे. ते नाटक बघणार्‍या बुद्धीमान जाणत्यांना ते सत्य उमगण्यासाठी तीन दशकानंतरच्या संशोधनाची गरज भासावी, यातच त्यांच्या बुद्धीची कींव करावीसे वाटते. मुजोर पुढारी असलेला नाना सामाजिक कार्य करणार्‍या रिमा लागू या तरूणीला डाक बंगल्यावर बोलावून बलात्कार करतो आणि रिमा त्या अन्यायाच्या विरोधात न्याय मिळावा म्हणून जंग जंग पछाडते, असे कथानक आहे. त्याच काळात तिची एक सुखवस्तु मैत्रिण तिला भेटायला व सहानुभूती व्यक्त करायला येते, असा प्रसंग नाटकात आलेला आहे. तिच्याशी बोलताना बलत्कारिता रिमा तिला आपला अनुभव कथन करते. बलात्काराच्या आधी आपल्या मनाला काय वाटेल, यासाठी आपण गयावया केल्या. पण तो म्हणाला, ‘तुझ्या मनाशी काय घेणंदेणं? मला तुझं शरीर भोगायचं आहे. मनाशी आपलं काय काम?’ रिमा हे सांगते त्यावर मैत्रिणीची प्रतिक्रिया कोणाला आठवते का? ती विवाहित मैत्रिण रिमाला सांगते, ‘हेच वैवाहिक आयुष्यातही होत असते. कुठल्या नवर्‍याला बायकोच्या भावना व मनाची फ़िकीर असते? त्याला तिचं शरीर तेवढं उपभोगायला हवं असतं. वैवाहिक सुख म्हणजेही बलात्कारच असतो. फ़क्त तो नवर्‍याने केला म्हणून त्याला बलात्कार म्हणता येत नाही.’ हजारो प्रयोगात त्या अभिनेत्रीने हे बोलून दाखवले आणि उच्चभ्रू जाणत्यांनी ते नाटक अनेकदा बघितले. कोणाला त्या विधानाचा अर्थ उमगला नव्हता का? तेच सत्य ओळखायला संशोधनाने सत्य समोर आणायची प्रतिक्षा करायचे काय कारण होते? की बलात्काराची ‘पुरूषी’ धुंदी डोळ्यावर चढवून हे नाटक हजारो लोक बघत राहिले. प्रत्येकवेळी आपली वैवाहिक बलात्काराची कैफ़ियत मांडणार्‍या त्या तरूणीची वेदना कोणाला का जाणवली नव्हती?

आज वैवाहिक बलात्काराचा विषय ऐरणीवर आल्यानंतर आपणच त्यातले संवेदनाशील आहोत, असे भासवायचे नाटक छान रंगले. पण ते रंगवणार्‍या किती शहाण्य़ांनी, कायदेपंडितांनी वा विचारवंतांनी तेव्हा वैवाहिक बलात्काराच्या त्या कैफ़ियतीवर भाष्य करायची संवेदनशीलता दाखवली होती? की पुढारलेल्या जगात तसे कायदे होऊन आणि भारतामध्ये त्याविषयी संशोधन होऊन आकडे समोर येईपर्यंत ज्यांच्या भावना व संवेदना बोथट असतात? म्हणून त्यांना भारतीय बुद्धीमंत म्हणून ओळखले जाते काय? की कुठल्याही विषयावर सनसनाटी माजली, मग आपले पांडित्य सांगायची संधी साधण्याला भारतीय बुद्धीवाद म्हणतात? गेल्या आठवड्यात ज्यांनी कोणी वैवाहिक बलात्कारावर मतप्रदर्शन करून राजकीय नेते वा सरकारवर दुगाण्या झाडण्याचा ‘पुरूषार्थ’ दाखवला, त्यांचा खरा पुरूषार्थ जयवंत दळवींच्या त्या नाटकानंतर सुप्तावस्थेत गेला होता का? या देशातील बुद्धीवाद शहाणपणा नेहमी पाश्चात्य वा पुढारलेल्या देशातील उष्ट्या खरकट्यातूनच उचलावा लागतो काय? नसेल तर साडेतीन दशकापुर्वीच्या मराठी नाटकात जो आवाज उठला होता, त्यावर ह्या तमाम शहाण्यांची तोंडे कोणी शिवून ठेवली होती? दुसर्‍यांना दुषणे देणारा बुद्धीवाद हा सुद्धा वैचारिक बलात्कारच असतो आणि वैवाहिक बलात्काराचे निमीत्त साधून जे कोणी सरकारला वा परंपरावाद्यांना ठोकायला पुढे सरसावले, त्यांच्या बदमाशीचा हा नमूना आहे. त्यांना बलात्काराविषयी संवेदना नाहीत, की वैवाहिक जीवनातील वेदनेविषयी सहानुभूती नाही. वहात्या गंगेत हात धुवून घेणार्‍यांची ही नवी विचारवंत जमात आजकाल प्रतिष्ठीत झाली. त्यातूनच मग लक्ष्मण माने उदयास येतात आणि बलात्कार हा राजकारणाचा विषय होतो. बुद्धीवादी ‘पुरूषार्थ’ समाजातले बलात्कार थांबवू शकत नाही, की महिलांच्या हक्क, अधिकार वा न्यायाला न्यायही देवू शकत नाही.

1 comment:

  1. भाऊराव,

    >> या देशातील बुद्धीवाद शहाणपणा नेहमी पाश्चात्य वा पुढारलेल्या देशातील उष्ट्या खरकट्यातूनच
    >> उचलावा लागतो काय?

    अगदी बोचरा आणि समर्पक प्रश्न विचारलात तुम्ही. मॅकॉलेछाप शिक्षण म्हणतात त्याचा हा परिपाक आहे.

    आपला नम्र,
    -गामा पैलवान

    ReplyDelete