Friday, May 1, 2015

राहुल अंदर सोनिया बाहर?



संसदेचे अर्थसंकल्पी अधिवेशन सुरू झाल्यावर अनेक विषय वादाच्या भोवर्‍यात होते. त्यातला एक विषय होता कॉग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी. खरे तर एक व्यक्ती असा वादाचा विषय व्हायचे कारण नाही. पण तसे झाले. कारण याच अधिवेशनात मोदी सरकार देशाचा पहिला अर्थसंकल्प मांडणार होते आणि त्यातच वादग्रस्त झालेले भूमी अधिग्रहण विधेयक मांडले जाणार होते. म्हणजे प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संसदेत कोंडी केली जाणार हे गृहीत होते. पण त्याचवेळी सरकारला कोंडीत पकडण्याची विरोधकांना सर्वोत्तम संधी असताना प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या कॉग्रेसचा सेनापती म्हणावेत, असे राहुल गांधी गायब रहाणार ही मोठी बातमी बनली. कारण ते गैरहजर रहाणार इतकीच बातमी नव्हती, तर ते कुठे जाणार याविषयी देखील गोपनीयता पाळली गेली. अखेरीस त्यानिमीत्ताने विरोधकांना नेतृत्व देण्याची भूमिका सोनिया गांधींना पार पाडावी लागली. विरोधकांना एकत्र करून सोनियांनी राष्ट्रपती भवनापर्यंत पदयात्रा केली आणि भूमी अधिग्रहण अध्यादेशाला असलेला विरोध नोंदवला. याच दरम्यान अधिकृतपणे कॉग्रेसचे नेतृत्व राहुल यांच्याकडे सोपवले जाण्याच्या बातम्या होत्या आणि त्याला पक्षांतर्गत ज्येष्ठ नेत्यांच्या विरोधाच्या बातम्याही बाहेर येत होत्या. मग अशा नेत्यांवर नाराज होऊनच राहुलनी अधिवेशनावर बहिष्कार घातल्याचा निष्कर्ष काढला गेला. शेवटी हा प्रकार इतका शिगेला पोहोचला, की पक्षाध्यक्षा व मातोश्री सोनियांना आपला पुत्र पुन्हा कार्यरत होणार असल्याचे पत्रकारांना सांगावे लागले होते. अर्थसंकल्पी अधिवेशनाची मधली सुट्टी संपली आणि खरेच राहुल गांधी भारतीय राजकारणात पुन्हा अवतीर्ण झाले. या गडबडीत एक मोठा फ़रक पडलेला असूनही माध्यमांचे त्याकडे साफ़ दुर्लक्ष झालेले आहे. तो बदल म्हणजे सोनियांची संसदेतील अनुपस्थिती.

गेल्या आठवड्यात राहुल गांधी यांनी दिर्घकाळानंतर आपले मौन सोडले. बाहेर सभांमधून जोरदार प्रचाराची भाषणे देणार्‍या वा रोडशो करणार्‍या राहुलनी मागल्या सात वर्षात संसदेत मात्र सहसा आपले तोंड उघडले नव्हते. सात वर्षापुर्वी अमेरिकेशी होऊ घातलेल्या अणुकराराच्या निमीत्ताने युपीए सरकारला असलेला आपला पाठींबा डाव्या आघाडीने काढून घेतला होता आणि त्यामुळे मनमोहन सरकारला नव्याने विश्वास प्रस्ताव संमत करून घ्यावा लागला होता. तेव्हा राहुलनी संसदेत तोंड उघडले होते. तत्पुर्वी अनेक भागांना भेटी देऊन गरीब व शेतकर्‍यांचा शोध घेत भारताची तोंडओळख करून घेणारे राहुल विदर्भात जाऊन आलेले होते. तिथे एका शेतकर्‍याच्या विधवेचे सांत्वन त्यांनी केलेले होते. तिच्या वेदनांना राहुलनी संसदेत आवाज प्रदान केला आणि ती विधवा कलावती जगप्रसिद्ध होऊन गेली. पुढे जग आणि राहुल त्या विधवेला व तिच्या वेदनेला विसरून गेले. चार वर्षांनी तिच्याच जावयाने आत्महत्या केली आणि कलावतीची तरूण मुलगीही विधवा होऊन गेली. राहुलना तिचे सांत्वन करायची इच्छा झाली नाही, की सवड मिळाली नाही. असो, पण इतक्या प्रदिर्घ काळानंतर पुन्हा राहुलना शेतकरी आत्महत्या करीत असल्याचा साक्षात्कार झालेला आहे आणि तो घडण्य़ासाठी त्यांना दोन महिने अज्ञानस्थळी जाऊन तपस्या करावी लागली आहे. असे राहुल गांधी मधली सुट्टी संपल्यावर संसदेत हजर झाले आणि पुन्हा त्यांनी शेतक‍र्‍यांच्या व्यथा व आत्महत्यांना आवाज दिला आहे. दोन भाषणातला फ़रक इतकाच, की सात वर्षापुर्वी राहुल सत्ताधारी पक्षात होते आणि तेव्हा त्यांचा प्रत्येक शब्द झेलणारा पंतप्रधान सत्तेवर होता. आज त्यांचे शब्द ऐकून घ्यायलाही नवा पंतप्रधान सभागृहात हजर नसतो, असा तो फ़रक आहे. मात्र त्यामुळे राहुलना कुठलाही फ़रक पडलेला नाही. फ़रक त्यांच्या पक्षाला पडला आहे.

राहुल यांच्या पुनरागमनाने पडलेला राजकीय फ़रक म्हणजे त्यांनी दोनदा लोकसभेत भाषण केले आणि पहिल्या रांगेत येऊन भाषण केलेले आहे. समस्या इतकीच आहे की त्यांना पहिल्या रांगेतून भाषण करायला संधी मिळावी, म्हणून सोनियांना सभागृहात उपस्थित रहाता आलेले नाही. आज त्या पक्षाची संख्या इतकी रोडावलेली आहे, की पहिल्या रांगेत ज्या मोजक्या जागा कॉग्रेसपाशी आहेत, त्यात गटनेते खरगे यांना एक जागा दिल्यास दुसरी जागा सोनियांना द्यावी लागते. पर्यायाने राहुल गांधींना पहिल्या रांगेत बसता येत नाही. सहाजिकच त्यांनी पहिल्या रांगेतून भाषण देत पक्षाचे नेतृत्व करायचे, तर सोनियांना सभागृहापासून दूर रहावे लागते आहे. लागोपाठ दोनदा पुत्राने संसदेत पक्षाचे नेतृत्व केले आणि मातेला त्यावेळी सभागृहात उपस्थित रहाता आलेले नाही. खरेतर हीच मोठी ब्रेकिंग न्युज होती. पण जाणत्या पत्रकारांचे तिकडे साफ़ दुर्लक्ष झालेले असावे. ही समस्या पहिल्या रांगेतील आसनांची आहे, की पक्षाच्या माथी राहुलचे नेतृत्व मारण्यासाठी केलेली खेळी आहे, त्याचे उत्तर शोधावे लागेल. कारण राहुल हजर असतात, तेव्हा बहुतेक वेळ त्यांच्याच वाट्याला येतो आणि उर्वरीत पक्ष सदस्य त्यांची वहावा करण्याचे कर्तव्य पार पाडतात. योगायोगाने लोकसभेत आता कोणी ज्येष्ठ व जुना कॉग्रेसी नेताच शिल्लक उरलेला नाही. ज्यांनी युपीए सरकारमध्ये सत्तेच्या खुर्च्या उबवल्या, ते बहुतेक राज्यसभेत बसलेत किंवा पुन्हा निवडून येऊ शकलेले नाहीत. त्यामुळे पक्ष संघटनेत नाही, तरी लोकसभेत राहुल यांच्या नेतृत्वाला प्रतिकार करणारा कोणी कॉग्रेसनेता शिल्लक नाही. उपनेतेपदी ज्योतिरादित्य शिंदे यांची नेमणूक झालेली असल्याने राहुलचे नेतृत्व लोकसभेपुरते तरी मान्य झाले आहे. त्यासाठी अर्थातच सोनियांनी सभागृहात गैरहजर रहाण्याची खेळी यशस्वीरित्या खेळली आहे. बाकी तिथे काय बोलले गेले ते महत्वाचे नाही.

गेली अकरा वर्षे राहुल गांधी लोकसभेचे सदस्य आहेत. पण त्यांनी चर्चेत वा पक्षातर्फ़े पुढाकार घेऊन कामकाजात सहसा भाग घेतला नव्हता. त्यामुळे पहिल्यापासून त्यांना संसदीय नेतृत्वाची सुरूवात करावी लागते आहे. त्यापैकी अधिवेशनाचा महत्वाचा कालखंड निघून गेल्याने उरलेल्या कालावधीत मोठी मजल मारावी लागणार आहे. कारण या अधिवेशनात जे काही होईल, त्यानंतर पक्षातील नेतृत्वाचा विषय ऐरणीवर येणार आहे. सोनियांची प्रकृती रस्त्यावर येऊन धावपळ करण्याइतकी खंबीर राहिलेली नाही. त्यांच्या वागण्याबोलण्यातून थकलेपणा जाणवतो आहे आणि सत्तेबाहेर राहुन अस्वस्थ झालेले काही नेते कार्यकर्ते नव्याने पक्षाला उभारी देण्याचा आग्रह धरू लागले आहेत. त्यासाठी राहुलनी नेतृत्व करावे किंवा प्रियंकाला पक्षाची सुत्रे सोपवावी, अशीही मागणी डोके वर काढत आहे. प्रियंकाचा विषय गुंडाळायचा असेल, तर राहुलना पुर्वीपेक्षा अधिक आक्रमक व कार्यरत व्हावेच लागणार आहे. नुसते योजलेल्या समारंभात व जमवलेल्या गर्दीत भाषणे देवून भागणार नाही, तर कार्यकर्ते नेते यांना प्रेरीत करून कामाला जुंपण्याची गरज आहे. अशावेळी पुढाकार घेऊन मुसंडी मारण्याची जबरदस्त इच्छाशक्ती आवश्यक असते. संसदेतील पक्षाचे बळ नगण्य असल्याने मित्रपक्ष व अन्य विरोधकांना सोबत घेण्याची चतुराई दाखवावी लागणार आहे. जन्मजात मोठेपणा गुंडाळून इतरपक्षीय ज्येष्ठ नेत्यांना विश्वासात घ्यावे लागेल. तिथेच घोडे अडलेले आहे. धड हिंदी येत नसतानाही सोनिया संसदेत मित्रपक्षांना सोबत घेऊ शकत होत्या. पण राहुलची दोन भाषणे बघितली, तर कॉग्रेसजन सोडल्यास सभागृहात अन्य पक्षांचे समर्थन त्यांना मिळताना दिसले नाही. ते मिळावे आणि पक्षासह मित्र पक्षांनीही राहुलला साथ द्यावी, म्हणून सोनियांनी सभागृहात गैरहजर रहाण्याचा उपाय निवडला आहे काय? काळच त्याचे उत्तर देईल.

No comments:

Post a Comment