Friday, May 29, 2015

अति-ताप बोलबच्चन



दोन वर्षापुर्वी भाजपामध्ये भलतीच घुसळण चालू होती. नव्याने उदयास आलेल्या आम आदमी पक्षाच्या अरविंद केजरीवाल यांनी पक्षाध्यक्ष नितीन गडकरी यांच्यावर गंभीर आरोप केले होते आणि नंतर एका बातमीच्या खुलाश्याने गडकरी यांच्यावर सावट आले. सहाजिकच त्यांना पक्षाध्यक्षपद सोडावे लागले होते. वास्तवात त्यांना सलग दुसर्‍यांदा पक्षाध्यक्ष करण्यासाठी नियमात दुरूस्ती करण्यात आली होती. पण त्यांना त्या पदावर कायम ठेवण्याने ऐन निवडणूक मोसमात नसत्या आरोपांचे खुलासे करत बसण्याची वेळ आली असती. म्हणून शेवटी त्यांनी पद सोडले आणि पर्याय म्हणून राजनाथ सिंग यांची त्या पदावर वर्णी लागली. तर तेव्हाच मोदींच्या पंतप्रधान पदाचा चेहरा म्हणून पुढे आणण्याचा वाद रंगला होता. ते भूत राजनाथ यांच्या बोकांडी बसले आणि त्यांनी मोदींना पक्षाच्या संसदीय मंडळात सहभागी करून घेतले. तितकेच नाही, मोदींचे विश्वासू सहकारी असलेल्या वादग्रस्त अमित शहा यांना पक्षाचे सरचिटणिस करण्यात आले. मग मोदींच्या बढती इतकाच शहा वादाचा विषय झाला. कारण तोपर्यंत शहा यांच्यावर खोट्या चकमकीचे बालंट होते आणि त्यांना गुजरातमध्ये जायलाही सुप्रिम कोर्टाने प्रतिबंध घातलेला होता. इतका बदनाम माणूस पक्षाचा सरचिटणिस केल्यामुळे बहुतांश माध्यमांनी राजनाथ यांना धारेवर धरले होते. तरी त्याच शहांना पक्षध्यक्षांनी उत्तर प्रदेशचे प्रभारी बनवले. ती जबाबदारी निभावताना शहा सर्वप्रथम अयोध्येला रामलल्लाचे दर्शन घ्यायला गेले आणि मग वाद विकोपास गेला. कारण मंदिर व्हावे ही प्रत्येक भारतीयाची इच्छा आहे आणि तेच मागणे देवाकडे के्ले, असे शहांनी अयोध्येत तेव्हा पत्रकारांना सांगितले होते. पुढे उत्तर प्रदेशचे राजकारण घुसळले जाऊ लागले आणि यात शहांवर वाटेल तितके आरोप झाले. पण सहसा आपले तोंड त्यांनी उघडले नाही. मौन हे त्यांचे प्रभावी साधन होते.

लोकसभेची निवडणूक दिवसेदिवस रंगात येत गेली, तरी शहांनी सहसा कुठलेही विधान करायचे टाळले आणि आपल्या पद्धतीने काम करत राहिले. अपरिहार्य झाले तेव्हा त्यांनी मोजक्या शब्दात निवेदन केले. पण कुठे शब्दात फ़सू नये याची काटेकोर काळजी घेतली. त्यांनी उत्तर प्रदेशात विस्कटलेल्या पक्ष संघटनेची इतकी सुंदर बांधणी केली, की नरेंद्र मोदी यांना वाराणशीतून उमेदवार करण्यापर्यंत मजल मारली. त्याचा एकत्रित परिणाम ८० पैकी ७३ जागा भाजपाला मिळण्यात झाला. त्यामुळे चकमकफ़ेम अमित शहा एकदम निवडणूकांचा चाणक्य अशी नवी प्रतिमा उदयास आली. लोकसभा निकालापर्यंत चकमकीचा उल्लेख करणारी माध्यमे निकालानंतर शहांची ती ओळख पुर्णपणे विसरून गेली. त्याचा स्वाभाविक परिणाम खुद्द शहा व भाजपावर होणे भागच होते. महाराष्ट्रातून शहांना राज्याचे प्रभारी करण्याची मागणी झाली, कारण पुढल्या सहा महिन्यात इथल्या विधानसभा निवडणूका व्हायच्या होत्या. पण प्रभारी होण्याऐवजी शहा पुढल्या काळात पक्षाध्यक्ष झाले. त्यातून मग भाजपाच्या मोदीयुगाचा आरंभ झाला किंवा वाजपेयी-अडवाणी युगाचा शेवट झाला. मात्र पक्षाध्यक्ष होईपर्यंत आपल्या बोलण्याला लगाम लावण्याची कुवत शहा गमावून बसले होते. उत्तर प्रदेशात मोदीलाट उभी केल्याने आपल्यात संचारलेल्या अमोघ शक्तीचा उच्चार करण्याचा मोह शहांना आवरेनासा झाला. पक्षाध्यक्ष म्हणून मोजके बोलायचे विसरून शहा सुद्धा उफ़राटी राजकीय विधाने करू लागले आणि त्यात फ़सत गेले. परिणामी पक्षात नवे लोक आणणे, जुन्यांना संभाळून घेणे व नव्या मित्रांना पक्षाशी जोडणे थांबले. उलट अनेक मित्रपक्ष एका वर्षात दुरावत गेले आणि पक्षातलेही अनेकजण दुरावले. ज्याचा परिणाम दिल्लीच्या मध्यावधी विधानसभा निवडणूकीत दिसला. शहा यांच्या हडेलहप्पी कारभाराने पक्षातही असमंजस गोंधळ माजू लागला.

शहा सहसा मोजक्या शब्दात बोलतात. तेही बोचरे झोंबणारे बोलतात. उदाहरणार्थ पत्रकारांनी पक्षाशी संबंधित विचारल्यास ‘तुम मीडिया चलाव मुझे पर्टी चलाने दो’, असे उत्तर त्यांनी अनेकदा दिलेले आहे. मग काळापैसा भारतात कधी येणार आणि प्रत्येक भारतीयांच्या खात्यात पंधरा लाख कधी जमा होणार? या प्रश्नाला त्यांनी दिलेले उत्तर माध्यमांसाठी बोचरे होते. पण त्यातून विरोधकांच्या हाती कायमचे कोलित दिले गेले. काळापैसा लोकांमध्ये वाटणार हा चुनावी जुमला होता, तो इतका गंभीरपणे घ्यायचा नसतो असे त्यांनी म्हटले आणि मग मोदींची तमाम आश्वासने ‘चुनावी जुमला’ म्हणून हेटाळणी सुरू झाली. अर्थात भाजपाच्या समर्थकांनी मुर्खासारखे त्याचेही समर्थन केले. पण आता चुनावी जुमले वाढत चालले असून, शहा यांच्या तोंडाला कुलूप लावणे पक्षहितासाठी आवश्यक होऊन जाणार आहे. कारण ज्या विषयाने भाजपाला राज्यात इतके मोठे यश व सत्ता सोपी केली. त्यालाही शहांनी चुनावी जुमला करून टाकले आहे. त्यामुळे खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस यांची गोची झाली आहे. नितीन गडकरींसह फ़डणवीस यांनी आग्रहपुर्वक स्वतंत्र विदर्भाचा मामला विधानसभेत वापरला होता आणि शक्य तितके शिवसेनेला डिवचण्याचा उद्योग केला होता. पुढे सत्तेचे समिकरण जमवताना सेनेने वेगळ्या विदर्भाची मागणी सोडावी तरच सत्तेत सहभागी होऊ; अशी अट घालण्यापर्यंत हा मामला ताणला गेला होता आणि त्याचा उल्लेख ठळकपणे भाजपाने विधानसभा जहिरनाम्यात केलेला होता. असे असताना परवा कोल्हापूरला राज्य पक्ष बैठकीत शहांनी ‘तोंड उघडले’. भाजपाच्या जाहिरनाम्यात कुठेही वेगळ्या विदर्भाचे आश्वासन दिलेले नाही, असे ठोकून दिले. किंबहूना भाजपाचा तो अजेंडाच नाही, असेही ठामपणे सांगून टाकले. फ़डणवीस यांच्या हजेरीतच शहा असे बोलल्याने मुख्यमंत्री गोरेमोरे झाल्यास नवल नाही.

सत्ता हाती घेतल्यावरही देवेंद्र यांनी वारंवार विदर्भाचा मामला उचलून धरलेला होता. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असलो तरी कट्टर विदर्भवादी आहे, असे त्यांनी सातत्याने म्हटलेले आहे. किंबहूना त्यामुळेच विदर्भात भाजपाला विक्रमी जागा जिंकता आल्या. आता पक्षाध्यक्षच असे विषय झटकून टाकत असतील, तर खुद्द मुख्यमंत्र्यांचा किती मुखभंग झाला असेल, त्याचा अंदाज आपण करू शकतो. गडकरींची तारांबळ लक्षात येऊ शकते. मग सामान्य विदर्भवादी मतदाराची मनस्थिती काय असेल? शहा यांनी वैदर्भिय भाजपावाल्यांना पुरते तोंडघशी पाडले. तसे त्यांनी आताच बोलण्याची काहीही गरज नव्हती. निदान फ़डणवीस यांच्या उपस्थितीत व पक्षाच्या परिषदेत तरी असे म्हणायचे काही कारण नव्हते. कारण त्यातून विदर्भ राज्यविरोधी शिवसेनेला आयते कोलित मिळाले आणि खुद्द विदर्भावादी बिगर भाजपावाल्यांना टिकेसाठी हत्यार उपलब्ध झाले. पक्षाला त्याचा कुठलाही लाभ नाही, पण तोटा मात्र होऊ शकतो. प्रत्येक निवडणूकीत भाजपा मते मिळवण्यासाठी वाटेल त्या खोट्या घोषणा करू शकते व मते मिळाल्यावर आश्वासन ‘चुनावी जुमला’ म्हणून झटकते, असा आरोप करायची सोय पक्षाध्यक्षानेच करून ठेवली. उत्तम संघटक व पाताळयंत्री धुर्तपणा यासाठीच ख्यातनाम असलेल्या अमित शहा यांनी उत्तम वक्ता असण्याचे काही कारण नाही, की गरज नाही. लोकांना भुरळ घालणारा हुशार वक्ता मोदींच्या रुपाने उपलब्ध आहे. ती जागा व्यापण्याची शहांना गरज नाही. त्यापेक्षा मोदींची भुरळ पडलेल्यांना संघटित करण्याचे काम त्यांनी शांत राहुन केले, तरी पक्षाला त्याचा खुप लाभ होऊ शकेल. पण असेच अतिशयोक्त बोलत गेले, तर ‘आम आदमी’ भाजपाला ‘अब भी दिल्ली दूर है’ हे दाखवून द्यायला तयार असतो. कामापेक्षा अति-ताप देणारी बोलबच्चनगिरी शहांनी लौकर थांबवली नाही, तर मोदींच्या गळ्यातला हा ताईत त्यांच्याच गळ्यातले लोढणे होत जाईल.

1 comment:

  1. एकेक गोष्टी बाहेर पडत आहेत. पडू द्या. लोकांना कळू द्या. यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे आहेत.

    ReplyDelete