Tuesday, June 30, 2015

मोदींसारखा नशीबवान माणूस नसेल



कुठल्याशा चित्रपटात म्हणे सलमान खानच्या तोंडी एक वाक्य आहे. ‘मुझपर बडा अहसान करो, के मुझपर कोई अहसान मत करो.’ थोडक्यात मला मदत करायची असेल, तर कुठली मदत करू नका. किती विचित्र वाटते ना? पण बारकाईने विचारात घेतले, तर त्यात खुप मोठा अर्थ सामावला आहे. आपल्या आयुष्यात नित्यनेमाने काही माणसे अशी येतात, की त्यांनी मदत करण्यासारखे भयंकर संकट नसते. सहाजिकच त्यांनी आपल्याला मदत वा उपकार न करण्यासारखे अन्य कुठले मोठे उपकार असू शकत नाहीत. कारण अशी माणसे नको तितक्या समस्या मदत म्हणून आपल्यापुढे आणून उभ्या करीत असतात. सहाजिकच त्यांनी आपल्यापासून दूर रहाणेच अधिक सोयीचे असते. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बाबतीत उलट अर्थाने अशा लोकांची अखंड वर्दळ राहिली आहे. म्हणून ते कमालीचे नशीबवान वाटतात. गुजरातचे मुख्यमंत्री झाल्यापासून पक्षातच त्यांचे विरोधक त्यांना संपवायला टपलेले होते. पण जितकी म्हणून संकटे व अडथळे त्यांनी समोर आणले, त्यातून प्रत्येकवेळी मोदी सहीसलाम बाहेर पडले आहेत आणि पुर्वीपेक्षा अधिक बलवान होऊन पुढले पाऊल टाकू शकले आहेत. देशात स्वातंत्र्योत्तर काळात शेकडो दंगली झाल्या. पण गुजरातच्या दंगली इतका कुठल्या दंगलीचा गाजावाजा झाला नाही. कुठल्या मुख्यमंत्र्याला दंगलीसाठी थेट आरोपी ठरवून मोदींप्रमाणे देशाव्यापी प्रसिद्धी मिळवून दिली गेलेली नव्हती. त्यातून खरे तर मोदींना राजकीय जीवनातून उध्वस्त करण्याचा डावपेच खेळला जात होता. पण असे अडथळे पार करताना प्रत्येकवेळी मोदी तावून सुलाखून बाहेर पडत गेले. जितके आरोप व कायदेशीर समस्या उभ्या केल्या गेल्या, त्यांनाच संधी समजून मोदी त्यावर स्वार होत थेट देशाच्या सर्वोच्च पदावर जाऊन बसले. इतका नशीबवान माणूस इंदिराजी सोडल्यास दुसरा कोणी भारतीय राजकारणात झाला नसावा.

एकप्रकारे त्यांच्या विरोधक व शत्रुंनी त्यांच्यावर केलेले हे उपकारच नाहीत काय? जर उलटा विचार केला तर? म्हणजे असे, की मोदींना संकटात ढकलून संपवण्याच्या ऐवजी अशा लोकांनी मोदींना ‘मदत’ केली असती तर? मग मात्र मोदींना आजचे ‘अच्छे दिन’ बघता आलेच नसते. मागल्या चौदा वर्षात एक दिवस असा गेलेला नसेल, की विरोधकांनी मोदींच्या कुठल्याही कृती वा निर्णयाला गुन्हा ठरवला नसेल. पण त्यात फ़सण्यापेक्षा मोदी निर्दोष ठरून बाहेर पडले. त्या प्रत्येक प्रसंगातून त्यांची शक्ती वाढतच गेली. मोदी मुस्लिम विरोधी आहेत म्हणून गवगवा करण्यात आलेला होता. त्यांनी सदभावना यात्रा केली. तिच्यावर चिखलफ़ेक झाली. त्यात त्यांनी एका मुस्लिम मौलवीकडून टोपी नाकारल्याचे राजकीय भांडवल करण्यात आले. किमान लाखभर वेळा तरी ते चित्रण भारतीय वाहिन्यांवरून झळकले असेल. मग त्यामुळे मुस्लिम मते दुरावली तरी अनेकपटीने हिंदू मते मात्र मोदींच्या झोळीत अलगद येऊन पडली. हिंदूत्वाची कितीही प्रवचने देऊन, भाषणे करून मोदींना हिंदूंची इतकी प्रचंड मते एक गठ्ठा मिळवता आली नसती. जे काम त्यांच्यासाठी विरोधकांनी केले. सेक्युलॅरिझम विषयी अशा विरोधकांनी जनमानसात इतका तिरस्कार निर्माण करून घेतला, की त्यांच्यावर चिडलेल्या हिंदूंना मोदी हाच पर्याय वाटत गेला. जितकी अशा रितीने मोदींची कोंडी करण्याचा आटापिटा झाला, तितकी मोदींविषयी लोकांत सहानुभूती निर्माण होत गेली. थोडक्यात मोदींवर जितके अपकार होत गेले, त्याचा परिणाम उपकार म्हणून होत गेला. किंबहूना त्यातून आजचा मोदी नावाचा बिगर कॉग्रेसी पंतप्रधान भारताला मिळू शकला, हे नऊ दशकात संघ करू शकला नव्हता, की भाजपाच्या अडवाणी वाजपेयी अशा दिग्गजांनाही जमलेले नव्हते. ते मोदींनाही साधलेले नाही. ही सगळी किमया त्यांच्या विरोधकांची आहे. असे विरोधक मिळणे नशीब नाही काय?

गुजरातमध्ये सर्वकाही आलबेल नव्हते, की लोक सुखासमाधानाने जगत नव्हते. पण देशाच्या अन्य राज्यांच्या तुलनेत गुजरातचा नागरिक खुप समाधानी व सुसह्य जीवन जगत होता. मोदींवर जे काही आरोप केले जात होते, त्याचा सामान्य नागरिकाच्या नित्यजीवनाशी काडीमात्र संबंध नव्हता. सहाजिकच आरोप वा तांत्रिक मुद्दे याच्याशी सामान्य नागरिकाला कर्तव्य नव्हते. त्याने पुन्हा पुन्हा नरेंद्र मोदी यांनाच बहुमत दिले आणि विरोधकांच्या आरोपाला धुडकावून लावले. पण दुसरीकडे त्यातून मोदींची देशव्यापी प्रतिमा विरोधकांनी व माध्यमांनीच उभी केली. ती प्रतिमा जितकी राक्षसी व खतरनाक उभी करण्यात आली, तितकी लोकांना आवडतही गेली. किंबहूना लोकांना खंबीर नेता हवा होता आणि तशीच प्रतिमा माध्यमातून व आरोपातून उभी करण्यात आली होती. उलट जे आरोप होते त्याविषयी लोकामध्ये कुठला जिव्हाळा नव्हता. मात्र यातून फ़ारसे न बोलता कृतीतून विरोधकांना नामोहरम करण्याचे कौशल्य मोदी आत्मसात करत गेले. त्याला अपवाद होता, ते मागले एक वर्ष. मोदींनी आपल्या सर्व विरोधकांना चारी मुंड्या चित करून लोकसभेत बहूमत मिळवले आणि मागले एक वर्ष मोदींच्या विरोधात कुजबुज सुरू असली, तरी आरोप संपुर्ण वंद झालेले होते. गदारोळाशिवाय झोप लागत नाही असा प्रसंग ‘पुष्पक’ सिनेमात कमाल हसनने रंगवला आहे. काहीशी तशीच मोदींची अवस्था असावी. कडव्या विषारी प्रतिकाराशिवाय हा माणूस राजकारण करूच शकत नाही. त्याचीच गेले वर्षभर त्रुटी होती. आता त्याची सुरूवात झाली आहे. गुजरातमध्ये अमित शहा, माया कोडनानी अशा सहकार्‍यांवर गंभीर आरोप झाले व त्यांना तुरूंगातही जाऊन पडावे लागले. त्यानंतर मोदी संपलेच अशी भाषा कायम ऐकू येत होती. मोदींचे त्यातून काय झाले? माणूस थेट पंतप्रधान होईपर्यंत मजल मारून गेला.

मात्र पंतप्रधान झाल्यापासून त्या कडव्या विरोधी व विषारी प्रतिकाराची धार बोथट झालेली होती. एखादा फ़लंदाज जसा ठराविक प्रतिकुल खेळपट्टीवरच दणकेबाज फ़टके मारतो व धावा करतो, तशीच मोदी या माणसाची मानसिकता आहे. कडव्या प्रतिकाराशिवाय त्याला राजकारण खेळता येत नाही. जितकी प्रतिकुल व विपरीत स्थिती, तितके मोदींचे राजकारण बहरते, असा आजवरचा अनुभव आहे. लोकसभा प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात एबीपी या नेटवर्कला त्यांनी मुलाखत दिली होती, त्यात ‘माझा’चे संपादक राजीव खांडेकर यांनी मोदींना नेमका प्रश्न विचारला होता. इतकी कडवी टिका व प्रखर विरोध कधीपर्यंत चालणार अशी तुमची अपेक्षा आहे? त्यावर मोदींनी दिलेले उत्तर मोठे मार्मिक व त्यांच्या आकलनाचे प्रतिक आहे. ‘जोपर्यंत मी पराभूत होत नाही, तोपर्यंत कुठल्याही थराला जाऊन माझ्या विरोधात टिका होणार व कारवाया केल्या जाणार. त्यात काही चुकीचेही नाही. सतत पराभूत होणारा प्रतिस्पर्धी अधिक चवताळून अंगावर येणारच ना? त्याचा तेवढाही अधिकार नाकारून चालेल काय?’ आपल्या विरोधकांविषयी मोदींचे आकलन किती नेमके आहे, त्याचा यातून अंदाज येतो. मात्र वर्षभर त्याचीच त्रुटी मोदींना जाणवत असावी. गेल्या दोन आठवड्यापासून मोदींना आवडणारी खेळपट्टी तयार झाली आहे. चहुकडून त्यांना घेरण्याचा व संपवण्याचा राजकीय खेळ सुरू झाला आहे. म्हणूनच आता खरेखुरे राजकारण सुरू होऊ लागले आहे. हळुहळू ते गुजरातच्या थराला जाऊन वैयक्तिक होते आहे. जितके ते मोदी या व्यक्तीभोवती घुटमळू लागेल, तितके भाजपामधल्या अन्य नेत्यांची महत्ता निकालात निघेल. दुसरीकडे एकाकी पडल्याचा देखावा उभा करून मोदी अधिकाधिक सहानुभूती मिळवत जातील. जोपर्यंत सामान्य लोकांचे जीवन सुसह्य आहे, तोपर्यंत मोदींच्या विरोधातले आरोप व राजकारण जनमानसात मुळ धरू शकणार नाही. मोदींचाच वरचष्मा राहिल. याला नशीब नाही तर काय म्हणायचे? यापुर्वी एकट्या इंदिराजींच इतक्या नशीबवान ठरल्या होत्या.

No comments:

Post a Comment