Friday, January 15, 2016

सुनंदाच्या मृत्यूचे भूत



कॉग्रेसचे नेते व माजी मंत्री शशी थरूर यांच्या मानगुटीवरून आपल्या पत्नीच्या संशयास्पद मृत्यूचे भूत उतरताना दिसत नाही. २०१६ च्या जानेवारीत पुन्हा तो विषय उसळी मारून बाहेर आला आहे. दोन वर्षापुर्वी शशी थरूर पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात गर्क असताना, त्यांची लाडकी पत्नी सुनंदा पुष्कर हिचा एका पंचतारांकित हॉटेलच्या आलिशान दालनात मृत्यू झालेला होता. दालनाच्या दाराला आतून कडी घातलेली होती आणि म्हणूनच निदान वरकरणी सुनंदाचा मृत्यू अन्य कुणामुळे झाला, असा संशय घ्यायला जगा नव्हती. पण तिचा मृत्यू शंकास्पद नक्कीच होता. त्याची कारणे अनेक आहेत. पहिली बाब म्हणजे मृत्यूनंतरही ती शांतपणे आपल्या बिछान्यावर पडलेली होती आणि बेडशीटला साधी सुरकुतीही कुठे पडलेली नव्हती. जणू मृत्यू समोर येऊन उभा राहिला आणि सुनंदा नि:शंक मनाने त्याच्या स्वाधीन झाली, असे दृष्य होते. पण तिच्या मृतदेहावर शंकास्पद डाग होते आणि शवविच्छेदनात मृत्यूचे कारण ठरवणे अवघड झालेले होते. म्हणूनच त्याचा व्हिसेरा अमेरिकेतील अत्याधुनिक प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आलेला होता. आता त्याचा अहवाल आलेला आहे. दरम्यान पोलिसांनी अनेक संशयितांची जबानी घेतलेली होती आणि त्यात खुद्द शशी थरूर यांचा समावेश होता. पण आता जो अहवाल आला आहे, त्यानंतर सुनंदाचा मृत्यू नैसर्गिक नव्हता आणि त्याला विषबाधा कारण असल्याचे दिल्लीच्या पोलिस आयुक्तांनी सांगितले आहे. सहाजिकच ह्या प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे. कारण मृत्यूच्या आधी सुनंदा व थरूर यांच्यात सर्व काहीही आलबेल नव्हते. त्यांची सतत भांडणे व्हायची आणि सार्वजनिक जागीही त्यांना हमरातुमरीवर येताना अनेकांनी बघितले होते. तशा साक्षीही अनेकांनी दिल्या आहेत आणि खुद्द सुनंदाने तेव्हा केलेले ट्वीटस संशयाला हवा देणारे असेच होते. त्यातील पाकिस्तानी महिला हेराचा उल्लेख खुप गंभीर मामला आहे.

काही दिवस थरूर दुबईला एका कार्यक्रमासाठी गेलेले होते आणि तेव्हा त्यांच्याशी पाकिस्तानी महिला पत्रकार मेहर तर्रार हिने खुप सलगी केलेली होती. त्या महिलेने थरूर यांच्यावर प्रेमाचे जाळे विणण्याचा प्रयत्न केला आणि ती पाक हेरखात्याची हस्तक असल्याचा आरोप सुनंदाने ट्वीटरवरून केला होता. त्यानंतर त्या दोघींमध्ये शाब्दिक बाचाबाची खुप झालेली होती. मात्र ह्या बाचाबाचीला आठवडाही होण्याआधी सुनंदाचा संशयास्पद रितीने मृत्यू झाला. मंत्र्याचा बंगला असताना सुनंदा व थरूर हॉटेलमध्ये कशाला वास्तव्य करून होते, हा पहिला प्रश्न आहे. एका माहितीनुसार आदल्या रात्रीच पतीपत्नीमध्ये खडाजंगी झाली होती आणि त्यानंतर सुनंदा एकटीच उठून घराबाहेर पडलेली होती. थरूर नंतर हॉटेलमध्ये पोहोचले. इतक्या गोष्टी सहजासहजी मंत्र्याच्या खाजगी जीवनात घडतात आणि त्याकडे कोणाचेही लक्ष जात नाही, ही बाब शंकास्पद नाही काय? थरूर घटनेच्या दिवशी संपुर्ण वेळ पक्षाच्या अधिवेशनात होते आणि सुनंदा हॉटेलमध्ये एकटीच होती. दुपारच्या वेळी तिला अनेकांनी लॉबीत फ़िरताना बघितलेले होते. तिची प्रकृती ठणठणित होती. म्हणजेच आकस्मिक मृत्यूने गाठावे अशी तिची प्रकृती ढासळलेली नव्हती. म्हणूनच मग तिच्या आधीच्या आरोपांना वजन येते. कारण पतीवर जाळे फ़ेकणार्‍या महिलेवर सुनंदाने केलेले आरोप जितके गंभीर आहेत, तितकेच ते संशयास्पद मृत्यूने अधिक गंभीर होतात. आतून बंद असलेल्या त्या दालनात कोणी घुसल्याचा पुरावा नाही, की संघर्ष झाल्याची खुण नाही. म्हणूनच असा गुन्हा कोणी सामान्य गुन्हेगाराकडून होऊ शकत नाही. त्यामागे कोणी मोठी पाताळयंत्री संघटना कार्यरत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही बाब लक्षात घेतली, तर सुनंदाने पाक हेरसंस्थेच्या महिला हस्तकावर केलेले आरोप दखलपात्र होऊन जातात. पण अशा कुठल्या अंगाने तपास पुढे सरकलेला आजवर दिसलेले नाही.

आपल्या मृत्यूपुर्वी आणि मेहर तर्रार हिच्याविषयी सुनंदाने केलेली विधाने या तपासात बारकाईने विचारात घेतली पाहिजेत. पाक हेरखाते महिलेला पुढे करून भारतातल्या महत्वाच्या व्यक्तींना आपल्या जाळ्यात ओढण्याचा खेळ करते, ही बाब नवी नाही. कालपरवाचा ज्या पठाणकोट हवाईतळावर हल्ला झाला, त्यात दिड वर्षापुर्वी एका महिलेच्याच माध्यमातून माहिती घेतली गेली होती. सुशीलकुमार नावाच्या हवाईदल कर्मचार्‍याकडून ही माहिती पाक हेरखात्यच्या महिलेने काढल्याचे निष्पन्न झालेले आहे. शशी थरूर तशाच सापळ्याचे बळी होते काय? असतील तर त्यांचे पितळ उघडे पडण्याने पाक हेरखात्याला एक महत्वपुर्ण मोहरा गमवावा लागला असता. ते पाऊल उचलण्याची धमकी सुनंदाने ट्वीटरच्या माध्यमातून दिली होती. आपण पतीसाठी खुप त्रास व बदनामी सहन केली. पण आता त्याची सर्व लक्तरे बाहेर काढू, असेही सुनंदा तेव्हा म्हणालेली होती. म्हणूनच तिला कायमचे गप्प करणे फ़क्त तिच्या पतीसाठीच आवश्यक असत नाही. तर पाक हेरखात्यालाही सुनंदा अडचणीची झाली होती. मग रहस्यमय वाटावा असा सुनंदाचा सफ़ाईदार मृत्यू पाक हस्तकांनी घडवून आणलेला असेल काय? कोणीही आजच्या परिस्थितीत त्याचा इन्कार करू शकलेला नाही. पण त्या दिशेने या प्रकरणाचा कितीसा तपास झाला? जवळपास शून्य असेच म्हणावे लागेल. कारण तपासाच्या ज्या बातम्या आजवर प्रसिद्ध झाल्या आहेत किंवा जी माहिती उघड झाली आहे, त्यात कुठेही  मेहर तर्रार हिच्याविषयी काहीही आढळत नाही. पण कालपरवा पठाणकोट हल्ल्याच्या निमीत्ताने विविध भारतीय वाहिन्यांवर तीच मेहर तर्रार चर्चेत भाग घेताना दिसत होती. म्हणजेच पाक जिहादी वा घातपाती कारवाया याविषयातली मेहर तर्रार ‘जाणती’ दिसते. सहाजिकच निदान आता तरी सुनंदाच्या संशयास्पद मृत्यूशी तर्रार हिचा काय व किती संबंध आहे, त्याचा दिल्ली पोलिसांनी कसून शोध घ्यायला हरकत नसावी.

सुनंदा पुष्कर ही थरूर यांची पत्नी होती. पण म्हणूनच ती त्यांच्या खुप नजिक होती. तिचा आरोप गंभीर आहे. एका भारतीय मंत्र्याच्या खाजगी जीवनात पाकिस्तानी पत्रकार महिला इतकी निकटवर्ती होऊ शकते कशी, याचा शोध देशाच्या सुरक्षेशी संबंधित विषय आहे. विशेषत: मंत्र्याच्या पत्नीनेच तसा आरोप केलेला असल्यामुळे त्या आरोपाला दुर्लक्षित करणे गैरलागू आहे. पण निदान अजून तरी त्या दिशेने कुठली हालचाल झालेली नाही. सुशीलकुमार वा रणजित यांच्यासारखे हवाई दलाचे कर्मचारी मोक्याची गोपनीय माहिती परकीयांना महिलेच्या नादाला लागून पुरवित असतील, तर भारताचा मंत्री कुठली नाजूक व गोपनीय माहिती देऊन बसला असेल, याची कल्पनाही भयभीत करणारी आहे. सुनंदाचा अनैसर्गिक मृत्यू म्हणूनच आणखी एक हत्या वा खुन अशा पठडीतला नाही. त्याचा राष्ट्रीय सुरक्षेशी निकटचा संबंध आहे. शिवाय जितक्या शिताफ़ीने ही हत्या झाली व कुठलाही धागादोरा हाती लागत नाही, त्यावरून हे सामान्य मारेकर्‍याचे काम नाही, याची ग्वाही मिळते. म्हणूनच एका महिलेचा खुन म्हणून त्याकडे बघता कामा नये. तर पाकच्या हस्तकांना वाचवण्यासाठी झालेली हत्या असावी काय, अशा दिशेने त्याचा तपास व्हायला हवा आहे. कारण आजवरच्या तपासात अनेक अनुत्तरीत प्रश्न कायम आहेत. अनेक रहस्यमय संदर्भ चक्रावून सोडणारे आहेत. थरूर यांच्यासारखा उच्चभ्रू मंत्री विमानतळावर चारचौघात पत्नीशी हमरतुमरी करतो आणि ते अनेकांच्या नजरेत भरते, तेव्हा बाब सोपी सरळ नक्कीच नसते. त्यात पुन्हा पाक हेरखात्याच्या महिलेविषयी पत्नीनेच केलेला बोभाटा थक्क करणारा आहे. दुबईत थरूर यांच्याशी भेट झाल्याचा तर्रार हिनेही इन्कार केलेला नव्हता. पण यातले कुठलेच दुवे तपासात घेतले गेलेले नाहीत. सामान्य गुन्हा वा खुन असल्यासारखा तपास रेंगाळला आणि बातम्यातली खळबळ वगळता काही खास घडले नाही. किंबहूना त्यातला राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा प्रथमपासून नजरेआड केला गेलेला आहे. नव्या सरकारने त्यात लक्ष घातले, तर थक्क करून सोडणार्‍या गोष्टी चव्हाट्यावर येऊ शकतील.

4 comments:

  1. भाऊ आपन आसाराम बापू खटल्यामागच सत्य विश्लेषण कराव ही विनंती.

    ReplyDelete
  2. सुब्रमण्यम स्वामींचे tweeter account चेक करा.... 17 ला जनहित याचीका दाखल करणार आहेत ते... !!

    हा माणूस जरा पण सुट्टी देत नाही

    ReplyDelete
  3. भाऊ तुमचं विश्लेशन पटलं पण शशी थरुर यांच्या राष्र्टभक्ती शंका घेण्या आधी थरुर यांनी Oxford Union २०१५ मध्ये अत्यंत उत्कृष्ट भाषण जरुर ऐकावं.

    ReplyDelete
  4. भाऊ,सुनंदा च्या संशयास्पद मृत्यू मागील हेतू/कारणे थोडा वेळ बाजूला राहू द्या..पण भाजप सरकार ने निदान एक राजकीय फायदा म्हणून तरी या प्रकरणाचा तपास नेटाने करावयास नको का? भाजप सरकार तेही करत नाहिये. यामागचे कारण समजत नाही.

    ReplyDelete