Wednesday, June 8, 2016

कोणी कोणाला कसे वाचवावे?



मध्यंतरी कॉग्रेस पक्षाने जंतरमंतर येथे ‘लोकतंत्र बचाव’ मेळावा आयोजित केला होता. त्यावेळी तिथे काहीजणांनी सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वाड्रा यांना प्राधान्य देणारे पोस्टर्स झळकवले होते. वाड्रा यांचा चेहरा मध्यवर्ति जागी आणि राहुल व सोनिया त्यांच्या दोन्ही बाजूला, असे ते पोस्टर्स चर्चेचा विषय झाले होते. कारण प्रत्येक वेळी वाड्रा यांची कुठली भानगड चव्हाट्यावर आली, मग त्यांनी कधी व्यक्तीगत खुलासे केले नाहीत. पण कॉग्रेस प्रवक्त्यांनी खुलासे देत वाड्राची वकिली केलेली होती. त्याचे एकमेव सुत्र असे, की वाड्रा हा एक सामान्य भारतीय नागरिक आहे आणि त्याला कॉग्रेसशी जोडू नये. पण जंतरमंतर येथे जो मेळावा झाला, त्यात रॉबर्ट वाड्रा यांचा चेहरा मधोमध दाखवून, वाड्रा हाच कॉग्रेसचा चेहरा असल्याचे सुचवले गेले होते. अर्थात त्यात नवे काहीच नाही. ते उघड गुपित आहे व होते. नेहरूगांधी घराणे म्हणजे कॉग्रेस, हे आता कोणी नाकारू शकत नाही. म्हणूनच ऑगस्टा वेस्टलॅन्ड हेलिकॉप्टर खरेदीच्या घोटाळ्यात सोनियांच्या नावाचा डंका पिटला गेला, तेव्हा कॉग्रेसला जंतरमंतर येथे मेळावा घेण्याची गरज वाटली. पण तसेच आरोप यापुर्वी कलमाडी, अशोक चव्हाण किंवा चिदंबरम यांच्या कुटुंबियांवर झाले, तेव्हा पक्षातर्फ़े कुठलाही खुलासा झाला नव्हता, किंवा मेळावा भरवण्यात आला नव्हता. थोडक्यात आता कॉग्रेस संघटना म्हणजे नेहरूगांधी घराण्यासाठी सुरक्षा रक्षक पथक होऊन गेलेले आहे. कॉग्रेस, किंवा तिचे विचार यांच्या रक्षणासाठी कोणाला लढायचे असेल, तर त्याला पक्षात स्थान उरलेले नाही. तर नेहरू खानदानाची इज्जत व वारस यांना वाचवण्याला प्राधान्य आहे. किंबहूना तोच एकमेव कार्यक्रम उरला आहे. कदाचित त्यासाठी पक्ष बुडवायला लागला तरी बेहत्तर, अशी मानसिकता म्हणजे कॉग्रेस अशी स्थिती झालेली आहे. मग कॉग्रेसला कोण कसे वाचवू शकतो?

कुठल्या तरी एका गाजलेल्या चित्रपटात सलमान खान आपल्या सहकार्‍यांना विनंती करतो, की ‘कृपया मला कुठलीही मदत करून नका, इतकी मदत कराल का?’ याचा अर्थ असा, की कॉग्रेस वाचवण्यासाठी नेहरू खानदानाला वाचवायचे, असा सिद्धांत आहे आणि मग त्याला वाचवताना कॉग्रेस मेली तरी बेहत्तर, अशी त्याची व्याप्ती झाली आहे. एकशेतीस वर्षे जुना पक्ष किंवा संघटना, अशी कॉग्रेसची ओळख सांगितली जाते. त्या पक्षाचा दिर्घकालीन इतिहास आहे. तो इतिहास भारत देशाच्या स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास आहे, असेही अगत्याने सांगितले जाते. मग त्या पक्षाचे उद्दीष्ट देश व त्याचे भवितव्य वाचवण्याचे असायला हवे. पण त्या दिशेने त्या पक्षातला कोणी कटीबद्ध असलेला दिसत नाही, की वागताना दिसत नाही. प्रत्येकाला पक्षाच्या भवितव्यापेक्षा, घराण्याच्या सदस्यांच्या भवितव्याची चिंता ग्रासत असते. मागल्या काही वर्षात युपीए सरकारच्या सत्तेचे लाभ घेऊन वाड्रा यांनी प्रचंड संपत्ती गोळा केली. त्यावर झालेल्या आरोप व चर्चेतून कॉग्रेस पक्षाच्या पदरी इतका मोठा पराभव आला. पण त्याविषयी खुलेपणाने बोलण्याची हिंमत कुणा कॉग्रेसवाल्यामध्ये दिसत नाही. या घराण्यामुळे पक्षाला इतके भयंकर दिवस आले असताना, सत्याला सामोरे जाऊन कॉग्रेसला वाचवण्याचा विचारही कुणाच्या मनाला शिवलेला नाही. खरे तर सोनिया-राहुल यांच्यापासून कॉग्रेसला वाचवण्याची गरज आहे. पण तसा विचारही कॉग्रेसी नेत्यांना भयभीत करतो. मग कोणी कोणाला कशापासून वाचवायचे? गेल्या तीन चार वर्षात राहुलनीच पक्षातले बहुतांश निर्णय घेतले आणि त्याचे दुष्परिणाम कॉग्रेसच्या वाट्याला आले. तर त्यातून पक्षाला बाहेर काढायचे, म्हणजे गांधी खानदानाच्या कचाट्यातून पक्षाला मुक्त करणे असू शकते. पण उलट त्याच दलदलित पक्षाला अधिक ढकलण्याला प्राधान्य दिले जाते आहे. मग कॉग्रेसला कोणते भवितव्य असेल?

स्वातंत्र्य चळवळीचा वारसा अगत्याने सांगणार्‍या कॉग्रेसजनांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, की या देशाच्या इतिहासात कॉग्रेसला जे महत्व आहे, ते एका राजकीय भूमिकेसाठी आहे. ती भूमिका राष्ट्रीय पक्षाची आहे. एका खानदानाचे राखणदार पथक, अशी त्या पक्षाची भूमिका असू शकत नाही. व्यक्ती वा घराण्यापेक्षा संघटनेचे स्वरूप भिन्न असते. आज भाजपा हा एकमेव राष्ट्रीय पक्ष म्हणून अवकाश व्यापत चालला असताना, विविध प्रादेशिक पक्षांची आघाडी हा त्याला पर्याय होऊ शकत नाही. तर कमी शक्तीचा का असेना, पण दुसरा राष्ट्रीय पक्ष हाच भाजपाला लोकशाहीतला मुख्य पर्याय असू शकतो. किंबहूना भारतीय लोकशाहीची ती गरज आहे. बाकी कुठल्या पक्षाला अनेक राज्यात स्थान नाही की संघटनाही नाही. कितीही दुबळी असली तरी कॉग्रेसच दुसर्‍या राष्ट्रीय पक्षाच्या स्थानावर आहे. पण तिथूनही कॉग्रेस दिवसेदिवस अस्तंगत होत चालली आहे. त्याला भाजपा वा अन्य कुठला राजकीय पक्ष जबाबदार नसून, कॉग्रेसचेच आत्मघातकी धोरण व नकारात्मकता कारणीभूत होत आहे. एका घराण्याच्या स्वार्थ व मतलबासाठी पक्षाला विचार व धोरणापासून वंचित करण्यातून ही दुर्दशा ओढवली आहे. जीएसटी सारखे विधेयक मुळातच कॉग्रेसने तयार केलेले असून, ते राष्ट्रहिताचे आहे आणि तरीही केवळ मोदींना अपशकुन करण्यासाठी विरोध करण्यात कॉग्रेसने पुढाकार घेतला. त्यापासून आता अनेक मित्रपक्षांचा भ्रमनिरास झाला आहे. येत्या पावसाळी अधिवेशनात राज्यसभेतही ते विधेयक संमत होईल. तो मोदीचा विजय असण्यापेक्षा कॉग्रेसच्या नकारात्मकतेचा संसदीय पराभव असेल. त्या विरोधाने सोनिया-राहुल यांचा अहंकार सुखावला जरूर. पण कॉग्रेस अन्य पक्षापासून दुरावणे व नामोहरम होण्याचा आणखी एक प्रसंग त्यामुळेच ओढवला आहे. याचा अर्थ इतकाच, की सोनिया-राहुलनाही पक्षाची पर्वा उरलेली नाही. मग कॉग्रेसचे भवितव्य काय?

कॉग्रेसचे भवितव्य म्हणजे सोनिया राहुल किंवा गांधी घराण्याचे भवितव्य असू शकते. पण त्या घराण्याचे भवितव्य हे कॉग्रेसचे भवितव्य असू शकत नाही. हेच आसाम राज्यात हेमंत बिश्वसर्मा राहुलना समजावून थकले आणि पक्ष सोडून निघून गेले. हेच विजय बहुगुणा यांनी उत्तराखंडात किंवा अन्य नेत्यांनी वेळोवेळी स्पष्ट केलेले आहे. घरातली जुनीपुराणी वस्तु कितीही भावना गुंतलेल्या असल्या, तरी भंगार झाल्यावर निकालात काढावी लागते. अन्यथा ती कुटुंबावर बोजा होऊन जाते. कॉग्रेस व नेहरू खानदानाचे संबंध काहीसे तसेच आहेत. इंदिरा गांधींनी पक्षाचे पुनरुज्जीवन केले, त्यावेळची राजकीय स्थिती आज नाही आणि राहुल-सोनियापाशी तितका करिष्मा नाही. म्हणून कॉग्रेस अस्ताला चालली आहे. त्याचे दु:ख इतक्यासाठी आहे, की कॉग्रेसच पर्यायी पक्ष आहे. त्याने त्या कर्तव्याला दाद दिली नाही, तर अन्य कुणा नेत्याला वा पक्षाला मोदी-भाजपा यांना पर्याय म्हणून राष्ट्रीय पातळीवर अवतार घ्यावा लागेल. कारण मोदी आज कितीही लोकप्रिय असले आणि अपरिहार्य असले, तरी लोकशाहीत सत्ताधार्‍यांना तितकाच समर्थ पर्याय आवश्यक असतो. प्रचलित पक्ष व नेत्यांनी तशी जबाबदारी उचलली नाही, तर काळ त्यांच्यासाठी थांबत नाही. इतिहास नवा पर्याय उभा करीत असतो. १९७० च्या दशकापासून तशी गरज होती. ती ओळखण्यात तोकडे पडणार्‍या जनता पक्षीय नेत्यांसाठी काळ थांबला नाही, की अडवाणींना भाजपाचे नेतृत्व समर्थपणे करता आले नाही, म्हणून इतिहास प्रतिक्षा करत बसला नाही. कॉग्रेसी राजकारणाला मूठमाती द्यायला मोदींचा उदय झाला. आता लोकशाहीत पर्याय म्हणून कॉग्रेसला कात टाकून उभे रहाणे अगत्याचे आहे. त्यांनी त्याकडे पाठ फ़िरवली, तर अन्य कुणी नेता वा पक्ष भाजपाला पर्याय म्हणून राष्ट्रीय पातळीवर उदयास आल्याशिवाय रहाणार नाही. मग उरलीसुरली कॉग्रेस पुराणवस्तु म्हणून जनपथावर जाऊन बघावी लागेल.

4 comments:

  1. भाऊ काँग्रेस ची डोळे व कान उघडणी करणारा लेख... इतक्या परखडपणे आपण वास्तव चे भान आपण काँग्रेस जनांना (खरे तर ते आता व अनेक दशके जन राहीलेले नाहीत तर गांधी नेहरु घराण्याची खाजगी मलमत्ता झालेले आहेत) दिले आहे....
    पण याची पेरणी कित्येक दशका पुर्वीच झालेली आहे हा योगायोग आहे की घडवले गेले आहे हे समजणे सामान्य माणसाच्या कल्पने पलिकडेचे आहे...
    संजय इंदिरा राजीव गांधी यांच्या हत्या (घातपात ) याची चर्चा सामान्य जनमानसात गेली दोन तीन दशके होत आहे. हे सर्व विदेशी व्यक्ती कडे देशाची सुत्रे जाण्यासाठी केले गेले आहे की योगायोग ह्यावर विचार व चर्चा कधीच केली गेली नाही..
    कारण उघड पणे बाहेर येणे शक्य नाही.
    काही वेळा परिकथे प्रमाणे याचा सिक्वेन्स लागतो.
    भारतीय विचारवंताना याचे वावडेच आहे.
    भारता सारख्या अविकसित बहुसंख्य गरिब अशिक्षित ( ठेवले गेले मग मतासाठी खरेदी करणे सोपे जाते) भावनिक जनांची ओढ गांधी नेहरु घराण्या भोवती घुटमळत राहणार याची पक्की खात्री विदेशी शक्‍तींना असणार (हे वास्तव की कल्पीत) मग अशी पेरणी करणे विदेशी महासत्तांना का शक्य नाही हे भारतीयांना का समजत नाही हे अकलनीय आहे.

    पण भारताची एक संघियता (unity) तोडण्या मध्ये यश येण्यात एवढा वेळ लागेल व पेरलेले बी एवढे निकृष्ट निघेल असे विदेशी प्लॅनरला वाटले नसेल. परंतु हा भारतीयांसाठी नियतीचा शुभ खेळ आहे असे म्हणावे लागेल.
    त्यामुळे भारतात मोदीं सारखा कणखर द्रेष्टा अभ्रष्टाचारी विकासी नेत्याचा उदय झाला. हे विदेशी शक्तींना अनपेक्षित आहे.
    एक पनवेलकर

    ReplyDelete
  2. परंतू मोदीं सारखा मुरब्बी द्रेष्टा नेत्याला विदेशी शक्तीनी गेल्या दशकात कोणते जाळे फेकले आहे हे कळायला येत्या लोकसभा निवडणूका पर्यंत थांबावे लागले.
    कारण एका बाजुने मोदींच्या विदेश दौऱ्यांच्या कथा विदेशी प्रणीत मिडिया रंगवित आहे व दुसऱ्या बाजुने विदेश फिरणारा पंतप्रधान म्हणून सामान्य जनमानसात खिल्ली उडवली जाते आहे.
    आपण जर विदेशी दौर्‍याचे कौतुक करायला गेलोतर अनेक अर्ध शिक्षीत भारतात पाणी, दुष्काळ महागाई शेतकरी आत्महत्या होत असताना मोदी विदेशात का फिरतायत हे विचारतात.
    काही महाभाग भारतात एवढी नैसर्गिक साधन संपत्ती असताना त्यात गुजरात प्रमाणे (Agricultural produce growth rate was in 2 digits in Modi regime ) शेती जलसंपदा, Hydro power धरण बांधून विज निर्माण का करत नाहीत असे पण बोलतात.
    त्याच वेळी अनेक विदेशी गुंतवणूकीचे करारांची चर्चा मिडिया करत आहे. तर दुसरीकडे सामान्य माणूस मोदींना हे विदेशी गुमराह करत आहेत अशी चर्चा करताना दिसतात. कागदावर विदेशी गुंतवणूक दाखवून प्रत्यक्षात गुंतवणूक झाली नाही तर लोकसभा निवडणूकीत हाच मुद्दा व काळ्या पैशाचा मुद्दा वरिल अपयशाची बोंबाबोंब करुन अशिक्षित गरिब जनतेची मते फिरवतील का हे काळच सांगेल.
    Incendently दिल्ली राज्यातील निवडणूकीच्या आधी ओबामांच्या भेटी वेळी हेच सामान्य रीक्षा वाले हमे कुछ नही फरक पडता म्हणत एकीकडे अप्रत्यक्ष रित्या मते फिरवत होते. व दुसऱीकडे केजरीवाल गल्ली गल्ली फिरुन सामान्य माणसाला विज पाणी चे आश्वासन देत होते.
    आता पण उत्तर प्रदेशातील निवडणूकी साठी मिडिया ने साधवी मुल्लां ची झुंज चालवली आहे.
    ह्या सर्वांचा रजकिय अभ्यास करणे एकिकडे जरि रोमहर्षक असेल तरी दुसरीकडे ह्य भारतवर्षा परिक्षा करणारा असेल.
    भाऊ या बाबत आपले विस्लेशण भाजपला मार्गदर्शक होईल.
    एक पनवेलकर

    ReplyDelete
  3. भाऊराव,

    एक गोष्ट नक्की की राहुल गांधी काँग्रेसचा मनापासून द्वेष करतात. त्यांना राजकारणाची कमालीची घृणा आहे.

    याची सुरुवात त्यांच्या वडिलांपासून झाली आहे. राजीव गांधी राजकारणात सक्रिय नव्हते. निरुपायाने त्यांना यात पडावं लागलं. जेव्हा राज्य कसं करतात ते उमजू लागलं होतं तेव्हढ्यात त्यांचा बळी गेला. आजी आणि पित्याच्या हत्येचा राहुलवर अतिशय नकारात्मक परिणाम झाला.

    राजीव हत्येपश्चात सोनिया गांधी लगेच सक्रिय झाल्या नाहीत. तब्बल ७ वर्षांनंतर त्या काँग्रेसच्या अध्यक्षा झाल्या. त्याही निरुपायाने राजकारणात पडलेल्या दिसताहेत. बाह्य शक्तींनी मातापुत्रावर राजकारणात पडायची सक्ती केलेली असावी. राजकारणात न पडल्यास त्यांच्या कदाचित जिवाला धोकाही उत्पन्न होऊ शकतो. या सर्व चिखलापासून प्रियांका यांना दूर ठेवण्याची तिच्या आईची धडपड चालू आहे. यासाठी जावईबापूंचा बळी गेला तरी बेहत्तर. म्हणूनच रॉबर्टना पुढे आणण्याची चाचपणी करून झाली. मात्र रॉबर्टचा यांचा चेहरा मते खेचणारा नाही.

    अर्थात, एक जालीम उपाय बाकी आहे. तो म्हणजे काँग्रेस पक्षाची वाट लावणे. सध्यातरी हाच उपाय उभयतांनी अंमलात आणायचं ठरवलेलं दिसतंय. न रहेगा बांस न रहेगी बांसुरी.

    आपला नम्र,
    -गामा पैलवान

    ReplyDelete
  4. सेना-भाजपा बघा व शिका लोक व काळ ५वा पक्ष हुडकायला लागलेत

    ReplyDelete