Wednesday, March 14, 2018

भुजबळांच्या मार्गाने?

Image result for chidambaram

बर्‍याच दिवसांनी किंवा महिन्यांनी राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आपला एक निकटवर्ति सहकारी तुरूंगात हकनाक जामिनाअभावी खितपत पडलेला असल्याची आठवण झालेली आहे. कपील पाटिल या पत्रकार आमदाराने एक लेख लिहून छगन भुजबळ यांची प्रकृती गंभीर असल्याचे सूतोवाच केलेले आहे. पाटिल हे राष्ट्रवादीचे आमदार नाहीत. पण तेही ओबिसी समाजासाठी काम करीत असल्याने त्यांना भुजबळांची फ़िकीर असावी. अन्यथा राष्ट्रवादी पक्षाचे तमाम नेते भुजबळांना विसरून गेले आहेत. आता त्यांच्या अटकेला दोन वर्षाचा कालावधी उलटून गेला असून तपास चालू असल्याने त्यांना कोठडीत ठेवलेले आहे. मध्यंतरी त्यांच्याच सोबत तुरूंगात असलेला पुतण्या समीर भुजबळ याला कोर्टात समोर बघून भुजबळ संतापल्याची बातमी आली होती. त्याला आपल्यासमोर आणू नका, असे भुजबळांनी पोलिस पथकाला सांगितल्याचे त्या बातमीत म्हटले होते. नंतर या प्रतिक्रीया आलेल्या आहेत. अशा तपासात आरोपी पुरावे नष्ट करण्याची वा साक्षीदारांना आमिष दाखवण्याची शक्यता असते. त्याचा परिणाम खटल्यावर होऊ शकतो म्हणून कोठडीत ठेवण्याची अट कोर्ट मान्य करते. पण भुजबळांच्या प्रकरणाला आता दोन वर्षापेक्षा अधिक काळ गेला असून अजून कुठला तपास चालू आहे? आणि कुठले पुरावे ते नष्ट करू शकतील, त्याचा खुलासा होऊ शकलेला नाही. पण दरम्यान अमर्याद काळासाठी ते गजाआड पडलेले आहेत. त्याच्या प्रकरणाची सुरूवात जशी झाली, तशीच नेमकी कार्ति चिदंबरम यांच्या अटक नाट्याची सुरूवात झाली, हा योगायोग मानता येणार नाही. जेव्हा भुजबळांचे प्रकरण तपास यंत्रणांनी हाती घेतले, तेव्हा ते परदेशी होते आणि मायदेशी येताच त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेले होते. कार्ति यांनाही असेच विमानतळावर उचलण्यात आलेले आहे आणि आता जामिनाचा खेळ रंगलेला आहे.

भुजबळ परदेशी गेलेले असताना त्यांच्यावर आरोप दाखल करण्यात आलेले होते आणि त्यांचा पुतण्या समिर याला पोलिसांनी ताब्यातही घेतलेले होते. तेव्हा भुजबळ परदेशी असल्याने पोलिस काय करणार, अशी चर्चा सुरू झालेली होती. पण परदेशातूनच भुजबळांनी आपण फ़रारी नाही, आठवडाभरात मायदेशी परतणार असल्याची ग्वाही दिलेली होती. तसे भुजबळ परतलेही आणि त्यांना विनाविलंब पोलिसांनी ताब्यात घेतलेले होते. मग त्यांच्या जामिनाचा खेळ सुरू झाला होता. आधी एकदोन दिवस व नंतर आठदहा दिवसांसाठी भुजबळांना कोठडी देण्याचा सपाटा कोर्टाने लावला होता. पण जसजसे दिवस गेले तसतशी मुदत वाढू लागली आणि अगदी सुप्रिम कोर्टापर्यंत जाऊनही त्यांना कुठला दिलासा मिळू शकलेला नव्हता. आताही वारंवार आपल्या प्रकृती व अन्य कारणास्तव भुजबळांनी जामिनाचा अर्ज करून बघितला आहे आणि तपासात काय शिल्लाक राहिले, असाही प्रश्न केलेला आहे. पण त्याला उत्तर मिळाले नाही की जामिन मिळालेला नाही. त्यामुळे आरंभी आवेशात असलेले भुजबळ आता अगदी निराश होऊन गेले आहेत. आपल्या वाढलेल्या वयाचा हवाला देऊनही त्यांनी जामिनाची याचिका करून बघितली आहे. पण त्यांना दिलासा मिळू शकला नाही. त्यांची व कार्ति चिदंबरमची प्रकरणे जवळपास सारखीच आहेत. ईडीच्या तडाख्यात दोघे सारखेच सापडलेले आहेत. त्यामुळे यातला योगायोग नजरेआड करता येत नाही. दोन वर्षापुर्वी हायकोर्ट व सुप्रिम कोर्टात जसे भुजबळ जामिनासाठी दाद मागत होते, त्यापेक्षा कार्ति चिदंबरम यांची कसरत थोडीही वेगळी नाही. मग त्याचे भवितव्य काय असेल? दोन्ही राजकीय खटल्यांच्या नाट्याचे तपशील तपासून बघण्यासारखे आहेत. प्रामुख्याने कालपरवा कोठडीची मुदत वाढवून मागण्यासाठी कार्तिला तुरूंगात आणले, तेव्हाचा प्रसंग तर समसमानच होता.

भुजबळांना अटक झाली तेव्हा राष्ट्रवादी पक्षातर्फ़े सरकारला जबरदस्त आवाज देण्यात आलेला होता. सुप्रिया सुळे यांनी आम्हाला कितीही लोकांना पकडा आम्ही भित्रे नाही की घाबरणार नाही; अशी भाषा केली होती. तर शरद पवार उपहासाने म्हणाले होते, मला कधी अटक होतेय त्याची प्रतिक्षा करतो आहे. भुजबळ अटकेपुर्वी परदेश वारी संपवून मायदेशी परतले, तेव्हा पक्षातर्फ़े त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले होते आणि आता त्यापैकी कोणी त्यांची वास्तपुस्तही घेत नाही. पक्षाच्या विविध कार्यक्रम वा आंदोलनातही भुजबळांची कोणाला आठवण होत नाही, की त्यांच्या सुटकेची मागणी होत नाही. कपील पाटिलच्या लेखामुळे पक्षाध्यक्षांना भुजबळांची प्रकृती गंभीर असल्याचे कळले व त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीले. कार्तिची कहाणी काय आहे? चेन्नईत घरावर धाडी पडल्यापासून त्याने आक्रमक पवित्रा घेतला आहे आणि अटक झाल्यावरही कोर्टात आणल्यावर त्याने नेल्सन मंडेला यांच्याप्रमाणे विजयी मुद्रेने कॅमेरासमोर आपला हसरा चेहरा सादर केला होता. पहिल्या तारखेला कॉग्रेसच्या काही लोकांनी कोर्टाच्या आवारात गर्दी केली होती व घोषणाबाजीही झालेली होती. आता महिना उलटलेला नाही, एवढ्यात ती गर्दी पांगली आहे आणि कोठडीची मुदत वाढत चालली आहे. चौथ्या सुनावणीत एकदम बारा दिवसांची कोठडी फ़र्मावणे, येऊ घातलेल्या संकटाची चाहुल आहे. यात कार्ति जितका असहकार करणार आहे, तितके त्याचे संकट वाढणार आहे. इंद्राणी मुखर्जी यांचा कबुली जबाब आणि केंद्रीय अर्थखात्याच्या दफ़्तरी असलेले काही दस्तावेज यांची सांगड घालण्यासाठी कार्तीची मदत तपास यंत्रणांना हवी आहे आणि तिथेच त्याने त्यांच्याशी आसहकार पुकारलेला आहे. मग इतके होऊनही कोर्ट कोठडी वाढवत असेल, तर लपवाछपवीचे पुरावे कोर्टाला गंभीर वाटत असण्याची दाट शक्यता आहे. अन्यथा एव्हाना फ़रक पडला असता.

कार्तिच्या चार्टर्ड अकौंटंटला आधीच अटक झाली असून त्याच्या संगणकातून काही गंभीर नोंदी तपास यंत्रणांच्या हाती लागलेल्या आहेत. पण त्या नोंदींची अधिकृत पत्रे वा दस्तावेज मिळत नाहीत. ते नष्ट करण्यात आले असावेत किंवा लपवण्यात आले असावेत, असा यंत्रणांचा दावा आहे. त्या नोंदींविषयी कार्तिने समाधानकारक खुलासा केल्याखेरीज त्याची सुटका होऊ शकत नाही. नुसता इन्कार वा असहकार कामाचा नाही. त्यातून कोठडीचा काळ वाढत जाईल आणि हळुहळू दिवस आठवड्याची जागा महिने घेतील. अटकेपुर्वी कोर्टाने कार्तिला अनेक सवलती दिल्या होत्या आणि त्यामुळे परदेशी गेला असताना त्याने काही पुरावे नष्ट केल्याचा दावा, बहूधा वजनदार ठरलेला असावा. त्याच्याच परिणामी ईडी व सीबीआयला कोर्टाचा झुकता कौल मिळतो आहे. पण ज्या दिशेने व गतीने कार्तिचे प्रकरण वाटचाल करते आहे. त्याकडे बघता, हा चिदंबरम पुत्र भुजबळांच्या मार्गाने जाताना दिसतो. असहकार व अडवणूकीने त्याचा तपास लांबत राहिल आणि मुळ खटलाच उभा रहायला विलंब झाला, मग किती महिने किंवा वर्षे कोठडी नशिबी येईल, त्याची गणती नाही. वकील म्हणून काम केलेल्या पिता चिदंबरम यांना त्याचा अंदाज आलेला आहे. पण त्यातून पळवाटही काढता येणे शक्य राहिलेले नाही. बहुधा त्याचे कुठलेही भान पुत्र चिदंबरमला नसावे. म्हणून तो कुठला मोठा पराक्रम करून आल्याप्रमाणे कॅमेरासमोर हाताची वळलेली मूठ उंचावून पोझ देण्यात धन्यता मानतो आहे. वळलेली मूठ ही ‘भुजाबळा’चे प्रतिक असते. पण दरम्यान आपला भुजबळ होऊ घातला आहे. याचे भान या लाडावलेल्या मंत्रीपुत्राला नसावे. कारण असली सत्ता वा राजकीय मस्ती न्यायासनासमोर चालत नाही, की तिची कसलीही महत्ता असू शकत नाही. असती, तर सुप्रिम कोर्टापर्यंत मजल मारून शेवटी सोनिया राहुलना नॅशनल हेराल्ड प्रकरणात जामिनाचा बॉन्ड लिहून द्यावाच लागला नसता ना?

5 comments:

  1. भुजाबळाचे प्रतिक.... एकदम मार्मिक

    ReplyDelete
  2. Bhau
    Aaplya Sadhvi pradnya aani colnel Purohit yana vinakaran 9 varshe Kothadi milali.

    Ya haramkhorana aatashi 2 Varshe zali aani ekachi suruwatach aahe.

    Yanahi kalu det ki

    ReplyDelete
  3. भाऊ
    अप्रतिम इतके सुंदर आणि अचूक विश्लेषण केलत.

    ReplyDelete
  4. आगदी वास्तविक विश्लेषण.

    ReplyDelete
  5. उत्तम भविष्यवाणी... भुजबळांपेक्षा एकच गोष्ट वेगळी व्हावी.. भुजबळ आणि पुतण्या दोघंच सापडले.. कार्ती तीर्थरूप आणि इतर चोरमंडळींसह तुरूंगात जावेत..

    ReplyDelete