Friday, March 30, 2018

गणितातली समिकरणे

संबंधित इमेज

त्रिपुरात भाजपाच्या यशाने अनेकांचे डोळे दिपले होते. मग त्याचा शिल्पकार म्हणून मुंबईतल्या सुनील देवधरने तिथे काही वर्षे ठाण मांडून केलेल्या संघटनात्मक कार्याचे कौतुकही झाले. त्यात सत्य आहेच. पण दिर्घकाळ तिथे सत्ता राबवणार्‍या मार्क्सवादी पक्षाच्या नाकर्तेपणाची वा नकारात्मक कारभाराची फ़ारशी चर्चा झाल्याचे ऐकायला मिळाले नाही. कुठल्याही यशापयशामध्ये हा नाकर्तेपणा खुप महत्वाचा असतो. जेव्हा सत्तेत बसलेल्यांचा नाकर्तेपणा अतिरेकी होतो, तेव्हा जनता बदलाला प्रवृत्त होत असते. अन्यथा सुनील देवधरच्या मेहनतीला फ़ळ येत नसते. त्याचीच दुसरी बाजू अशी असते, की सुनीलसारख्यांनी कितीही मेहनत घेतली, म्हणून उत्तम काम करणार्‍या सत्ताधीशाला कोणी सत्ताभ्रष्ट करू शकत नसतो. तशी़च तिसरी बाजू आहे. कितीही नाकर्ते सरकार असले तरी त्याचा राजकीय लाभ उठवणारा पक्ष वा नेता समोर आल्याशिवाय लोक बदलाला तयार होत नाहीत. त्रिपुराचे असे विश्लेषण कुठे वाचनात आले नाही. किंबहूना आपल्याकडे जे उथळ विश्लेषण चालते, त्यात कुणाला तरी श्रेय देऊन पराभूताचा नाकर्तेपणा लपवला जात असतो. जेव्हा असेच विश्लेषण चालते, तेव्हा मग अटीतटीच्या लढतीमध्ये कोणता पक्ष कशामुळे पराभुत होईल वा जिंकू शकेल, त्याचाही अंदाज बांधता येत नसतो. अशी स्थिती असली, मग कर्नाटकात उद्या काय होईल, त्याचा अंदाज कुठल्याही पत्रकाराला बांधता येत नसला, तर नवलाची गोष्ट नाही. अशी माध्यमे मग नेत्यांचे वा पक्षांचे दावे प्रतिदावे रंगवण्यात धन्यता मानत असतात आणि निकालाच्या दिवशी चमत्कार झाल्याचे अभिमानाने कथन करू लागतात. आताही कर्नाटकात कॉग्रेस मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनी लिंगायत समाजाला वेगळ्या धर्माचा दर्जा देऊन कशी जबरदस्त खेळी केली आहे, त्याची लांबलचक वर्णने वाचायला मिळत आहेत. पण म्हणून कॉग्रेसला पुन्हा सत्ता राखणे सोपे आहे काय?

क्वचितच या दक्षिणी राज्यात पाच वर्षे पुर्ण करणारा मुख्यमंत्री पुन्हा निवडून आलेला आहे. शिवाय लिंगायतांना सिद्धरामय्यांनी गाजर दाखवले, हेही मान्य करायलाच हवे. पण तेवढ्याने हा समाज कॉग्रेसला एकगठ्ठा मतदान करील, असा निष्कर्ष काढणे अतिरेकी आहे. कारण वीरेंद्र पाटील यांना अपमानित करून बाजूला केल्यापासून हा समाज घटक कॉग्रेसला दुरावला. त्याचाच लाभ उठवून भाजपाने त्या समाजघटकात आपले बस्तान बसवलेले आहे. अशा पार्श्वभूमीवर नुसते गाजर दाखवून कॉग्रेस पुन्हा त्या समाजाला जिंकू शकणार आहे काय? कर्नाटकातील सर्वात मोठा समाजघटक म्हणून या वर्गाकडे बघितले जाते आणि तोच तिथला सुखवस्तु पुढारलेला समाज आहे. पण त्यातल्या नेतृत्वाला खच्ची करण्यातूनच कॉग्रेस खिळखिळी होत गेली. भाजपाचा विस्तार त्यामुळेच झाला. मग आपला समाज नेता मुख्यमंत्री होण्याची संधी लिंगायत नाकारतील असे ज्यांना वाटते त्यांना कोणी समजावू शकत नाही. एका बाजूला येदीयुरप्पा हा लिंगायत नेता भाजपासाठी मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार आहे आणि दुसरीकडे भाजपाकडे आजही देशातील सर्वात लोकप्रिय नेता म्हणून नरेंद्र मोदी प्रचारासाठी उपलब्ध आहेत. पण त्याही दोन गोष्टींच्या पलिकडे संघटना व तिचा निवडणूकीतील यंत्राप्रमाणे वापर, ही भाजपाची सर्वात महत्वाची जमेची बाजू आहे. इतकी साधने तेव्हा निर्णायक ठरतात, जेव्हा एखाद्या पक्षाकडे अन्य महत्वाचे पोषक घटक असू शकतात. ते घटक म्हणजे भाजपाला मिळू शकणार्‍या मतांची संख्या किंवा टक्केवारी होय. भाजपा कर्नाटकात कुठवर मोठी झेप घेऊ शकतो त्याचे गणित कोणी अजून मांडलेले नाही. त्याचे उत्तर मागल्या तीन मतदानातून सापडू शकते. मोदी व येदीयुरप्पा अधिक संघटनात्मक बळ किती मोठी बेरीज होते, त्याचे उत्तर मागल्या लोकसभा मतदानात सामावलेले आहे.

२००८ सालात प्रथमच भाजपा कर्नाटकातला सर्वात मोठा बहूमताचा पक्ष म्हणून विधानसभेत निवडून आला. तेव्हा त्याला मिळालेली मते कॉग्रेसपेक्षा एक टक्का कमीच होती. पण ही मते काही भागात केंद्रीत झालेली असल्याने त्याला सर्वाधिक म्हणजे २२४ पैकी ११० जागा मिळालेल्या होत्या. थोडीफ़ार तडजोड करून भाजपाला सत्ताही संपादन करता आली. मात्र ती सत्ता पचवता आली नाही आणि पाच वर्षांनी भाजपाला दणका बसला. तेव्हा भाजपाची मते ३४ टक्क्यांवरून २३ टक्केपर्यंत घसरली होती. जागा मात्र ७० कमी झाल्या. उलट सत्ता गमावतानाही कॉग्रेसकडे २००८ सालात सर्वाधिक मते होती आणि पाच वर्षांनी पुन्हा सत्ता मिळवताना कॉग्रेसच्या मतांमध्ये अवघी अडीच टक्के वाढ झाली होती. पण त्या अडीच टक्क्यांनी कॉग्रेसला अधिकच्या ४२ जागा व बहूमत मिळवून दिले होते. सत्ता मिळणे वा सत्ता जाण्यातला फ़रक हा असा अगदी नगण्य असतो. पण परिणाम मात्र भलतेच असतात. २०१३ सालात कॉग्रेसने सत्ता मिळवली व भाजपाने सत्ता गमावली. तरी कुठल्याही परिस्थितीत भाजपा एका ठराविक मतांपर्यंत येऊन टिकलेला पक्ष होता आणि म्हणूनच वर्षभरात आलेल्या लोकसभा निवडणूकीत त्याने चमत्कार घडवला. विधानसभेत येदीयुरप्पा पक्ष सोडून गेले असताना २३ टक्क्यांपर्यंत घसरलेल्या भाजपाने, लोकसभेत काय चमत्कार घडवला? त्याची मतांची टक्केवारी थेट ४३ टक्क्यांपर्यंत जाऊन पोहोचली व लोकसभेच्या १७ जागा भाजपाने जिंकल्या. इतकी मोठी झेप घेण्यासाठी मुळात २३ टक्के किमान मतांचा पाया भक्कम होता. झेप घेण्यासाठी असा पाया असला मग संघटनेच्या माध्यमातून उंच झेप घेता येत असते. कॉग्रेसला नेहमी इतरांच्या नाकर्तेपणाचा लाभ घेता आला. पण संघटनेच्या बळावर मोठी झेप घेता आली नाही, हा दोघातला मोठा फ़रक आहे. शिवाय अशी दोन राष्ट्रीय पक्षांची झुंज होते, तेव्हा मधल्यामध्ये देवेगौडांचा प्रादेशिक पक्ष त्याची मोठी किंमत मोजत असतो.

विरोधात बसण्यापेक्षा सत्तेची फ़ळे चाखण्यासाठी देवेगौडांच्या पक्षाने अनेक कसरती केल्या आणि त्यात त्यांचा मतदार हळुहळू हातातून निसटत गेला आहे. त्यातला काही भाजपा तर काही कॉग्रेसकडे गेला आहे. म्हणून मागल्या लोकसभेत अटीतटीची लढत आली, तेव्हा देवेगौडांना मोठा फ़टका बसला. त्यांचे कसेबसे दोन खासदार निवडून आले. कॉग्रेसची मते वाढली तरी त्याच्याहूनही भाजपाच्या संघटनात्मक मशागतीने आणखी मते वाढवून घेतली. त्यातले आकडे डोळे दिपवणारे आहेत. २०१३ सालात विधानसभेला २३ टक्के मते व ४० जागा कशाबशा मिळवणार्‍या भाजपाने लोकसभेत ४३ टक्के मतांची झेप घेतली. त्याचा विधानसभा मतदारसंघानुसार आकडा थक्क करणारा आहे. २२४ जागी झालेल्या मतदानात भाजपाने   १३२ जागी तर कॉग्रेसने ७७ जागी आघाडी मारली होती. मोदी येदीयुरप्पा बेरजेचे हे गणित आहे. उद्या होऊ घातलेल्या निवडणूकीत भाजपाला तो १३२ जागांचा आकडा खूणावतो आहे. किंबहूना त्यात कॉग्रेसला किती जागा मिळू शकतात, त्याचेही मार्गदर्शन आहे. २०१४ सालातले मतदान जसेच्या तसे आताही होईल असे नाही. पण भाजपाला कर्नाटकातीला सत्ता हिसकावून घ्यायची असेल, तर कोणत्या मतदारसंघात सर्व शक्ती पणाला लढायचे, त्या जागा ठरलेल्या आहेत. त्याखेरीज जिथे थोडक्या फ़रकाने मागे पडले, तिथे अधिक शक्ती पणाला लावायची आहे. अशा मिळून जागा १८० होत असतील तर कर्नाटकची लढाई कुठल्या बाजूला झुकणारी आहे, त्याचे उत्तर मिळू शकते. मोदी शहा मिळून जी रणनिती आखतात, ती जागा लढण्यापेक्षा जिंकायच्या जागांवरच शक्ती पणाला लावायची असते. तिथे जाऊन मग सुनील देवधर स्वत:ला गाडुन घेत असतो आणि मतमोजणी होऊन निकाल लागले, मग जगाला त्याचे कौतुक सांगावे लागत असते. आज कर्नाटकात कुठला सुनील देवधर मशागत करतो आहे, त्याचा कुणाला थांगपत्ता आहे काय?

6 comments:

  1. Perfect presentation of situation, and analysis big Sunil Deodhar pattern

    ReplyDelete
  2. भाऊ देवधर आले होते तो माझा कट्टा चा भाग बघा. त्यात त्यांनी स्वतः च सांगितलं की त्रिपुरा च्या लोकांना बदल हवा होता पण सक्षम पर्याय नव्हता (काँग्रेस ने तसे कधीच प्रयत्न केले नाहीत, काही कारणांसाठी) वगैरे! खूप छान आहे तो भाग.

    ReplyDelete
  3. आणखी एक भाउ अमरींदरसिंग प्रमाणे ईथेही आमदारांनीच राहुलला कर्नाटकमध्ये जास्त फिरवू नका अस सांगितलय.सिद्धरामांवर जास्त भरोसा आहे पन मोदी तर प्रचार करनारच.

    ReplyDelete
  4. आज कर्नाटकात कुठला सुनील देवधर मशागत करतो आहे, त्याचा कुणाला थांगपत्ता आहे काय?


    Best punch line !!👍

    ReplyDelete
  5. भाउ, महाराष्ट्रातले अनेक भाजप नेते गेल्या अनेक महिन्यांपासून कर्नाटकात नियमितपणे जावून संघटनेच्या बैठका घेत आहेत. डावपेच आखत-राबवत आहेत.

    ReplyDelete