Thursday, July 26, 2018

मेलेल्या मनाची जीवंत माणसे

Image result for kakasaheb shinde

गेल्या आठवड्यात अकस्मात पुन्हा मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आणि आषाढी एकादशीचा मुहूर्त साधून या मागणीकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांना कोंडीत पकडायचा खेळ केला. मुख्यमंत्री पंढरपूरला शासकीय पुजेसाठी आले तर गडबड होऊ शकते, असा इशारा दिल्यावर देवेंद्र फ़डणवीस यांनी त्यातून माघार घेतली. वास्तविक अशी शासकीय पूजा ही दिर्घकालीन प्रथा आहे, त्यामुळे त्याचे राजकारण व्हायला नको होते. शिवाय मुख्यमंत्र्यांना कडेकोट सुरक्षा पुरवलेली असल्याने त्यांना कुठलाही धोका नव्हता. पण त्यांच्यापेक्षा अशा वारीसाठी जाणार्‍या लाखो वारकर्‍यांच्या जीवाला धोका होऊ शकला असता. जिथे गर्दी असते तिथे नुसती बेशिस्तही हजारो लोकांचा बळी हकनाक जाऊ शकत असते. सहाजिकच कुठल्याही स्फ़ोटक वा शस्त्रापेक्षाही गर्दीच भेदक असल्याने मुख्यमंत्र्यांनी त्यातून माघार घेतली. आपल्या सुरक्षेपेक्षा वारकर्‍यांची सुरक्षा महत्वाची असल्याचे सांगताना फ़डणवीसांनी अशा धमक्या देणारे शिवरायांचे मावळे असू शकत नाहीत, अशीही मल्लीनाथी केली. ती राजकीय स्वरूपाची भाषा होती, हे कोणी नाकारू शकत नाही. पण वारीतच गडबड करण्याचा इशाराही राजकीय हेतूनेच केलेला होता. त्यात गुप्तचर खात्याने काही सांगितल्याचा मुख्यमंत्र्यांचा दावा खराखोटा ठरवण्याचेही राजकारण झाले. गुप्तचर खात्याकडे कुठल्याही घातपात वा हल्ल्याची नेमकी माहिती उपलब्ध होऊ शकली असती, तर जगाच्या पाठीवर कुठल्याही देशात कधीही घातपात होऊ शकले नसते. म्हणूनच गुप्तचर खात्याची माहिती पुरावे दाखवा, असले आव्हान पोरकट असते. समाजाच्या वेगवेगळ्या थरात गुप्तचर मिसळलेले असतात आणि तिथल्या गावगप्पातून आपले अंदाज व्यक्त करीत असतात. तशी नुसती शक्यताही सावधानतेचे उपाय योजण्याचे कारण असते. मग वारीच्या निमीत्ताने मिळालेली माहिती खोटी ठरवण्याचा खटाटोप कशाला? नंतरच्या घटनांनी त्याची ग्वाही दिलेली नाही काय?

वारी संपली आणि मग एक एका जिल्हा शहरात मराठा क्रांती मोर्चाच्या नावाने उग्र आंदोलनांचे पेव फ़ुटले. उरंगाबाद येथे अशा भावनातिरेकाने काकासाहेब शिंदे या तरूणाने गोदावरीत उडी घेतली आणि त्याला घोषणांच्या सलामीत जलसमाधी घेऊ देण्यात आली. तो तरूण बुडताना दिसत असूनही मोर्चातल्या कोणी याला वाचवायला पुढाकार घेतला नाही, ही वस्तुस्थिती आहे. तिथे पोलिस होते तसेच मोर्चेकरीही होते. यापैकी कोणाच्याही काळजाला पाझर फ़ुटला नाही, ही बाब अत्यंत अमानुष अशीच आहे. काही वर्षापुर्वी शेतकरी आत्महत्यांचा विषय घेऊन केजरीवाल आणि त्यांच्या मंत्री सहकार्‍यांनी दिल्लीच्या जंतरमंतर येथे एक धरण्याचा कार्यक्रम योजलेला होता. शेतकरी कसा बेजार झालेला आहे आणि त्याला जगणे अशक्य झाल्याचा तमाशा त्यांना मांडायचा होता. त्याला तमाशा इतक्यासाठी म्हणायचे, की तिथे गजेंद्र सिंग नावाच्या राजस्थानहून आलेल्या एका खेडूताने झाडावर चढून थेट आपल्याला गळफ़ास लावून घेतला. त्याला वाचवण्यासाठी तिथेच गर्दी करून बसलेल्यापैकी कोणी पुढाकार घेतला नाही आणि पोलिस धावाधाव करीत होते, त्यांनाही त्या झाडापर्यंत पोहोचण्यात अडथळे आणले गेले. समोरचा साक्षात मृत्यू दिसत असताना आप पक्षाचे नेते बिनधास्त भाषणे करीत राहिले आणि झाडाखाली असलेली गर्दी घोषणा करीत गजेंद्राला प्रोत्साहन देत राहिली होती. मात्र त्याचा जीव निघून गेल्यावर भाषणे थांबली आणि पळापळ सुरू झाली. पुढे त्याच्यासाठी आप नेत्यांनी कॅमेरासमोर अश्रूही ढाळ्ले आणि त्याच्या कुटुंबियांना काही लाख रुपयांची मदतही देऊ केलेली होती. त्याचे मोठे राजकारण झाले. आप प्रवक्ता आशुतोष याने वाहिनीवर ओक्साबोक्शी रडूनही छान दाखवले होते. मुद्दा इतकाच, की गळफ़ासात गजेंद्रचा जीव घुसमटला होता, तेव्हा नेत्यांना भाषण थांबवून धाव घेण्याची इच्छा झालेली नव्हती.

अर्थात भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासात वा कुठल्याही आंदोलनातला हा असा पहिलाच बळी नव्हता आणि काकासाहेब शिंदेही अखेरचा बळी नाही. राजकारणाच्या होळीत आपल्या पोळ्या भाजून घेणार्‍यांना या देशात राजकीय नेता मानले जाते. त्यामुळे सामान्य भावनाशील कार्यकर्त्याने अनुयायाने अशीच बलिदानाची तयारी ठेवावी लागते. किंबहूना असे भावूक व संवेदनाशील पाठीराखे असतात, म्हणून एकाहून एक महान लढवय्ये राजकीय नेते भारतात उदयास येत राहिले आहेत. गजेंद्राने काय केले, तो इतिहास आहे आणि त्याची काकासाहेब शिंदे याने पुनरावृत्ती केलेली आहे. पण आज काकासाहेब याच्या कुटुंबियांना काय वाटते? त्यांच्या भावना काय आहेत? त्यांचे शब्द कुठूनही कानावर आले नाहीत, की वाचायला मिळालेले नाहीत. लाखांच्या मदतीचे आकडे सरकारी व आंदोलन नेत्यांकडून नक्कीचे फ़ेकले जाणार आहेत. पण अशी मदत वा त्यातून मिळणार्‍या भरपाईविषयी पिडीत कुटुंबाच्या धारणा कधी समोर येत नाहीत. त्याबाबतीत गजेंद्र नशिबवान म्हणायचा. कारण त्याच्या बहिणीची अशा बलिदान व भरपाईबद्दलची प्रतिक्रीया आलेली होती आणि निदान जगाला उमजलेली होती. त्याला पाच लाखाचे अनुदान केजरीवालनी दिल्लीचा मुख्यमंत्री म्हणून जाहिर केले होते. त्याला उत्तर देताना न्याय म्हणून गजेंद्राच्या बहिणीने केलेली मागणी प्रतिकात्मक व नेमकी होती. ती म्हणाली मीच तुम्हाला दुप्पट म्हणजे दहा लाख रुपये अनुदान देते. एका नेत्याने समोर येऊन गळफ़ास लावून तशीच जाहिर आत्महत्या करावी. पैशापेक्षाही तीच आम्हा कुटुंबियांसाठी योग्य भरपाई असेल. काकासाहेब शिंदे यांच्या कुटुंबाची प्रतिक्रीया कितीशी वेगळी असेल? आरक्षणासाठी झालेला शहीद, असे त्याचे कोडकौतुक होईल. त्याचा मृतदेह घेणार नाही वा अंत्यक्रीया करणार नसल्याचे इशारे ही ऐकायला मिळाले. पण कुटुंबियांचा आवाज त्यात दडपला गेला ना?

मराठा आरक्षणाचा मुद्दा नवा नाही, की मागणी नवी नाही. शालिनीताई पाटील यांनी तो दहाबारा वर्षापुर्वी मांडलेला होता आणि त्यासाठी चिकाटीने क्रांती सेना नावाची संघटना स्थापन करून मुद्दा लावून धरला. तेव्हा त्यांची राष्ट्रवादी कॉग्रेसमधून बारा वर्षापुर्वी हाकलपट्टी करण्यात आलेली होती. आज जितक्या मराठा संघटना आहेत वा त्यांचे जे कोणी नेते आहेत, त्यापैकी कोणी एकजण शालिनीताईंच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला होता काय? आमदारकी व पक्षाचे सदस्यत्व पणाला लावून तेव्हा शालिनीताई एकाकी लढल्या होत्या. त्यांची मागणी मराठा या एका जातीपुरती मर्यादित नसेलही. पण आरक्षणाच्या राजकारणात सामान्य मराठा समाज भरडून निघतो आहे आणि त्याच्या आर्थिक मागासलेपणाची कोणीही दखल घ्यायला तयार नाही, या दुखण्य़ाकडे लक्ष वेधणार्‍या त्या पहिल्या मराठा नेता आहेत. आज विविध मराठा नेते आवेशपुर्ण बोलत असतात. पण तेव्हा त्यापैकी कोणी शालिनीताईच्या पाठीशी उभा राहिला नव्हता, हेही सत्य आहे. बारा वर्षापुर्वी यातले मूठभर नेते जरी समोर आले असते, तर राज्यातले व देशातले सरकार त्यांचेच होते आणि विषय अधिक लौकर मार्गी लावता आला असता. पण नुसती अशी मागणी केली म्हणून शालिनीताईंना पक्षातून हाकालपट्टी करणारेच आज सरकारने संवाद साधून चर्चा करण्याचे सल्ले देत आहेत. किती भयंकर विरोधाभास आहे ना? शालिनीताईंनी आर्थिक निकषावरचे आरक्षण मागितले होते. त्यांना जातियवादी ठरवायला अनेकांनी बुद्धी पणाला लावलेली होती. त्यांनाच आज काकासाहेब शिंदेविषयी कळवळा आलेला आहे. पण त्याच्या कुटुंबियांच्या भावना तरी कोणी समोर येऊ देतो आहे काय? आज त्याची अंत्ययात्रा शोभायात्रा असावी तशी गर्दीने साजरी केली जाईल. पण उद्या दोनचार वर्षांनी त्याची भावंडे वा आप्तस्वकीय धक्केबुक्के खात असतील, तेव्हा त्यांच्याकडे सहानुभूतीने बघणारा कोणी असेल का?

राहुल गांधींनी अणूकराराच्या निमीत्ताने मनमोहन सरकारवर अविश्वास प्रस्ताव आलेला असताना केलेल्या भाषणात विदर्भातील कलावती नामक शेतकरी महिलेचा उल्लेख केला होता. तिच्या पतीने कर्जबाजारी होऊन आत्महत्या केल्याची कथा सांगून राहुलनी संसद सदस्यांच्या डोळ्यात अश्रू आणलेले होते. मग माध्यमातून त्याच कलावतीला अफ़ाट प्रसिद्धी मिळाली होती. दहा वर्षानंतर ती कलावती कुठल्या स्थितीत आहे? तिच्या कुटुंबाची अवस्था काय आहे? राहुलनी डोळ्यात अश्रू आणल्यावर चारपाच वर्षांनी कलावतीच्या जावयाने त्याच कर्जापायी आत्महत्या केली आणि मुलगीही विधवा होऊन गेली. कोणाला त्याची दादफ़िर्याद आहे? यज्ञातल्या समिधांप्रमाणे अशा जीवंत धडधाकट माणसांचा आंदोलनाच्या होमहवनात बळी दिला जात असतो. नंतर त्यांच्या आप्तस्वकीयांचे काय झाले, याची कोणाला फ़िकीरही करावीशी वाटत नाही. मुद्दे खरे असतात. पण त्यापेक्षा त्यांचे निमीत्त करून ज्या लोकांचा बळी जातो, त्यांची दुर्दशाही अस्सल व खरीच असते. त्यांच्या रडण्याचा आवाजही गदारोळात दबला जात असतो. काकासाहेबाला आपण का वाचवण्याचा प्रयास केला नाही, याचे उत्तर मात्र कोणी देत नाही. त्या क्षणी त्याने घेतलेला निर्णय भले त्याचाच असेल. पण त्याला वाचवण्याचा व जगवण्याचा निर्णय आसपास उभे असलेले लोक घेत नाहीत, ही समाजाच्या संवेदनशीलतेची शोकांतिका होऊन बसलेली आहे. आपण रस्त्यात छेडल्या जाणार्‍या मुलीसाठी पुढे यायला तयार नसतो. आपण राजरोस होणार्‍या दादागिरी गुन्हेगारीला रोखायला पुढे येणार नाही. गर्दी व झुंडीत गर्जना घोषणा करण्यापुरता आपला सामाजिक पुरूषार्थ शिल्लक राहिलेला आहे. आपल्या मतलबासाठी अन्य कुणाचाही बळी जायला आपली हरकत राहिलेली नाही. काकासाहेब शिंदे हा अशाच शोकांतिकेने घेतलेला बळी आहे आणि आपण सगळेच बधीर लोक त्याला तितकेच जबाबदार आहोत. काकासाहेब शिंदे जिवंत मनाचा होता आणि आपली मने कधीच मरून गेलेली आहेत.

8 comments:

  1. आज देशाचे जाती-जातीत विभागून वाटोळे करणाऱ्यांना नेते म्हणतात हे आपले दुर्दैव आहे. थोडयाच दिवसात शिवाजी महाराज हे मराठा नावाच्या मागासवर्गीयांचे नेते ठरवले जातील. आणि दलितांवर सर्वात जास्त अत्याचार करणारेच स्वतः मागासलेपण अंगिकरत आहेत. मागासवर्गीय बनण्याची स्पर्धा पाहिली की किळस येते या लोकांची

    ReplyDelete
  2. सुरवातीला अगदी चुकीची माहिती की कोणीही तरुणाला वाचवायचा प्रयत्न नाही केला, तर वस्तुस्थिती ही आहे की कित्येक आंदोलन कर्ते तरुण त्याला वाचवायला नदीत उडी घ्यायला तयार होते तशी त्यांनी पोलिसांना विनंती सुद्धा केली, पण पोलिसांनी त्यांना जोखडून ठेवले होते व त्या निष्पाप तरुणाचा जीव गेला, याला जबाबदार जितके प्रशासण तितकेच त्यावेळी उपस्थित पोलीस ही आहेत,

    आणि हो या आंदोलनाची तुलना दुसऱ्याशी करणे बरोबर न्हवे

    ReplyDelete
  3. उरंगाबाद --> औरंगाबाद

    ReplyDelete
  4. परिस्थिती अत्यंत उबगवाणी झालेली आहे. एकापाठोपाठ एक विषय उकरून काढून दंगे केले जात आहेत. खरोखर आरक्षण हवे की सर्वांना आरक्षण दिल्यास शेवटी काय होणार याचा राजकीय नेतृत्वाकडून कसलाही विचार दिसत नाही. आरक्षण घेतलेल्या आणि कमी गुण असूनही चांगल्या अभ्यासक्रमांना गेलेल्या मुलांची कशी परवड होते, हे जवळून बघणाऱ्याला कळते. अशा मुलांची पुढे स्वतःच्या पायावर उभे रहाण्याची क्षमताच उरत नाही.पुन्हा झुंडशाही करून कसले तरी आरक्षण मिळविले नाही तर जगायचे कसे? या अशा मतपेट्या हव्या असतात. पण अक्खा देश लुळा पांगळा होत चालला आहे. कर्तृत्वावर काही मिळवण्यापेक्षा गुंडगिरी करून दुसऱ्याचे कर्तृत्व ओरबडा असे काहीसे आपण शिकवू लागलो आहोत. तावून सुलाखून धारदार होणे आता अशक्य वाटते.
    फक्त काल राज ठाकरे वेगळ्या पद्धतीने बोलले. बरेच प्रामाणिक वाटले.
    फुलपाखराच्या अळीला झगडून कोषातून बाहेर यावे लागते. आरक्षणाच्या कात्रीने कोष कापून बाहेर काढले तर स्वप्न फुलपाखराचे आणि शरीर अळीचे असे विपरीत होते.

    ReplyDelete
  5. एकदम बरोबर आहे भाऊ

    ReplyDelete
  6. Ajach eka tv channel var Kakasahebachya kutumbachi mulakhat dakhvali geli Teva tyachya bahinini arakshan nahi milale tar Kakasahebachya atmyala shanti milnar nahi ase sangun pudhachya morchachya veli amhi pan nadit Udya maru saw sangitale Ase provoking vatavaran media nirman karate ahe ani sarva virodhi paksha eka magun ek andolan karun lokana bhadkavat ahet tar hyala ala ghalnyasathi kaydyane kahi karata yeil ka? Mediavar tar apan bahishkar ghalun jahir prachar kela pahije Bhau apan kahitari kele pahije Ata ati zale ahe Changalya sarkarchi vaat lavat ahet Ayajichya jivavar bayaji udar!

    ReplyDelete
  7. सर , मराठा आरक्षणाविषयीचे आपले दोन्ही लेख उत्तम आहेत. आपण नेहमीप्रमाणे रोखठोक लिहीले आहे. माझी तर अशी इच्छा आहे की भारतातील ज्यांना कोणाला आरक्षण हावे आहे त्यांनी इकदाच आपल्या मागण्या करून टाकाव्यात. एकाचे झाले की दुसरयाचे अंदोलन आहेच. त्यामुळे होते काय की त्याच त्याच बातम्या व राजकारणी लोकांची आश्वासने, टि.व्हि. चॅनेलवाल्याचा तोच काथ्याकुट ऐकावा व पहावा लागतो. दुसरे असे की शिक्षाणासाठी एक टक्का वेगळा जीएसटी आकारून सर्वाना परवडेल असे पहावें. जेणेकरून कुणालाही शिक्षणापासुन वंचित राहावे लागणार नाही. आपण या बद्दल लिहावे असे वाटते. दुसरे बांधा, वापरा, हस्तातंरित करा तत्वावर रेल्वे मार्ग उभारावेत म्हणजे कमी पैशात व वेळेत वाहतुक शक्य होऊन विकास होईल. ज्यांच्या जमिनी घ्याव्या लागतील त्यांना बाजारभावाप्रमाणे मोबदला व दोन पिढयाना पेन्शन द्यावे म्हणज्ये कामे लवकर होतील व कुणी आडकाठी करणार नाहीं. या बद्दल आपले मत मांडावे. मा.श्री. गडकरी साहेब याचा विचार करतील तर बरे व भले होईल. आपला ब्लाग भक्त, प्रविण लंके, अहमदनगर

    ReplyDelete