Monday, February 15, 2016

प्रियकराच्या मुखवट्यातला दगाबाज

क्राईम पेट्रोल दस्तक २)
आधीच्या लेखात मी गुन्हेतपासाच्या ज्या मालिका विविध वाहिन्यांवर चालू असतात, त्यातून लोकांचे प्रबोधन होऊ शकते, असा दावा केला होता. त्याच्याही पुढे जाऊन अगदी पत्रकारांनीही त्यापासून काही शिकावे असे आवाहन केले होते. पण जे मुळातच ‘अतिशहाणे किंवा अर्धवट’ अकलेचे असतात, त्यांना काही शिकता येत नाही की शिकवता येत नसते. कारण शिकण्याची मुळात इच्छा असावी लागते. अन्यथा अकलेचे प्रदर्शन मांडण्यातच धन्यता मानली जाते आणि व्हायचे ते नुकसान होतच रहाते. सोमवारी ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी आपल्या अग्रलेखातून त्याचा अप्रतिम नमूनाच पेश केला. लेखाचा आरंभच मुर्खपणाचा दाखला म्हणता येईल. ‘विचारांच्या युद्धात सर्वात निरुपयोगी अस्त्र म्हणजे शस्त्र. हे समजून घेण्याची कुवत नसेल तर ज्या विचारास आपण मारू पाहतो तो विचार शस्त्राच्या वापराने टरारून फुलतो.’ ही त्या लेखाची सुरूवात आहे. इथे विचारांचे युद्ध म्हणजे काय? युद्ध थोपवून प्रश्न मिटवण्याला विचार म्हणतात, याचेही भान वा अक्कल नसल्याचा दाखला कुबेर देतात. मग पुढे काय अक्कल पाजाळलेली असेल, त्याची कल्पना केलेली बरी. विचार हा माणसाला बुद्धीकडे घेऊन जातो आणि शस्त्र वा हिंसेपासून परावृत्त करतो. उलट विवेकाची कास सोडली तर विचार हिंसक होऊ बघतो, तेव्हा त्याच्याशी विचारांनी युक्तीवादाने प्रतिवाद करता येत नाही. सहाजिकच शस्त्रानेच त्याला नेस्तनाबुत करावे लागते. हिटलरशी विचारांनी लढायच्या असल्या अतिशहाणपणानेच अवघे जग महायुद्धाच्या खाईत लोटले गेले होते आणि त्या विचारांच्या आचरणावर प्रतिबंध घालण्यातून हिटलर संपवला गेला. अगदी भारताचा शेजारी श्रीलंकेने तामिळी वाघांचा विचारांनी मुकाबला करताना लक्षावधी लोक हकनाक मारले गेले आणि अखेरीस शस्त्रानेच त्याचा निचरा होऊ शकला. तीन दशकापुर्वी खलीस्तानचा मुकाबला विचारांनी होऊ शकला नव्हता, तर शस्त्रानेच होऊ शकला आणि विषय निकालात निघाला होता. तेव्हा विचारांचे युद्ध होत नसते तर शस्त्रांचेच युद्ध होत असते आणि त्यात विवेकाची कास सोडणार्‍या कुठल्याही विचारांचा बंदोबस्त शस्त्रानेच झाल्याचे इतिहास सांगतो. पण तितकी विवेकाची श्रीमंती कुबेरापाशी नसेल तर काय उपयोग?
देशद्रोही, समाजद्रोही वा अन्य कुठल्याही घातक प्रवृत्ती ह्या विचारांवर आधारीत नसतात. अंगी शक्ती वा लढण्याची ताकद नसल्यानेच त्यांनी विचारांचा बुरखा पांघरलेला असतो. त्यातून त्यांना प्रस्थापित कायद्याचे संरक्षण हवे असते आणि समोरच्याला हतोत्साहीत करण्यापुरता विचारांचा तो मुखवटा सज्ज असतो. नक्षलवाद वा जिहाद यांनी प्रवृत्त झालेल्यांच्या हातातले सर्वात भेदक शस्त्र, विरोधातल्या लोकांचा चांगुलपणा हेच असते. अर्थात ही स्थिती केवळ जिहादी वा नक्षली लोकांपुरती नाही. कुठल्याही गुन्हेगारी वा विघातक मानसिकतेने पछाडलेल्या व्यक्तीचे सर्वात मोठे शस्त्र वा हत्यार, बळी पडणार्‍याचा चांगुलपणा किंवा समजूतदारपणावर त्याची असलेली अंधश्रद्धा हेच असते. गुन्हेतपासात पोलिस आधी बळी वा पिडीताचीच जबानी घेऊ लागतात. त्यातून ते धागेदोरे शोधू बघतात. गुन्हेगाराचा पाठलाग सोडून बळी-पिडीताचीच उलततपासणी पोलिस करतात, हे अजब वाटणारे सत्य आहे. पण त्याला पर्याय नसतो. कारण कुठलाही गुन्हा हा पिडीताच्या सहकार्य वा सहभागाशिवाय होऊ शकत नसतो. कुठल्याही गुन्हा वा विघातक कृत्यामध्ये जितका गुन्हेगार दोषी असतो, तितकाच त्याला निरंकुश सहकार्य देणारा पिडीतही दोषी असतो. त्यातला गुन्हेगार फ़रारी वा अदृष्य असतो आणि हाताशी असतो, पिडीत! म्हणून त्याच्यापासून पोलिसांना तपास सुरू करावा लागतो. कारण त्याच पिडीताचा चांगुलपणा, विश्वास्, श्रद्धा किंवा गाफ़ीलपणा हे गुन्हेगाराचे शस्त्र असते. त्यामुळेच त्याचे विवेक नावाचे सुरक्षाकवच भेदले जात असते. त्याच कवचाला छेद पाडून गुन्हेगार आपल्या गुन्हेगारी कृत्याला साकार करू शकत असतो. तुमचा विवेक शाबुत व जागृत असेल, तर कोणी गुन्हेगार तुम्हाला पिडीत करू शकत नाही. पण कसायाला गाय धार्जिणी म्हणतात, तसे पिडीत गुन्हेगाराला सहकार्य देण्यात पुढाकार घेतात आणि गुन्हेगारी सोकावत जाते. विचारांचा आडोसा घेऊन वा कसले तरी आमिष दाखवून लोकांना अशा गुन्ह्यात सहभागी करून घेणे खुप सोपे असते. त्यालाच कुबेर विचारांचे युद्ध म्हणतात.
आम्ही कसेही असो, तुम्ही तर विचारी व शहाणे आहात ना? मग आमच्याशी बुद्धीवादाने विचारांनी संघर्ष करा, ही पळवाट असते. जगभरात कुठला असा देश आहे, जिथे डाव्या कम्युनिस्ट विचारसरणीच्या राजकारणाने विचाराने आपली सत्ता प्रस्थापित केली आहे? तशी केल्यावर कुठल्या अन्य विचारसरणीशी वैचारिक प्रतिवादाचा मार्ग शिल्लक ठेवला आहे? पण जिथे भिन्न विचारांच्या लोकांनी कम्युनिस्टांना इवलीशी जागा दिली, तिथे त्यांनी वैचारिक मुखवटे लावून इतरांना गाफ़िल ठेवण्याचा मार्ग चोखाळला आणि सत्ता हाती आल्यावर मुखवटा उतरून खरा भयानक चेहरा समोर आलेला आहे. नेहरू विद्यापीठातील डाव्या लोकांनी कधी तिआनमेन चौकातील स्वातंत्र्यप्रेमी विद्यार्थ्यांची तिथल्या कम्युनिस्ट सत्तेने कत्तल केल्यावर टाहो फ़ोडला आहे काय? स्टालीनने आपल्या विरोधकांची सार्वत्रिक कत्तल केली, त्याचा निषेध त्या डाव्या विद्यार्थी संघटनांनी केला आहे काय? ह्यात काही नवे नाही. कालपरवा केरळात संघाच्या कार्यकर्त्याचे खुन पाडले म्हणून मार्क्सवादी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्याला अटक झाली आहे. त्याच्या विरोधात या स्वातंत्र्यप्रेमीनी कधी निषेधाचा शब्द उच्चारला आहे काय? नसेल तर कोणाशी वैचारिक लढाईच्या वल्गना कुबेर करतात? हा जगाचा इतिहास त्यांना चांगला ठाऊक आहे. बाजूला सिरीया इराकमध्ये जी भिन्न विचार आचारांची दिवसाढवळ्या कत्तल चालू आहे, त्याच धार्मिक विचारसरणीने अफ़जल गुरूचे समर्थक प्रेरीत झालेले आहेत ना? त्यांना चुचकारून काय होणार आहे? जोपर्यंत आझादी शब्द उच्चारण्यासाठी जम्मू काश्मिरात स्थानबद्ध केले जातत होते, तोपर्यंत तिथे झकास शांतता होती. १९७५ नंतर इंदिरा गांधींनी थोडी मोकळीक दिली आणि वैचारिक अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य दिले, त्यातून अपहरण, कत्तल, हिंसा आणि घातपातापर्यंत मजल गेली. खरेच वैचारिक लढाई असती, तर या काश्मिरी तरूणांनी हिंसा वा शस्त्रांचा मार्ग कशाला अवलंबिला असता? उलट पाकव्याप्त काश्मिरात अशा स्वातंत्र्याला गोळ्या घातल्या जातात, म्हणूनच तिथे कोणी स्फ़ोट वा घातपात घडवत नाही. तेव्हा आपण कुठली मुक्ताफ़ळे उधळतो आहोत, त्याचा आधी कुबेरांनी विवेकबुद्धी शिल्लक असेल तर तिला साकडे घालून विचार करावा.
भारतीयांचे दुर्दैव असे आहे, की गेल्या काही दशकात अशाच अर्धवट अतिशहाण्यांच्या नादी लागून इथल्या राजकारण्यांनी वैचारिकतेच्या मुखवट्यातल्या गुन्हेगारी व हिंसाचाराला मोकाट रान दिले आहे. पाच लाख काश्मिरी पंडित त्याच वैचारिक स्वातंत्र्याचे बळी आहेत. कुबेर किंवा तत्सम अर्धवटांना त्याच्या झळा लागल्या नाहीत, म्हणून असले दिवटे वैचारिक आवर्तन घेण्याची दुर्बुद्धी सुचते आहे. तेच विविध देशातल्या अर्धवट अतिशहाण्यांचे पाप आहे. मुंबई वा देशात हजारांनी लोक बळी पडलेत, त्यांच्या साध्या जगण्याच्या अधिकाराची पायमल्ली झाली. ती करणार्‍या अफ़जल वा याकुबसाठी अश्रू ढाळणारे, असे अतिशहाणे देशासाठी व समाजासाठी सर्वात मोठा धोका झालेले आहेत. अशांच्याच नादाला लागून निर्भया सारखी मुलगी गाफ़ीलपणे दिल्लीत उशीरा रस्तावर फ़िरू शकली आणि एका रात्री सैतानाची शिकार झाली. कारण तिला बसमध्ये बोलावणारे सैतान म्हणजे ‘वैचारिक चर्चेचे’ आमंत्रण वाटले. गुन्हा करणारे कधी आपल्या शिकारीला धोक्याचा इशारा देत नसतात. तो इशारा प्रत्येकाला आपापल्या अनुभवानेच ओळखावा लागत असतो. आजवर जे स्वातंत्र्य मिळाले आहे, त्याचा किती गैरवापर झाला व त्याचे कोणते दुष्परिणाम समाजाला देशाला भोगावे लागले, त्याकडे ढुंकूनही न बघता, कुबेरांसारखे अर्धवटराव जे प्रवचन करतात, त्यातून कोण अतिशहाणा आहे, त्याचा आपोआप दाखला मिळत असतो. कारण हे लोक मुलींना प्रेमात पडायला आग्रह धरत असतात आणि प्रेमाची आमिषे दाखवणारा कुठल्याही कोठ्यावर तिला विकून टाकण्याच्या धोक्यापासून गाफ़ील बनवत असतात. प्रेमात पडणे सोपे असते आणि निरागसतेचा मामला असतो. पण एकदा त्यात गुरफ़टत गेले, मग धोक्याचे इशारेही समजेनाचे होतात. म्हणून परिणाम बदलत नाहीत. म्हणूनच समाजाला आज गुन्हेगारांपासून जितका धोका आहे, त्यापेक्षा अशा अर्धवट अतिशहाण्यांच्या वैचारिक घातपाताने अधिक धोका आहे. कोठ्यावरच्या अत्याचारी मालकिणीपेक्षा तिथे मुलीला आणून सोडणारा वा विकणारा मोठा गुन्हेगार असतो ना? मग तो प्रियकराच्या रुपात भेटलेला का असेना? (अपुर्ण)

20 comments:

  1. जर भिंद्रनवले, बियांत सिंग शाहिद असू शकतात
    जर राजीव गांधींच्या मारेकऱ्यांना तामिळनाडू मध्ये सहानुभूती असू शकते
    जर हिंदू महासभेचे लोक नथुराम गोडसेची पुण्यतिथी साजरी करू शकतात
    तर, अफ़जल गुरू हा शाहिद असू शकतो आणि काही काश्मिरी त्याला हिरो मानू शकतात
    मी अफझलचं समर्थन करत नाही. माझा मुद्दा एवढाच आहे की आपण जो त्वेष मुस्लिम अतिरेक्यांच्या विरोधात दाखवतो तो त्वेष शीख, तामिळ अतिरेक्यांच्या विरोधात दाखवत नाही. आणि सध्याचे सरकारही तसेच वागते. आधीचे मुस्लिम लांगूलचालन करणारे होते आताचे मुस्लिम विरोध करणारे आहे.
    याच सरकारच्या काळात सुवर्ण मंदिरात भिंद्रनवले व बियांत सिंग यांना शाहिद म्हटले गेले. नथुराम गोडसेचे पुतळे, मंदिरं उभे करण्याचा प्रयत्न होतोय. हे त्या अतिरेक्यांना समर्थन आहे. उद्या पुन्हा खलिस्तानी संघटना पुढे येऊ शकते.
    जर विरोध करायचाच आहे तर सर्व अतिरेक्यांचा करा, केवळ मुस्लिम अतिरेक्यांचा नाही

    ReplyDelete
    Replies
    1. वरील विचार हीआपली वैचारिक दिवाळखोरी आहे आपण म्हणता त्या प्रमाणे भाजपा किंवा मोदींनी कधीही नथुराम चे उदात्ती करण केले नाहीच किंवा भिद्रनवाले ना समर्थन दिले
      कावीळ ग्रस्ताला जगच पिवळे दिसते हा दोष कावीळीचा

      Delete
    2. Dnyanesh Deshpande,

      तुम्ही म्हणता की : जर विरोध करायचाच आहे तर सर्व अतिरेक्यांचा करा, केवळ मुस्लिम अतिरेक्यांचा नाही.

      माझं म्हणणं आहे की अतिरेक्यांच्या विरोधापेक्षा भारताची एकात्मता अधिक समर्पक मुद्दा आहे. भिंद्रनवाले, अफझल वगैरे भारत तोडू पहात होते. याउलट नथुराम, लिट्टे, बियांत सिंग यांना भारत तोडण्यात रस नव्हता. त्यामुळे जरी मी सर्व अतिरेक्यांचा विरोध केला तरी भारत तोडणाऱ्या अतिरेक्यांवर माझा विशेष खुन्नस असेल.

      आपला नम्र,
      -गामा पैलवान

      Delete
    3. गामा,सहमत.
      Unknown, माझा आक्षेप विविध दहशतवाद विविध प्रकारे हाताळणे याला आहे. 8, 10 महिन्यापूर्वी भिंद्रनवलेची मयंती साजरी केली होती. त्याला कुणी विरोध केल्याचे वाचनात नाही.
      सामूहिक राष्ट्रवादाच्या अभिव्यक्तीसाठी समान उद्दिष्टांपेक्षा समान शत्रूविरोध वरचढ ठरत असेल तर तो राष्ट्रवाद अजून अपरिपक्व आहे.
      सध्या देशात दोन घटना घडत आहेत. एक, JNU आणि दुसरी Make in India सप्ताह. टीव्ही चॅनेल वर Make in India पेक्षा JNU ची चर्चा असणे स्वाभाविक आहे. पण नावाजलेल्या वृत्तपत्रात आणि समाजमाध्यमांतसुद्धा Make in India पेक्षा जास्त चर्चा JNU ची होत आहे.
      जेव्हा आपण समान उद्दिष्टाला राष्ट्रवादाच्या अभिव्यक्तीसाठी अधिक महत्व देऊ तेव्हाच अब्दुल कलमांचे 2020 सारखे स्वप्न साकार होऊ शकेल
      जय हिंद!!!

      Delete
    4. Ek vel afzal,Yakub ani bhindranwale yanche udattikaran manya karu.. Pan,"bharat tere tukde honge, kashmir mange anadi, India go back.... " Asha ghoshnacha pan samarthan karayche ka? Ithe FoE navakhali lok kahihi kas karu shakta?

      Delete
  2. मी ही हा अग्रलेख वाचून हैराण झालो होतो. लोकसत्ता कोणाला विकला गेलाय हे ही समजून येते. आपण ह्या लेखाची नुसतीच चिरफाड करणार नाही पण त्याची कोथळी बाहेर काढणार हे मी ओळखलेच होते व अपेक्षेने आपला अपूर्ण लेख वाचून काढला . उद्या कोथळा कसा बाहेर पडणार ह्याची उत्सुकता तर आहेच. मला राहून राहून वाटते की श्रीयुत संपादक महाशय जरी दावणीला बांधलेले असले तरी श्रीयुत मोदीं बद्दल ची असूया कुठल्या थराला हे पोहोचवणार आहेत ? सगळ्यांचे मूळ निवडणूकात आपटी खाल्ल्याने व जो सत्ता बदल झाला आहे ते पचवणे अवघड झालेले आहे !

    ReplyDelete
  3. Hon. Balasaheb Thakare wrote an editorial 'Loksattecha Veda Sampadak' in Samana before some years.I recall that frequently while reading Loksatta editorial as it is applicable even today.

    ReplyDelete
  4. कुबेर आडनाव असलेला माणूस विचारांनी इतका भिकार कसा काय असू शकतो?

    ReplyDelete
    Replies
    1. तो कुबेर नव्हे याचक आहे

      Delete
  5. ठराविक मुद्द्यांवर ठराविक तर्क

    ReplyDelete
  6. भाऊ .........एकदम झकास लेख !! अगदी माझ्या मनातील बोलला भाऊ....... हे लोकसत्ता चे संपादक महाशय वाचकांचा ' बुद्धी भेद ' करण्यात वाकबगार आहेत. या लोकांची ' अर्हता ' याच गुणांवर पारखली जाती का हे न कळे...... परत एक्स्प्रेस ग्रुपच्या शेठजींच्या चेहऱ्याकडे बघत बघत त्यांना काय आवडते त्यानुसार या संपादक महाशयांनी हा लेख लिहायचा उपदव्याप केलेला दिसतो आहे. हि पुरोगामी म्हणविणारी जमात देशाच्या एकतेपेक्षा स्वतःच्या ' किडक्या ' विचारसरणीचे हिरीरीने समर्थन करताना दिसतात. नितीश कुमार हाच एकेकाळी ' इशरत जहान ' ला बिहारकी बेटी म्हणत होता. ...दुर्दैव आहे या देशाचे कि अशी पुरोगामी ' बांडगुळांची ' सध्या माध्यमामध्ये चलती आहे.

    ReplyDelete
  7. अविचारांचा मुकाबला जर शस्त्रांनी च करावयाचा असेल तर ब्लॉग लिहून तर्कवड करावयाची गरजच काय लेखण्या मोडा आणि बंदुका हाती घ्या

    ReplyDelete
  8. खर आहे लोकसत्ता बंद करावा असे वाटायला लागले आहे

    ReplyDelete
  9. भाऊसाहेब.....


    अफजल गुरूचं समर्थन करणारे देशद्रोही यावर आपली १०० टक्के सहमती आहे. परंतू अफजल गुरूचं जाहीर समर्थन करणारी पीडीपी आणि त्यांच्या सोबत काश्मिरात सत्तासोबत करणारी भाजपा यांच समर्थन कोणत्या तोंडाने करायचे? की राष्ट्रवादातही चांगला आणि वाईट राष्ट्रवाद असतो?

    आपलाच
    सेवकदास

    ReplyDelete
  10. मनसे मिलिंदFebruary 16, 2016 at 9:54 AM

    खूप दिवसांची इच्छा होती कि ह्या असल्या स्वयंघोषित पत्रकारांच्या मुस्काटात मारावी, ती भाऊ तुम्ही पूर्ण केली. अजूनही खूप आहेत एकदा घ्या त्यांना रांगेत. मी कायम तुमच्या ब्लॉगवर आलेला मजकूर मित्रांमध्ये पाठवत असतो व अजूनही तुमच्या सारख्या पत्रकार आहेत याची माहिती पोचवत असतो. तुमचा हा यज्ञकुंड असाच धगधगत राहू द्या.

    ReplyDelete
  11. Samyavadi manse vidwan avashya ahet. Aple tatwadnyan matra jadtik manchavar nirasta hovunahi te kabul karayla ka tayar nahit he na sutlele kode ahe.

    ReplyDelete
  12. आपण अगदी योग्य शब्दात गिरीश कुबेर यांचा बुरखा फाडला याबद्दल धन्यवाद. त्यांचा अतिशहाणपणा असह्य झाल्याने मी पत्र पाठवले होते. २००% ते छापले जाणार नाही याची खात्री असतांना पाठवले होते.पण आपण आमचे काम केल्याबद्दल धन्यवाद.
    विद्याधर(विजय) कुलकर्णी
    लोकसत्तेच्या १५ फेब्रुवारी २०१६च्या अंकातील संपादकीय
    नमस्कार,
    अतिशहाणे वि. अर्धवट या अग्रलेखाद्वारे सरकारच्या राजकीय शहाणपणाइतकेच संपादकीय अर्धवट शहाणपण उघडकीस आले आहे. आपल्या साखळी वृत्तपत्राचा मोठा खप असल्यामुळे आपण सांगू तीच गोष्ट खरी आहे असा वाचकवर्ग विश्वास बाळगत आहे असे समजून राष्ट्रविरोधी गोष्टी पांडित्यपूर्ण मांडल्या तर आपण त्यात यशस्वी होऊ हा संपादक महाशयांचा भ्रम आहे. या गोष्टीचा उलट परिणाम होतो, हे कृपया त्यांनी ध्यानात घ्यावे. अर्थात् सारासार विवेकबुद्धी जागृत असली तर.
    विद्याधर(विजय) कुलकर्णी

    ReplyDelete