Monday, March 12, 2018

जनभावनेचे ज्वालामुखी

lenin statue attacked in russia के लिए इमेज परिणाम

गेल्या जुलै महिन्यातली गोष्ट आहे. दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात काही संघटनांनी मिळून तिरंगा फ़ेरी काढलेली होती. त्यात काही माजी सेनाधिकारी व मंत्रीही सामील झालेले होते. ती फ़ेरी संपल्यावर झालेल्या भाषणात कुलगुरू जगदीश कुमार यांनी विद्यापीठाच्या आवारात जुने झालेले रणगाडे व लढावू विमानाच्या प्रतिमा सजवण्याची कल्पना मांडलेली होती. त्यावरून मग खुप वादळ उठले होते. विद्यापीठात अशा युद्धजन्य वस्तु आणायची गरज नाही आणि त्यांचे प्रदर्शन तर अजिबात नको. त्यातून कुठलाही राष्ट्रवाद मुलांच्या मनात उत्पन्न होण्याची शक्यता नाही. राष्ट्रप्रेम हे माणसातली उपजत भावना असते आणि ती अशी प्रदर्शनीय प्रतिकातून येत नसते. वगैरे मोठमोठे युक्तीवाद करण्यात आलेले होते. वैचारिक लढाईत नेहमी असेच फ़सवे युक्तीवाद होत असतात. सर्वसामान्य लोकांचे विषयावरून लक्ष उडवण्यासाठी त्याचा नेमका उपयोग होत असतो. त्यामुळे असे युक्तीवाद मुद्दाम केले जातात. खरेच अशा प्रतिकातून राष्ट्रवाद वा अन्य कुठल्या वैचारिक निष्ठा तयार होत नसतील, तर जगाच्या कानाकोपर्‍यात विविध प्रतिके व स्मारके कशाला उभी केलेली असतात? कालपरवा त्रिपुरा राज्यात भाजपाचा विजय झाला व डाव्यांचा पराभव झाला, त्यानंतर तिथे उभारलेला कॉम्रेड ब्लादिमीर लेनीन यांचा सार्वजनिक पुतळा जमावाने उध्वस्त केला. त्याचे तरी काय कारण होते? अशा प्रतिक पुतळयांनी कुठल्या भावना वा निष्ठा उत्पन्न होत नसतील, तर त्यांची उभारणी वा विध्वंस तरी कशाला होतो? हा पुतळा उभारण्याचा हेतू काय होता आणि तो उडवल्याने नेमके काय साधले गेले आहे? आता त्याच्यावर विवाद रंगला असल्याने त्याचा सविस्तर उहापोह आवश्यक आहे. पण मजेची गोष्ट अशी, की विद्यापीठात रणगाडा ठेवायला विरोध करणार्‍यांचा युक्तीवाद आता पुर्णत: बदलून गेला आहे.

रणगाडा वा लढावू विमानांच्या प्रतिकांनी राष्ट्रप्रेम जन्माला येत नाही, असे ठामपणे सांगणार्‍यांना इतरांच्या प्रतिकांचा तिटकारा होता. ज्या विद्यापीठात भारताचे तुकडे करण्याच्या घोषणा दिल्या गेल्या, तिथे देशप्रेम नक्कीच निपजत नाही, हे वेगळे समजावण्याची गरज नाही. अशा घोषणा दिल्या जातात, तेव्हा त्याची प्रतिक्रीयाही उमटत असते. त्या घोषणांनी ज्यांच्या भावना व देशप्रेमाला धक्का लागला होता, त्यांना मग तिथे देशाच्या सुरक्षेचे प्रतिक असलेल्या रणगाड्यांची गरज वाटू लागलेली होती. उलट तशा प्रतिकांनी आपल्या देशविरोधी घोषणांच्या मक्तेदारीचा पाया उखडला जाण्याची भिती दुसर्‍या बाजूला वाटलेली होती. म्हणूनच तशा कल्पनेला कडाडून विरोध झाला होता. ती प्रतिके तिथे लावण्यापुर्वीच तो विचार उखडण्याचा उत्साह कोणी कशाला दाखवला होता? ती दुसर्‍या विचारांची गळचेपी होती. पण अशा दबावाला विचार म्हणायचे आणि आपण लादलेल्या प्रतिकांची महती सांगायची, असा हा खेळ असतो. कारण विचारधारा, तत्वज्ञान, राजकीय भूमिका वा संघटनांची प्रतिके सर्वत्र असतात. कधी ती नेत्यांच्या प्रतिमांमध्ये असतात, तर कधी ती विचारांचे प्रतिनिधीत्व करणार्‍या आकारांची रेखाटनांची असतात. जेव्हा अशी प्रतिके एका बाजूसाठी पक्षपात करतात, तेव्हा त्यातून दबलेल्या भावनांची दुसरी बाजू तयार होत असते. तो विरोध दिसू लागला मग त्यातले बलदंड असतात, ते गट दुसर्‍याला थेट चेपून टाकत असतात. पण अशा दडपण्याने कधी दुसरी बाजू संपत नसते. कारण माणूस हा विचार करणारा प्राणी आहे आणि तो विवेकाने आपल्या भूमिकांना मुरड घालून योग्य संधीची प्रतिक्षा करत असतो. अनेकदा त्यात दोनचार पिढ्याही निघून जातात. पण चिरडलेला मुस्कटदाबी केलेला आवाज व बाजू मान खाली घालून सर्व सहन करत आपल्या संधीची प्रतिक्षा करत असते. जेव्हा ती संधी येते, तेव्हा ज्वालामुखी फ़ाटत असतो. त्रिपुरा हे त्याचे उदाहरण आहे.

त्रिपुराची गोष्ट किरकोळ आहे कारण तिथे एकदोन पुतळ्यावर हल्ला झालेला आहे. सोवियत युनियन संपुष्टात आल्यावर रशियाभर अशा ज्या मार्क्सवादी कम्युनिस्ट सत्तेच्या खाणाखुणा होत्या, त्या उध्वस्त करण्याचा सपाटाच लागला होता. काही दिवसांपुर्वी जिथे त्या पुतळे व प्रतिमांसमोर लोक आपले फ़ोटो काढून घेत होते, तिथेच व तेच लोक जमावाने त्या स्मारकांचा विध्वंस करायला बेभान झालेले होते. पण ते असा विध्वंस करायला कशाला प्रवृत्त झाले होते? अशी प्रतिके त्यांच्या जीवनावर कुठला परिणाम करत नसतात. पण ती दडपशाही व अन्याय अत्याचाराची प्रतिके झालेली असतात. ज्यांनी प्रत्यक्षात तो अन्याय व गळचेपी केली, ते दूर रहातात आणि संधी मिळालेले लोक त्या प्रतिकांवर तुटून पडत असतात. त्यांना प्रतिक वा पुतळा कोणाचा आहे त्याच्याशी कर्तव्य नसते. खराखुरा राग ज्यांच्यावर काढायचा, ती माणसे समोर नसल्याने हा प्रतिकात्मक विध्वंस चालत असतो. हजारो वर्षापुर्वी कधी ज्यु व मुस्लिम यांच्यात संघर्ष झालेला आहे आणि तोही तिकडे दूर पॅलेस्टाईन नामक देशातला इतिहास आहे. त्यातला कोणी आज हयात नाही की भारत पाकिस्तानशी त्यांचा संबंध नाही. पण भारतात हिंसाचारी हत्याकांड घडवायला आलेली टोळी छबाड हाऊस या मुंबईतील ज्यु इमारतीवर चाल करून गेली. तिथे दिसेल त्याचे व तिथल्या धर्मगुरूंचे हत्याकांड त्यांनी केले. त्यामागची त्यांची मानसिकता काय होती? ती इमारत व ती मारली गेलेली माणसे, कसले तरी प्रतिक होती? ज्या प्रतिकांबद्दल हजारो वर्षाचा तिरस्कार मुस्लिम मानसिकतेमध्ये आजही रुजवला जातच असतो. त्याला आलेले ते विषारी फ़ळ होते. कसाब टोळीने छबाड हाऊन उध्वस्त करून पॅलेस्टाईनला न्याय मिळू शकत नव्हता. तरी त्यांनी मुंबईच्या छबाड हाऊसवर घातक हल्ला केलाच. ती मानसिक्ता व त्रिपुरातील मानसिकता समजून घेतली पाहिजे.

कसाब टोळीला आपण इस्लामचे फ़ार मोठे उदात्त कार्य पार पाडत असल्याच्या धारणेने भारावून टाकलेले होते. त्रिपुरात असे काय घडले होते, की त्या जमावाला लेनिन या व्यक्तीच्या पुतळ्याविषयी इतका तिटकारा वाटावा? त्यापैकी बहुतांश लोकांना लेनिन ऐकूनही ठाऊक नसेल, की त्याने रशियात वा सोवियत युनियनमध्ये कोणता कारभार केला होता, त्याचाही थांगपत्ता नसेल. मग त्याचा पुतळा उध्वस्त करण्यातून त्यांना कसले समाधान मिळत असते? तर लेनिन हे एक प्रतिक आहे आणि जसे ते इथल्या कम्युनिस्ट राजवटीचे प्रतिक झाले आहे, तसेच ते रशियन सोवियत राजसत्तेचे प्रतिक झालेले होते. ते सोवियत साम्राज्य ढास्ळताना दिसले, त्यावेळी त्याच प्रतिमांना सलाम ठोकणार्‍या जमावाने त्यावर हल्ले चढवले होते. कारण ते सोवियत अत्याचार अन्यायाचे प्रतिक झालेले होते. त्रिपुरातील डाव्या आघाडीच्या सत्तेची कहाणी फ़ारशी वेगळी नाही. तिथेही आपली सत्ता कायम राखण्यासाठी कम्युनिस्ट पक्षाचे राज्यकर्ते व कार्यकर्ते यांनी मिळून सामान्य लोकांची मुस्कटदाबी केलेली होती. त्याचे लेनिनचा पुतळा हे प्रतिक होते. नुसता पुतळाच नाही, तर त्या पक्षाच्या अनेक कार्यालये व मालमत्तांवरही विविध ठिकाणी जमावाने हल्ले केल्याची बातमी आलेली आहे. असे देशात अन्य राज्यात कधी घडलेले नव्हते. मग त्रिपुरातच कशाला घडले, तेही तपासून बघायला नको काय? नुसतेच भाजपा वा संघाच्या डोक्यावर हिंसेचे खापर फ़ोडून विषय संपवता येणार नाही, की संपणारही नाही. दबलेल्या समाजाला वा मोठ्या लोकसंख्येला जेव्हा असा मोकळेपणाने श्वास घेता येतो, त्यातून मग असे फ़ुत्कारच सोडले जात असतात. कालपर्यंत निमूट अन्याय सहन करणार्‍या जमावाला आज इतकी हिंमत कशातून येत असते? त्याचे उत्तर राजसत्तेत लपलेले आहे. आता राजसत्ता तरी अशा मुजोरीच्या संरक्षणाला येणार नाही, ही खात्रीच त्या जमावाला हिंमत देत असते.

त्रिपुरा व अन्य इशान्येकडील राज्यांच्या निवडणूकीचा निकाल लागल्यापासून त्याचे विश्लेषण करणार्‍यांनी अचंबित होऊन भाजपाला इतकी मते कशाला मिळाली, त्याचे नवल सतत व्यक्त केलेले आहे. पण ते नवल नसून वास्तव असेल तर त्यामागची कारणे शोधावी असे त्यापैकी एकाही शहाण्याला वाटलेले नाही. तिथेच त्यांची किंव करावी असे वाटते. ज्या कारणास्तव बंगालमधून डावी आघाडी व मार्क्सवादी समूळ उखडले गेले आहेत, त्यापेक्षा त्रिपुराची कहाणी किंचीतही वेगळी नाही. बंगालमध्ये दिर्घकाळ राज्य करताना जे साम दाम दंड भेद असे तंत्र वापरले होते, त्याला कोणी आव्हान द्यायला उभा राहिला नव्हता. त्यामुळे डाव्यांची झुंडशाही दिर्घकाळ चालली होती. कॉग्रेस हाच त्यांना आव्हान देऊ शकणारा पक्ष होता. पण डाव्यांना बंगालपुरते राज्य आंदण देऊन कॉग्रेस गप्प बसली होती. त्याच पक्षातून बाहेर पडून ममतादी उभ्या ठाकल्या आणि त्या डाव्या झुंडशाहीखाली दबलेल्या श्वासांना पहिल्यांदा आवाज मिळाला. पुढल्या काळात असे दबलेले, कोंडलेले व नाडलेले लोक ममतांच्या मागे उभे रहात गेले आणि त्यांची पर्यायी झुंड तयार झाली. त्यातून डाव्यांचा बंगालमध्ये दारूण पराभव झाला. दडपशाही करायला सत्तेचा आधार राहिला नाही आणि आपल्या त्याच बालेकिल्ल्यात आता पुन्हा पायावर उभे रहाण्याइतकेही बळ मार्क्सवादी पक्षात शिल्लक उरलेले नाही. नेमकी तीच व तशीच कहाणी त्रिपुराची आहे. न्युज एक्स या वाहिनीवर जनकी बात या संस्थेतर्फ़े मतचाचणीचा अहवाल सादर करताना एका पत्रकाराने त्याचा स्वच्छ उल्लेख केला होता. आजच जाऊन त्रिपुराच्या कुणाला जर मताविषयी विचारले, तर तो भयापोटी सत्य बोलणार नाही. पण मत देताना डाव्यांना धुळ चारणार, असे तो उगाच म्हणाला नव्हता. डाव्यांच्या झुंडशाहीखाली दबलेल्या मतदाराला भाजपाने आवाज दिला आणि सत्ता उलथून पाडली गेली आहे.

राज्यात जिंकला कुठला पक्ष, याविषयी तिथल्या बहुतांश जनतेला अजिबात कर्तव्य नाही. मार्क्सवादी संपले यातच त्यांचा आनंद आहे. त्यांना भाजपाशीही कुठले कर्तव्य नाही वा आस्था नाही. आता निदान आपण डाव्या झुंडीला रोखू शकतो आणि नवे सत्ताधीश आपली मुस्कटदाबी करणार नाहीत, इतका आत्मविश्वास त्रिपुराच्या लोकांना आला आहे. त्यातून हे विस्फ़ोट होत आहेत. पुतळा लेनिनचा म्हणून अजिबात फ़ोडलेला नाही. किंबहूना तो कोणाचा तेही बहुतांश लोकांना ठाऊक नसेल. ते दडपशाहीचे प्रतिक होते आणि त्या मुस्काटदाबीने लोक हैराण झालेले होते. त्याची भयानक प्रतिक्रीया उमटलेली आहे. तीच सोवियत युनियन कोसळताना उमटली होती आणि आज त्रिपुरासारख्या इवल्या राज्यात उमटते आहे. पण तसे पडसाद अन्य कुठल्या भारतीय राज्यात सत्तांतरानंतर उमटलेले नव्हते. किंबहूना २०१४ सालातही नरेंद्र मोदी यांचा इतका मोठा विजय कुणा एका पक्षाच्या विरोधातला अजिबात नव्हता. तो मोदी वा भाजपाचाही विजय नव्हता. पुरोगामीत्व नावाचे जे थोतांड व पाखंड माजवून मागल्या सहासात दशकात देशात धुडगुस घालण्यात आलेला आहे, त्याचा शेवट करण्याची घोषणा मोदींनी आपल्या प्रचारातून केली आणि देशाच्या बहुतांश राज्यात त्याला प्रतिसाद मिळत गेला. तिला मोदींची लोकप्रियता वा मोदीलाट ठरवून पळवाट शोधली गेली. ती लोकांची दिशाभूल नव्हती, तर तथाकथित पुरोगाम्यांनी केलेली स्वत:चीच फ़सगत होती. राष्ट्रवाद, राष्ट्रप्रेम, हिंदूधर्म वा हिंदूत्वाचे खच्चीकरण याला वैतागलेल्या लोकांना कोणीतरी तारणहार हवा होता. कुठलेही कारण नाही तरी हिंदूंना संपवण्याचे चाललेले कारस्थान उखडण्याचे नेतृत्व करणारा कोणीतरी पुढे येण्याची गरज होती. तो मोदींच्या रुपाने मिळाला व ती दबलेली हिंदू झुंड मतदार होऊन घराबाहेर पडली. त्या झुंडीने पुरोगामीत्व, सेक्युलॅरीझम नव्हेतर त्या मुखवट्याखाली चाललेले पाखंड उध्वस्त करून टाकले. ते मोदींचे कर्तृत्व अजिबात नाही. त्यांनी त्या दबलेल्या हिंदू समाजाला आवाज दिला. अमित शहांनी त्याला संघटनात्मक पाठबळ दिले.

लेनिनच्या पुतळ्याचे उध्वस्तीकरण हा एक संकेत आहे. कदाचित पुरोगामी ढोंगाला दिलेला शेवटचा इशारा आहे. आयडीया ऑफ़ इंडिया म्हणून चाललेल्या बुवाबाजीला सावध करणारा अखेरचा सिग्नल आहे. कुठल्याही युगात व देशात समाजात मुठभर अल्पमतीने प्रचंड बहुसंख्येला ओलिस ठेवल्याचे परिणाम यापेक्षा वेगळे होत नाहीत. या देशात हिंदू असणे पाप आहे. या देशाला हिंदू संघटनापासून धोका आहे. राष्ट्रवादाच्या घोषणा व प्रतिके देशाचे तुकडे पाडतील, असल्या पाखंडाला कंटाळल्या जनतेची ही प्रतिक्रीया आहे. जे काम कायद्याने करावे व राज्यघटनेने त्याला बळ द्यावे, त्याचाच आधार घेऊन जनतेच्या माथी थोतांड मारले जाते, तेव्हा नागरिकांना कायदा हाती घ्यावा लागत असतो. कुठे गुन्हेगाराला पकडून लोक ठार मारतात व कुठे अशा प्रतिकात्मक पुतळ्याचा विध्वंस करतात, त्यातून एक संकेत मिळतो. तो ओळखण्यातच शहाणपणा असतो. त्याची प्रतिक्रीया म्हणून मग नरेंद्र मोदी दुसर्‍या बाजूचे प्रतिक होऊन जातात. रोज उठून पुरोगामी जितके त्या मोदी नामक प्रतिमेचे भंजन करू बघतात, तितकी ती प्रतिमा अशा वैतागलेल्या बहुसंख्य समाजघटकासाठी आपल्या अभिमान व प्रतिष्ठेचे हक्कदार बनून जाते. मोदी त्या भावनेला आवाहन करतात, त्याचा राजकीय लाभ उठवतात. मात्र अशी जनता व तिच्या मनातला आक्रोश त्यांना उभा करावा लागत नाही. ते काम पुरोगामीत्व मिरवणारे अगत्याने सतत करीत असतात. त्याची प्रतिक्रीया म्हणून नथूराम मोठे होतात. पुरोगाम्यांनी गाडलेल्या, पुसून टाकायचा प्रयत्न केलेल्या कित्येक प्रतिमा म्हणूनच मागल्या काही वर्षात अधिकाधिक लोकप्रिय होत गेल्या. त्या व्यक्ती वा त्यांचे कार्य हे लोकांमधले आकर्षण नसून, पुरोगाम्यांनी नाकारलेल्या गोष्टी म्हणून त्यांची महत्ता वाढलेली आहे. तर दुसरीकडे पुरोगाम्यांची प्रतिष्ठेची व अभिमानाची प्रतिके लोकांच्या तिरस्काराचे लक्ष्य होत चालली आहेत. त्रिपुराचा लेनिनचा पुतळा त्याच अग्नीच्या भक्ष्यस्थानी पडला आहे. सत्य दाबले जाऊ शकते. पण नष्ट होत नाही. ते उफ़ाळून अंगावर येते आणि तेव्हा त्याचे रौद्ररूप इतके भीषण असते.

3 comments:

  1. त्रिपुरातील भाजपचा विजय EVMचा आहे अस अजून कोणीच म्हणाल्याच ऐकिवात आल कस नाही.

    ReplyDelete
  2. भाऊ न‌मस्कार
    आपणास नम्र विनंती वी.दा. सावरकर आणि हिंदूत्व व तेव्हाच्या शासकांनी सावरकरांवर केलेले अत्याचार या विषयासंबंधी आपले मत मांडावे किवा एक लेख जरूर लिहावे जेणेकरून आम्हाला कळेल की त्या काळी देखील पुरोगामी कसे होते

    ReplyDelete
  3. भाऊ, सध्या फसेबूक वर एक मैसेज फिरतोय पप्पूजिनी पित्यांच्या खुन्याना माफ केले तर आम्ही म क च्या वधकरयाना माफ केलय

    ReplyDelete