Saturday, March 3, 2018

सरकार आणि कर्माकार

dipa karmaakar BMW के लिए इमेज परिणाम

यशाला अनेक बाप असतात. पण अपयश मात्र अनौरस असते. म्हणूनच आता त्रिपुरात वा इशान्य भारतात भाजपाने कशामुळे व कोणामुळे यश संपादन केले, त्यांची अवघी वंशावळ माध्यमे व वाहिन्या जगासमोर सादर करतील. पण देशातील सर्वात स्वच्छ चारित्र्याचा वा गरीब मुख्यमंत्री माणिक सरकारच्या अपयशाचे धनी कोण, ते कोणाला आठवणार नाही. कारण तीच जगरहाटी आहे. माणिक सरकार यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला लागोपाठ चार निवडणुका त्रिपुरात जिंकून दिल्या होत्या आणि त्यांच्या साधेपणाचे नित्यनेमाने कौतुक झालेले आहे. पण दरम्यान त्या इशान्येकडील दुर्गम राज्याची अवस्था काय झाली होती? त्याचे चित्रण जगाला दाखवावे अशी सुबुद्धी कुठल्याही पत्रकाराला कधी झाली नाही. ते काम माध्यमांशी संबंध नसलेल्या भलत्याच कुणा व्यक्तीला पार पाडावे लागले आणि तिथूनच मार्क्सवादी मुखवटा गळून पडायला आरंभ झालेला होता. त्या व्यक्तीचे नाव दीपा कर्माकार असे असून, तिचा राजकारणाशीही काही संबंध नाही, की तिने तिथल्या मार्क्सवादी सत्तेविषयी कधी चकार शब्द उच्चारला नव्हता. पण त्याच दीपाच्या एका कृतीमुळे त्रिपुराची दुरावस्था जगासमोर आली. दिसली नाही, ती बवाल माजवणर्‍या वाहिन्यांना वा पत्रकारांना. खरे तर तिथूनच मार्क्सवादी पक्षाची घसरण सुरू झाली होती आणि तिथली जनता पर्याय शोधू लागलेली होती. अशी ही दिपा कर्माकार कोण आणि तिने माणिक सरकार नावाचे गारूड कसे संपुष्टात आणले? ते समजून घ्यायला वर्षभर मागे जावे लागेल. २०१६ च्या डिसेंबर महिन्यात दक्षिण अमेरिकेत झालेले रिओ ऑलिम्पिक आठवते? त्यात जिम्नॅस्टीक या क्रीडाप्रकारात स्थान संपादन करून गाजलेली मुलगी म्हणजे दीपा कर्माकार. तिच्यामुळे हे राज्य देशाच्या चर्चेत आले. तिला तिथे कुठले पदक जिंकता आले नव्हते, म्हणूनही आपण हळहळलो होतो. तिने आता काय केले?

रिओ आलिंपिक स्पर्धेत अखेरच्या फ़ेरीत पोहोचलेल्या दीपाचे कांस्यपदक थोडक्यात हुकले, तरी तिथे देशात खुप कौतुक झाले. कारण तिथपर्यंत मजल मारणारी दीपा पहिली भारतीय होती. तिच्याखेरीज सिंधू व साक्षी अशा दोन मुली पदके जिंकून आल्या. तर बीएमडब्ल्यु या कंपनीने त्या तिघींना आपल्या महागड्या गाड्या भेट दिल्या होत्या. त्या कंपनीचा ब्रान्ड अंबेसेडर सचिन तेंडूलकरच्या हस्ते त्या आलिशान गाड्या देण्यात आल्या. मात्र तो समारंभ उरकल्यावर दीपाने कंपनीला विनंती केली, की आपल्याला त्या गाडीपेक्षा तिची किंमत रोख रुपात देण्यात यावी. कारण ती गाडी त्रिपुरात उपयोगाची नाही. अशा आलिशान गाडीसाठी आगरतळा या राजधानीत रुंद रस्ते नाहीत, की बिनखड्ड्याचे रस्ते उपलब्ध नाहीत. म्हणून आपल्याला पैसे द्यावेत आणि त्रिपुरात उपयुक्त ठरेल अशी योग्य गाडी आपण घेऊ. कंपनीने ते मान्य केले. पण दीपाने त्या एका कृतीतून त्रिपुरा राज्याची दुर्दशा जगासमोर मांडली होती. जगात नाव कमावणार्‍या त्रिपुराच्या त्या कन्येला आपल्या राज्यात गाडी हाकायला साधा रस्ता उपलब्ध नाही, हा मागल्या कित्येक दशकातला तिथला पुरोगामी व मार्क्सवादी सरकारचा विकास होता. त्यांना लोकांनी सातत्याने मते दिली व सत्ता बहाल केली. पण बदल्यात लोकांना काय मिळाले? मार्क्सवादी पक्षाने स्वच्छ चारित्र्याचा गरीब मुख्यमंत्री दिला. पण बदल्यात साधे रस्ते वा कुठल्याही जगण्यायोग्य सुविधा त्या राज्यातील जनतेला मिळू शकल्या नाहीत. ना हायवे ना अन्य कुठल्या पायाभूत सुविधा. तिकडून कोणी दिल्ली, मुंबई वा चेन्नईला आला किंवा कुठल्याही राज्यात गेला; तर त्याला बघायला मिळणार्‍या साध्या सुविधाही त्रिपुरात नव्हत्या. हे मार्क्सवादी राज्य व तत्वज्ञान होते. पुरोगामी राज्य हवे असेल तर कच्चे खड्ड्यांचे रस्ते व असुविधा पत्कराव्या लागतील, याची सक्ती होती आणि तेच जोखड सामान्य जनतेने झुगारून लावलेले आहे.

बोलके चित्र


सबका साथ सबका विकास, ह्या भाजपा वा मोदींच्या घोषणेची मागल्या चार वर्षात यथेच्छ टिंगलटवाळी झालेली आहे. पण जिथे भंयकर असुविधा वा मागासलेपणा आहे, अशा लोकांना त्याचा नेमका अर्थ कळतो. त्याचीच परिणती आजच्या निकालातून समोर आलेली आहे. उठसुट भाजपाच्या हिंदूत्वाची भिती घालायची आणि अन्य धर्मिय व आदिवासी दलितांना नरकवासात खितपत ठेवायचे, अशी मग पुरोगामी राज्याची ओळख होऊन गेली. विकास म्हणजे निदान जीवनावश्यक अशा पायाभूत सुविधाही जिथे आजवर पोहोचल्या नाहीत, अशी त्रिपुराची ओळख होती. इशान्येकडील राज्यांना देशाच्या घडामोडीत कोणी हिशोबातही धरत नव्हते. लोकसभेच्या प्रचार मोहिमेपासूनच मोदींनी त्याला छेद दिला आणि तेव्हाही त्यांनी तिथे चारपाच सभा मेळावे घेऊन त्या मतदाराला विकासाचे स्वप्न दाखवले होते. कदाचित तिकडे फ़िरकलेला तो पहिलावहिला राष्ट्रीय नेता होता. अन्यथा कुठल्याही पक्षाचे दिल्लीकर नेते व श्रेष्ठी इशान्य भारताकडे ढुंकूनही बघत नव्हते. तेव्हा मोदींना प्रतिसाद मिळू शकला नाही. पण सत्ता काबीज केल्यावर त्यांनी मागल्या तीनचार वर्षात आपले लक्ष इशान्येकडे केंद्रीत केले. पक्षाच्या उभारणीला प्राधान्य दिले, तसेच तिथे विकासाला चालना देणार्‍या अनेक योजनांसाठीही पुढाकार घेतला. त्याचा हळुहळू प्रभाव जनमानसावर पडत गेला. अन्य राज्यात ज्याला महत्व दिले जाणार नाही, अशा योजनाही इशान्येकडील जनतेला महान विकास वाटू शकतो. कारण आजवर त्यापासून त्यांना वंचित ठेवले गेले होते. दीपा कर्माकारने बक्षीस मिळालेली आलिशान कार परत करणे, हे त्याचे प्रतिक होते. त्या लोकांना मग पुरोगामीत्वाच्या भ्रमातून बाहेर पडण्याला पर्यायच राहिला नाही आणि त्याचीच चाहुल लागलेल्या विविध लहानमोठ्या पक्षातले नेते कार्यकर्ते भाजपात दाखल होत गेले. त्याचा मतपेटीतून साक्षात्कार आता झाला आहे.

खरेतर २०१४ च्या निवडणूकीत आपण पुरोगामीत्वाची पताका खांद्यावर घेऊन इतके नाचलो, तरी लोकांनी मोदींच्या हिंदूत्वाला प्रतिसाद कशाला दिला, त्याचा उलगडा अजून पुरोगामी विरोधकांना झालेला नाही. लोकांनी मोदी वा संघाच्या भगव्या हिंदूत्वाला मते दिलेलीच नाहीत. त्यांनी पुरोगामीत्वाच्या नावाखाली मागासलेपणाच्या नरकवासात खितपत पडायला नकार दिला होता. विकास म्हणजे किमान सुसह्य जीवनावश्यक व्यवस्था, इतकीच लोकांची अपेक्षा आहे आणि त्यालाच लोक अच्छेदिन असे समजत असतात. त्यांचे अच्छेदिन वातानुकुलीत केबिनमध्ये बसणार्‍यांना कधी समजू शकत नाहीत, की त्याचे आकर्षणही अशा सुखवस्तु शहाण्यांना कळू शकणार नाही. मग गोमांस वा गोरक्षणाच्या नावाखाली भाजपाला पराभूत करण्याचीच रणनिती सुचू शकते. पण लोक व्यवहारी असतात आणि त्यांनी नरकवासाची सक्ती करणार्‍या पुरोगामीत्वाला झिडकारले आहे. त्यापेक्षा विकासाची चाहुल सांगणारा भगवा हिंदूत्ववाद स्विकारला आहे. म्हणूनच हे मत हिंदूत्वाला वा मोदींना दिलेले नसून ते मागासलेपणाची सक्ती करणार्‍या व गरीबी लादणार्‍या पुरोगामीत्वाला नाकारणारे मत आहे. उद्या ह्यातले रहस्य समजून कॉग्रेस वा डाव्यांनी तितकी विकासवादी भूमिका घेतली, तर भाजपाचा पराभव व्हायला वेळ लागणार नाही. त्रिपुराच कशाला? अवघ्या देशाला विकासाचे वेध लागले आहेत आणि पुरोगामी डावे पक्ष लोकांवर मागासलेपणाची सक्ती करून राहिले आहेत. त्याच्याच विरोधातले हे मतदान आहे. अर्थात हे भाजपा मान्य करणार नाही, की पुरोगाम्यांना पटणार नाही. पण तेच सत्य आहे, तेच दीपा कर्माकारने कृतीतून सांगितले होते आणि तिच्यातली तीच भावना उर्वरीत इशान्येत पसरली. म्हणून गरीब चरित्र्यसंपन्न माणिक सरकार पराभूत झालेले आहेत. म्हणूनच डाव्यांनी मोदींच्या यशाकडे विजय म्हणून बघण्यापेक्षा आपल्या पराभवाकडे जरा डोळसपणे बघण्यात त्यांचे भले असेल.

4 comments:

  1. भाऊ सत्यताची जाणीव करूण दिली ऐक ह्रदय स्पर्शी लेख

    ReplyDelete
  2. भाऊ भन्नाट आहात तुम्ही.....दिपाने रस्त्याअभावी गाडी परत केल्याच मी सुध्दा वाचल होत..पण त्याची सद्यपरिस्थितीत न्युज व्हॅल्यु इतकी होईल याची कल्पनाही केली नव्हती....भले भले

    ReplyDelete
  3. आपण जे चित्र वर दाखवलं आहे हे आज 2018 साली कलकत्ता मध्ये होतय आजही माणस चक्क घोडागाडी ओढतात पण दुर्दैवाने ह्यावर कोणीही काहीही बोलत नाही किंवा आवाज उठवत नाहीत वा रे पुरोगामी

    ReplyDelete
    Replies
    1. सत्य आहे पण पचनार नाही भोंदू लोकांना

      Delete