Wednesday, January 15, 2020

भाजपाच्या ‘लेखी’ एकमेव पर्याय

Image result for meenakshi lekhi young

आजही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देशातील लोकप्रियता कायम असली, तरी राज्य विधानसभेच्या निवडणूका भाजपाला त्यांच्या प्रतिमेवर किंवा लोकप्रियतेवर जिंकता येणार नाहीत. किंबहूना गेल्या काही महिन्यात वा वर्षभरात तेच सिद्ध झालेले आहे. जिथे भाजपापाशी राज्यातला खंबीर वा समर्थ नेता उपलब्ध आहे, तिथेच मोदींची लोकप्रियता कामी येते. कारण त्या स्थानिक नेत्याच्या प्रतिमेला मोदींच्या सोबतीचा लाभ होतो. पण जिथे तशी स्थिती नसेल, तिथे भाजपाला मते कमी पडत नाहीत. पण उपलब्ध असलेल्या अन्य पर्यायांकडे मतदार अपेक्षेने पहातो. खरे तर यात नवे काहीच नाही. २०१४ साली मोदींनी लोकसभेत भाजपाला बहूमत मिळवून दिल्यानंतरच्या अनेक विधानसभा निवडणूकातही त्याची प्रचिती आलेली आहे. पण जिथे दुबळे विरोधक वा नाव घेण्यासारखा नेता नव्हता, किंवा ज्या सत्ताधारी पक्षाला लोक कंटाळलेले होते; तिथेच पर्याय म्हणून भाजपाकडे मतदार वळलेला आहे. दिल्ली त्याचे उत्तम उदाहरण होते. भाजपाकडे नावाजलेला कोणी नेता मुख्यमंत्री म्हणून पेश करायला नव्हता आणि केजरीवाल हा पर्याय होता. कितीही उचापती केल्या तरी त्यांनी अल्पावधीचा मुख्यमंत्री म्हणून आपल्या नेतृत्वगुणांची साक्ष दिल्लीकरांना दिलेली होती. त्यांच्या तोडीस तोड म्हणून भाजपाकडे कोणीही नेता नव्हता, कॉग्रेसपाशीही नव्हता. त्याचा प्रचंड लाभ केजरीवाल व त्यांच्या आम आदमी पक्षाला मिळून गेला आणि जवळपास सगळी विधानसभाच त्यांनी खिशात घातली. आज ती प्रतिमा टिकलेली नाही व विटलेली सुद्धा आहे. पण म्हणून भाजपाला लाभ होईल, अशी अपेक्षा भ्रमाचा भोपळा फ़ोडल्याशिवाय रहाणार नाही. भाजपाला कोणी खमका नेता मुख्यमंत्री म्हणून सादर करावा लागेल आणि उपलब्ध मनोज तिवारी वा विजय गोयल तसे पर्याय नक्कीच नाहीत. तुलनेने नवी दिल्लीच्या खासदार मीनाक्षी लेखी त्यासाठी उत्तम पर्याय असू शकतो.

पाच वर्षापुर्वी भाजपाने केलेली मोठी चुक म्हणजे मोदींच्या लोकप्रियतेवर स्वार होऊन दिल्लीच्या नगरराज्याची सत्ता मिळवण्याचा गैरलागू प्रयत्न होय. तेव्हा विधानसभा स्थगीत केलेली होती आणि त्यात कोणालाही स्पष्ट असे बहूमत नव्हते. भाजपा सर्वात मोठा पक्ष होता आणि आम आदमी पक्ष दुसर्‍या स्थानावर होता. तिसर्‍या क्रमांकाच्या कॉग्रेसने पाठींबा दिल्याने ४९ दिवस केजरीवाल मुख्यमंत्री झाले आणि पंतप्रधान होण्याच्या स्वप्नामागे लागून त्यांनी राजिनामा दिला होता. परिणामी अन्य पर्याय नसल्याने विधानसभा स्थगीत केली गेली होती. लोकसभा निकालांनी चित्र पालटून गेले. केजरीवालांची झिंग उतरली, तर भाजपाला मोदीलाटेची नशा चढलेली होती. म्हणून भाजपाचे अध्यक्ष अमित शहांनी तात्काळ विधानसभा बरखास्त करून निवडणुका घेतल्यास मोठा लाभ झाला असता. पण त्यापेक्षा त्यांनी आम आदमी पक्षाचे आमदार फ़ोडून बहूमताचा आकडा पार करण्याचा जुगार खेळण्यात अनाठायी कालापव्यय केला. त्यामुळे मधले आठ महिने केजरीवाल यांना पक्ष संघटना सावरण्यात व नव्याने निवडणुकांची तयारी करायला आयते मिळाले. ती वेळ आली, तेव्हा भाजपाकडे कोणी तितका आक्रमक तोडीस तोड उमेदवार नव्हता. म्हणून कधीकाळी केजरीवाल यांच्या आंदोलनातल्या सहकारी असलेल्या किरण बेदींना पक्षात आणून मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून पेश करण्यात आले. त्याचा जबरदस्त फ़टका भाजपाला  मिळाला. तर त्याचा लाभ घेऊन केजरीवाल यांनी मोठी बाजी मारली. पाच वर्षे उलटून गेली तरी भाजपाला नवा चेहरा वा नेता दिल्लीत उभा करता आलेला नाही. पर्यायाने आजही केजरीवाल नकोसे झाले, अशी स्थिती दिल्लीत नाही. त्यांनी महापालिका व लोकसभा अशा दोन्ही मतदानात पक्षाला यश दिलेले नसले, तरी मुख्यमंत्री म्हणून केजरीवालाच्या प्रतिमेला छेद देईल, असा दुसरा नेता कॉग्रेस वा भाजपाकडे नाही. ज्यांची नावे घेतली जातात, त्यापैकी तर कोणीच नाही.

म्हणूनच भाजपाला पर्याय किंवा नवा विचार करणे भाग आहे. केजरीवाल यांच्याशी मैदानात व युक्तीवादात टक्कर देऊ शकेल असा खमक्या नेता भाजपाला द्यावा लागणार आहे. ती कुवत संयत स्वभावाच्या किरण बेदी यांच्याकडे नव्हती. तशीच मनोज तिवारी यांच्यापाशीही नाही. केवळ पुर्व उत्तरप्रदेशी मतदार संख्येवर डोळा ठेवून तिवारींना पुढे करण्याने काहीही साधणार नाही. कारण शीला दिक्षीत वा केजरीवाल यांच्या यशाकडे बघता, प्रादेशिक चेहरा म्हणून दिल्ली जिंकता येत नसते, हे सिद्ध झालेले आहे. त्यामुळे अहमहमिका करून आपली प्रतिमा जनमानसात उभी करू शकणारी कोणी व्यक्ती भाजपाला पुढे करावी लागेल. तरच ३५ टक्केपर्यंत मिळणार्‍या मतांच्या पार जाऊन बहूमताचा पल्ला गाठता येईल. कदाचित त्याच्याही पुढे झेप घेता येईल. त्यासाठी भाजपाच्या दिल्लीतील संघटनेमध्ये असलेले एकच व्यक्तीमत्व परिपुर्ण आहे. त्या साच्यात पक्के बसणारे आहे. मीनाक्षी लेखी वाहिन्यांवर भाजपाच्या प्रवक्त्या म्हणून आल्या आंणि त्यांचा चेहरा देशव्यापी होऊन गेला होता. २०१४ मध्ये त्यांनी नवी दिल्ली मतदारसंघ जिंकून लोकसभा गाठली. आठ महिन्यांपुर्वी त्या तिथूनच दुसर्‍यांदा निवडून आलेल्या आहेत. याहीपेक्षा त्यांचे व्यक्तीमत्व, आक्रमक स्वभावामुळे केजरीवालांशी उत्तम टक्कर देऊ शकणारे वाटते. कारण त्या कायदेतज्ञ असून सुप्रिम कोर्टात वकिलीही करतात. गेल्या लोकसभेपुर्वी त्यांनी कॉग्रेस अध्यक्ष राहुल गांधींना मतदानाच्या मुहूर्तावर जाहिर माफ़ी मागण्याची पाळी आणून आपली धमक दाखवलेली आहे. राफ़ेल विमान खरेदी प्रकरणात सुप्रिम कोर्टाचा निकाल स्पष्ट असताना राहुल गांधींनी आपल्या मनातले त्यात घुसवून मोदींवर जाहिर खोटे आरोप केले. त्यातून कोर्टाचा अवमान झाल्याची याचिका लेखींनीच दाखल केली आणि ऐन मोक्याच्या वेळी राफ़ेलविषयी आरोप खोटे पाडण्याची समयसुचकता दाखवलेली होती. याला टक्कर घेणे म्हणतात.

दिल्लीत भाजपाला तशा चेहर्‍याची व नेत्याची गरज आहे. जो नुसता युक्तीवाद  करून शहाण्यांशी लढणारा नव्हे, तर सामान्य जनतेला भुरळ घालणारी हिंमत दाखवणारा असला पाहिजे. लेखींचा स्वभाव आणि बोलण्यातली शैली तशी आक्रमक व झुंजार आहे. वाहिन्यांवरच्या वादात किंवा संसदेतील त्यांची प्रतिमा तशीच आहे. अमेठीत राहुल गांधींना बालेकिल्ल्यात पराभूत करण्याची जी क्षमता स्मृती इराणींनी दाखवली, तितकीच धमक लेखींपाशी आहे. अर्थात एका बाजूला कायद्याची जाण व सत्तेच्या मर्यादांचे भान असलेली व्यक्तीच मुख्यमंत्री पदावर शोभते व कामही यशस्वी करून दाखवू शकते. जनतेशी जुळवून घेण्याची क्षमताही तितकीच महत्वाची असते. मीनाक्षी लेखींच्या देहबोलीतून त्यांच्या या गुणांची साक्ष मिळते. मात्र आजवर भाजपाने स्मृती इराणींना जशी जबाबदारी सोपवून झुंजण्याची संधी दिली, तशी लेखींना मिळालेली नाही. अमेठीत राहुल समोर महिला म्हणून इराणींना जो फ़ायदा घेता आला; तसाच तो दिल्लीत केजरीवाल यांच्याशी होणार्‍या झुंजीत लेखींना मिळू शकतो. भाजपाच्या उमेदवार आक्रमक व झुंजार असल्या तरी त्यांच्याशी उनाडपणे केजरीवाल प्रतिक्रीया देण्यात तोकडे पडतील. महिला असल्याचा वेगळा लाभही महिला मतदारात लेखींना उचलता येईल. जी अन्य कोणाही पुरूष भाजपा नेत्याची जमेची बाजू असू शकणार नाही. त्याखेरीज आणखी एक लाभदायक गोष्ट आहे. मीनाक्षी लेखी हा एकदम नवा ताजातवाना चेहरा म्हणूनही पेश होणार असल्याने त्यांच्यावर कुठलेही नाकर्तेपणाचे आरोप विरोधक करू शकणार नाहीत. याचा अर्थ लेखी म्हणजे केजरीवाल विरोधातला हुकमी एक्का, अशी समजूत करून घेण्याचे कारण नाही. तर जबरदस्त टक्कर देऊ शकेल, असा पर्याय म्हणून हे नाव आहे. किंबहूना भाजपाच्या ‘लेखी’ तोच मुख्यमंत्री पदासाठी एकमेव पर्याय आहे.

11 comments:

  1. मीनाक्षी लेखीच उत्तम पर्याय आहे आपली सुचना एकदम बरोबर आहे

    ReplyDelete
  2. perfect...! I just find Ms. Lekhi or Smriti Irani right candidate if BJP really has to be in game of Delhi Election

    ReplyDelete
  3. अतिशय योग्य पर्याय भाऊ!

    ReplyDelete
  4. Bhau Able leaders need to b groomed by BJP at State and local level This point is correct. But 11the hour changes do not lead to d victory
    Sushma Swaraj a prominent well known and proven leader was projected by BJP at d 11the hour against then invincible CM Sheela Dixit BJP lost badly.Manta was not successful till Jyoti Bash was leading as CM in WB.The change of leadership in CPM and continued fight by Manta made her successful.In Maharashtra also continued and persistent fight by Minds Mahajan and Balasaheb brought d change.In my opinion AAP is going to retain power but by slender margin.Only ray of hope will b if Congress is able to recapture d lost voter base then Perhaps BJP can come to power.Otherwise Grooming of leaders is d only alternative.

    ReplyDelete
    Replies
    1. I think gopinath Munde also played prominent role in Maharashtra

      Delete
  5. तुम्ही सांगितलेला पर्याय चांगला आहे असे मला वाटते

    ReplyDelete
  6. ANERAO CHANDRASHEKAR VINAYAKJanuary 15, 2020 at 11:37 AM

    भाऊ, एकदम बरोबर ������

    ReplyDelete
  7. सोशल मिडियावर काही सुत्रांकडुन कुमार विश्वास यांचा पर्याय भाजप कडुन पडताळला जात असल्याचे वृत्त आहे, विश्वास यांची तयारी असल्यास ते केजरीवाल यांना नैतीक दृष्ट्या वरचढ ठरु शकतील.

    ReplyDelete
  8. मीनाक्षी लेखी आणि कुमार विश्वास दोघेही चांगला पर्याय असू शकतात. भाजप नेतृत्वाने याची दाखल घायला हवी.

    ReplyDelete