Saturday, January 4, 2020

सत्तेसाठी पवार क्लासेस

Image result for pawar uddhav kureel

आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची टवाळी व टिंगल करताना भाजपाच्या समर्थकांना मजा येत असेल. पण आघाडी वा तडजोडीच्या राजकारणात अशा अगतिकतेला पर्याय नसतो. तीन पक्षांचे सरकार बनवताना याप्रकारे कसरती प्रत्येकाला कराव्याच लागत असतात. तसे नसते, तर आजवर अनेक आघाडी सरकारे चांगली चालली असती व यशस्वी कारभारही करू शकली असती. फ़ार कशाला आधीचे तब्बल पाच वर्षे चाललेले फ़डणवीसांचे सरकारही अशाच कसरती करीत होते ना? २०१४ सालाच्या अखेरीस शिवसेनेचा त्यांच्या सरकारमध्ये समावेश झाला, ती सुद्धा एक तडजोडच होती. वास्तविक निकाल लागल्यानंतर भाजपाने बहूमत हुकले असताना सेनेला सोबत घेऊन सरकार बनवावे, हीच लोकांची अपेक्षा होती. पण तेव्हा त्यांना बाहेरून पाठींबा जाहिर करून पवारांनी त्यात बिब्बा घातलेला होता. त्यामुळे फ़ुशारलेल्या भाजपाच्या प्रवक्त्यांनी आम्हाला कोणाच्या मिनतवार्‍या करायची गरज नाही; असे म्हटलेले होते आणि नंतर अल्पमत असतानाही राज्यपालांचे आमंत्रण स्विकारून सरकार बनवलेलेच होते. त्याचे बहूमत सिद्ध करण्याची वेळ आली, तेव्हा आवाजी मतदानाचा बार उडवून सरकार रेटले होते. परंतु त्या बहूमताला प्रकाश आंबेडकरांनी हायकोर्टात आव्हान दिल्यावर पवारांची खेळी उघडी पडली आणि फ़डणवीसांना बहूमतचा आकडा कागदोपत्री सिद्ध करण्यासाठी सेनेला सोबत घ्यावेच लागले. खरे तर तेव्हाच भाजपाची संपुर्ण तारांबळ करण्याची उत्तम संधी उद्धवरावांपाशी होती. पण त्यांचे शिलेदार मंत्री व्हायला उतावळे असल्याने त्यांना ती संधी साधता आलेली नव्हती. फ़डणवीसांचे तेव्हाचे दु:ख आता उद्धव ठाकरेंना कळत असेल.

मुद्दा इतकाच आहे, की तेव्हा दुखावली गेलेली शिवसेना सत्तेत सहभागी झाली; तरी प्रत्येक बाबतीत भाजपाला डंख मारण्यात पुढेच होती आणि विरोधात बसलेल्या दोन्ही कॉग्रेसपेक्षा शिवसेनाच विरोधक म्हणून रोजच्या रोज भाजपा सरकारवर तोफ़ा डागत होती. किंबहूना तेव्हापासून भाजपाला तोंडघशी पाडण्याचे मनसुबे रचूनच सेना आपले डाव खेळत असावी. अन्यथा महायुती करून निकालापर्यंत शांत बसण्याची गरज नव्हती. आताही सेनेने मुख्यमंत्रीपद मिळवले आहे. पण त्याचा आनंद असण्यापेक्षा भाजपाला खिजवण्याचा सुख अधिक आहे. सरकार बघितले, तरी त्यात सेनेला नगण्य कमाई व इतरांचा बोजा अधिक उचलावा लागणार, हे सहज दिसू शकते. पण त्याने काय फ़रक पडतो? सुडाला पेटलेला माणूस आपला फ़ायदा तोटा कधीच बघत नसतो. त्याला समोरच्याचे नाक कापण्यात रस असतो आणि ते नाक कापताना आपल्याला झालेल्या जखमाही आनंदित करीत असतात. शिवसेनेची अवस्था आज त्यापेक्षा वेगळी नाही. अर्धी सत्ता मिळवण्यासाठी सुरू झालेला संघर्ष, अर्ध्याहून कमीच सत्तापदे मिळवूनही आनंदित असल्याचे चेहर्‍यावर दाखवित रहाणे, कमी वेदनादायी नसते. पण शिवसेना आपले दु:ख आज बोलू तरी शकते आहे काय? ज्यांनी त्या मुख्यमंत्री पदासाठीच आटापिटा केला, असे शिवसेनेचे बहुतांश नेते म्होरके सुतकात उगाच गेलेले आहेत काय? त्यांना दु:ख व्यक्त करता येत नाही की आपले दुखणे सांगताही येत नाही. कारण आपल्या वेदनांपेक्षाही त्यामुळे भाजपावाल्यांना खुशी मिळण्याचे दु:ख मोठे असते ना? सुडाच्या डावपेचात अशा स्थितीला पर्याय नसतो.

पाच वर्षापुर्वी आपले सरकार स्थापन झाले वा आपला मुख्यमंत्री महाराष्ट्रात विराजमान झाला, त्यापेक्षाही भाजपाचे लोक शिवसेनेचे नाक कापल्याच्या आनंदातच नव्हते का? आज कुठेच स्थान नसल्याने हळहळलेले एकनाथ खडसे तेव्हा कसे छाती फ़ुगवून युती मोडण्याचा पराक्रम आपणच केला म्हणून अभिमानाने सांगत होते? त्यावेळी त्यांना पाच वर्षानंतर काय वाढून ठेवलेले आहे, त्याचा थांगपत्ता होता काय? नसेल तर आज शिवसेनेच्या अनेकांना आजच्या आनंदाला फ़ुटलेल्या उकळ्यांचे चटके इतक्यात कसे कळावेत? माझ्या पाच वर्षे जुन्या लेखांमध्ये त्याची पुर्वसुचना मी सातत्याने दिलेली होती. पण तेव्हा मला शिवसैनिक ठरवण्यात भाजपाचे अनेक समर्थक समाधानी होते. उलट गेल्या काही महिन्यात शिवसेनेला येऊ घातलेल्या धोक्याची सुचना देतोय, तर त्यांना मी मोदीभक्त आहे, असेही साक्षात्कार होत आहेत. ही प्रत्येक राजकीय पक्षनिष्ठाची शोकांतिका असते. त्याला आपल्या पक्षाचे कल्याण वा भवितव्य यापेक्षा दुसर्‍या कुणा पक्षाच्या विनाशाचे वेध लागले; मग स्वहिताचे भान रहात नाही. म्हणून मग त्याला आपल्या लाभापेक्षा अन्य कुणाचे नुकसान सुखावू लागते आणि तिथून त्यांची राजकीय घसरण सुरू होत असते. अगदी तसेच आज शिवसेनेला आपले नुकसान कळणार नाही. महिनाभर आधी शिवसेनेच्या बड्या नेत्यांना तरी आपलीच गठडी वळली जाणार असल्याचे कुठे पटत होते? शिवसेनेचाच मुख्यमंत्री म्हणून रात्र रात्र जागून काढलेल्या अनेक नेत्यांना आता आपण सत्तेबाहेर फ़ेकले गेल्यावर सुतक लागले आहे, ते उगाच नाही. जे लोक आपण पटावरची प्यादी मोहरे असल्याचे विसरून जातात, त्यांची वेगळी स्थिती होत नसते.

शिवसेनेचा मुख्यमंत्री म्हणजे सत्ता आपलीच, अशी एक समजूत होती आणि सर्व सत्ता आपल्याच हाती आल्यानंतर हवे ते पद व हवी तितकी सत्ता; असेच वाटणे स्वाभाविक आहे. पण ४३ मंत्रीपदे भरली गेल्यावरही सेनेच्या वाट्याला किती पदे आलेली आहेत? अमित शहांशी झालेल्या बोलण्यात ‘अर्धी सत्ता’ असे शब्द होते आणि त्याचे पालन झाले नाही, म्हणून निकालानंतर सेनेने महायुती मोडली ना? मग आता सेनेच्या वाट्याला काय आले आहे? मुख्यमंत्री म्हणून आपला खातेवाटपाचा विशेषाधिकारही वापरू शकणार नाही, असे सर्वोच्च पद ना? शपथविधी झाल्यावर महिना उलटून गेला, तरी सरकारचा विस्तार करायचाही निर्णय उद्धव ठाकरेंना घेता आला नाही. आणि विस्तार झाला, तेव्हा पदरात काय पडलेले आहे? राष्ट्रवादीचे १६ तर कॉग्रेसचे १२ मंत्री आहेत. शिवसेनेच्या वाट्याला आलीत अवघी १४ मंत्रीपदे. अधिक मुख्यमंत्रीपद. त्यापैकी तीन अपक्षांना गेलीत. म्हणजे उरली फ़क्त ११ मंत्रीपदे. अर्धी सत्ता म्हणून युती मोडल्याची ही किंमत आहे. सेनेपेक्षाही दोन मंत्रीपदे राष्ट्रवादीला अधिक मिळाली आहेत. पण त्याची पर्वा कोणाला आहे? सत्ता दुय्यम आणि भाजपाला दुखावण्याला प्राधान्य आहे ना? पण ते उद्दीष्ट साध्य करताना शिवसेनेच्या दिग्गजांना सत्तेबाहेर बसावे लागलेले आहे. अर्थातच इतक्या मोठ्या लढाईत कोणाला तरी त्याग हा करावाच लागत असतो. त्यामुळे सेनेचा मुख्यमंत्री विराजमान करण्यासाठी दिग्गजांनी आपली सत्तापदे गमावली, तर त्याकडे त्याग म्हणून बघता आले पाहिजे. पण त्याग तितकाच नाही वा नेत्यांपुरता मर्यादित नाही. शिवसेनेलाही आपल्या आजवरच्या भूमिकेला मुरड घालण्याचाही त्याग करावा लागला आहे.

ह्या गोष्टी राजकारणात अपरिहार्य असतात. प्रत्येकाला तशी शेपूट घालावी लागत असते. सोनिया परदेशी म्हणून कॉग्रेस सोडून वेगळी चुल मांडणार्‍या पवारांनी सत्तेसाठी त्याच सोनियांसमोर वीस वर्षापुर्वी गुडघे टेकलेले नव्हते का? वाजपेयींच्या काळात सत्ता संपादनासाठी भाजपानेही मंदिर, ३७० असे विषय गुंडाळून ठेवलेले नव्हते का? फ़डणवीसांनी बहुमताचे गणित सिद्ध करण्यासाठी पाच वर्षे शिवसेनेच्या बोचर्‍या शब्दांचा भडीमार सहन केलेला नव्हता का? मग त्यातून उद्धव ठाकरेंची तरी सुटका कशी असेल? त्यांच्यावरही अशा टिका व प्रश्नांचा भडीमार होणारच आहे. पण अशा तत्वांना तिलांजली देणारा पहिलाच पक्ष वा नेता म्हणून त्यांच्याकडे बोट दाखवायचे काही कारण नाही. तत्व विचार जनतेला भुलवण्यासाठी असतात आणि सत्ता हा निव्वळ व्यवहार असतो. पवार नेमके त्यातले जाणकार आहेत. म्हणून तर चारपाच दशके सत्तेत टिकून राहिलेले आहेत. त्यांनी कितीदा तत्वांचा बळी घेतला त्याचा हिशोब नाही. मग त्यांच्याकडून राजकारणाचे धडे गिरवायला बसलेल्या उद्धवरावांना सवलत कशी मिळू शकेल? आता तर शिवसेनेने राजकारण शिकायला सुरूवात केली आहे. सगळी महाविकास आघाडी जुळवून आणल्यानंतर सेनेच्या चाणक्यांना पहिला धडा समजू शकला. उद्धवरावांना तर अजून खुप शिकायचे आहे. आपल्या जुन्या निष्ठावंताना डावलून अनौरसांना आपल्या हिश्श्यातील मंत्रीपदे देणे; ही फ़क्त सुरूवात आहे. विरोधी पक्षात बसायला जनतेने सांगितले असे सतत सांगून सत्तेतली सर्वाधिक पदे मिळवण्याचा धडा नंतरचा आहे. अजून पवार सरांनी पुस्तक उघडले आहे कुठे?

सवाल आज सरकार बनवण्यापुरता नसतो राव! भविष्याचा वेध घेऊन पक्ष टिकवणे व चालवणे, खरी कसोटी असते. अशा रितीने सरकार स्थापन करणे वा सत्ता बळकावणे, पवारांनी मागल्या अर्धशतकात अनेकदा केले आहे. किमान आमदारात सरकार बनवण्याची किमयाही चारदा केली आहे. पण राज्यातला प्रादेशिक पक्षही बहूमताने जिंकून आणण्याची कुवत पवारांना एकदाही साध्य करून दाखवता आलेली नाही. स्वबळावर राज्य जिंकण्याचा दोनदा केलेला प्रयोग त्यांना पन्नासच्या पार घेऊन गेला, तरी साठीच्या पार घेऊन जाऊ शकलेला नाही. उद्धवराव यानंतर या नव्या प्रयोगानंतर शिवसेनेला स्वबळावर लढावे लागणार आहे. त्यात पवार कुठलीही साथ देंणार नाहीत. धाकट्या राज ठाकरेंना लोकसभेपासून विधानसभेपर्यंत त्याचा पुरेसा अनुभव आलेला आहे. त्यामुळेच आज सरकार स्थापन झाले असले तरी पुढे कधी होतील तेव्हाच्या विधानसभेत २८८ जागा स्वबळावर लढवण्याला महत्व आहे. तेव्हा हे सत्तेतले भागिदार सेनेला मतदानपुर्व आघाडीत सहभागी करून घेणार काय? याच प्रश्नाचे उत्तर भविष्यासाठी महत्वाचे आहे. आज भाजपाला डिवचण्याचा आनंद जरूर मनसोक्त लूटता येईल. पण येणार्‍या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाला सर्व २८८ जागा तुम्हीच मोकळ्या करून दिल्यात, याचा विसर पडून चालणार नाही. अशाच आघाडीत १९९९ सालामध्ये उत्साहात सामील झालेले जनता दल, शेकाप, कम्युनिस्ट वा अन्य लहानसहान पक्ष आजे कुठे आहेत? जरा शोध घ्यायला हरकत नसावी. त्यांनाही किमान आमदारांचे सरकार स्थापन कसे करावे, त्याचे धडे पवारांनीच शिकवले होते. काय झाले त्यांचे?

 सत्ता पाच किंवा कमी वर्षांपुरती असते आणि पक्ष संघटना वा त्यातल्या निष्ठावान कार्यकर्त्यांची फ़ौज दिर्घकालीन सत्य असते. ज्यांना याचे भान राखता येते, तेच तीस वर्षात २ खासदारांपासून २८२ खासदारांपर्यंत पोहोचून सत्ता हस्तगत करतात. उलट ज्यांना सत्तेची घाई झालेली असते, ते वाटेल त्या तडजोडी करून सत्ता लगेच मिळवतात. पण नंतर कधीतरी सत्ता गमावल्यावर पुन्हा सावरण्यासाठी पक्ष वा निष्ठावान कार्यकर्त्यांचा दुष्काळ पडलेला असतो. आज सत्तेपासून वंचित रहाण्याचे दु:ख भाजपावाल्यांना होणे स्वाभाविक आहे. गेल्या पाच वर्षात त्यांनी सत्ता अनुभवली आहे. पण ती सत्ता मिळवण्यासाठी त्यांच्या आधी दोनतीन पिढ्यांनी कुठलीही अपेक्षा बाळगली नाही व पक्षाची उभारणी करण्यात हयात खर्ची घातली. त्याचे भान भाजपाच्या आजच्या तरूण पिढीला राखता आले, तर गमावलेल्या तात्कालीन सत्तेच्या वेदना सुसह्य होतील. शिवसेनेनेही आरंभीच्या पाव शतकात लागोपाठ निवडणुका लढवूनही दोनतीन आमदार निवडून यायचे नाहीत, त्यावेळच्या शिवसैनिकांनी उपसलेले कष्ट लक्षात घ्यायला हवेत. पण सत्तेच्या मस्तीत अशा मोलाच्या गोष्टींची कोणाला कदर असते? त्यांना वाजपेयी, बाळासाहेब आठवत नाहीत, तर किमान श्रमात सत्ता झटपट मिळवणारे शरद पवार भुरळ घालतात. पण त्याच राजकारणात पवारांनी माती करून टाकलेली प्रतिभा व प्रतिमा बघता येत नाही. त्यातच शेकाप, जनता दल यासारखे वैचारिक भूमिकांचे पक्ष जमिनदोस्त वा नामशेष होऊन गेले. बघुया, पवारांकडून धडे गिरवणारे उद्धवराव कोणता नवा इतिहास घडवतात.

19 comments:

  1. भाऊ, फार छान ! आता देव भाजप व शिसे ला चांगली बुद्धी देवो हीच प्रार्थना !

    ReplyDelete
  2. भाऊ ऊत्तम विश्लेषण, नेहेमीप्रमाणेच. धन्यवाद !

    ReplyDelete
  3. १९५६ साली यशवंतराव चव्हाण यांनी मुख्यमंत्री झाल्यावर महाराष्ट्राच्या राजकारणात 'बेरजेचे राजकारण' असा शब्दप्रयोग रुढ केला. कोणाशीही मांडायचे नाही. भांडण झाले तरी काढायचे नाही. अपमान करायचा नाही. व्यक्तिगत संबंध चांगले ठेवायचे. याच वृत्तीमूळे भाजप २०१४ साली शिवसेनेशी युती करू शकली. सध्या शिवसेना या वृत्तीच्याविरुद्ध वागत आहे आणि जुने व्यक्तिगत संबंध तोडून टाकत आहे. यातच आनंद मानत आहे. भाजप वा कोणताही दुसरा पक्ष यांचे अस्तित्व रहाणार आहे आणि त्यांच्याशी राजकारणाव्यतिरिक्त संबंध तोडणे हा बुमरँगसारखा आत्मघातकीपणा आहे.

    ReplyDelete
  4. भाऊ, खूप छान आहे हा लेख.

    ReplyDelete
  5. भाऊ प्रश्न तडजोड करून सत्ता टिकवणे एवढया पुरता नाही तर भविष्यात पक्षाला त्याचा फायदा किती हा आहे, भाजपने 2014 मध्ये युती तोडून मुख्यमंत्री पद मिळवले आणि त्यानंतर राज्यातील अनेक महानगर पालिका, जिल्हा परिषदा, नगरपालिका यात बस्तान बसविले, शिवसेनेची मक्तेदारी असलेल्या मुंबई महापालिके त भाजप सेनेबरोबर जागा घेऊन आला, आता मिळालेल्या सत्तेचा वापर करून शिवसेना हे करणार आहे का हाच कळीचा मुद्दा आहे, शिवसेनेचे 56 आमदार निवडून आले आहेत त्यातील दोन मंत्रीपदे ठाकरेंच्या घरात,तीन अपक्ष आणि तीन विधानपरिषद सदस्य हे वजा केले तर तर जेमतेम सहा मंत्री निवडून आलेल्या आमदारांपैकी झाले आहेत, आता अशी खच्ची झालेली शिवसेना नव्या उमेदीने परत उभी राहू शकणार आहे का हा महत्त्वाचा मुद्दा आहे, भाजपने 2014 मध्ये युती तोडून आणि 2019 मध्ये युती करून दोन्ही वेळा 100 च्या वर आमदार निवडून आणले आहेत आणि सेनेला दुय्यम भूमिकेत ढकलून दिले आहे, कदाचित याचा सूड म्हणून सेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत जाऊन भाजपला धडा शिकवला आहे पण हा रोगा पेक्षा इलाज भयंकर आहे याचा दूरगामी परिणाम म्हणजे शिवसेनेच्या लढवय्या कार्यकर्त्यांचा धीर खचून जाणार आहे, आपण नेमके याच गोष्टीचे मार्मिक वर्णन केले आहे आपला ब्लॉग अतिशय उत्तम आहे

    ReplyDelete
  6. योग्य विश्लेषण, भाऊ

    ReplyDelete
  7. भविष्यात २८८ किंवा शक्य असतील तेवढ्या जागा लढवायला शिवसेना पक्ष अस्तित्वात राहील का अशी शंका वाटते..

    ReplyDelete
  8. कर्नाटकातील येडुरप्पांनी विरोधी पक्षात असताना योग्य प्रकारे संयम राखून सत्ता मिळवली आहे. हे जिवंत व ताजे उदाहरण फडणवीस यांच्या समोर आहे. त्याचा उपयोग करतात की नाही, ते कळेलच.

    ReplyDelete
  9. भाऊ एकदम मस्त विश्लेषण

    ReplyDelete
  10. Bhau, ek tar pawaranna Ani rashtrawadila kontehi tatva nahi, tyanchyasathi Satta Ani samajat fut padane hech tyanche tatva ahe. Tyamule te suruvatipasunach sattesathi konahi sobat jatat. Pan Balasaheb aste tar sattesathi NRC Ani CAA chya virodhat kadhihi gele naste. Sawarkaranbaddal vattel te bolne sahan naste kele. Tyanni khade bol sunavle aste. Pan senene fakt tatva kinwa swabhimanach nahi tar Vivek Ani matadarahi gamavat ahet. Tyache tyanna bhanach urlele nahi.

    ReplyDelete
  11. भाऊ, उद्धवरावांनी शरद पवारांची शिकवणी का लावली? शरदरावांनी नको त्या वयात नको त्या पक्षांची सांगड
    घालून सत्तेची सर्कस का उभी केली? शिवसेनेच्या उद्धवरावांनी शरद रावांची शिकवणी लावतानाच गेले २०
    वर्षाची बी जे पी ची आघाडी तोडण्याचे काम तोंडफाटक्या पत्रकारावर का सोपवले? ह्या उघडतोंड्या पत्रकाराने वैचारिक मतभेदाचे रूपांतर वैयक्तिक हेव्यादाव्यांवर बिनबोभाट आणून शिवसेनेचे व पर्यायाने ठाकरे कुटुंबियांना
    बी जे पी पासून तोडून शरदरावांच्या पायाशी का ठेवले? ह्या
    सगळ्या का? चे उत्तर २०१४ च्या निवडणुकांच्या निकालात
    सापडेल. विरोधासाठी विरोध हे दुरित २०१४ साली मोदीसाहेब निवडून आल्यापासून फारच विकोपाला गेले. कोणत्याही निवडणुकीनंतर कोणी तरी विरोधी पक्ष म्हणून
    बसणार पण २०१४ साली मोदीसाहेब निवडून आल्यापासून जे पक्ष विरोधी पार्टी म्हणून रूपांतरित झाले त्यांनी फक्त विरोधासाठी विरोध हे दुरित अवलंबले. मोदींच्या सत्ताग्रहणानंतर जे पक्ष विरोधी पार्टी म्हणून रूपांतरित झाले त्यांची मानसिकता विशुध्दपणे नकारात्मक बनली. एकदा टार्गेट ठरवले की कसेही करून दूषणे द्यायचीच अशी सक्ती विरोधकांना होऊन बसली आहे. त्यात म्हणायचे पण म्हणलो नाही असेही दाखवायचे (याला इंग्लिशमध्ये पॅरालेपिसिस अलंकार म्हणतात) असे २०१४ ते २०१६ मध्ये झाले अन २०१६ नंतर तर उघड उघड कोणीही चालेल पण मोदी नको
    ही भावना विरोधकांनी उघड उघड दाखवली. भारतातील लोकशाहीने मोदीजींना सत्ता दिली हेच बीजेपी विरोधकांना
    आवडले नाहीये. काहीही करू अगदी देश विकू पण मोदी नको ह्या साठी पराकोटीच्या टोकाच्या भूमिका विरोधकांकडून घेतल्या जात आहेत. पर्याय न देता टीका करणे हे जरी कायदेशीर असले तरी हिताचे नाही एव्हढा साधा विचार विरोधकांना नाहीये. हेत्वारोप करून जाती जातीत भांडण लावून पावसात भिजून सर्जिकल स्ट्राईक झालाच नाही असं म्हणून पागोटं पगडीत वाद निर्माण करून
    कर्नाटकात कुमारस्वामी ना पाठिंबा देत सोनियांनी मायावतींच्या डोक्याला आपलं टाळकं घासून, मोदीजींना सत्तेवरून पायउतार व्हायला लावायचा प्लॅन रचला गेला. त्यातील बरेच प्लान फसले म्हटल्यावर शरद पवारांनी तोंडफाटक्या पत्रकारास दावणीस बांधून एकाच दगडात शिवसेनेस शरदसेना करत पवारलंबी बनवले, काँग्रेस ला शिवसेनेशी तडजोड करायला लावत त्यांना चुना लावला, फडणवीसांना वर्षातून घालवून नागपुरात खळबळ उडवली.
    भाऊ तुमच्यासारखं लिहिता येणार नाही तुमच्यासारखे स्पष्टय
    विचार सिम्पल भाषेत सहज मांडता येणार नाही अन तुमच्यासारखे बिनतोड विचारबैठक प्राप्त करत सद्य परिस्थितीवर भाष्य करता येणार नाही पण माझे विचारचक्र तुमच्या लेखांमुळे सुरु झालं. दोषारोप करणे, निषेध करणे किंवा निर्भर्त्सना करणे हे विरोधकांना कधी आवश्यक असतेही. पण ते कधीच पुरेसे नसते. उपाय शोधले पाहिजेत. विधायक आणि व व्यवहार्य पर्याय शोधले पाहिजे. शिमगा जातो आणि कवित्व रहाते असे म्हणतात. पण सध्या शरद पवारांनी नको नको त्या लोकांना एकत्र आणून स्वतःला मेटास्टॅटीक ओरल कैन्सर असताना राज्यात अंतहीन शिमगा चालू केला आहे आणि तो इतका यांत्रिकपणे द्विधृवीय झाला आहे कि विरोधकांबद्दल एक बेसिक घृणा निर्माण झालेली आहे. राज्यतील विकासवादी लोकांना ह्यात चुना लागला हे
    मात्र निश्चित.
    शरद पवारांनी जे काही केलं ते खुद्द शरद पवारांना कुठं घेउन
    जाईल हे भविष्यकाळ आणि त्यांचं प्रारब्ध ठरवेल पण शरदरावांकडे शिकवणी लावलेले आजून १२ महिन्यात कुठं
    जातील? राजकीय क्षेत्राचे विरोधासाठी विरोध या ‘तत्त्वा’मुळे भरपूर नुकसान झाले आहे. एन टी रामाराव यांना बहुमत असूनही इंदिराजींनी डिसमिस केले. आंध्रप्रदेश कायमचा दुखावला गेला. ममता बॅनर्जी या कॉंग्रेसमध्ये राहून का नाही कम्युनिस्टाना शह देऊ शकत ह्याच उत्तर खुद्द काँग्रेस न कधीच सापडवलं नाही पण उद्धवरावांना मोदी शहा ना शह देण्यासाठी नको त्या शिकवण्या लावण्याची बुद्धी सुचली. शिकवणीतून काय शिकतील ते शिकवणी लावणारा अन
    शिकवणाऱ्यालाच माहिती पण विरोधासाठी विरोधवाले लोक हमखास प्रगतीविरोधी अफवा पसरवण्यात अग्रभागी असतात हे मतदारांनी समजून घेण्यासाठी फक्त भाऊ तुमचे
    लेख वाचले तरी पुरेसे आहे. भाऊ लिहीत राहा














    ReplyDelete
    Replies
    1. चांगला प्रयत्न..

      Delete
    2. शंतनू जी,
      खूप छान लिहिलंय

      Delete
  12. Very appropriate article. To the point. Good summary of present political situation..Prediction for next elections are factual. Public don't like betrayal.

    ReplyDelete
  13. Bhau tumhi lekh changla lihita pan shivsene sarkha nishtha asnara karyakarta kontyach pakshat nahi he dhyanat theunach apan lekh lihila pahije

    ReplyDelete
  14. अत्यंत उत्तम विश्लेषण भाऊ

    ReplyDelete
  15. Udhav hi parprakashit pan nashibvan VYAKTI aahe....hi suruvat aahe senechya shevtachi....lihun ghya....asangashi sang mrutyshi gath...

    ReplyDelete
  16. Bhau can you tell what shall SS should have done this time to get party to next level. Going with bio and take second fiddle, was that the right approach. UT has taken a risk, if it pays of then good what they would have by going with bio. Its party that is important and not the mlas. NCP and BJP has shown that.

    ReplyDelete
  17. आता तर राऊतांनी शरद पवार राष्ट्रपती बनतील अशी स्वप्ने पाहायला सुरुवात केली आहे

    ReplyDelete