Wednesday, January 8, 2020

‘पिपली लाईव्ह’मधली दीपिका

Image result for deepika at JNU

काही चित्रपट तारे वा कलावंत किंवा तथाकथित प्रतिभावंत, पुरोगामी चळवळीत आंदोलनात अधूनमधून सहभागी होत असतात. ती आजकाल फ़ॅशन झालेली आहे. खरे तर त्यात नवे काहीच राहिलेले नाही. कधीकाळी असे लोक चळवळी आंदोलनापासून चार हात दुर असायचे. विजय तेंडूलकर किंवा तत्सम प्रायोगिक कला जगतातले लोक तिथे पुढे असायचे. पण त्या किंवा तेव्हाच्या चळवळी व आंदोलने अशा नामवंतांच्या ओशाळ्या नसायच्या, त्यांच्यावर अवलंबून नसायच्या. तिथे मुळच्या कार्यकर्ते चळवळ्ये यांना प्राधान्य असायचे. अलिकडल्या काळामध्ये अशा नामवंतांच्या कडेवर बसून आंदोलनांना चालावे लागते. त्याचाच एक भाग म्हणून दीपिका पादुकोण जेएनयु विद्यापीठातल्या निदर्शकांना भेटायला गेली. अर्थातच तिथे गेल्यावर त्यांचेच रडगाणे गायला पर्याय नसतो. असे झाले, मग राजकीय गोटात खळबळ माजवली जाते. तात्काळ त्यावरून प्रतिक्रीया उमटू लागल्या आणि दीपिकाच्या नव्या येऊ घातलेल्या ‘छपाक’ नावाच्या चित्रपटावर बहिष्कार घालण्याची भाषा सोशल मीडियातून सुरू झाली. असल्या तात्कालीन प्रतिक्रीया देणार्‍यांना एकाच गोष्टीचे भान नसते, की त्यांनी याप्रकारे प्रतिक्रीया द्याव्यात; हीच तर दीपिकाची वा तिच्या चित्रपट निर्मात्यांची अपेक्षा असते. कारण दीपिका वा तत्सम नामवंतांना कलावंतांना कुठल्याही सामाजिक विषयावर आपले काही मत नसते, किंवा आस्था नसते. कपिल शर्माच्या शोमध्ये जाऊन आपल्या चित्रपटाची प्रसिद्धी वा प्रमोशन करणे आणि जेएनयुतील विद्यार्थ्यांच्या गर्दीला चित्रीत करणार्‍या वाहिन्यांच्या कॅमेराचा भवताल व्यापणे; हाच तर दीपिकाचा हेतू असतो. चित्रपट बाजारात आला व त्याविषयीची चर्चा संपली, मग दीपिका वा कलाकारांना मुळच्या आंदोलन वा चळवळीशी कर्तव्य नसते. लेटेस्ट फ़ॅशन आणि व्यापारी हेतूने लोकांचे लक्ष वेधून घेणे, हेच तर त्यातले तंत्र आहे.

आता किती लोकांना आठवते ठाऊक नाही. पण नर्मदा बचाव आंदोलनात अरुंधती रॉय किंवा आमीर खान जाऊन पोहोचले होते आणि अण्णांच्या आंदोलनातही अशा लोकांनी गर्दी केलेली होती. तेव्हा ‘रंग दे बसंती’ किंवा तत्सम काही चित्रपट प्रदर्शित व्हायचे होते. पुढे आमिर खाननेच आपल्या कंपनीतर्फ़े अशा आंदोलन वा चळवळीचे पाखंड उघडे पाडणारा चित्रपटच काढला होता आणि त्याने खुप धंदाही केलेला होता. ‘पिपली लाईव्ह’ असे त्याचे नाव होते. खरेतर त्यासाठी आमीरला धन्यवाद द्यायला हवेत. दहा वर्षापुर्वीच्या त्या चित्रपटातून त्याने आजकालच्या चळवळी व आंदोलनांचे पितळ त्यातून उघडे पाडलेच होते. पण त्यात अशा लोकचळवळीचा खरा चेहरा समोर आणला होता. शेतकरी आत्महत्या आणि त्यावरून माध्यमांनी माजवलेले काहूर, अशी काहीशी कथा होती. आजचे विद्यार्थी आंदोलन वा केजरीवाल यांचे लोकपाल आंदोलन, त्यापेक्षा किंचीतही वेगळे नव्हते. तेव्हा अण्णा हजारे किती मोठे सुपरस्टार झालेले होते ना? पण आज अण्णा कुठे आहेत आणि केजरीवाल काय करतात? माध्यमांनी डोक्यावर घेऊन नाचले, म्हणजे आजकाल आंदोलन व चळवळ यशस्वी होत असते. त्या चळवळींचा नागरिकांशी वा सामान्य जनजीवनाशी काडीमात्र संबंध उरलेला नाही. बुधवारी देशात भारत बंद होता आणि तरीही जनजीवन अतिशय सुरळीत चालू होते. एका बाजूला भारत बंद आणि दुसरीकडे विद्यार्थी आंदोलनाने देश हादरल्याच्या बातम्या माध्यमातून रंगवल्या जात होत्या, तर दुसरीकडे अग्रलेखातून सरकारला इशारे दिले जात होते. बाकी जग निश्चीत निवांत होते. ही चळवळी करणार्‍यांची शोकांतिका होऊन बसली आहे. आजकाल चळवळीला काही प्रश्न, समस्या वा जनतेच्या मनातल्या प्रक्षोभाचेही निमीत्त आवश्यक वाटेनासे झाले आहे. त्यापेक्षा वाहिन्यांचे कॅमेरे आपल्या भोवताली असले म्हणजे आंदोलन यशस्वी होत असते. कारण तिथे दीपिकालाही यावे लागत असते.

आजकालच्या आधुनिक पुरोगामी चळवळी सामान्य जनता व तिच्या जीवनातील ज्वलंत विषयापासून कशा किती दुरावल्या आहेत, त्याचा हा पुरावा आहे. नागरिकत्व कायद्याच्या विरोधात मुंबईच्या ऑगस्ट क्रांती मैदानात झाली, त्या रॅलीमध्ये कोण किती कलावंत नामवंत हजर होते? त्याच्या रसभरीत कहाण्या माध्यमे रंगवून सागत होती. पण त्यात जनतेचा सहभाग किती व कुठला, त्याची कोणालाही फ़िकीर नव्हती. प्रतिभावंत, नामवंत लोकांनी हल्ली पुरोगामी चळवळीची जनतेशी असलेली नाळ कापून टाकली आहे. १९९० पर्यंत असे कोणी चमचमणारे मुखवटे वा चेहरे आंदोलनात दिसायचेही नाहीत. दाभोळकरांच्या निदर्शनात डॉ. लागू वा निळू फ़ुले असायचे. कुठल्या एका चळवळीत शबाना आझमी दिसायच्या. पण आंदोलनाचा चेहरा सामान्य कार्यकर्ते वा जनतेसाठी आयुष्यभर कष्ट उपसलेल्या नेत्यांचाच असायचा. आता तापसी पन्नू, स्वरा भास्कर, दीपिका हे आंदोलनाचे चेहरे झालेले आहेत. लोकांची गर्दी वा प्रक्षुब्ध जमावातील जनता दुरावली आहे आणि कॅमेराच्या अवकाशात चळवळ गोठून गेली आहे. तिला कुठले धोरण, उद्धीष्ट वा दिशा उरलेली नाही. अनेकदा तर आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी अशा आंदोलनांचा सरसकट वापर होऊ लागला आहे. ‘छपाक’ नावाच्या चित्रपटावर तथाकथित हिंदूत्ववादी अनुयायांनी बहिष्कार जाहिर करावा आणि दीपिकाची निंदानालस्ती करावी; हा सुद्धा प्रचार असतो. किंबहूना तिचा कुठला चित्रपट येतोय, ही यातली खरी बातमी आहे आणि ती जेएनयुमध्ये दीपिका हजेरी लावायला गेली म्हणूनच जगभर पसरली ना? बहिष्कार घालणार्‍यांनी दीपिकासाठी जितके मोठे काम केले, तितके दीपिकाने आंदोलकांना उपयुक्त असे काहीही केलेले नाही. तिथे तिच्या जाण्याने त्या आंदोलनाला धार चढलेली नाही वा भाजपाचे नुकसानही झालेले नाही. पण दरम्यान मार्केटींग यशस्वी झाले आहे. त्या चित्रपटाविषयी कुतूहल निर्माण करण्याचे काम बिनपैशात मोदी समर्थकांनी पार पाडलेले आहे.

वरकरणी हा आंदोलक पुरोगाम्यांना लाभ वाटेल. पण व्यवहारात अशी लोकाभिमूख असलेली आंदोलने, चळवळी जनतेपासून दुरावल्या आहेत. त्यांना जनतेपर्यंत जाऊन आपला प्रभाव जनमानसात निर्माण करण्याची गरजही वाटेनाशी झाली आहे. दिवसेदिवस सर्वच चळवळी व संघटना प्रसिद्धीच्या आहारी गेल्या आहेत आणि प्रसिद्धीचा झोत मिळवण्यात धन्यता मानायची सवय त्यांच्या अंगवळणी पडू लागली आहे. माध्यमांनाही सर्वात सोपी बातमी म्हणून सरकारला शिव्याशाप देणार्‍यांसमोर कॅमेरा रोखून आळशी बसून रहाता येते. तळागाळापर्यंत जाऊन समस्या व जनतेला भेडसावणार्‍या विषय समस्यांचा वेध घेण्याची कटकट संपून जाते. परिणामी सगळ्या चळवळी सेलेब्रिटीच्या होऊन गेल्या आहेत. किंबहूना अशा नामवंतांनी आता पुरोगामी चळवळ आपल्या जनानखान्यातच बंदिस्त करून टाकली आहे. तसे नसते तर दीपिकाचे इतके कौतुक झाले नसते आणि विरोधही झाला नसता. पण जमाना मार्केटींगचा आहे. प्रत्येक बाब व वर्तन मार्केट खेचण्याकडे वळलेले आहे. कधीकाळी चळवळ वा आंदोलन म्हणजे जनजीवन विस्कळीत होऊन जायचे. नागरिकांची तारांबळ उडायची आणि हजारो लाखोच्या संख्येने त्यात सामान्य जनता सहभागी झालेली बघायला मिळायची. आता आपल्या घरातल्या टिव्ही पडद्यावर चळवळी सीमीत होऊन गेल्या आहेत. बाकी जनतेच्या जीवनात चळवळीला कुठले स्थान नाही की परिणाम नाही, अशीच अवस्था आलेली आहे. सगळा प्रकार माध्यमे, वाहिन्या व नामवंतांनी ‘पिपली लाईव्ह’ करून टाकला आहेत. त्याचा लाभ उठवायला प्रत्येकजण त्यामध्ये आपल्या परीने सहभागी होत असतो. पुढे येत असतो वा पाठ फ़िरवित असतो. पण सगळेच खुश आहेत. आंदोलन गाजले म्हणून चळवळ्ये खुश आणि परिणामशून्य म्हणून सत्ताधारीही खुश आहेत. या चमचमाटात कालचे सुपरस्टार कुठे अडगळीत पडलेत, त्याचीही कोणाला फ़िकीर नाही.

गेल्या २० डिसेंबरपासून म्हणजे जवळपास २० दिवस अण्णा हजारे यांनी निर्भयाच्या गुन्हेगारांना शिक्षा होण्यासाठी मौनव्रत धारण केलेले आहे. आता तिच्या गुन्हेगारांना फ़ाशी होण्यावर तारखेसह शिक्कामोर्तब झाले, तरी अण्णांनी आपले आंदोलन सोडलेले नाही की मागे घेतलेले नाही. पण कुठल्याही वाहिनीला वा कॅमेरावाल्यांना तिकडे फ़िरकायला सवड मिळालेली नाही. हे अण्णा कोण आहेत? २०११ सालातले ते सुपरस्टार आहेत. लोकपाल आंदोलनासाठी त्यांनी बेमुदत उपोषणाचा एल्गार पुकारला आणि देशभरातल्या वाहिन्यांवर फ़क्त अण्णाच दिसत होते. त्यांचे वजन किती घटले वा अण्णांना कोण कधी भेटले, अशा बारीकसारीक गोष्टींचा तपशील वाहिन्यांवर सदोदित झळकत होता. आज अण्णांचे मार्केट घसरले आहे. त्यांच्याकडे कोणी अभिनेता नामवंत फ़िरकलेला नाही. त्यांच्यापेक्षाही दीपिकाचा ब्रॅन्ड आंदोलकांना व वाहिन्यांना मोठा वाटू लागला आहे. दीपिकाची कहाणी वेगळी नाही. तिचा चित्रपट पडद्यावर झळकण्यापर्यंत तिचे महत्व आहे. शिवाय तिलाही प्रमोशन पुरतेच आंदोलन चळवळीचे कर्तव्य आहे. त्यानंतर पुढल्या प्रमोशनसाठी कुठलेही आंदोलन असेल, तेव्हा ती हजेरी लावणार. बाकी स्वरा भास्कर वा तत्सम अन्य नामवंतांना काम कमी असल्यावर आंदोलने अगत्याची असतात. एकूण सगळीकडे ‘पिपली लाईव्ह’ चित्रपट आपल्या जीवनात अवतरला आहे. माध्यमे दाखवतील तितके जग, अशीच जागरूक म्हणून मिरवणार्‍यांची स्थिती आहे. बाकीचे जग त्यापासून पुर्णपणे अलिप्त आहे. आपल्या पोटपाण्याच्य विवंचनेत अखंड गर्क असलेल्यांना विद्यार्थ्यांचे आंदोलन, नागरिकत्व कायदा किंवा लोकशाहीपेक्षाही संध्याकाळची चुल पेटण्याचे महत्व अधिक आहे. आपला देश व समाज दोन गोटात विभागला गेलेला आहे. एका बाजूला सामान्य जनता आणि दुसरीकडे माध्यमांच्या चक्रव्युहात फ़सलेले मुठभर शहाणे व नामवंत; अशी ही विभागणी आहे.

20 comments:

  1. Mala nehami ha prashn padaycha. Aaj bhauni vevsthit sangitale ata kahi doubt nahi.

    ReplyDelete
  2. डाव्या विचारांना शरण गेलेल्या उडाणटप्पू गॅंग चे सदस्य हे धंदे करीतच असतात. तुकडे तुकडे गॅंग वाले हेच. जेएनयु आणि पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिटयूट सुद्धा हेच लोक हाकीत असतात. देशविरोधी आणि मुख्यत्वे हिंदू विरोधी विचारांना हवा देणे हे यांचे प्रथम कर्तव्य. 35-40 वय झाले तरी यांचे शिक्षण काही पूर्ण होत नाही, फुकट चे हॉस्टेल चे पोळीचे तुकडे तोडायचे आणि सबसिडी वर राहायचे. अभ्यास सोडून इतर बिन मेहनतीचे धंदे करायचे आणि पैसे मिळाले कि फुंकून टाकायचे. अनुराग कश्यप, स्वरा भास्कर, कन्हैय्या, खालिद, शेहला, सोनाली कुलकर्णी (अप्सरा वाली), विशाल भारद्वाज, अख्तर कुटुंब, भट्ट कळप, हि तमाम बिन मेंदू ची टाळकी सतत मीडिया मध्ये सरकार विरोधी बकवास करीत असतात. मग NDTV , WIRE , FIRST POST , लोकमत, लोकसत्ता, मटा वगैरे मंडळी यांना उचलून धरतात आणि आपल्या मालकांचे पांग फेडतात. मोदी दुसऱ्यांदा निवडून आल्याने यांची टाळकी सटकली आहेत. NGO वाल्यांना पैसे मिळेनासे झाले आहेत. म्हणून हे उपद्व्याप. बाकी शाह आणि मोदींना याच्याने काही फरक पडत असेल असे वाटत नाही. उलट ह्यांना बिळातून बाहेर काढण्याचे पुण्य ते नक्कीच कमावतात.

    ReplyDelete
    Replies
    1. कुठल्याही पक्षाचे 'भक्त' होणे, म्हणजे वास्तवा पासून दूर जाणे. कुंपणावर राहून प्रत्यक्ष सहभाग न घेता ट्विटरादी समाज माध्यमांवर व्यक्त होऊन बॉलिवूड, राजकारणी ह्यांच्या 'व्यवसायात' भर न घालणे श्रेयस्कर. बाकी अपप्रचार आणि टीका दोन्ही बाजूकडच्यानं शक्य असते ह्याचे भान ठेवावे

      Delete
    2. कश्मीरी हिंदु सिख नरसंहार,1984 सिख नरसंहार,26/11,रोज देशाच्या कोण्यात छोटेमोठे होणारे दंगे,भारताची बदलनारी डेमोग्राफी, CWG जीजाजी कोळसा आदर्श हेराल्ड अगुस्ता वेस्टलँड हे मुद्दे कोणत्या पक्षाचे चमचे विसरले

      Delete
  3. नमस्कार भाऊ,
    कृपया समन्य सुजान नगरिकानि काय करावा किंवा या लोकनचा स्टण्ट कासा बाद करावा यबद्दल थोड पण लिहव .
    धन्यवाद
    Mandar Darekar
    Qatar

    ReplyDelete
  4. भाऊ,
    अश्या लोकांना प्रतिभावंत म्हणणे हे त्यांचा अवास्तव गौरव करणेच आहे. रामकृष्ण परमहंस म्हणायचे की प्रतिभा म्हणजे प्रत्येकाच्या आत असलेल्या परमात्म्याचा प्रकाश. इतकी उच्च परिभाषा जगद्वंद्य द्रष्ट्यांनी केली आहे. त्या प्रमाणे ठरवायचे झाले तर तथाकथित कला क्षेत्रातील लोक कलेच्या नावाखाली जे करतात त्याचा प्रतिभेशी काडीमात्र संबंध नाही असेच दिसते. फसगत, दिशाभूल करून घेण्यास अति तत्पर असलेल्या जनतेला झकवणे म्हणजे कला, चळवळ, आंदोलन हे सर्व झाले आहे. जनता जोवर अश्या प्रतिभाशून्य मंडळींना डोक्यावर घेऊन नाचत राहील तोवर अशी सर्वार्थाने अतिसामान्य असलेली लोक सुद्धा प्रतिष्ठित म्हणून मिरवतील आणि संधी मिळेल तेव्हा तेव्हा देशद्रोह करत राहतील.

    - पुष्कराज पोफळीकर

    ReplyDelete
  5. भाऊ, या टिव्ही आणि पेपर माध्यमांचा कंटाळा आला आहे. कहिही लिहित व दाखवत असतात. मागे पावसाळ्यात तिवरे धरण फुटले (ते धरण नव्हतेच मातीचा मोठा बंधारा होता) धरणाच्या भिंतीलगतच असणारी तिवरे गावातील भेंडवाडीतील घरे माणसे वाहून गेली. तिवरे गावातील इतर वाड्या व आजूबाजूच्या सहा सात गावांना कळले पण नाही की बंधारा फुटला. माझा गाव याच नदी किनारी आहे आम्हाला सुद्धा कळले नाही. पण टिव्हिवर सर्व चँनेल्स सहासात गावे वाहून गेल्याचे सांगत होते. सामटिव्ही तर या सात गावांचे स्मशान झाले असे ओरडून सांगत होते. असले नालायक आहेत हे.

    ReplyDelete
  6. This is not good. Country is in Bad Situation. People are going against the Government. Study Hard For Exams.

    ReplyDelete
    Replies
    1. जेव्हा 1984 सिख नरसंहार,1990 कश्मीरी नरसंहार,1993 मुम्बई बॉम्बस्पोट,26/11,CWG, जीजाजी,कोळसा,आदर्श,हेराल्ड,अगुस्ता वेस्टलँड होत,निर्भया होत होते तेव्हा काय रामराज चालू होते का
      तेव्हा का मुग गिळून गप्प होतात,किती आंदोलने निदर्शने पुरस्कार वापस केले?? की पेट्रोडॉलर तोंडात कोंबल्या मुळे आवाज निघाला नाही तुमच्या सारख्या स्वघोषित बुद्धिजीवींचा?

      Delete
  7. अतिशय उत्तम आणि समर्पक विश्लेषण.

    ReplyDelete
  8. श्री भाऊ इतकं परखड विश्लेषण कोणीही केलेलं नाही

    ReplyDelete
  9. भाऊ,
    वरील लेख हा लेख नसून माध्यमाचं केलेलं शवविच्छेदन आहे!

    ReplyDelete
  10. तोंडातून चकार शब्द ही न काढता; फक्त पाचच मिनिटं कँमेऱ्यांसमोर चमकून प्रचंड प्रसिद्धी व आगामी चित्रपटाची जाहिरात व चर्चेला चालना.

    ReplyDelete
  11. आजकाल हेच मार्केटिंग झाले आहे कि एखादी गोष्ट करु नका हे आरडा ओरडा करून सांगितले कि लोक हमखास ते मुद्दाम करतात. नविन असतांना आलिया भट्ट ने तिच्या जनरल नॉलेजचा अभावाचा बोभाटा करून सगळ्यात जास्त प्रसिद्धी मिळावली. शेवटी काय, ऐनि पब्लिसिटी ईज गुड पब्लिसिटी. ‌

    ReplyDelete
  12. सद्य परिस्थितीचे वर्णन करणारे परखड विश्लेषण.भडकावले जाणारे यातून काही तरी बोध घेतली ही अपेक्षा आहे.धान्यवाद भाऊ.

    ReplyDelete