Saturday, January 18, 2020

तुम्ही मोदींना पाडू शकता

अर्धशतकापुर्वी शिवसेनाप्रमुख व व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे यांनी चितारलेले एक अफ़लातून व्यंगचित्र आठवते. तेव्हा लोकसभा विधानसभांच्या एकत्रित म्हणजे सार्वत्रिक निवडणूका नुकत्याच संपलेल्या होत्या आणि त्यामध्ये नऊ राज्यातील सत्ता कॉग्रेसने गमावली होती. इंदिराजींच्या नेतृत्वाखाली त्या पहिल्याच असल्या तरी देशातल्या चौथ्या सार्वत्रिक निवडणुका होत्या. शिवसेनाही प्रथमच संघटना म्हणून प्रचाराच्या आखाड्यात उतरली होती. सेना तेव्हा कोवळी म्हणजे अवघ्या एक वर्षाची संघटना होती. त्यात दक्षिण मुंबईतून जॉर्ज फ़र्नांडीस थेट लोकसभेत निवडून गेलेले होते. त्यापुर्वी कामगार क्षेत्रातले दिग्गज असले तरी ते मुंबई महापालिकेचे नगरसेवक होते. त्यांनी त्या भागातले दिग्गज व केंद्रीय मंत्री स. का. पाटील यांचा पराभव केल्याने तो निकाल देशभर गाजला होता. जॉर्जकडे देशाचे लक्ष वेधले गेले होते आणि त्यांची ‘जायंट किलर’ अशी नवी ओळख तयार झाली होती. मग दिल्लीत जाऊन त्यांनी जे काही पराक्रम सुरू केले, त्यावर आधारीत व्यंगचित्र बाळासाहेबांनी चितारलेले होते. कारण संसदेत पोहोचल्या नंतर जॉर्ज यांनी देशाचे राजकारण सुरू केले आणि आघाडी केल्यास कॉग्रेस पराभूत होते, या भूमिकेचा आधार घेऊन फ़र्नांडिस यांनी थेट राष्ट्रपती पदासाठी कॉग्रेसला पराभूत करण्याच्या डरकाळ्या सुरू केल्या होत्या. ते अजिबात शक्य नव्हते. कारण त्यासाठी सामान्य मतदार मत देत नाही, तर संसद आणि विधानसभांचे सदस्य मतदार असतात. ते कॉग्रेसपाशी अधिकच होते. मग जॉर्ज यांच्या अशा डरकाळ्यांची टवाळी करताना बाळासाहेबांनी त्याला दक्षिण मुंबईतील जॉर्ज यांच्या गाजलेल्या प्रचाराचा आशय घेतला होता. लोकसभेत जिंकण्यासाठी फ़र्नांडिसांनी केलेला प्रचार कौतुकास्पद होता. पण तो राष्ट्रपती निवडणुकीत उपयोगाचा नव्हता. हेच बाळासाहेबांना सांगायचे सुचवायचे होते. हल्ली शिवसेनेचे नेते संजय राऊत तशाच गर्जना करताना दिसले आणि पन्नास वर्षापुर्वीचे बाळासाहेबांचे कार्टून आठवले.

दक्षिण मुंबईतले स. का. पाटील म्हणजे मुंबईचे अनभिषिक्त सम्राट मानले जायचे. त्यांना एक दणदणित पोस्टरने पाडले, असा खुप बोलबोला त्यावेळी झालेला होता. त्या पोस्टरवर चारच शब्द होते. ‘तुम्ही पाटलांना पाडू शकता’. थोडक्यात पाटील सम्राट वगैरे नाहीत. ते मतदाराच्या इच्छेवरच निवडून येऊ शकतात आणि मतदाराने मनात आणले तर पाटील सहज पराभूत होऊ शकतात. हा प्रचाराचा सपाटा फ़र्नांडिसांनी लावला होता आणि त्यालाच यश मिळाले, असे गृहीत होते. त्यामुळेच त्या पोस्टरचे खुप कौतुक तेव्हाच्या माध्यमातून झालेले होते. सहाजिकच दिल्लीत पोहोचल्यावर फ़र्नांडिस विरोधकांचा राष्ट्रपती आणायची भाषा बोलू लागले. तेव्हा बाळासाहेबांनी जॉर्जची खिल्ली उडवण्यासाठी तोच संदर्भ घेतला होता. ‘मार्मिक’ साप्ताहिकाच्या मधल्या पानावर ‘रविवारची जत्रा’ म्हणून ते काही व्यंगचित्रे एकत्रित टाकायचे. त्यातले एक चित्र होते, फ़र्नांडिस घोषणा देत चाललेले आणि त्यांच्या हातात फ़लक होता, ‘तुम्ही राष्ट्रपतींना पाडू शकता’. त्यावर चित्र रेखाटले होते, डॉ. लोहियांचे! कारण विरोधी एकजुटीचा मंत्र त्यांनीच त्या निवडणूकांमध्ये यशस्वी करून दाखवला होता आणि जॉर्ज त्यांनाच राष्ट्रपती करायला निघालेत, असे बाळासाहेबांना सुचवायचे होते. हल्ली महाराष्ट्रात जे नवे राजकीय समिकरण आलेले आहे, त्यामागे राऊत व शरद पवार यांचे सख्य कामी आलेले आहे. त्यानंतर अल्पावधीतच राऊत यांनी शरद पवार यांना देशाचे राष्ट्रपती करण्याची घोषणा केली आणि ते जुने व्यंगचित्र आठवले. कारण नुसत्या विरोधी एकजुटीने राष्ट्रपती पदासाठी आवश्यक असलेली मतांची बेरीज होऊ शकत नाही. पण वल्गना करणार्‍यांना कोण कशाला अडवू शकेल? पण प्रसंग जसाच्या तसा समान आहे, म्हणून आठवले. नशीब राऊतांनी तुम्ही मोदींना पाडू शकता अशी देशव्यापी मोहिम अजून हाती घेतलेली नाही.

आता यातली गंमतही समजून घेतली पाहिजे. शिवसेनेला फ़ितवून पवारांनी भाजपाला विरोधात बसवण्याचा गेम यशस्वी केला, हे कोणी नाकारू शकत नाही. पण तात्काळ त्यांनी त्यातल्या भागिदार राऊतांनाच दणकाही दिला आहे. इतके मोठे सत्तांतर घडवण्यातल्या या ‘सहकार्‍याच्या’ भावाला मात्र त्यात साधे मंत्रीपदही मिळू शकलेले नाही. की पवारांनी काळजीपुर्वक ते मिळू दिलेले नाही? त्या दोघांनाच त्यातले रहस्य सांगता येईल. पण गंमतीची गोष्ट अशी, की राऊत २०२२ सालात पवारांना देशाचे राष्ट्रपती करायला निघालेले आहेत आणि पवार मात्र आपले राष्ट्रपतीपद संभाळण्यापेक्षा मोदींच्या जागी ममता बानर्जींनाच देशाच्या पंतप्रधान बनवायला कटीबद्ध होत आहेत. त्यांनी तशी ममतांना विनंतीही केलेली आहे. आता सवाल इतकाच आहे, की पवार आधी राष्ट्रपती होऊन ममतांना थेट पंतप्रधान पदाची शपथ देणार आहेत, की २०२४ च्या निवडणूका होईपर्यंत कळ काढणार आहेत? आधी तेच राऊत यांच्या योजनेनुसार देशाचे राष्ट्रपती व्हायला सज्ज होणार काय? तसे केले तर त्यांना त्या पदावर बसून राजकीय भूमिका घेता येणार नाहीत. कुठल्याही पक्षाच्या बाजूने वा विरोधात निवडणुकांच्या मोहिमा वा कारस्थाने करता येणार नाहीत. मग योजना कोणाची यशस्वी होईल? राऊतांना पवार राष्ट्रपती हवे असतील, तर खुद्द पवारांना ममतांना पंतप्रधान करण्याचा नाद सोडून द्यावा लागेल. किंवा आधी ममतांना पंतप्रधान पदावर बसवून नंतर आपल्या राष्ट्रपती पदाची बेगमी करावी लागेल. पण तसे करायला गेल्यास पवारांना २०२७ पर्यंत वाट बघावी लागेल. कारण २०२२ ची राष्ट्रपती निवडणूक पुढल्या लोकसभेपुर्वी व्हायची आहे. किंवा आणखी एक मार्ग उपलब्ध आहे, तो थेट २०२२ सालीच राष्ट्रपती झाल्यावर ममतांना पंतप्रधानपदी बसवण्याचा. राऊत आणि पवार यांचे डाव खरेच शिजलेले असतील, तर तेही शक्य व्हायला हरकत नाही. कमी आमदारात सरकार बनवायला उद्धवरावांना शिकवणारे पवार कमी खासदारात ममतांना पंतप्रधान बनायचेही शिकवू शकतात ना?

लौकरच राज्यसभेचे ७० सदस्य निवृत्त होत असून नव्याने त्या जागा भरल्या जाणार आहेत. त्यामध्ये कर्नाटकातून पुन्हा संसदेत जाण्याचा चंग माजी पंतप्रधान देवेगौडांनी बांधला आहे. त्यामुळे तिथे काही व्यापक कटाचा भाग शिजवला जाऊ शकतो. कारण असे कट शिजवण्याचे कौशल्य धारण केलेले कुमार केतकर तिथे आधीच सदस्य म्हणून बसलेले आहेत. शरद पवार आणि राऊत तिथले जणू कायम सदस्य आहेत. त्यात देवेगौडांची भर पडली, तर ही चौकडी मिळून ममतांना अल्पसंख्य खासदारातही पंतप्रधानपदी बसवायचा कट शिजवू शकतील ना? त्यात काय मोठे कठीण आहे? १९९६ सालात देवेगौडांनी अवघ्या ४६ जनता दल खासदारांच्या पाठबळावर पंतप्रधान होऊन दाखवलेले आहेच. यावेळी त्यांच्यासह पवार आणि राऊत अधिक केतकरांची मदत असेल. मग काय अवघड आहे? फ़रक एकच आहे. आधी पवारांना राष्ट्रपती बनावे लागेल. राष्ट्रपतीपद हाती असले तर पंतप्रधानपद दुर रहात नाही. कारण पंतप्रधानाला आमंत्रण देणे व शपथ देणे राष्ट्रपतींच्याच तर हाती असते. २०२२ सालामध्ये राऊत यांची योजना यशस्वी होऊन पवार राष्ट्रपती झाले, तर ममतांच्या पंतप्रधानपदाचा हायवेच खुला होऊन जाईल. त्यासाठी २०२४ च्या लोकसभा निवडणूकांपर्यत थांबावेही लागणार नाही. सुरूंग पेरणारे पवार आणि भूकंप घडवणारे राऊत यांची जोडी जमली, तर काय अशक्य असू शकते? अडचण केवळ सोनिया गांधींची असेल. या सर्व कारस्थानाला वा योजनेला त्यांची मान्यता मिळवावी लागेल. राहुल गांधींचे मत विचारात घ्यावे लागणारच. ती जबाबदारी घेणारा यामध्ये कोणी दिसत नाही. अन्यथा सगळा प्लान निर्वेध आहे. आतापासून राऊतांनी जॉर्ज फ़र्नांडिस यांच्या स्टाईलने ‘तुम्ही मोदींना पाडू शकता’ पोस्टर झळकवायलाही हरकत नव्हती. ममतांची संमती त्यांना मिळाली असेल, असे आपण गृहीत धरायला हरकत नाही.

राजकारणात कुठलेही व कितीही हवेतले बार काढायला हरकत नसते. पण त्याला कुठेतरी वास्तवाचा आधारही आवश्यक असतो, याचे भान ठेवायचे की नाही? पवारांना राष्ट्रपती करायचे तर मतदार कोण आणि त्यांची संख्या हाताशी किती आहे, त्याचा विचार नको व्हायला? ममतांना पंतप्रधान व्हायला पुढे करणे म्हणजे बहूमताची बेरीज तयार असताना उद्धव ठाकरे यांना आग्रह करण्याइतके सोपे आहे काय? राऊतांचे ठिक आहे. ते अग्रलेखाच्या भाषेत बुडालेले असतात. त्यामुळे वास्तवाशी नाळ तुटलेली असेल तर माफ़ आहे. राहुलनी संसदेत भूकंप घडवला होता आणि राऊत गोव्यात भूकंप घडवून मोकळे झालेत. अन्यथा या दोन्ही जागा अजून शाबूत कशाला राहिल्या असत्या? पवार त्या बाबतीत खुप सावध असतात. त्यांनी ममतांना पुढे करण्याचे कारण समजत नाही. त्यांचा हेतू ममता व सोनिया यांच्यात बिब्बा घालण्याचा आहे काय? कारण परवा सोनियांनी नागरिकत्व कायद्याच्या विरोधात सर्व पक्षांची बैठक बोलावली, त्याला उपस्थित रहाणार नसल्याचे ममतांनी सोनियांना कळवले नाही. पवारांना तसे कळवले. बैठक सोनियांनी बोलावली असताना पवारांना प्रतिसाद देण्यातून काय सिद्ध होते? पवारांनी खेळी केली  काय? २०१४ सालात भाजपाला बाहेरून पाठींबा देण्यामागे सेनेशी त्यांचे फ़ाटावे, अशी खेळी असल्याचे पवारच आता सांगतात. मग २०२४ मध्ये ममतांच्या पंतप्रधान पदाला पाठींबा घोषित करण्यातून कॉग्रेस तृणमूल यांच्यात वितुष्ट आणण्याची खेळी नसेल कशावरून? कारण परिणाम तात्काळ दिसलेले आहेत. थोडक्यात ‘तुम्ही मोदींना पाडू शकता’ मोहिम जोरात सुरू झालेली आहे. ते मोदी पडतील तेव्हा पडतील, पण दरम्यान कोणाकोणाचे बळी पडतात, ते बघण्यासारखे असेल. कारण राऊत, पवार व केतकर हे त्रिकुट काहीही करू शकतील. आपण प्रेक्षक म्हणून फ़क्त बघायचे. आपल्या नशिबी शंभर जन्म कुठे असतात ना?

8 comments:

  1. श्री भाऊ आपला हाच शंभरावा जन्म

    ReplyDelete
  2. भाऊ
    खरच केतकर , देवेगौडा ,राऊत एकदम भन्नाट राऊत तर सध्या एखाद्या पिसाळलेल्या xxx सारखा सुटलाय

    ReplyDelete
  3. लवकरच 70 राज्यसभा सदस्य निवडणूक हा एक clue असू शकतो
    यातल्या 30-35 जागी जरी bjp ने बाजी मारली तरी याचे परिणाम काय होतील याचा विरोधकांनी विचार करायला हवा
    Caa ला विरोध करताना राज्यात राष्ट्रपती राजवट लागली तर त्याचा परिणाम election madhe आणि तिथून 70 खासदार वर होऊ शकतो
    अजून मोदी शहा शांत का आहेत याच उत्तर यांच्यातून कळू शकते
    त्यांचं निशाना हा, हे 70 सदस्य आहेत राज्य सरकार नाहीत

    ReplyDelete
  4. श्री भाऊ, आपण आधी म्हणल्याप्रमाणे शिवसेनेचे पुरोगामी होणे वेगाने चालू आहे. श्री योगेश सोमण यांची हकालपट्टी
    अशा अनेक प्रकारे ते वारंवार आपली निष्ठा प्रकट करत आहेत. पण शिवसेना, काँग्रेसला वीर सावरकर यांच्या विषयी माफी मागायला सांगू शकत नाही. आपण काही महिन्यांपूर्वी अभिजन बदमाशांची टोळी असा लेख लिहिला होता. त्याची आठवण झाली.
    असो. सध्या मला वाटते बातम्यांचा दुष्काळ आहे. तो श्री राऊत आपल्या बोलण्यातून कमी करत आहेत. आरे कॉलनी मध्ये गोल्फ कोर्स आणि वसाहतीसाठी जंगलतोड होणार आहे असे वाचनात आले. आपल्या लाडक्या पेंग्विन साठी मत्सालय बांधणार आहेत त्यासाठी पण आरे कॉलनीत जंगलेतोड होणार आहे. पण सगळीकडे शांतता आहे कोणीही पर्यावरणप्रेमी आता रडत नाही. ह्या selective outrage मुळे समाजाचे आणि देशाचे मोठे नुकसान होत आहे असे वाटते आणि यावर कोणीही फारसे भाष्य करत नाही.

    ReplyDelete
  5. भाऊ, शेवटची पंच लाईन छान. आपल्याला १०० जन्म मिळणार नाहीत. पण राऊतांचा १०० वा जन्म असेल काय?

    ReplyDelete