Sunday, January 5, 2020

मनसेचा झेंडा आणि अजेंडा


Raj Thackeray during one of his political rallies. Pic/Midday archives
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीतून प्रथम राज ठाकरे यांनी माघार घेतलेली होती. कारण त्यांना अल्पसंख्य आमदारात सरकार स्थापन करायचे धडे नीट गिरवता आलेले नव्हते. तसे बघायला गेल्यास मागल्या दोन वर्षात त्यांनी मन लावून पवारांच्या क्लासमध्ये ट्युशन घेतली होती. पुण्यात पवारांची दिर्घ जाहिर मुलाखत घेऊन राज ठाकरे यांनी सुरूवात छान केली होती. पण हळुहळू त्यांच्या हातून बाजी सरकत गेली आणि मनसेच्या धोरणांचा रिमोट कंट्रोल बारामतीकडे गेल्याची चर्चा होती. त्याचे परिणाम लोकसभा निवडणुकांचा मोसम सुरू होताच दिसू लागले. मधल्या तीनचार वर्षात राजकारणापासून व चळवळी आंदोलनातून बाजूला झालेली महाराष्ट्र नवनिर्माण सेना, क्रमाक्रमाने कॉग्रेस व राष्ट्रवादीच्या जवळ सरकत गेली आणि पर्यायाने त्यांची दोन्ही कॉग्रेसच्या आघाडीत वर्णी लागेल, असे चित्र तयार झाले होते. पण काही उपयोग झाला नाही आणि स्वबळावर लढायची इच्छाही मनसे गमावून बसली होती. त्यामुळे लोकसभेत आपला वरचष्मा दाखवून विधानसभेत आघाडीकडून जागा मिळवायचा त्यांचा बेत असावा. पण आपल्याला शिडी करून पवार साहेब अन्य कुणाचा बेत कधी यशस्वी होऊ देतात काय? विधानसभा निवडणूकीचे पडघम वाजू लागले आणि मनसेला साहेबांनी खड्यासारखे बाजूला केले. मनसेही आघाडीत जाणार अशा बातम्या पेरल्या गेल्या आणि ऐनवेळी कॉग्रेस राजी नसल्याचे सांगत पवारांनी त्यातून अंग काढून घेतले. पण कार्यकर्त्यांच्या दबावामुळे अखेरच्या सहासात दिवसात राज ठाकरेंना मैदानात यावेच लागले. मात्र त्याचा पुरेसा प्रभाव पडला नाही. त्यामुळेच आता मनसेचे राजकीय भवितव्य काय, असा प्रश्न उभा राहिलेला होता. त्याचे उत्तर खुद्द राज ठाकरे यांनीच शोधलेले दिसते. ते जुना अजेंडा सोडून झेंडा हाती घेणार असल्याच्या बातम्या आहेत.

विधानसभेच्या निकालानंतरच्या घडामोडींनी राज्यात नवी राजकीय समिकरणे तयार झाली आणि त्यात पवार तर राजना विसरूनच गेले. त्यांनी मातोश्रीशी जवळीक करीत उद्धव ठाकरेंना विशेष ट्युशन देण्याचे काम हाती घेतले. पर्यायाने राजना एकलव्य होऊन पुढली वाटचाल करण्याखेरीज पर्याय उरला नाही. मात्र या राजकीय घडामोडीत त्यांची इच्छा पुर्ण झाली. विधानसभेत भक्कम मजबूत विरोधी पक्ष असावा, अशी अपेक्षा त्यांनी प्रचारात व्यक्त केलेली होती. युतीत व सत्तेत बसून विरोधी जागाही व्यापणार्‍या शिवसेनेला व मरगळल्या दोन्ही कॉग्रेसना पर्याय म्हणून राज आपली जागा शोधत होते. पण शिवसेनेने अशी काही पलटी मारली, की राजना हवी असलेली जागा आधी सत्तेत बसलेल्या भाजपाला मिळाली. आज विधानसभेत कधी नव्हे इतका मजबूत विरोधी पक्ष बसला आहे. १०५ आमदारांचा एकच विरोधी पक्ष, ही महाराष्ट्र विधानसभेतील अपुर्वाई आहे. पण राजना तेच स्थान हवे होते आणि भाजपाने ते आता बळकावले आहे. म्हणजे पवारांनी आघाडीत घेतले नाही आणि शिवसेनेने सत्तेत जाताना भाजपाला भक्कम विरोधी पक्षाची जबाबदारी देऊन टाकली. त्यामुळे या नव्या समिकरणात मनसेचे कुठे व काय असेल, हा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यामुळेच राजना नव्या सोंगट्या घेऊन खेळण्याखेरीज पर्याय उरलेला नाही. कारण आता भाजपाच विरोधात बसला असून त्याच्यासारख्या ‘माजोरी’ सत्ताधारी पक्षाला धडा शिकवण्याची गरज उरलेली नाही. मग राजनी काय करायचे? राहुल गांधी व कॉग्रेसला एक संधी द्यावी, अशी विनंती त्यांनीच मतदाराला लोकसभेच्या वेळी केलेली होती. विधानसभेत शिवसेनेकडून ती पुर्ण होऊन कॉग्रेस सत्तेत बसली आहे आणि विरोधातली जागा भाजपाने घेतली आहे. मग मनसेने काय करावे? राज्यव्यापी पक्ष आहे म्हणजे काहीतरी करावे लागणारच ना?

सुरूवात झेंड्यापासून करावी असा त्यांचा विचार दिसतो. अर्थात बाकीचे राजकारण बाजूला ठेवले, तरी शिवसेनेची सध्या मनसेच झालेली आहे. मागल्या दोन वर्षात मनसे जशी कुठला तरी लाभ मिळावा. म्हणून दोन्ही कॉग्रेसच्या मागून फ़रफ़टत गेलेली होती, तशी आता सत्तेत बसून शिवसेनेची फ़रफ़ट चालू आहे. आपला हिंदूत्वाचा टेंभा सोडून अधिकाधिक नरमाईने हिंदूत्वाची हेटाळणी व विडंबना सहन करण्याखेरीज सेनेपाशी पर्याय उरलेला नाही. सत्ता की सावरकर, असा पेच आला असून सत्ता मिळवण्यासाठी व टिकवण्यासाठी ‘काहीही करायचा’ चंग निकाल लागल्यानंतर पक्षप्रमुखांनी बांधलेलाच होता. ती सत्ता कॉग्रेसच्या पाठींब्याने म्हणजे ४४ आमदारांमुळे मिळालेली आहे. सहाजिकच सत्ता टिकवण्यासाठी ‘वाटेल ते’ म्हणजे कसरत व अपमानित होण्याला पर्याय नाही. अशा प्रसंगी मराठी अस्मिता व हिंदूत्व नावाचा झेंडा हाच सोपा मार्ग असतो. सेनेने ती जागा सोडून दिली आहे. नावाला भगवा झेंडा सेनेने अजून राखला आहे. पण त्यामुळे भगवा अजेंडा कायम राखला जात नाही. सहाजिकच तो अजेंडा मोकळा झालेला आहे आणि जो कोणी हाती घेईल, त्याच्यासाठी उपलब्ध आहे. मनसेने तोच हाती घ्यायचे योजले असेल, तर त्यात गैर काहीच नाही. तसेही मनसेला हिंदूत्वाचे वावडे नाही व कधी नव्हते. सात वर्षापुर्वी रझा अकादमीने मुंबईत धुडगुस घातला; तेव्हा त्यांना आव्हान द्यायला शिवसेना तोकडी पडली, तर मनसेने पुढाकार घेतलाच होता. तितकेच नाही, संभाजी ब्रिगेडने बाबासाहेब पुरंदरेंच्या महाराष्ट्रभूषण पुरस्काराला आक्षेप घेतल्यावर सर्वात आधी मैदानात शड्डू ठोकला, तोही राज ठाकरे यांनीच होता. त्यामुळे आता शिवसेनेने सोडलेला हिंदूत्व किंवा मराठी अस्मितेचा अजेंडा कब्जा करायला राज ठाकरे सिद्ध होत असतील, तर काय गैर आहे? मुद्दा इतकाच आहे, की अजेंडा छापील ठेवायचा, की मैदानात उतरून अंमलात आणायचा?

राज ठकारे यांच्या मनसेचे आमदार किती आहेत, त्याला महत्व नाही. शिवसेनेचेही पहिल्या पंचवीस वर्षात कितीसे आमदार होते? पण त्याहीपेक्षा मोठा अजेंडा सेनेपाशी होता, त्याला राडा वा खळ्ळ खट्याक म्हणून जग ओळखते. ती क्षमता आजही राज यांच्यापाशी पुरेपुर आहे. त्यांच्यापाशी असा वेळोवेळी राडा करणारी यंत्रणा आजही शाबूत आहे आणि तितकेही पुरेसे आहे. जोडीला झेंडा थोडा बदलून सुटसुटीत करायला काय हरकत आहे? राजकारणात काहीही कायमस्वरूपी नसते. झेंडा-अजेंडा वारंवार बदलूनही राजकारण खेळता येते, हे अनेकांनी आजवर सिद्ध केलेले आहे. ‘मुख्यमंत्री आमचाच’ हे सिद्ध करण्यासाठी सेनेने आजवरची प्रतिष्ठा पणाला लावलीच ना? सावरकर किंवा त्या विचारधारेची विटंबना झाल्यावर रस्त्यावर उतरणारी शिवसेना; आता कॉग्रेस सेवा दलाच्या पुस्तिकेवरून चिडीचुप आहे ना? सरकार बनवायचे व टिकवायचे, तर सावरकरवादाला थोडी मुरड घालावीच लागते. रस्त्यावर उतरून राडा करणारे अनेक शिवसैनिक आज नाराज व अस्वस्थ आहेत. त्यांना कोणीतरी आशा दाखवणे भाग आहे. ‘जाये तो जाये कहॉ’ अशी ज्यांची स्थिती आहे, त्यांना सिग्नल देण्यासाठी नुसता अजेंडा पुरेसा नाही. झेंडाही अगत्याचा असतो. सहाजिकच तीनरंगी झेंड्यातला निळा हिरवा रंग कमी करून मनसेचे भगवीकरण करण्यात काय नुकसान आहे? जागा तर व्यापता येते ना? आज एकदा तिथे आपला पाय रोवला, मग उद्या सवडीने मतदान असेल तेव्हा हातपाय पसरता येतात. पण ज्या भावनांवर शिवसेना उभी राहिली व फ़ोफ़ावली, तो अजेंडा महत्वाचा आहे. तो कोणी हाती घेणार नसेल, तर मनसेने का पुढे होऊ नये?

उद्धवरावांनी बाळासाहेबांना शिवसेनेचा मुख्यमंत्री करीन म्हणून शब्द दिलेला होता. शिवसेना अधिक बलवान करीन वा स्वबळावर सत्ता आणीन, असे काही वचन दिलेले नव्हते. त्यामुळेच शिवसेनेचा मुख्यमंत्री आणण्यासाठी शिवसेना घसरणीला लागली तरी बेहत्तर ना? मग राजनी तीच शिवसेना अस्मिता म्हणून टिकवण्यात वा आंदण म्हणून घेण्यात काय गैर आहे? मराठी अस्मितेलाही कोणीतरी वाली हवाच ना? बाळसाहेबांचे हिंदूत्व कोणीतरी पुढे रेटायला हवे आहे ना? ती जबाबदारी पुतण्या म्हणून राज घेणार असतील, तर गैर काय?  हिंदूत्वाची सर्व मक्तेदारी भाजपाला एकट्याला कशाला द्यायची? थोडक्यात राज यांनी आता शिवसेनेतील अशा नाराजांना आशेचा किरण दाखवण्याचा पवित्रा घेतलेला आहे. राडा वा खळ्ळ खट्याक हा शिवसेनेचा ब्रॅन्ड आहे. ती क्षमता मनसेपाशी आहे. त्याला झेंड्याची जोड दिली म्हणजे झाले. शिवाय तसे केल्यास उद्या भाजपालाही मनसेच्या मतांची किंमत मान्य करावी लागेल. ज्यांना थेट सेनेतून भाजपात जाणे शक्य नाही, त्यांच्यासाठी ‘प्रतिक्षानगर’ म्हणूनही मनसेचा छान उपयोग होऊ शकेल. अर्थात असा मनसेचा अजेंडा व झेंडा बदलणार असेल, तर भाजपा त्याला खतपाणी घालेल. हे सांगण्यासाठी कुणा कुडमुड्या ज्योतिषाची गरज नाही. नाहीतरी आगामी महापालिका निवडणुकांना आणखी दोन वर्षे शिल्लक आहेत. तितक्या वेळात झेंडा व अजेंडा लोकांपर्यंत घेऊन जायला भरपूर वेळ आहे. बहुधा तोच हिशोब मांडून राज ठाकरे यांनी २३ जानेवारीचा मुहूर्त शोधलेला असावा. कारण तो शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस आहे. त्याच दिवशी भगवा झेंडा व अजेंडा घोषित करण्याचे अन्य काय कारण असू शकेल? मग मात्र वेगळी मजा सुरू होईल. शिवसेनेला ‘लावा रे तो व्हिडीओ’ अशी मोहिम हाती घ्यावी लागेल, इतकेच.

14 comments:

 1. देव करो व असे घडो.
  संपूर्णपणे भाजपची राज्यांमध्ये एकहाती सत्ता आली,तर भाजपचे केंद्रिय नेतृत्व,कदाचित मराठी नेत्यांना कमी महत्त्वाची खाती देत अमराठी नेते डोक्यावर आणून ठेवतील. २०१४ ला महाराष्ट्र जनतेने, मोदींच्या लाटेमध्येही शिवसेनेचे ६३ आमदार निवडून दिले होते,ते बहुदा ह्या भितीपोटीच.
  म्हणून यापुढे, शिवसेना सोबत नसेल तर राज ठाकरे यांच्या रूपाने समर्थ पर्याय उपलब्ध होईल.
  भाजप केंद्रीय नेतृत्वाने दुर्लक्ष केलेले मराठी नेते, अगदी गडकरींसह, तावडे खडसे बावनकुळे आदींना ही सन्मानाने पुनर्वसन करावे.
  फडणवीस यांना केंद्रात बोलवावे, अशी व्यूह रचना दिसावी,ही आशा ठेवतो.
  धन्यवाद.

  ReplyDelete
 2. Actually bala sahebani Sena Raj Saheb yanach dyayla pahije hoti ase punha ekda watat ahe

  ReplyDelete
 3. भाऊ आजचा लेख खूपच मस्तं!!एक दगडात अनेक निशाणे साधलेत.राजने आपल्या लेखाचा गांभीर्याने विचार करावा असे वाटते.महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळे वळण मिळूशकते.तसेच साहेबांचा फुगा फुगून जो वर उडू पाहतोय त्याला टाचणी लावून जमिनीवर उतरविण्याचे काम राजच चांगल्या प्रकारे करु शकतात.
  आजचा ब्लॉग खूपच मार्मिक आहे.धन्यवाद!!����

  ReplyDelete
 4. एवढेच म्हणेन...
  "बाळासाहेब ठाकरे यांचा खरा वारसदार, खरा वारसा खांद्यावर घेत आहे"....

  ReplyDelete
 5. मागे एकदा राज पत्रकारांना म्हणाले होते, हे महाविकास आघाडी सरकार जास्त टिकणार नाही. तेव्हाच ते पवारांपासून दूर गेले आहेत हे लक्षात आले होते. अर्थात पवारांनी त्यांना नुसतेच वापरले हे ही कारण होतेच. आघाडी पासून राज यांना दूर ठेवण्याचा "शहाणपणा" पवारांनी केला आणि राज ठाकरे दुखावले.
  याच प्रश्नाला उत्तर देताना पवार म्हणाले होते " राज यांना आता जास्त कळायला लागलयं" ...
  तेव्हाच खात्री पटली होती, राज आता दुसरा मार्ग शोधणार, पर्याय उरलाच नाही.

  ReplyDelete
 6. भाऊ,
  फार मजेशीर लिहिता तुम्ही!

  कृपया अमेरिका इराण संघर्षा विषयी काही लिहावे. 🙏

  पुष्कराज पोफळीकर

  ReplyDelete
 7. ही जागा स्वतः शिव सेनेने तयार करून दिली अर्थात मनसे अध्यक्ष याचा कितपत फायदा घेऊ शकतील सांगता येत नाही . याला कारण मनसेची धरसोड वृत्ती पाहू पुढे काय होते ते

  ReplyDelete
 8. भाऊ राजकारणात कोणतीही पोकळी राहत नसते, सावरकरांचा काँगेसने अपमान केला आणि सत्ता टिकवण्यासाठी शिवसेनेने बोटचेपी भूमिका घेतली आता ही पोकळी मनसे भरून काढू शकते, शिवसेनेतील ज्यांना सेनेचे काँग्रेस राष्ट्रवादी समोर झुकणे मान्य नाही असे कार्यकर्ते मनसे कडे जाऊ शकतात त्यामुळे राज ठाकरे यांनी जर हिंदुत्ववादी भूमिका घेतली तर दोन वर्षांनी येणाऱ्या महापालिका निवडणुकीत ते सेनेची जागा भरून काढू शकतात आणि याचा मोठा फटका शिवसेनेला बसू शकतो

  ReplyDelete
 9. भाऊसाहेब शिवसेना हिंदुत्वापासुन तुटली हे caa/cab विरोधी मोर्चात हे प्राकर्षाने जानवले. मोर्चेकर्याचा नंगानाच चुपचाप सहन करावा लागला.शिवसेना आता पाठीशी नाहि म्हणून हिंदुना एकप्रकारे अनामिक भिती वाटु लागलीय....तुम्हि जर राजच्या जवळचे आसाल तर राजला यावर बोला. मोदीची माफी मागुन पून्हा एकदा संसाराला लागा म्हणावं , तेच महाराष्ट्राच्या हिताचे आसेल.

  ReplyDelete
 10. शिवसेनेचा उदय म्हणा किंवा बाळासाहेबांचा उदय हा मराठी अस्मितेचे एक ठसठशीत वळण होते. एका राजकीय प्रणालीने राज्यातील मराठी भाषिकांमधील अस्मिता जागवून स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करणे हे शिवसेनेने बाळासाहेबांनी केले. लॉजिकली बाळासाहेबांनी मराठी भाषिकांमधील अस्मिता जागवण्याचा अजेंडा हा अपग्रेड करून हिंदुत्वावर नेला. सडेतोड बोलणारे शब्द मागे न घेणारे बाळासाहेब नुसते हिंदू हृदय सम्राट झाले नाहीत तर दैवत झाले. शिवसेनेच्या अलीकडच्या प्रमुखांना किंवा शिवसेना सोडून मनसे स्थापन करणाऱ्या राज ठाकरे ना शिवसेनेचा अजेंडा फक्त लॉजिकली पुढं नेण्याच काम होत. बाळासाहेबांनी प्रस्थापित केलेला अजेंडा राबवणे, समाजकारण करीत बाळासाहेबांनी आखून दिलेल्या रस्त्यावर राजकारण करत शिवसेना देशातील सत्तेवर असणाऱ्या सरकार मधील एक प्रमुख हिस्सेदार होती. जे सत्य नाही ते भ्रामक नसेलच असं नाही. हे बाळासाहेबांचे वारस विसरले. सत्ता ही भ्रामक असतेच असते पण सत्तेच्या हवासापोटी मूलभूत प्रश्न निर्माण होतात व ते लपवण्यासाठी
  टाईम टेस्टेड अजेन्डाला बाजूला ठेवून नवीन अजेंडा उभा करावा लागतो. काही जुनाट रोग हे खूप चर्चा झाल्यामुळे, आता त्यावर काय बोलणार? असे वाटून पुनःपुन्हा बाजूंला पडतात. हे जुनाट रोग चर्चेत आणण्याच्या हेतूने तुम्ही जो
  अप्रतिम लेख लिहिला आहे भाऊ तो मात्र खासच आहे. राज
  साहेबानी पवारांशी जवळीक साधणे, नंतर पवारांची मुलाखत
  घेणे नंतर अचानक मनसे ने निवडणुकात भाग न घेता पवारांचा छुपा अजेंडा चालवणे लाव रे तो व्ही डी ओ अश्या
  आरोळ्या ठोकत राहुल गांधीना संधी द्या असं आवाहन करणे
  व नंतर पवारांनी राज ठाकरेंबरोबर मारलेल्या थापा व वापरलेले समज हे दोन्ही इतके उघड होते कि कोणत्याही जन्माने आंधळ्या व अतिसामान्य बुद्धी असणाऱ्या गुढग्या
  एव्हड्या उंचीच्या बालकास ते कळले असते. लाव रे तो
  व्ही डी ओ हे राज ठाकरेंचे एक अफाट रसायन होते. या रसायनात काही टिपिकल राज ठाकरे टाईप अतिरंजित, काही धादांत खोटे, काही पवारांच्या बीजेपी बद्दलच्या सूडभावनेने व द्वेषभावनने पछाडलेले, काही फॅसिस्ट हुकुमशाहीचा पुरस्कार करणारे, काही विकासासातील आधुनिकताच नाकारणारे, काही अफवा व घबराट पसरवणारे, सभ्यतेला सोडून नेत्यांची अवहलेना करणारे, प्रस्थापित पवारलंबी नोकरशाही मक्तेदारी हितसंबंधांना जपणारे, पवारांबद्दल अंधश्रद्धा जोपासणारे असे बरेच काही या रसायनात होते. आपल्या अभिनिवेशाच्या भरात राज ठाकरे पूर्ण पवारांच्या कह्यात गेले. कसाया समोर बकरीने कितीही मुरडून दाखवले तरी जे होणार तेच होणार. मुरडणारी नाचणारी बकरी कापली गेली व कसाई नवीन बकरी च्या शोधात व्यस्त झाला. एकदाका भारावून गेलं कि
  सध्याचं गणित सोडवून भविष्यातील गणितं सोडवायचा कंटाळा येतोच. बिनधास्त आकडे व बिनताळ्याचे गणित एकदाका होईना जमवण्याची सुरसुरी येतेच. एकच आकडा एकदा एका बाजूने वापरायचा. तर दुस-या ठिकाणी तोच आकडा विरुद्ध बाजू सिद्ध करण्याकरिता वापरायचा ही नशा पवारलंबी लोकांमध्ये दिसतेच. रोगाचे निदान नेमकेपणाने न करताच सुटसुटीत अंगारे धुपारे वजा उपाय करण्याचा मोह व
  सत्ताद्वार उघडेल इतकी संख्या नसताना जुगाड करून सत्ता
  स्थापित करण्याचा मोह शेवटी झेंडा अन अजेंडा बदलवतोच.
  आपल्या सर्व कर्तृत्वशून्यतेचे, आपल्या चुकीच्या हितकल्पनांचे, अपयशाचे खापर कोणाच्या तरी डोक्यावर फोडायला तोंडपाटीलकी करायला उघडतोंड्या पत्रकार असला कि झेंडा अन अजेंडा बदल करण्याची नशा जास्तच चढते. पवारांनी मात्र येथे तुमच्या अपराधगंडाचे व न्यूनगंडाचे मोदीद्वेषात रूपांतर करून मिळेल’ असे दुकान काढले त्याची
  भोवनी उद्धरावांनी केली. राज्यातील राजकारणाविषयातील
  साऱ्या पसाऱ्या विषयी आंतरिक सुसंगती राखून बांधलेले चित्र म्हणजे तुमचे लेख
  अप्रतिम लेख भाऊ.
  ReplyDelete
 11. Baghya MNS Kay Karel Hi utsukata aahech

  ReplyDelete
 12. मनसे ला हा इव्हेंट कॅश करता आला तर मोठी मुसंडी मारू शकतील अशी शक्यता नाकारता येईल का? आपलं काय मत आहे?

  ReplyDelete
 13. भाऊ तुमचा अंदाज खरा ठरो,कोणाचा तरी हात धरल्या शिवाय मनसे पुढे येणार नाही हे राज यांना पटायला हवे आणि भाजप बरोबर गेले तर दोघांचा फायदा होईल हे निश्चित पण भाजप काय डाव खेळणार ,नवीन मित्र जोडणार का हे बघणे उत्सुकतेचे आहे।

  ReplyDelete
 14. सर, मुळात मला यात एकच फरक जाणवतो तो मी सांगण्याचा प्रयत्न करतो, जर कळला तर नक्की उत्तर द्या. मी जेव्हा मनसे निर्माण झाली तेव्हा त्यांनी ५रुपये देणगी घेऊन सदस्य बनवण्याची मोहीम केली होती. अंदाजे २००८ २००९ मध्ये असेल तेव्हा के म्हणतात ते नवीन रक्त आणि राज ठाकरे यांचे आवेशपूर्ण भाषण यामुळे मी मनसे कडे आकर्षित झालो होतो.

  पण कालांतराने मी जेव्हा केव्हाही राज ठाकरे यांचे भाषण आणि निवडणूक लढवण्याची पद्धत पाहिली तेव्हा प्रकर्षाने जाणवले की राज ठाकरे साहेबांच्या भाषणात जेवढा परप्रांतीयच्या बद्दल राग नव्हता तेवढा शिवसेनेबद्दल होता मला तेव्हा वाटे की त्यांचा योग्यतेवर अन्याय झाला आणि उद्धव ठाकरे यांनीच तो केला म्हणून उद्धव ठाकरे यांचा प्रचंड राग येत होता. कालांतराने असे होत गेले की राज ठाकरे जेवढ्या आक्रमकाने आवेशपूर्ण भाषण करतात तेवढ्याच विरोध पूर्ण संयमाने उद्धव ठाकरे यांचे भाषण राहतात. अश्या संयमी भूमिका पटत नसल्या तरी आपसूकच मनावर एकप्रकारे वेगळीच छाप टाकून जातात. त्यामुळे ह्या दोघांतील किती मोठा फरक मला कोण योग्य ह्याचे उत्तर देऊन गेला.

  आता मुद्दा दुसरा की मला देवेंद्र फडणवीस ह्या व्यक्ती बद्दल बोलायचे आहे, जेव्हा देवेंद्र फडणवीस मुखमंत्री झाले आणि त्यांनी शिवसेनेशिवाय सत्ता बसवली तेव्हा वाटले की आता शिवसेना आणि भाजपा हे दोघे सत्ताधारी आणि विरोधक अशी वाटणी करून घेईल, पण त्यांनी शिवसेनेला सत्तेत सहभागी करून घेतले, मग वाटले की देवेंद्र फडवणीस मध्ये मुत्सदगिरी खूप आहे आणि भविष्यात उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडवणीस दोघे मिळून राष्ट्रीय राजकारणात मराठी माणसाला तिथे पोहचवेल जिथे अजून मराठी माणूस पोहचला नाही. मला यात शंका अशी आहे की देवेंद्र फडवणीस यांना मुद्दावून मागे खेचले गेले. पण आता जर राज ठाकरे आणि देवेंद्र फडवणीस असे आक्रमक चेहरे उद्धव ठाकरे यांच्या संयमाची परीक्षा घेत राहिली तर नक्की भाजपा खाली आणेल आणि मनसेला समांतर करून घेईल.
  कारण मला माझ्या स्वभावातून किंवा एकंदरीत आपल्या मराठी माणसाच्या स्वभावातील एक विशेष गुण आवडतो तो म्हणजे आपण आपली स्वाभिमान टिकवायला वाटेल ते करू पण राहू मनाने नेहमी साधे आणि म्हणून आपण नेहमी साधेपणालाच मोठे भाव देऊ. इथे फायदा एकच वाटतो की आता समोर राजकारणात मज्जा येईल.

  शिवसेना कशी स्वतःचे स्वाभिमान राखून समोरच्याला दाबेल. मनसे कशी भाजपा पेक्षा वेगळी शिवसेनेपेक्षा वेगळी आहे म्हणून आक्रमक राहील आणि भाजपा कशी स्वतःला खाली खेचून मनसेला वर आणेल. राहिला प्रश्न राष्ट्रवादी आणि काँग्रेस चा तर त्यांना आता एक असा व्यक्ती सापडला की ते त्याला समोर ढाल करून स्वतःची राजकीय पोळी भाजून घेईल.
  बस त्यांनी हे करताना उद्धव ठाकरेना एवढे मोठे नाही करायला हवे की मोदी शहा ह्या आक्रमक चेहऱ्याला उद्धव ठाकरे म्हणून संयमी चेहरा दाखवेल. कारण राजकारणात काहीही होऊ शकते आणि कोणी कधीही कोणाचीही मदद घेऊ शकते.
  तुम्हाला काय वाटते नक्की सांगा किंवा यावर सविस्तर एक लेखच लिहा.

  ReplyDelete