Sunday, January 19, 2020

बालमनाचे विश्व



साधारण दीड वर्षापुर्वी मी इशानीबद्दल लिहीलेले काहीजणांना तरी आठवत असेल. इशानी ही माझ्या भाच्याची कन्या. अद्वैत जावळे आणि शिल्पाची मुलगी. जुलै २०१९ मध्ये ती प्रथमच भारतात आली. तिचा जन्म वॉशिंग्टन डीसीमधला. पहिला वाढदिवस इथे भारतात व नात्यागोत्यात साजरा करून कन्येचे आप्तेष्टांचा दर्शन घडवावे, हा अद्वैतचा त्यामागचा हेतू होता. तेव्हा त्यांचा पुर्ण मुक्काम माझ्या घरीच होता. सहाजिकच अकरा महिन्यांची इशानी इथे आली, तेव्हा माझ्या ताब्यात होती. अर्थात माझ्या घरच्या नियमाप्रमाणे वास्तव्याला येणारे प्रत्येक मुल माझेच असते आणि त्यात जन्मदात्यांनाही मी जुमानत नाही. ती आली तेव्हा उभी रहात नव्हती, रांगत होती, म्हणून बिचार्‍या जन्मदात्यांना माझ्याकडून शिव्याशाप खावे लागले आणि पुढल्या दोन आठवड्यात तिचा छळवाद करून मी तिला चालती केली. पर्यायच नव्हता, त्या बाळाला! डेंजर आजोबाच्या तावडीत सापडलेली होती. मग ती माघारी गेल्यावर त्या निमीत्ताने एक पोस्ट लिहीली होती, सोशल मीडियात. आता इशानी अडीच वर्षाची झालीय आणि पुन्हा नात्यागोत्यांना भेटायला जन्मदात्यांसह भारतात आलेली होती. पण यावेळी माझ्या तावडीत सापडली नाही. उलट असेही म्हणता येईल, की आजोबाच तिच्या तावडीत सापडला होता. कारण आता ही कारटी चालायचे सोडा, धावते दौडते. किंबहूना धावायचे हा तिचा आवडता खेळ आहे. मात्र खेळणे म्हणून तिला कुणा मोठ्याचा हातही सोबत असावा लागतो. म्हणजेच त्याची तारांबळ उडवते. वर्षाच्या अखेरचा दिवस ते आमच्याकडे सहकुटुंब होते आणि नव्या वर्षाच्या दुपारी निघाले. या दरम्यान त्या बाळाने चालवण्यातल्या छळवादाचा वचपा काढलाच. पण मला खुप नव्या गोष्टी शिकवल्या. मुलांकडे, बालकांकडे आपण अज्ञानी वा अजाण म्हणून बघतो, त्यासारखी चुक नसते. त्यांनाही खुप कळत असते आणि आपल्याला त्यातले काही कळत नसते.

दीड वर्षापुर्वीची इशानी आता खुप बदलली आहे. ती रडवी नाही, पण हसरीही नाही. ती बारकाईने जगाकडे बघत असते आणि निरीक्षणेही करीत असते. ती ज्या जगातून आली, त्यापेक्षा इथले जग वेगळे आहे, हे पदोपदी जाणवून देत होती. म्हणजे सांगत नव्हती, पण तिच्या बोलण्यातून वा बडबडीतून त्याची जाणिव होत राहिली. नववर्षाच्या त्या पहिल्या सकाळी घरात खुप वर्दळ होती. सगळ्या बायका आपापल्या कामात होत्या आणि त्यांना इशानीची लुडबुड त्यात नको होती. म्हणून काही काळ तिला खाली फ़िरवून खेळवून आणायचे काम माझ्यावर सोपवण्यात आले. तिला जवळच्या बागेत घेऊन गेलो आणि म्हणालो, गार्डनमध्ये जाऊ. समोरची जागा बघताच म्हणाली, ‘नो धीस इज प्लेग्राऊंड’. तिच्याशी कसला वाद घालणार? निमूट मानले आणि तिला खेळायला मोकळी सोडली, झोपाळे व घसरगुंडी खेळताना खुप रमलेली होती. पुरूषभर उंचीच्या घसरगुंडीचा प्रश्नच नव्हता. तिथे शिडीवरून चढताना वा घसरताना माझा हात घट्ट पकडूनच सगळी कसरत चाललेली होती. मग तिचे लक्ष उंच घसरगुंडीकडे  गेले आणि तिथे जाऊन शिडी चढायला लागली. पण एका टप्प्यावर पोहोचताच आजोबाचा हात आणखी चढताना सोडावा लागणार, हे लक्षात आल्यावर गुपचुप माघार घेतली. मग तिला थोडे रमवायला गार्डनमधून बाहेर पडलो आणि हिरवळीवर तिला फ़िरवायचे मनात होते. इतक्यात त्या वाटेवरून एक कुत्रा येताना तिला दिसला आणि ती अचंबित होऊन म्हणाली, डॉगी वॉकिंग अलोन? हे वाक्य मला उलगडायला थोडा वेळ गेला. आपल्याकडे भटकी कुत्री मोकाट असतात आणि अनेकदा अर्भकांनाही कुत्र्यांनी इस्पितळाच्या आवारात खाल्ले, असल्या अमानुष बातम्या वाचायला मिळतात. पण अमेरिकेत पाळीव प्राणी असणे वा पाळणे, यावर अनेक निर्बंध व नियम आहेत. सहाजिकच तिथल्या परिसरात जगताना मोकाट एकटा फ़िरणारा कुत्रा, ही इशानीसाठी जगातली नवलाची गोष्ट होती. हा भारत आहे अमेरिका नाही, हे त्या जीवाला कुठे ठाऊक होते ना?



इथल्या कुणाही मुलांना त्याची नवलाई असू शकत नाही. शहरातील असो वा खेड्यातील मुले, सहजगत्या कुत्र्यांना हात लावतील, दगडही मारतील. पण तिच्यासाठी हे नवल होते. तिने माणसांच्या सहवासातले कुत्रे बघितले, त्यांना पट्टा बांधून मालक फ़िरवतात. त्याने कुठे रस्त्यात घाण केली तरी निमूट साफ़ करतात. एकटा कुत्रा ही चमत्कारीक गोष्ट झाली ना? तिचे जगण्यातले विश्व आणि भारतातले जनजीवन यातला फ़रक कळायचे वय नाही. पण एकट्या कुत्र्याला बघून तिला वाटलेला अचंबा विचार करायला लावणारा होता. ही बाब रस्त्यावरची होती. पण आदल्या दिवसापासून घरी आल्यावर तिला एका गोष्टीचे मोठे कुतूहल होते. ते आमच्याकडे असलेल्या दोन मांजरांचे. दोन्ही बोके आहेत आणि त्यांना वेगवेगळे ठेवावे लागते. चुकून समोरासमोर आले तरी एकमेकांच्या ऊरावर बसायला उतावळे असतात. माझ्याखेरीज त्यांना आवरणे घरातल्यांना संकट वाटते. त्यातला एक पांढरा व एक तांबूस रंगाचा आहे. तो माझ्या जवळही फ़िरकत नाही आणि नेहमी माझ्याकडे संशयित नजरेने बघत असतो. पांढर्‍याची गोष्ट वेगळी आहे. तो माझ्याशी सलगी करतो. धपाटे खातो आणि जवळीकही साधून असतो. त्याचे नाव टिंग्या असे मी ठेवलेले आहे आणि म्हणून दुसर्‍याचे नाव झिंग्या आपोआपच झालेले आहे. पण यांच्याही पलिकडे एक तिसरा बोका आहे आणि तो बाहेरचा भटक्या आहे. मुख्य दार उघडझाप करताना कायम घरात घुसायच्या तयारीत असतो. म्हणून त्याचे नाव मी रोहिंग्या असे ठेवलेले आहे. अशा एकूण तीन मांजरांविषयी इशानीला मोठे कुतूहल होते. पण मांजरे अनोळखी माणसाला जवळ येऊ देत नाहीत आणि ह्या पोरीने आयुष्यात पहिल्यांदाच जीवंत खरीखुरी मांजरे बघितलेली, तीही इतक्या जवळून. अन्यथा तिथल्या प्राणिसंग्रहालयात वा टिव्हीवर किंवा कार्टुनमधली. तिच्यापाशी डिस्नेच्या कार्टूनसारखे मांजरही आहे. पण खरेखुरे गुबगुबीत मांजर? दुर्मिळ वस्तु ना?

वर्षाच्या त्या पहिल्या दिवशी तिला गार्डनमध्ये खेळवून दमलो. तेव्हा मला थोडी विश्रांती मिळावी म्हणून माघारी घरी परतलो, तो डोक्यात प्लान घेऊनच. कोणीही कितीही रोखले तरी इशानीला मांजराशी खेळायची संधी द्यावी, असा माझा निर्धार होता. घरात सगळ्यांचा विरोध होणार याची खात्री होतीच. पण माझा इशानी इतकाच टिंग्यावर विश्वास होता. म्हणून तर घरी आल्या आल्या त्याला पहिला कोंडीत पकडला. कारण आदल्या रात्रीपासून इशानीला संशयास्पद नजरेने तो न्याहाळत होता आणि तिने कितीही जवळ येण्याचा प्रयत्न केला, तरी कुठेतरी आडोसा बघून लपत होता. त्याला ते आक्रमणच वाटत असावे. मांजरे लाडातही पंजा मारतात आणि लेकरू जखमी होईल, याची घरातल्यांना फ़िकीर होती. पण टिंग्याला मी जवळ घेऊन बसलो, तर त्याच्याकडून आगळीक होणार नाही, याची मला खात्री होती. म्हणून मी कोणाला जुमानले नाही. घरातले मग वैतागले. ह्याला मुल संभाळायला सांगण्यापेक्षा आपणच तिला संभाळून काम करू, असाही सुर उमटला. पण मी अशा गोष्टी ऐकून घेत नाही. सहाजिकच टिंग्याला पकडला आणि सोफ़ावर घेऊन बसलो. इशानीला जवळ शेजारी येऊन बसायला सांगितले आणि टिंग्याला नुसता स्पर्श केल्यावरची तिची एक्साईटमेंट थक्क करून सोडणारी होती. ‘ही इज सो सोफ़्ट.’ माझ्या पकडीत टिंग्या अंग चोरून बसलेला होता आणि कुठल्याही क्षणी पकड सैल होताच निसटण्याचेच विचार त्याच्या डोक्यात घुटमळत असणार. दहाबारा वेळ पाठीवरून अंगावरून हात फ़िरवून झाल्यावर इशानी धीटावली आणि हळुहळू करत त्याच्या कान व तोंडावरूनही हात फ़िरवू लागली. त्याने मान झटकली, तर तिचे लक्ष त्याच्या मिशांकडे गेले. मग काय विचारता, तिला मिशाही पकडायच्या होत्या. तिचा हात थांबवायला गेलो आणि पकड सैल होताच टिंग्या टुणकन उडी मारून निसटला. थेट पुस्तकांच्या रॅकमागे जाऊन आमच्याकडे संशयीत नजरेने बघू लागला.



पुढले दोन तास त्या दोघांचा लपंडाव सुरू होता. जिथे तिथे इशानी त्याची पाठ सोडत नव्हती आणि टिंग्याला नवे नवे आडोसे आपल्याच घरात शोधावे लागत होते. हा सगळा प्रकार मनोरम होता. टिंग्याचा पंजा लागेल म्हणून इतरांना चिंता होती आणि बिचारा तो प्राणी इशानीपासून आपली सुटका करून घेण्यासाठी इथून तिथे लपण्याचा अखंड प्रयत्न करीत होता. हा सगळा प्रकार म्हटले तर पोरखेळ होता. पण दबा धरून इशानीवर लक्ष ठेवणारा टिंग्या ज्याप्रकारे शेपटी उभी करून गदेसारखी फ़िरवीत होता, त्यातून त्याच्या मनातली आंदोलने कोणी समजून घेऊ शकेल काय? त्याच्या प्रत्येक हालचाली व त्याविषयीचे कुतूहल असलेली इशानी वा कुठलेही बालक त्याविषयी कसा विचार करीत असेल? बाकीच्या घरातल्या माणसांविषयी टिंग्याला परकेपणा नव्हता. कारण शिल्पा वा अद्वैत त्याच्या जवळपास फ़िरकत नव्हते आणि बाकीची माणसे घरातलीच ओळखीची होती. पण इशानी त्याच्या जवळ जाण्यासाठी प्रयत्नशील होती. ती परिचयातली नव्हती तरीही जवळ येते, म्हणून तो दुर रहात होता. तो रस्त्यावरला कुत्रा वा घरात मांजरे याविषयी इवल्या इशानीच्या मनात कल्लोळ माजलेला होता. ती सारखी पुटपुटत होती आणि बहुधा आईला काही सांगतही होती. तिचे बोबडे सगळे बोल मलाही कळत नव्हते. पण तिच्या तोंडून बाहेर पडणारे शब्द तिच्यासाठी काही विचार करूनच व्यक्त झाले होते ना? तिच्याच कशाला तुमच्या घरातल्याही कुठल्या बालकाचे असे बोबडे बोल कानी पडल्यावर तुम्ही कधी त्याचा गंभीरपणे विचार करता काय? आपण अशा मुलांच्या बोलांकडे साफ़ दुर्लक्ष करतो वा हसण्यावारी नेतो. अजाण बालके समजून आपण असे करतो. पण त्यांची प्रत्येक कृती किंवा वागणे काहीतरी विचारानुसार झालेले असते. त्यांच्या अनुभव आकलनानुसार त्यांच्या प्रतिक्रीया प्रतिसाद येतात. आपल्याला त्याचे आकलन होत नसते वा त्यांच्या पातळीवर जाऊन आपण ते समजून घेऊ शकत नसतो, म्हणून त्यावर बालीशपणाचा शिक्का मारून आपण पळ काढतो काय?

इशानी त्या अठ्ठावीस तासात किती काही मला शिकवून गेली. अजून मला त्याचे पुर्ण आकलन झालेले नाही. पुढे कधी त्याचे आकलन झाले व काय नवे शिकलो, ते मुद्दाम लिहून सांगेन. पण एक गोष्ट निश्चीत शिकलो, मुलांकडे वा कुठल्याही प्राण्यांकडे, त्यांच्या कृतीकडे बालीश वा निरर्थक म्हणून बघणे हा आपला शहाण्यांचा साळसूदपणाच आहे. आपले इशारे, संकेत वा भाषा त्यांना समजत नाही, म्हणून त्यांना अजाण म्हणायचे, तर त्यांच्या पातळीवर आपणही तितकेच अजाण नसतो का? मला अमेरिकेत मोकाट प्राणी नसतात, हे ठाऊक आहे, म्हणून इशानी काय म्हणते, ते समजू शकले. पण त्याविषयी माहिती नसलेल्यांना तिच्या उदगाराचे हसूच येईल. पण वास्तवात ते त्यांचे अजाणतेपण असते. इशानीचे नाही. अनोळखी प्राणीमात्राविषयी सावध असावे, ही मांजर म्हणून टिंग्याची उपजत जाणिव आहे. त्याला इशानी आपलीच आहे, तिला घाबरू नये, असे मी कितीही सांगून उपयोग नसेल, तर त्याला तसले इशारे संकेत देणारा मीच अजाण नाही काय? किती तरी प्रश्न या पोरीने त्या काही तासात माझ्या डोक्यात पेरले. सजीव प्राणी कुठलाही असो, त्याला आपल्या सुरक्षेची उपजत जाणिव असते. त्यानुसार तो वागत जगतही असतो. ज्यांना खुप काही समजले आहे असे वाटते, तेही अनेक बाबतीत तितकेच अजाण असतात. पण सत्तेपुढे शहाणपण नाही, म्हणून आपण वयाने मोठे आपले खरे करत असतो. मग ती इशानी असो, किंवा टिंग्यासारखे पाळलेले मांजर असो. त्यांनाही मेंदू आहे, त्यांच्यातही विचार करण्याची क्षमता आहे. त्यांना आपण समजून घेण्याचा प्रयत्न करीत नाही, म्हणून ते अजाण मानले जातात. ते परिसराच्या अनुभवातून शिकतात आणि आपण परिसर गृहीत धरतो. कदाचित आपल्याही पलिकडे जाऊन सत्य बघण्याची क्षमता त्यांच्यापाशी असू शकते आणि आपल्याला त्याचे आकलन होत नाही, म्हणून आपण दुर्लक्ष करतो ना? त्यांच्या इतकी निरागस नजर व बुद्धी आपण हरवून बसलोय, आणखी काय?

13 comments:

  1. भाऊ, आपण ललित लेखनही छान करता, आणखी लिहा

    ReplyDelete
  2. Baherun yenara rohingya Bhau tyala yeu deu nka

    ReplyDelete
  3. #रोहिंग्या 🤣🤣

    ReplyDelete
  4. छान!आपल ललित लेखननहि वाचनिय!

    ReplyDelete
  5. पण यांच्याही पलिकडे एक तिसरा बोका आहे आणि तो बाहेरचा भटक्या आहे. मुख्य दार उघडझाप करताना कायम घरात घुसायच्या तयारीत असतो. म्हणून त्याचे नाव मी रोहिंग्या असे ठेवलेले आहे.

    Fantastic.

    ReplyDelete
  6. रोहिंग्याच्या मालकाने पोस्ट वाचली तर, तो जाणता राज्याच्या कार्यकर्त्याला घेऊन घरी येईल भांडायला... :):)

    ReplyDelete
  7. True fact, we not understand child or animals thinking.
    Hence, someone said that Man is great then animal is true because animal not to speek or argue with us.

    ReplyDelete
  8. पुन्हा एकदा अप्रतिम पोस्ट . रोहिंग्या बोक्याचे नाव ऐकून हसून हसून लोळलो भाऊ !

    ReplyDelete
  9. माझ्या पावणेदोन वर्षांच्या नातीशी खेळताना मलासुद्धा हाच अनुभव येतो. त्यांचं अनुभवविश्व, समज ही आपल्या कल्पनेपलीकडची असते. वास्तविक आपणच अजाण असतो, याची जाणीव तेव्हा वारंवार होते. त्याच तरल भावनांची अनुभूती देणारा लेख म्हणूनच भावला.

    ReplyDelete