मागल्या आठवड्याभरात सतत वाहिन्यांच्याच बातम्या ज्यांनी बघितल्या असतील त्यांना असे वाटेल, की आता देशातले राजकारण तात्काळ बदलून गेले आहे. अमेठी व रायबरेली या दोन लोकसभा मतदारसंघात प्रियंका गांधी गावागावात व पारावर गर्दी जमवून आपल्या मातोश्री व बंधूचा प्रचार करीत आहेत. त्यांमुळे देशात जे राजकीय वादळ घोंगावत असल्याच्या बातम्या होत्या, त्यांचा धुरळा खाली बसला आहे. मोदी मोदी नावाचा चालू असलेला जयघोष निकामी झाला असून भाजपाचा विजयरथ किंवा अश्वमेध रोखणारा लढवय्या प्रियंकाच्या रुपाने अवतरला आहे. अर्थात त्यासाठीचा हा पहिलाच योद्धा नाही. दिड वर्षापुर्वी मोदींना शह द्यायला राहुल गांधी मैदानात उतरले होते. पण चार विधानसभांच्या मतदानाची मोजणी पुर्ण होता होता, राहूलची हवा निघून गेली. त्यानंतर काय करायचे अशा विवंचनेत राहुल असताना जयराम रमेश यांच्यासारख्या जाणत्यांनी त्या युवराजांना फ़ुगवलेले फ़ुगे फ़ोडण्याचा नवा खेळ शोधून दिला. राहुल त्यात हल्ली कमालीचे रममाण झालेले आहेत. डिसेंबर महिन्यापासून मोदींच्या अश्वमेधाला रोखायला नवा योद्धा अरविंद केजरीवाल यांच्या रुपात समोर आणला गेला होता. लोकांना कंटाळा येईपर्यंत मग केजरीवाल अहोरात्र वाहिन्यांवर झळकत राहिले. त्यातून मोदींना रोखण्य़ात किती यश मिळाले माहित नाही. पण केजरीवाल यांना देशाच्या कानाकोपर्यात डिपॉझीट गमावण्यात रस असलेले चारशेहून अधिक ‘उमेद’वार मात्र मिळाले. मात्र वाहिन्यांची टीआरपी घसरू लागल्याने अखेर केजरीवाल मालिका गुंडाळावी लागली आणि बातम्यांचे गाडे पुन्हा मोदींच्या सभा व त्यांच्याच किरकोळ पत्रकारांना दिलेला मुलाखतीकडे वळले.
मतचाचण्य़ांनी आधीच मोदींच्या एनडीएला बहूमताच्या दारात आणून सोडलेले होते आणि त्यातच लोटणार्या गर्दीने माध्यमांना हताश व्हायची वेळ आलेली होती. इतक्यात त्यांना बुडत्याला काडीचा आधार म्हणावा तशी प्रियंकाची काडी सापडली. रायबरेली व अमेठीत प्रचारासाठी फ़िरताना प्रियंकाने आपल्या पतीला अकारण बदनाम करून राजकीय लाभ उठवले जात असल्याचे सांगितले आणि तिथून नवी प्रियंका मालिका सुरू झाली. प्रियंकानेही मग मोदी विरोधात वक्तव्ये सुरू केली आणि मोदी विरोधात काहीही बरळलेल्या शब्दांच्याच शोधात असलेल्या वाहिन्यांची प्रियंकाभोवती झुंबड उडाली. तात्काळ मग राहुल व केजरीवाल यांना अडगळीत फ़ेकून वाहिन्यांनी प्रियंकाला मोदी विरोधी लढाईतल्या सेनापतीची वस्त्रे चढवली. तिनेही कौतुकाने ती वस्त्रे परिधान करून राजकीय आरोपाची दुधारी तलवार चौफ़ेर फ़िरवायला सुरूवात केली. मग त्याचाच आधार घेऊन निकालानंतर नामोहरम होऊ घातलेल्या कॉग्रेसचा जिर्णोद्धार वाहिन्यांनी हाती घेतला. राहुलचा मोहरा निकामी ठरल्यावर प्रियंका नव्याने कॉग्रेसला जीवदान देऊ शकेल काय, यावर सांगोपांग चर्चा सुरू झाली. सतत वाहिन्यांच्या पडद्यावर कुणाला झळकवले म्हणजे तो राजकारणातील प्रभावशाली नेता होतो आणि जनमानसावर प्रभूत्व गाजवू लागतो, अशा भ्रमात माध्यमातले काही म्होरके असल्याचा तो दुष्परिणाम आहे. आणि ज्यांना भ्रामक जगात सुखरूप वाटते, त्यांना वास्तवातल्या जगाशी कर्तव्य नसते. म्हणूनच प्रियंकाची देशातील सोडा रायबरेली वा अमेठीतली कामगिरी किती प्रभावशाली आहे, त्याचीही दखल घ्यायची गरज या नव्या ‘महाभारत’कारांना गरज वाटलेली नाही.
मागल्या दोन लोकसभा निवडणूकीत प्रियंकाने याच दोन मतदारसंघात माता व बंधूसाठी काम केले यात शंका घेता येत नाही. पण म्हणून रायबरेली वा अमेठीत तरी प्रियंकाच्या उपस्थितीचा प्रभाव पडला होता काय? समजा तिथे सोनिया वा राहुल गांधी उमेदवार नसते, तर दुसर्या कुणाला प्रियंकाचा प्रचार विजयी करू शकला असता काय? गांधी खानदानाचा वारसदार नसलेल्या व्यक्तीला प्रियंकाचा प्रचार त्याच बालेकिल्ल्यात तरी मते मिळवून देऊ शकतो काय? प्रियंकाच्या त्या करिष्म्याची प्रचिती अडीच वर्षापुर्वी आलेली आहे. त्यावेळी उत्तरप्रदेशच्या विधानसभेच्या निवडणूका होत्या आणि तब्बल तीन महिने राहुल गांधी राज्यभर दौरे करीत होते. पुन्हा उत्तरप्रदेशात कॉग्रेसची सत्ता प्रस्थापित करण्याचा निर्धार त्यांनी केला होता. त्यामध्ये केवळ रायबरेली व अमेठीची जबाबदारी प्रियंकावर सोपवण्यात आलेली होती. केवळ दहा आमदार भाऊ व मातेच्या लोकसभा मतदारसंघातून निवडून आणायचे होते. प्रियंकाने किती मजल मारली? य बालेकिल्ल्यातल्या दहा जागांपैकी अवघ्या तीन जागी कॉग्रेस उमेदवार यशस्वी होऊ शकले आणि सात जागी प्रियंकाचा प्रचार निरूपयोगी ठरला होता. जितक्या जागा जिंकल्या त्याच्या दुपटीपेक्षा अधिक जागा गांधी घराण्याच्या बालेकिल्ल्यातच प्रियंकाने प्रचार करूनही गमावल्या होत्या. ही वास्तविक जगातली घटना आहे. वाहिन्यांवरची कहाणी नव्हे. थोडक्यात प्रियंकाच्या लोकप्रियतेने कॉग्रेसचे पुनरूज्जीवन किंवा नवी लाट निर्माण करण्याचे मनसुबे किती पोकळ व निरर्थक आहेत त्याचा हा पुरावा आहे. पण भ्रामक जगातच ज्यांना जगायचे असते, त्यांना कोण समजावू शकतो? मतमोजणीच्या दिवशी त्याचाच पुन:प्रत्यय आल्याशिवाय रहाणार नाही.
No comments:
Post a Comment