Tuesday, May 13, 2014

आईनस्टाईनचा साक्षात्कार



   पंतप्रधान पदाच्या शर्यतीत गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी कधी उतरले, या प्रश्नाचे उत्तर केवळ मोदीच देऊ शकतील. पण भाजपाचेच आघाडी सरकार वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीत काम करीत होते, तेव्हापासूनच काही लोकांनी मोदींना पंतप्रधान करून सोडण्याचा विडा उचलेला होता. मजेची गोष्ट म्हणजे त्यातला एकही माणूस राष्ट्रीय स्वयंसेवक संघातला नव्हता, की भाजपातला नव्हता. कारण त्यावेळी त्या दोघांनाही पंतप्रधान पदाच्या उमेदवाराचा शोध घेण्याची गरजही वाटलेली नव्हती. वाजपेयी त्याच पदावर होते आणि त्यांच्या निवृत्तीनंतर सत्तासुत्रे हाती घ्यायला लालकृष्ण अडवाणी सज्ज होऊन बसलेले होते. पण स्वत:ला सेक्युलर किंवा पुरोगामी मानणार्‍या कुणालाही या दोघा वयोवृद्ध भाजपावाल्यांचे पंतप्रधानपदी असणे अजिबात मान्य नव्हते. कारण दोघेही दिर्घकाळ राजकारणात व संघाच्या कामापासून दूर होते. या पुरोगाम्यांना देशाची सत्तासुत्रे पक्क्या संघ स्वयंसेवकाच्या हाती सोपवण्याची घाई झालेली होती. म्हणूनच त्यांनी भाजपा व संघाला अंधारात ठेवून भाजपाला स्वबळावर बहूमत व सत्ता मिळवून देऊ शकणारा बलवान उमेदवार निर्माण करण्याचे कार्य आपल्या हाती घेतले होते. त्यासाठी या सेक्युलर लोकांनी नरेंद्र मोदी यांची निवड केली आणि त्यांना साहसी व कडवे बनवण्यासाठी गुजरातला सेक्युलर हिंदूत्वाची प्रयोगशाळा बनवून टाकले. तब्बल बारा वर्षाच्या या सेक्युलर मेहनतीला आता फ़ळे आलेली आहेत. कारण त्यांच्याच अथक प्रयत्नांनी व प्रयोगशीलतेतून घडलेला नरेंद्र मोदी, देशाच्या पंतप्रधानपदी निवडला जाण्याची वेळ जवळ येऊन ठेपली आहे. गुजरातच्या दंगलीनंतर मोदींना इतक्या प्रकारे कोंडीत पकडण्याचे डावपेच खेळले गेले नसते आणि शेकडो कसोट्यातून पार व्हायची सेक्युलर सक्ती झाली नसती; तर हा संघाचा प्रचारक इतक्या उच्चपदी पोहोचण्यास लायक होऊच शकला नसता.

   देशात आजवर शेकडो दंगली झाल्या आहेत आणि त्याचे खापर कधीच कुठल्या मुख्यमंत्र्यावर फ़ोडले गेलेले नाही. दंगली झाल्यानंतर चौकशी आयोग नेमून विषय नेहमी अडगळीत जाऊन पडला आहे. पण गुजरात व मोदी त्याला अपवाद ठरले. तमाम सेक्युलर लोकांनी आपली सगळी शक्ती, बुद्धी व साधने पणाला लावून मोदींना दंगलीचा प्रणेता व खुनी वगैरे ठरवण्याची जी मोहिम हाती घेतली; त्यातून त्यांच्याभोवती हिंदूत्वाचा एकमेव तारणहार अशी प्रतिमा उभारण्याचा हा प्रयोग गेल्या बारा वर्षात अथक चालू होता. त्यामुळे तेव्हाच वाजपेयी व अडवाणीही भयभीत होऊन गेले होते. मोदींना मुख्यंत्री पदावरून बाजूला करायचाची विचार झाला होता. पण अडवाणींच्या हस्तक्षेपामुळे मोदी वाचले आणि पुरोगाम्यांचा बेत फ़सता फ़सता बचावला. त्यानंतर सेक्युलरांनी मागे वळून म्हणून बघितले नाही. अहोरात्र व अथक परिश्रम घेऊन मोदींना इतके कठोर प्रशिक्षण दिले, की कुठल्याही कायदेशीर वा वैधानिक अडचणीवर मात करण्याची क्षमता त्यांच्यात उत्पन्न झाली. दुसरीकडे मोदींची देशव्यापी मुस्लिम विरोधी प्रतिमा उभारण्यातून त्यांच्याच भोवती कट्टर हिंदूत्ववादी असे वलय पद्धतशीर उभारण्यात आले. परिणामी वाजपेयी, अडवाणी, उमा भारती वा अगदी संघ बाजूला पडले आणि मोदीच देशाच्या कानाकोपर्‍यात हिंदूहृदयसम्राट बनून गेले. पहिली काही वर्षे मोदींनाही आपल्या देशव्यापी प्रतिमेची कल्पना नव्हती. पण सेक्युलर शहाण्यांनी त्यांना अन्य प्रांतातल्या लहानमोठ्या नेत्यांशी झुंज करायची संधी निर्माण करून दिल्यावर आपोआप त्या त्या प्रांतामध्ये मोदींची लढवय्या हिंदू सेनापती अशी प्रतिमा जनमानसात ठसत गेली. दुसरीकडे मुस्लिमांच्या मनात जितका मोदी द्वेष भिनवला गेला, तितकी उलटी प्रतिक्रिया म्हणुन मोदी हिंदूंमध्ये लोकप्रिय होत गेले आणि मुस्लिम लांगूलचालनाने मोदींचे आकर्षण हिंदूमध्ये वाढण्याचीही सेक्युलर खबरदारी घेतली गेली.

   सोमवारी मतदानोत्तर चाचण्यांचे आकडे बघितल्यावर सर्वजण मोदींचे वा त्यांच्या सहकार्‍यांचे कौतुक करत होते. पण हा मोदी घडवण्यासाठी बारा वर्षे ज्यांनी त्यासाठी अथक कष्ट उपसले त्या पुरोगाम्यांचा साधा उल्लेखही कोणी केला नाही. आपल्या सेक्युलर थोतांडामुळे मोदी लोकप्रिय होतोय आणि त्यातूनच त्याच्यामागे हिंदू व्होटबॅन्क उभी राहिल, असा साधा विचार करून पुरोगाम्यांनी पाचसात वर्षापुर्वीच अर्धवट आपले प्रयास सोडून दिले असते; तर आज मोदी ज्या लाटेवर स्वार झालेत, तिथपर्यंत मजल तरी मारू शकले असते काय? किंचित जरी आपल्या मुर्खपणाचे आत्मपरिक्षण सेक्युलर, समाजवादी, पुरोगाम्यांनी केले असते; तर मोदींना गुजरातमध्येही टिकणे अशक्य झाले असते. या पुरोगाम्यांच्या मुर्खपणाने संघाला आपला एक स्वयंसेवक देशाच्या सर्वोच्चपदी बसवण्याची संधी दिली. ती संधी आपण निर्माण करतोय, हे त्यांना आरंभी कळले नसेलही. पण त्याची लक्षणे दिसू लागल्यावर तरी फ़ेरविचार करायला त्यांना मोदी वा संघाने रोखलेले नव्हते. उलट मोदींनी सातत्याने अशा मुर्खांना ‘आत्मपरिक्षणाचा सल्ला’ दिलेला होता. पण चुका करायच्या आणि त्यांचे दुष्परिणाम दिसू लागले, तरी तोच शहाणपणा असल्याचा आग्रह व अट्टाहास करणे; हे पुरोगामीत्वाचे व्यवच्छेदक लक्षण झाले आहे. त्यातूनच मग संघाला विनासायास आपला स्वयंसेवक पंतप्रधानपदी बसवण्याची संधी मिळू शकली. पण आजही त्यापैकी एकाही पुरोगामी शहाण्याला शहाणपण सुचलेले नाही. आता मोदींना देशातील सर्वात कर्तबगार व बलवान पंतप्रधान बनवण्यापर्यंत त्यांचे कष्ट उपसणे चालूच राहिल. मात्र कधीच त्या मुर्खांना त्याचे तीळमात्र श्रेय मिळू शकणार नाही. अशा बुद्धीमंत लोकांविषयी थोर वैज्ञानिक प्रतिभावंत अल्बर्ट आईनस्टाईन म्हणुन गेलाय ना? ‘तोच तोच मुर्खपणा करीत रहायचे आणि वेगळ्या परिणामांची अपेक्षा करायची, म्हणजेच मुर्खपणा.’

Insanity: doing the same thing over and over again and expecting different results.  - Albert Einstein

4 comments:

  1. असा ब्लॉग इंग्रजी किंवा हिंदीत न लिहिल्याबद्दल तुम्हाला कोणती शिक्षा द्यावी?

    ReplyDelete
    Replies
    1. Dude , open in chrome there is translate option or take author's permition and translate yourself for other people

      Delete
  2. भाऊ तुमचा हा लेख म्हणजे सस्पेंस थ्रीलर आहे. किती वेळा तुमची प्रशंषा करत रहायची ? इतके योग्य मूल्यमापन कसे हो करता ? प्रत्येक लेखातील विश्लेषण अगदी काळजात घर करते. लिहणे सोपं आणि सुंदर असते. राजकारणातील एकेक पैलू उलगडत जाते(जातो). असेच लिहित रहा. भाऊ आपण कोणत्याही टिप्पणीला उत्तर देत नाही म्हणून आजपर्यंत विचारले नाही. पण आज विचारतो. साधारण दोनेक वर्षांपासून मी आपणाला फेसबुक वर फोलो करतोय. त्यावेळेस जाणवत होते आपले लेख मी वाचलेले आहेत. परंतु कुठे, कोणत्या पेपरात हे लक्षात येत नव्हते. अजुनही पूर्ण खात्री नाही पण असे वाटते की आपण, भरतकुमार राउत यांचे मुंबईच्या अंडरवर्ल्ड वर एक साप्ताहिक निघत होते. हे खरे आहे काय ? आपले पूर्ण प्रोफाइल पाहिले तरी आपले भूतकाळातील लेखन, लिहलेली पुस्तके यांची काहीच माहिती मिळत नाही. कृपया ती दिली तर बरे होईल. वाचायला आवडेल. धन्यवाद !
    .

    ReplyDelete