गेल्या चार महिन्यात लोकसभा निवडणूकीचा जो धुरळा उडालेला आहे, त्यात विविध प्रसारमाध्यमे व प्रचारसाधनांचा मुक्त वापर झालेला आहे. यापुर्वीही अशा जाहिराती व साधनांचा वापर झालेला होता. पण यावेळी साधनांसह नवनव्या कल्पना जनमानस जिंकण्यासाठी झाला. त्यामध्ये जसे राजकीय मुद्दे वापरले गेले, तसाच घटनांचाही वापर झाला. निकालापुर्वीच त्यात मोदींनी बाजी मारल्याचे सर्वमान्य झालेले आहे. खुद्द कॉग्रेस पक्षाचेच ज्येष्ठ नेते व प्रचारात राहुलना मदत करणारे जयराम रमेश, यांनीच त्याची कबुली दिल्यावर वादाला जागाच रहात नाही. एक महिन्यापुर्वीच त्यांनी आपला पक्ष जनमानसातील संकल्पनांची लढाई हरल्याचे जाहिरपणे मान्य केले. ही जनमानसातील संकल्पना म्हणजे लोकांना भारावून टाकण्याची लढाई असते. शेवटी निवडणूक म्हणजे काय असते? मतदाराने ठरल्या दिवशी येऊन दिलेले मत असते. ते मत आपल्याकडे फ़िरवण्यासाठी त्याच्या समोर विविध कल्पना व योजना धोरणांची मांडणी इच्छुक उमेदवार करीत असतात. प्रचार कार्य दिर्घकाळ चालू असते. अशावेळी आपल्याकडे ओढला गेलेला मतदार निसटू नये, याचीही काळजी पक्ष व नेत्यांना घ्यावी लागते. चार महिन्यांपुर्वी ज्याला तुमची कल्पना योजना आवडलेली असेल आणि नंतर त्यावर मात करणारी कल्पना प्रतिस्पर्ध्याने आणली; तर असा तुमचा मतदार तिकडेही झुकण्याचा धोका असतो. त्यासाठी मग एकीकडे अगोदर आकर्षित झालेला मतदार टिकवून अधिकच मतदार ओढायचे कसब पणाला लागत असते. त्यासाठीच प्रसार व प्रचारातून सतत आकर्षणच उलगडत राहावे, याचीही काळजी घ्यावी लागते. बदलत्या परिस्थितीनुसार पुढल्या प्रचारात बदल व सुधारणा कराव्या लागतात. जयराम रमेश यांनी त्यामध्येच कॉग्रेस तोकडी पडल्याची कबुली देऊन टाकली. प्रचाराचा झंजावात व त्यालाच जोडून कार्यकर्त्यांनी आपापल्या मतदारसंघात विस्तारलेले प्रचारकार्य, याची सांगड घातली जाणे त्यासाठी अतिशय मोलाचे असते. तरच अखेरच्या दिवशी त्या भारावलेल्या मतदाराचे मत तुमच्या पदरात पडणार असते. तोपर्यंत प्रचार व मोहिम शिगेला पोहोचवणे ही कसोटी असते.
इथे एक उदाहरण देता येईल. अगदी आरंभापासून म्हणजे निवडणूक वेळापत्रक जाहिर होण्याच्या आधीपासून कॉग्रेसने भारत निर्माण व अन्य योजना यांच्या जाहिराती सुरू केलेल्या होत्या. त्याचवेळी पक्षपातळीवर राहुल गांधी यांच्या कल्पनांचाही प्रचार आरंभला होता. तो उच्चभ्रू वा बुद्धीमान लोकांना कळणारा असला, तरी सामान्य मतदाराला भुलवणारा नव्हता. ‘मी परिवर्तन घडवून आणू शकतो’ असा आशावाद मोदींनी जनमानसात निर्माण केला होता, त्याला पुसण्यासाठी ‘मै नही, हम’ अशी जाहिरातबाजी कॉग्रेसने सुरू केली. पण ती कशासाठी व कोणाशी संबंधित आहे, त्याचा सुगावा मुठभर बुद्धीमान लोकांच्यापलिकडे कोणाला लागला नाही. ज्या भ्रष्टाचार, महागाई, अनागोंदी वा गैरकारभाराला सामान्य जनता कंटाळलेली होती, त्याची कुठे दादफ़िर्याद कॉग्रेसच्या प्रचारात नव्हती. उलट आपल्या भ्रष्टाचारावर पांघरूण घालत मोदींचा कारभारावर तोफ़ा डागल्या गेल्या. बंगाल, आंध्र, बिहार या राज्यातला मतदार मोदींच्या कारभारामुळे महागाईने ग्रासलेला नाही. मग तिथे राहुलचे भाषण वा तत्सम प्रचाराचे मुद्दे निरर्थक बनत होते. त्यामुळेच जाहिरातीपासून प्रचारातली भाषणे व्यक्तीगत वा संदर्भहीन ठरत गेली. उलट मोदींच्या भाषणातून थेट केंद्राच्या कारभारातील दोषावर बोट ठेवून त्याच संकटातून बाहेर काढायचे आश्वासन सतत दिले जात होते. त्याच्या जोडीला वाहिन्या वा वृत्तपत्रातल्या जाहिराती सातत्याने बदलत व ताजेपणा घेऊन समोर येत होत्या. वाराणशीचा उमेदवारी अर्ज भरायला मोदी जनसागर घेऊन गेले, तो जल्लोश पुढल्या आठवड्यात भाजपाच्या जाहिरातीमध्ये तसाच दाखवला गेला. पुढे त्यांना वाराणशीत सभेची परवानगी नाकारली गेल्यावर झालेल्या अघोषित रोडशोची दृष्ये, दुसर्याच दिवशी ‘अबकी बार मोदी सरकार’ घोषणेच्या जाहिरातीमध्ये समाविष्ट करण्याची तत्परता दिसून आली. त्याच्या तुलनेत कॉग्रेसच्या जाहिराती तपासून बघता येतील. तीन महिने ज्या जाहिराती झळकू लागल्या, त्या तशाच काल अखेरचे मतदान होईपर्यंत चालू होत्या. ‘मेरा व्होट उसीको’ ही जाहिरात मालिका बदलत्या परिस्थितीनुसार किंचितही बदल न करता प्रसारीत होत राहिली.
राहुल गांधी कुठे हमालांशी, महिलांशी वा कोळी आदिवासींच्या घोळक्यात बोलतात वा चालताना दिसतात. ‘कॉग्रेस की टीम आपके साथ’ अशी जी जाहिरात होती, तिचा अनुभव कोणत्या मतदाराला कधी येऊ शकला आहे काय? तिथेच प्रचाराची दिशा चुकत गेली होती. पण त्याचा पुनर्विचारही करायची कोणाला गरज वाटू नये, याचे नवल वाटते. मोदींनी आपल्या भाषणातून युपीए, कॉग्रेस व गांधी कुटुंबाला लक्ष्य केले होते. पण त्याच्या खुप पलिकडे जाऊन त्यांनी, ती टिका थेट सामान्य मतदाराच्या जीवनाला ग्रासणार्या प्रश्नांशी व समस्येशी जोडायची चलाखी केलेली होती. तिथेच राहुल तोकडे पडले. कॉग्रेसकडून होणारे आरोप वा राहुलनी गुब्बारा फ़ुटण्याची केलेली मल्लीनाथी, दिर्घकाळ तशीच्या तशी सगळीकडे चालू होती. स्थानिक वा प्रासंगिक घटनाक्रमाशी आपले मुद्दे जोडून घेण्यात राहुल अजिबात तोकडे पडत गेले. उलट सोनिया, राहुल वा अगदी प्रियंका यांच्या टोमणेवजा शब्द वा भाषेला तात्काळ प्रत्युत्तर देण्याची तत्परता मोदी दाखवत होते. अगदी प्रसंगी समोरून झालेल्या टिकेचा विपर्यास करूनही मोदींनी आपला उद्देश साधायाला कमी केले नाही. अशावेळी मोदींना मुद्दे मिळू नयेत याची काळजी कॉग्रेसकडून घेतली गेली नाही. मोदींनी खिल्ली उडवलेले मुद्दे राहुलनी नंतरच्या काळात टाळायला हवे होते. पण ते होऊ शकले नाही. म्हणुन त्यांचा पुनरूच्चार लाभदायक होण्यापेक्षा अपायकारक होत गेला. मोदींच्या सभा व भाषणे बारकाईने बघितली, तर त्यांनी मुद्दे बोलण्यापेक्षा राहुल यांची खिल्ली उडवण्याला लोकांचा अधिक प्रतिसाद मिळत होता. म्हणूनच असे मुद्दे मोदींकडून काढून घेण्याची गरज होती. पण राहूल तेच तेच बोलत राहिले आणि मोदी वेगवेगळ्या प्रकारे राहुलची खिल्ली उडवतच राहिले. म्हणुन तर जनमानसाच्या आशा व आकांक्षांवर स्वार होण्यात मोदी यशस्वी होत गेले. पण त्यांच्या यशाला हातभार लावताना राहुल मात्र स्वत:ची प्रचारमोहिम गोत्यात टाकत गेले. अदानी, अंबानी यांना जमीनी दिल्याच्या आरोपापासून स्नुपगेटच्या प्रभावशून्य गोष्टीपर्यंत सगळे मुद्दे संदर्भहीन होते. त्यापेक्षा अन्नसुरक्षा, आरक्षण वा मनरेगा अशा गोष्टींचा प्रभावी व परिणामकारक प्रचार कॉग्रेसला उपयुक्त ठरला असता. पण स्वभावात आक्रमकता नसताना राहुलना ज्याने कोणी आरडाओरडा करून आक्रमकता दाखवायचा सल्ला दिला; त्यानेच ती प्रचारमोहीम दिवाळखोरीत घालवली होती. कारण कॉग्रेसची प्रचारमोहिम पक्षाला उपयुक्त ठरण्यापेक्षा मोदींच्या टिकेला उपयुक्त मुद्दे पुरवण्याच्याच गाळात रुतून बसली.
No comments:
Post a Comment