Monday, May 5, 2014

अमेठीतले गुंतागुंतीचे राजकारण

  बहूधा २००७ किंवा २००९ सालची गोष्ट असेल. विधानसभा वा लोकसभा निवडणूकीचे निकाल लागत होते. कुणा पत्रकाराने गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना प्रश्न विचारला होता. पुढल्या वेळी म्हणजे २०१४ साली मोदी विरुद्ध राहुल अशी लढत होणार काय, असा तो प्रश्न होता. त्यावर मोदी यांनी दिलेले उत्तर मोठे मार्मिक होते. मात्र त्याचे मर्म प्रश्न विचारणार्‍यालाही कळलेले दिसले नाही. मोदी सहजगत्या उत्तरले होते. ‘राहुल गांधी गुजरातमधून निवडणूक लढवतील असे मला अजिबात वाटत नाही.’ मग तो विषय तिथेच संपला होता. आज लोकसभा निवडणूक व राजकारण ज्या स्थितीत येऊन पोहोचले आहे, तेव्हा मला ते उत्तर आठवले. खरेच ते मोदींनी सहजगत्या दिलेले उत्तर होते, की त्यामध्ये काही गर्भित अर्थ सामावला होता. राहुल गांधी गुजरातमध्ये निवडणूक लढवणार नाहीत, याचा अर्थच आपल्यालाच राहुल विरोधात लढण्यासाठी गुजरातबाहेर जावे लागेल, असे मोदींना म्हणायचे असेल काय? कारण त्यांनी २०१४ ची लढत त्याच दोघात होणार नाही असे अजिबात म्हटले नव्हते किंवा त्याचा अजिबात इन्कार केलेला नव्हता. म्हणजेच भविष्यात आपण देशव्यापी नेतृत्वाची अभिलाषा बाळगून आहोत, असे मोदींनी सुचित केलेले होते. पाचसात वर्षापुर्वीचे मोदी यांचे शब्द आज आठवतात. कारण सोळाव्या लोकसभेसाठीचे मतदान शेवटच्या टप्प्यात पोहोचले असताना, मोदींनी गांधी घराण्याचा बालेकिल्ला असलेल्या अमेठीत घुसखोरी केलेली आहे. वास्तविक आजवर कुठल्याही प्रमुख पक्षाच्या बड्या नेत्याच्या मतदारसंघात विरोधी नेत्यांनी आक्रमण केलेले नाही किंवा तुल्यबळ उमेदवार टाकलेला नाही. दिल्लीतील अनपेक्षित यशानंतर केजरीवाल व त्यांच्या आम आदमी पक्षाने त्यावर टिका करायला सुरूवात केली आणि अमेठीत राहुल विरुद्ध आपला मोठा मोहरा टाकायचा पवित्रा घेतला. निवडणूकीचे वेळापत्रक जाहिर होण्यापुर्वीच जानेवारीत कुमार विश्वास हा ‘आप’चा उमेदवार अमेठीत पोहोचला आणि त्याने लोकसभा लढतीला आरंभ केला होता. अधिक भाजपा राहुलच्या विरोधात लढत नसल्याचा आरोप चालविला होता. त्यातून मग भाजपाने अमेठीत स्मृती इराणीसारखा दमदार उमेदवार पाठवला. मात्र देशभर प्रचाराचे रान उठवणार्‍या मोदींनी अमेठी वा रायबरेलीत यायचे धाडस केले नाही, अशी टिका होत राहिली. अखेरच्या चार दिवसात मोदींनी अमेठीत शेवटची प्रचारसभा घ्यायचे मान्य केले आणि या लढतीला वेगळे वळण लागले.

   वास्तविक असे घडलेही नसते. कारण एकमेकांच्या प्रमुख नेत्यांच्या बालेकिल्ल्याकडे पाठ फ़िरवायचे तत्व याही वेळी पाळले गेले होते आणि मोदींनीही त्याचे पालन केले होते. पण गेल्या दहा दिवसात अमेठी रायबरेलीत प्रचाराची धुरा संभाळणार्‍या प्रियंका गांधींनी थेट मोदींवर व्यक्तीगत टिकेची झोड उठवली आणि चित्रच पालटून गेले. गुजरातचा विकास वा स्नुपगेट अशा विषयांना अमेठीत महत्व नाही. तिथे त्यांच्यावरून इतके काहुर माजवण्याने काहीही साधणार नव्हते. पण राहुलच्या फ़िका पडलेल्या प्रचारावर उपाय म्हणुन प्रियंकाच्या तोंडी जाणूनबुजून या गोष्टी घातल्या गेल्या. तेव्हा अर्थातच प्रियंकाला वारेमाप प्रसिद्धी मिळाली व त्याच विषयांचा गाजावाजा खुप झाला. पण तरीही प्रियंकावर प्रतिहल्ला चढवण्यास मोदींनी नकार दिला. त्यातून मोदींनी आपल्या औदार्याचे नाटक छान रंगवले. पण त्यातही त्यांनी राजकीय संधी शोधलीच. प्रियंकाने चौकसभा, गावसभा यामधून मोदींविषयी कुजबुज करून स्थानिक महिला व गावकर्‍यात उत्कंठा निर्माण केलेली आहे. सहाजिकच हा कोण, त्याला बघण्याची सुप्त इच्छा अमेठीच्या जनमानसात उत्पन्न करायचे काम प्रियंकानेच परस्पर करून ठेवलेले आहे. बहूधा त्यातूनच तिथे जाण्याचा धुर्त निर्णय मोदींनी अखेरच्या पर्वात घेतलेला असावा. त्यासाठी मोदींनी निवडलेली वेळ व दिवसही नेमका आहे. मोदींची अमेठीतली सभा संपतानाच प्रचाराची मुदतही संपणार आहे. त्यामुळेच अखेरचा शब्द अमेठीत जमणार्‍या लोकांसमोर मोदींचा असेल. म्हणजेच गेल्या दहापंधरा वर्षात कधी त्या बालेकिल्ल्यात गांधी कुटुंबाला आव्हान नव्हते, तितके मोठे आव्हान यावेळी उभे ठाकले आहे. प्रथमच सोनियांनी तिथे सभा घेतली आणि आजवर कधी नव्हे इतका वेळ प्रियंकाने तिथे तंबू ठोकला आहे. त्यामुळे काम सोपेच होते. पण प्रियंकाने मोदींना लक्ष्य करण्याने घोटाळा करून ठेवला म्हणावे लागेल. कारण त्यातून प्रियंकाच मोदींवर टिका करते म्हणून त्यांच्याविषयी उत्सुकता निर्माण झाली आणि टिकेला चोख उत्तर द्यायला मोदींना तिकडे जावे लागले. मोदींवरील अतिरेकी व्यक्तीगत टिका व अमेठीसारख्या एका मतदारसंघात स्थानिक विषयांकडे डोळेझाक करून पुन्हा मोदींना लक्ष्य करण्याच्या खेळीने सगळा घोळ घातला आहे. वरकरणी कॉग्रेसचा कुणी नेता तसे भासवत नसला तरी राहूलच्या वागण्यात बोलण्यात त्याचे प्रतिबिंब साफ़ पडलेले दिसते आहे. दोन दिवस अमेठीत मुक्काम ठोकलेल्या राहूलचे बोलणे वागणे काय सांगते?

   अखेरच्या दोन दिवसात अमेठीत मुक्काम केलेल्या राहुल व प्रियंकांनी प्रथमच तिथे दर्ग्याला व देवस्थानांना भेटी दिल्या. आपल्याला पुन्हा लोकांनी संधी दिल्यास आपण अमेठीचे लंडन करू असली भाषा अखेरच्या दिवसात बालेकिल्ल्यात उमेदवार वापरतो, तेव्हा ते आत्मविश्वासाचे लक्षण मानता येणार नाही. दुसरी बाब म्हणजे ३० एप्रिलचे मतदान संपल्यानंतर ४३८ जागांचे मतदान संपलेले आहे. त्याचे एक्झिट पोल घेतले गेले आहेत. म्हणजे ज्यांनी अशा चाचण्या केल्या, त्यांच्यापाशी निकालाचे अंदाज तात्काळ तयार झालेले आहेत. हे अंदाज बहुतेक प्रमुख पक्षाच्या नेत्यांनाही मिळालेले आहेत. म्हणूनच एकूण निवडणूकीला ३० एप्रिल नंतर खुप कलाटणी मिळालेली दिसते. भाजपा, कॉग्रेस यांच्यासह राजकीय अभ्यासकांची भाषाही बदलेली आहे. आणि नेमक्या त्याच कालखंडात अमेठीचे राजकीय चित्र झपाट्याने बदलत गेलेले आहे. दहा वर्षे प्रतिनिधीत्व करताना राहुल गांधी अमेठीचा विकास फ़ारसा करू शकले नाहीत, असाच त्याचा अर्थ होतो. आम आदमी पक्षाचे कुमार विश्वास असोत किंवा भाजपाच्या स्मृती इराणी असोत; त्यांनी अमेठीत उमेदवारी करताना जे टिकेचे हल्ले चढवले, त्याचा जनमानसावर विपरित परिणाम झालेला जाणवला. म्हणूनच प्रियंका राहुल यांना तिथे जोर लावणे भाग पडलेले असावे. अशावेळी आजचा सर्वाधिक लोकप्रिय विरोधी नेता असलेल्या मोदींनी तरी तिकडे फ़िरकायला नको होते. किंबहूना तशी वेळ येऊ नये याची काळजी कॉग्रेसने घ्यायला हवी होती. पण ती घेतली गेलेली नाही. म्हणूनच आपल्या बालेकिल्ल्यात राहुल यांनाही अस्वस्थ व्हायची पाळी आलेली आहे. मागच्या आकड्यातही त्याची कारणे सापडतात. मागल्यावेळी तिथे ४५ टक्के मतदान झालेले होते. यावेळी सर्वत्र ६० टक्के मतदानाचे विक्रम होत आहेत. अशा वाढत्या मतदानात प्रस्थापित विरोधी मतदार उत्साहाने बाहेर पडत असतो. त्यालाच बाहेर येऊन मत द्यायला भाग पाडण्याचे प्रयत्न आव्हानवीर करीत असतात. त्यात पुन्हा मोदींच्या लाटेची भर पडली तर बालेकिल्लाही धोक्यात येऊ शकतो. १९७७ साली संजय गांधी यांचा तिथे एका नगण्य उमेदवाराने पराभव केला होता. आताही स्थानिक संस्थानिक संजय सिंग भाजपात येऊन राहुलना आव्हान देण्याच्या बातम्या होत्या अशावेळी त्यांना आधीच कॉग्रेसने राज्यसभेत पाठवून डागडुजी केली होती. १९९९ सालात त्यांनीच भाजपातर्फ़े अमेठीची जागा जिंकली होती. म्हणजे निवडणूकीची घोषणा होण्यापुर्वीच अमेठीची लडाई सोपी नसल्याचे भान कॉग्रेसला होते असेच मानावे लागते. खरोखर तसेच असेल, तर मग प्रियंकाकडून मोदींना लक्ष्य बनवण्याची अक्षम्य चुक होऊन गेली आहे. तिचे परिणाम दहा दिवसानंतरच समोर येतील. गुजरातमध्ये राहुल लढायला येणार नाही, असे सात वर्षापुर्वी बोलणार्‍या मोदींनी आपणच लढायला अमेठीत येऊ असे तेव्हाच मनात ठरवले असेल काय?

1 comment:

  1. प्रियंका ताईंचे मानावे तितके धन्यवाद कमी आहेत. अतिताई पणे केलेल्या वक्तव्यामुळे, तिने बंधूरायाला गोत्यात आणायला भाग पाडले आहे. प्रियंकांचाीबेताल वक्तव्ये कार मधून जाता जाता करण्यात आली होती. प्क

    ReplyDelete