Tuesday, May 6, 2014

धिस इज पेबॅक टाईम


  सहा महिन्यांपुर्वी ८ डिसेंबर रोजी चार विधानसभांचे निकाल लागल्यानंतर तीन राज्यात मोठे यश मिळवणार्‍या भाजपाला दिल्लीसारख्या छोट्या राज्यात मात्र नवख्या आम आदमी पक्षाने अपशकून केला होता. त्यानंतर त्या पक्षाचे संस्थापक नेता अरविंद केजरीवाल यांनी इतक्या राजकीय उचापती केल्या, की तसले प्रकार त्यापुर्वी भारतीय राजकारणात कधी बघायला मिळालेले नव्हते. पण त्याच केजरीवालना डोक्यावर घेऊन नाचणार्‍या माध्यमांनी, कधी राजकीय सभ्यतेचे धडे त्यांना शिकवले नाहीत. उलट अपारंपारिक राजकारण म्हणून त्याचे कोडकौतुकच केलेले होते. आज तसाच काहीसा प्रकार लोकसभा निवडणूकीत भाजपाचे नरेंद्र मोदी करीत आहेत, तेव्हा मात्र माध्यमांना शिष्टाचार आठवू लागला आहे. पहिली गोष्ट अशी की गेल्या बारा तेरा वर्षात गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम करणार्‍या नरेंद्र मोदींना संपवण्याचा विडाच उचलल्याप्रमाणे माध्यमे वागलेली आहेत. विरोधी पक्षांनी नसेल, इतकी मोदी विरोधी आघाडी माध्यमांनी उघडलेली होती. वर्षभरापुर्वीचीच गोष्ट असेल. एका परदेशी वृत्तसंस्थेला मोदींनी दिलेल्या मुलाखतीमध्ये, दंगल काळात झालेल्या मृत्यूचा विषय निघाला; तेव्हा मोदींनी समर्पक उत्तर दिलेले होते. ‘गाडीत आपण बसलेलो असताना त्याच गाडीखाली कुत्र्याचे पिल्लू आले, तरी आपला जीव हळहळतो ना? मग जेव्हा आपल्या राज्यात माणसे दंगलीत मारली गेली, तर वेदना व्हायचे राहिल काय?’ असे म्हणणार्‍या मोदींना दंगलीच्या बळींना कुत्रे संबोधायचे नव्हते. पण त्याचा तसाच विपर्यास करून मोदींना कचाट्यात पकडण्याची शर्यतच माध्यमात सुरू झालेली होती. अगदी परदेशी असून मुलाखत घेणार्‍यानेही त्या विपर्यासावर नाराजी व्यक्त केली होती. पण अजून त्यासाठी मोदींना गुन्हेगार ठरवायचे प्रकार चालूच आहेत की नाही? मुद्दा इतकाच, की सार्वजनिक जीवनात गेल्या तेरा वर्षात मोदींनी गिरवलेला एकमेव धडा असा, आपल्या सोयीनुसार समोरच्या वास्तवाचा विपर्यास करून आपला हेतू साध्य करायचा.

   हा धडा मोदींना कोणी शिकवला? त्याच कॉग्रेस पक्षीयांनी वा सेक्युलर म्हणवणार्‍या प्रत्येकानेच हे धडे मोदींकडून गिरवून घेतले आहेत ना? त्यातून तयार झालेल्या मोदींनी मग गेल्या वर्षभरात लोकसभा निवडणूकीच्या प्रचाराचे रान उठवताना; आपल्या सोयीनुसार प्रत्येक गोष्टीचा वा घटनाक्रमाचा विपर्यास केला तर नवल कुठले? सहाजिकच ज्यांच्याकडून मोदी हे डावपेच शिकले आहेत, त्यांनाच मोदी आता अत्यंत चाणाक्षपणे त्यांच्याच पेचात अडकवून मजा करत सुटले आहेत. अशावेळी मोदींना समजूनच त्यांच्याशी दोन हात करावे लागतील. पहिली बाब म्हणजे कोणीही अंगावर गेला, की मोदी त्याला घाबरून पळण्याऐवजी शिंगावर घेतात. हाच सातत्याने आलेला अनुभव आहे. त्यामुळे मोदींशी लढताना थेट त्यांच्या अंगावर जाऊ नये, हा सोपा नियम होतो. कारण अंगावर जाणे म्हणजे शिंगावर घेण्याची संधी मोदींना बहाल करणे असते. मोदी स्वत: होऊन कोणाच्या अंगावर जात नाहीत. पण कोणी अंगावर आलाच तर त्याला शिंगावर घ्यायलाही मागेपुढे पहात नाहीत. ह्याच अनुभवातून शंकरसिंग वाघेला, कांशीराम राणा, केशूभाई पटेल यांच्यापासून राहुल गांधी व सोनिया गांधीपर्यंत अनेकजण गेलेले आहेत. ह्या इतिहासाकडे पाठ फ़िरवून आज कोणी मोदींना अंगावर घ्यायला धावला, तर गंमत बघणारे काहीवेळ टाळ्या वाजवतील. पण मोदींनी शिंगावर घेतले, मग सोडवायला त्यातला कोणीही बघ्या पुढे येत नाही, हाच अनुभव आहे. त्यापेक्षा मोदींच्या वाट्याला न जाणे अधिक सोयीचे असते. कारण मोदींचे राजकारणच शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांप्रमाणे अपवादात्मक आहे. त्यात मान्यवर, बुद्धीमंत, पत्रकार यांच्या मताला ते किंमत देत नाहीत. सर्वसामान्य जनतेच्या मनावर पडणार्‍या प्रभावाला मोदी प्राधान्य देतात. त्यामुळेच बुद्धीवाद्यांनी कितीही चढवले, म्हणून मोदींना अंगावर घेण्यात शहाणपणा नसतो. अमेठीत प्रचार करताना प्रियंका गांधींनी नेमकी तीच चुक केली होती. मोदींनी तिच्याकडे पाठ फ़िरवली, तरी पत्रकारांच्या प्रोत्साहनाने प्रियंका भरकटत गेली. आज त्याचेच परिणाम तिच्या वाट्याला आलेले आहेत.

   गेल्या आठदहा दिवसात सातत्याने मोदींच्या व्यक्तीगत जीवनावर वाटेल तसे बेछूट आरोप करणार्‍या प्रियंकाला सोनियांची कन्या म्हणून आपण माफ़ करतो, असे औदार्य मोदींनी दाखवल्यानंतरही त्यांनी ‘आपण राजीव गांधींची बेटी’ असल्याचा टेंभा मिरवला होता. तो उद्धट, असभ्यतेचाच पुरावा नव्हता काय? एकदा तुम्ही उर्मटपणा दाखवू लागलात, मग तुमच्याशी सौजन्य दाखवण्याला अर्थ उरत नाही. म्हणूनच मोदींनी अमेठीत जाऊन थेट गांधी परिवाराला खुले आव्हान दिले. त्यांच्या दिखावू शालीनतेचे मुखवटे फ़ाडून काढले. त्यानंतर पुन्हा त्यांच्या वाट्याला जाण्याचे कारण नव्हते. पण प्रियंकाने अंगी नसलेला चाणाक्षपणा दाखवायला खोड काढलीच. अमेठीत आपल्या शहीद पित्याचा अपमान करणार्‍यांना मतदार मतातूनच उत्तर देतील; असे म्हणताना ‘नीच राजनिती" असला शब्दप्रयोग करायची गरज नव्हती. तुमच्या पित्याचा इतिहास सांगणे नीचपणा असेल, तर मोदींवर सातत्याने महिलाविषयक शंकास्पद आरोप करून प्रियंका कुठल्या उच्चभ्रूपणाचे व शालीनतेचे पुरावे देत होत्या? ज्या पातळीवर तुम्ही राजकारण आणले, त्याची फ़ळे चाखायची वेळ आल्यावर नाक मुरडण्याचे कारण काय? शिवाय असले डाव वाजपेयी वा अडवाणी, सुषमा यांच्यासारख्या सभ्य लोकांसाठी ठिक असतात. त्या पातळीवर तुम्ही उतरलात तर मोदी थेट टपोरी टग्या व्हायलाही मागे बघणारा माणूस नाही. म्हणूनच त्यांनी अतिशय धुर्तपणे प्रियंकाने बोललेल्या ‘नीच राजनिती’ शब्दाचा विपर्यास करून तुमच्याच डावाचा फ़ास तुमच्याच गळ्यात घातला आहे. जे धडे मागल्या तेरा वर्षात सेक्युलर शहाण्यांनी मोदींना गोत्यात घालून गिरवून घेतले, त्यांनाच मोदी आता गुरूची विद्या शिकवत आहेत. गुजरातच्या दंगलीपासून चकमकीपर्यंत प्रत्येक घटनेच्या बाबतीत ज्यांनी विपर्यास करण्यातच धन्यता मानली; त्यांना आता त्यांच्याच सेक्युलर चलनात मोदी व्याजासह कर्जफ़ेड करीत आहेत. मग ते वाहिन्यांचे संपादक पत्रकार असोत, विचारवंत राजकारणी असोत किंवा प्रियंकासारखी लाडावलेली बाळे असोत. धिस इज पेबॅक टाईम.


1 comment:

  1. well said. The same thing is proven umpteen times by pre PM interview my Mr Modi to TIMES NOW and the latest interview on TIMES NOW in 2016. Modi approach is need of time.

    If the seed is rotten then the tree obviously will not be healthy. Congress must understand this.

    ReplyDelete