Thursday, May 15, 2014

गुणवत्तेची कसोटी



  गेल्या पाच महिन्यात तीन चेहरे माध्यमांनी व राजकीय पंडीतांनी भारतीय जनतेसमोर अहोरात्र पेश केले. एका आकडेवारीनुसार वाहिन्यांनी आपल्या प्राईम टाईममध्ये, म्हणजे जेव्हा सर्वाधिक प्रेक्षक कार्यक्रम बघतात, तेव्हा हेच तीन चेहरे लोकांना पेश केले. याचा अर्थ असा, की लोकांनी देशाचे भावी नेते म्हणून या तिघांना जनतेसमोर मांडून त्यातून निवड करण्यास सुचवले होते. त्यामध्ये नरेंद्र मोदी यांना सर्वाधिक काळ पेश करण्यात आले. त्यानंतर क्रम केजरीवाल व राहुल गांधी यांचा लागतो. ३३ टक्के मोदी, केजरीवाल १० तर राहुल ४ टक्के दाखवले गेले. त्यामुळेच एक असा आरोप आहे, की मोदींना माध्यमांनीच जनतेच्या गळी मारले. मोदींची लोकप्रियता ही माध्यमांनी निर्माण केली असा त्याचा अर्थ आहे. ती लोकप्रियता माध्यमांनी गळी मारल्याने होती, की मोदींच्या लोकप्रियतेवर माध्यमे स्वार झालेली होती? लोकांना मोदी बघायचे नसताना दाखवले गेले असते, तर त्या वाहिनीकडे लोकांनी पाठ फ़िरवली असती. तसे झालेले नाही. लोकप्रिय मोदींनी न दिलेल्या मुलाखतीही लोकप्रिय वाहिन्यांनी उसनवारी करून दाखवल्या. याचा अर्थच माध्यमांनी मोदींना लोकप्रियता दिलेली नसून माध्यमेच मोदींच्या लोकप्रियतेचा लाभ उठवायला पुढे सरसावलेली होती. पण तोही मुद्दा बाजूला ठेवू. आज मतमोजणी होत असताना माध्यमांनी सादर केलेल्या त्याच तीन नेत्यांना वा त्यांच्या पक्षाला मिळणारी मते बघितली, तरी माध्यमातून कुठला पक्ष वा नेता लोकांच्या गळी मारता येत नाही, याची साक्ष मिळू शकेल. सर्वाधिक प्रसिद्धीमुळे सर्वाधिक मते मोदींना मिळत असली, तरी सर्वात किमान प्रसिद्धी मिळालेल्या राहुलना केजरीवालपेक्षा अधिक मते कशाला मिळत आहेत?

   दुसर्‍या क्रमांकाची प्रसिद्धी केजरीवाल यांना माध्यमांनी दिलेली असेल तर त्यांनाही मोदींच्या खालोखाल मते मिळायला हवी होती. परंतु त्यांच्यापेक्षा निम्म्याहून कमी प्रसिद्धी मिळू शकलेल्या राहुलच्या पक्षाला केजरीवालच्या चौपटीने अधिक मते मिळत आहेत. म्हणजेच नुसत्या माध्यमातल्या प्रसिद्धीमुळे कोणी लोकप्रिय होत नाही किंवा मतदार आंधळेपणाने कुणाला मते देत नाही. प्रसिद्धीमुळे मतदाराला आपल्यासमोर कोणते पर्याय उपलब्ध आहेत, त्याची माहिती मिळत असते. पण कुणाचे कितीही खोटे गुणगान माध्यमांनी केल्याने, तो नेता वा त्याचा पक्ष भरघोस मते मिळवू शकत नाही. केजरीवाल हे त्याचे उत्तम उदाहरण ठरावे. डिसेंबर महिन्यात चार विधानसभांचे निकाल लागल्यानंतर तीन जागी मोदींच्या प्रचाराने भाजपाला मोठे यश मिळालेले असताना, माध्यमांना केजरीवाल व्यापून उरलेले होते. तिथेच न थांबता मोदींचा विजयरथ लोकसभा निवडणूकीत केजरीवालच रोखू शकतात, असे पटवण्यासाठी माध्यमांनी आपली सगळी बुद्धीमत्ता पणाला लावलेली होती. अगदी जानेवारी फ़ेब्रूवारी ह्या महिन्यातील वाहिन्यांचे कार्यक्रम व वृत्तपत्रे बघितल्यास केजरीवाल सर्वत्र झळकत होते. त्यांच्यापुढे मोदीच नव्हेतर राहुल गांधी पुरते झाकोळून गेलेले होते. मग त्यांनी मुंबई, बंगलोर वा वाराणशीला भेट देण्याचे प्रसंग असोत. इतके केल्यावरही त्यांच्या पक्षाला देशाच्या कानाकोपर्‍यात लोकसभा लढवू शकणारे उमेदवार भरपूर मिळाले, तरी मते मात्र मिळू शकलेली नाहीत. त्याचाच सरळ अर्थ असा, की नेता वा पक्ष कुठलाही असो, त्याला प्रसिद्धी वा जाहिरातीतून लोकप्रियता संपादन करता येत नाही किंवा मते मिळवता येत नाहीत. त्याची कारणे शोधायला हवीत.

   जाहिराती किंवा प्रचाराच्या क्षेत्रात काम करणार्‍यांना विचारल्यास ते एक निकष सांगतील. कितीही जाहिरात केली वा प्रसिद्धी दिली, तरी त्यातून लोकांपर्यंत तुमचा माल पोहोचवला जातो. पण लोक नुसत्या प्रसिद्धीमुळे माल स्विकारत वा खरेदी करीत नाहीत. माल चांगला व उपयुक्त सुद्धा असावा लागतो. राहुल गांधी एका भाषणात म्हणाले होते, की विरोधक नुसत्या प्रसिद्धीवर जनतेला उल्लू बनवतात. टकलू माणसाला हे कंगवाही विकू शकतात. हे विधान गंमत म्हणून ठिक असले किंवा समोरच्या प्रेक्षकांना हसवणारे असले, म्हणून खरे नव्हते. एखाद्या वेळी असे घडूही शकते. पण नेहमी ते सत्य नसते. म्हणूनच जाहिरात करण्यापुर्वी माल चांगला आहे, याचीही खात्री करून घ्यावी लागते. अन्यथा नुसती प्रसिद्धी उलटण्याचा धोका असतो. केजरीवाल व राहुल यांच्या बाबतीत तेच झाले. केजरीवाल यांना माध्यमांनी अफ़ाट प्रसिद्धी दिली, तरी त्यांच्यापाशी लोकोपयोगी माल नव्हता. म्हणून राहुलपेक्षा त्यांना कमी लोकांचा प्रतिसाद मतातून मिळू शकला. पण मोदींची गोष्ट वेगळी होती. गेल्या बारा वर्षात मोदींना जी प्रसिद्धी मिळाली ती पुर्णत: नकारात्मक होती. मोदींना माध्यमे सैतान म्हणुन रंगवत होती आणि व्यवहारत: लोकांपर्यंत अन्य मार्गाने पोहोचलेली माहिती मोदींच्या गुणवत्तेचे पुरावे होते. त्यामुळेच नकारात्मक प्रसिद्धीला पुराव्यांनी यशस्वी बनवले. पण केजरीवाल यांच्या पोकळ प्रसिद्धीला पुराव्यांचा आधार नसल्याने प्रतिसाद मिळू शकला नाही. तिसरीकडे राहुल यांना कालबाह्य झालेल्या मालाची जाहिरात करूनही प्रतिसाद मिळाला नाही. माध्यमांनी मोदींना प्रसिद्धी दिली; ती अगतिकता म्हणून, जाहिरात म्हणुन नव्हे. एकूणच माध्यमांनी या निवडणूकीत जुने सत्य नव्याने सिद्ध केले. तुम्ही काही लोकांना सर्व काळ, सर्वांना काही काळ फ़सवू शकत असला तरी सर्वांना सर्वकाळ फ़सवू शकत नाही.

1 comment:

  1. अगदी खरे आहे भाऊ. माध्यमे टीआरपी ज्याला मिळेल तेच दाखवतात.

    ReplyDelete