Sunday, February 15, 2015

धडा भाजपाला, शिकले केजरीवाल



दिल्ली विधानसभेच्या मतदानातून मतदाराने भाजपाला धडा शिकवला, हे आता सर्वांनी सांगून झाले आहे. पण भाजपावाले त्यापासून किती धडा शिकले, त्याचे संशोधन करावे लागेल. कारण निकालानंतरच्या भाजपा नेते वा प्रवक्त्यांच्या प्रतिक्रिया धडा शिकल्याचे दर्शवत नाहीत. उलट एखादी निवडणूक हरलो, म्हणजे पक्ष संपत नाही, अशी उद्दाम भाषा आहे. जणू दिल्लीच्या मतदाराने आम आदमी पक्षाला कौल दिलाय आणि त्यापेक्षा या निकालाचा फ़ारसा अर्थ काढण्याची गरज नाही, असाच एकूण भाजपावाल्यांचा सूर दिसतो. म्हणूनच मागल्या विधानसभेच्या वेळी असलेली मतांची टक्केवारी कायम असल्याचे निर्ढावलेले दावे पुढे करण्यात आलेले आहे. पण हा कौल आपल्या बाजूने लागला असला आणि त्यात भाजपाला मतदाराने धडा दिलेला असला, तरी त्यातही आपल्यासाठी असलेला धडा शिकण्याची जागरूकता केजरीवाल यांनी दाखवली, ही बाब लक्षणिय आहे. तसे मागल्या वेळी म्हणजे प्रथमच निवडणूक लढवून केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने मिळवलेले यश नगण्य अजिबात नव्हते, तर मोठेच होते. त्याच पायावरचे आजचे यश अधिक मोठे नाही. पण अशा यशातून अधिक मोठी जबाबदारी येते, याचे भान तेव्हा केजरीवाल यांच्यासह त्यांच्या सहकार्‍यांना व समर्थकांना राहिलेले नव्हते. म्हणूनच पुढल्या चुका होत गेल्या आणि पक्षाची घसरगुंडी होत गेली. त्याला खुद्द केजरीवाल व त्यांचा पक्षच जबाबदार होता. याचे भान त्यांना लोकसभेतील पराभवानंतर आले आणि त्याची अल्पशी कबुली देतच केजरीवाल पुन्हा विधानसभा लढवताना मतदाराला सामोरे गेले होते. आपण तडकाफ़डकी राजिनामा देऊन बाहेर पडलो, ही चुक होती असे त्यांनी यावेळी मतदाराला पदोपदी समजावून सांगितले आणि यावेळी पाच वर्षे सलग कारभार करू, असे सातत्याने सांगत रहिले होते. फ़क्त एक चुक त्यांनी आजपर्यंत लपवून ठेवली होती.

इतका अभूतपुर्व विजय केजरीवाल यांनी यावेळच्या निवडणुकीत मिळवला आणि त्यानंतर शपथ घेताना त्यांनी आपल्या सर्वात मोठ्या चुक वा गुन्ह्याची कबुली शपथ घेताच दिली. मागल्या वेळी विजयाचा उन्माद आपल्यात व सहकार्‍यांमध्ये संचारला होता आणि त्याचेच दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागले, हीच ती कबुली आहे. शपथविधी संपल्यावर तिथेच उपस्थितांसमोर भाषण करताना केजरीवाल यांनी आपल्या सहकारी समर्थकांना सावधानतेचा इशारा दिला. कारण मागल्या विजयानंतरच्या उन्मादाची पुनरावृत्ती लगेच दिसू लागली होती. योगेंद्र यादव यांच्यासह अनेकांनी इतर निवडणूका लढवून विरोधकांना संपवण्याची उतावळी भाषा लगेच सुरू केली होती. त्यांना खाजगी बैठकीत वा भेटीतही केजरीवाल कानपिचक्या देऊ शकले असते. पण त्यासाठी त्यांनी शपथविधीचा मुहूर्त शोधला, हे धडा शिकल्याचे लक्षण आहे. आपण लगेच आता उत्तर प्रदेश पादाक्रांत करायच्या दिग्विजयाला सिद्ध झालोय, अशी शेखी यादव यांनी मिरवली होती. तर त्यांचेच मुंबईतील सहकारी मयंक गांधी यांनीही मुंबई महापालिका जिंकायचे मनसुबे बोलून दाखवले होते. त्यांचे केजरीवालांनी जाहिरपणे शपथविधी समारंभातच कान उपटले आहेत. मागल्या खेपेस विधानसभेच्या यशाने झिंग चढली आणि लोकसभा जिंकायच्या वल्गना केल्या. त्याची मतदाराने शिक्षा दिली, अशी कबुली केजरीवाल देतात, याचा अर्थच दिल्लीत पराभूत भाजपाला मतदाराने दिलेला धडा विजयीवीर असूनही केजरीवाल शिकले असे म्हणावे लागते. मतदाराला कोणी गृहीत धरू नये किंवा मिळालेल्या मताला आपली शक्ती समजून मस्तवालपणा करू नये, असा तो धडा आहे. मतदार संधी देत असतो आणि त्यानुसार किती जबाबदारी पार पाडली, त्याप्रमाणेच पुढल्या खेपेस तुम्हाला बक्षीस वा शिक्षा देत असतो. हाच तो धडा आहे, तो यावेळी भाजपासाठी असला तरी त्यांचे तिकडे अजून लक्षच गेलेले दिसत नाही.

अर्थात केजरीवाल आज शपथविधीनंतर काय बोलले, तेवढेच महत्वाचे नाही. इतके प्रचंड बहूमत आणि निर्विवाद सत्ता, हीच आपल्या परीने भयंकर नशा असते. त्यातून आपल्या सहकारी अनुयायांना सावरणे, हे केजरीवाल यांच्यासाठी सत्ता राबवण्यापेक्षा अधिक जिकीरीचे काम असणार आहे. कारण असे अनुयायी व सहकारी सत्तेने बेताल होत असतात. नरेंद्र मोदी यांनाही त्याचे पुर्ण भान होते. म्हणूनच १६ मे रोजी लोकसभेचे निकाल लागल्यावर जो सोहळा सुरू झाला, त्याला दुसर्‍याच दिवशी लगाम लावणारा इशारा त्यांनी दिल्लीत पोहोचताच दिलेला होता. दुर्दैवाने त्यांच्याच चहाते व अनुयायांना त्याचा लौकरच विसर पडला आहे. १७ मे रोजी विजयीवीराच्या थाटात दिल्लीत पोहोचलेल्या नरेंद्र मोदी यांचे पंतप्रधानपद स्विकारण्यापुर्वीचे पक्षाच्या मुख्यालयातील भाषण, आज किती भाजपावाल्यांना स्मरते आहे? ‘हा विजय माझा वा जिंकून आलेल्या उमेदवारांचा नाही. ज्यांनी या निवडणूकीत शर्थीचे प्रयत्न केले व मेहनतीची पराकाष्टा केली, त्यांचाही हा विजय नाही. जनसंघाच्या स्थापनेपासून ज्या चार पिढ्यांनी पक्षाचा विस्तार करण्यासाठी अपरंपार कष्ट उपसले, त्यांच्या मेहनतीचे हे फ़ळ आहे’, अशी सावधानतेची भाषा मोदींनी केलेली होती. पण आजच्या भाजपा कार्यकर्त्यांना मोदी हे व्हिसा क्रेडीट कार्ड आणि अमित शहा ही जादूची कांडी वाटते आहे. तिथून भाजपाची घसरगुंडी सुरू झाली होती. त्याचा तळ दिल्लीत गाठला गेला. म्हणूनच आज केजरीवाल यांची भाषा जितकी वास्तव आहे, तितकाच ती भाषा हा कार्यकर्ते व अनुयायांना किती उमजणार, हा गहन सवाल आहे. भाजपावाल्यांना मोदींनी इशारा समजला नाही आणि त्यांनी मागल्या आठ महिन्यात मस्तवालपणाचे प्रदर्शन घडवले, तिथे दिल्लीच्या पराभवाची निश्चिती झालेली होती. कारण तिथूनच आपल्या मित्रांना हीन लेखण्यापासून कस्पटासमान वागवण्याची प्रक्रिया सुरू झाली होती.

भाजपाला ३१ टक्के मते मिळाली तरी जागा २८३ मिळाल्या, त्याला मित्रांना मिळालेली १० टक्के मते कारण होती. त्या मित्रांशिवाय त्या ३१ टक्क्यात सव्वाशे दिडशे जागांच्या पुढे भाजपा जाऊ शकला नसता. आजही दिल्लीत केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाचा खरा पाया २५-२७ टक्केच्या पलिकडे नाही. पराभूत कॉग्रेसची १०-१५ टक्के अधिक लहानसहान पक्षांची आठ-नऊ टक्के मते मिळून ५० टक्क्यांचा पल्ला ओलांडताना, केजरीवाल ६७ जागा जिंकू शकले आहेत. त्या जागा व वाढलेली मते ह्या सदिच्छा आहेत. याचे भान त्यांनी शपथविधीनंतरच्या पहिल्याच भाषणात जाहिरपणे दाखवले आहे. तिथेच परिस्थितीचे भान आल्याची कल्पना येते. यशाने नेहमी माणसे इतकी भारावतात, की त्यांचे पाय जमीन सोडतात आणि तिथून कपाळमोक्षाची शक्यता निर्माण होते. जसजशी हवा डोक्यात जाते, तसतशी कपाळमोक्षाची खात्री स्वत:च करून घेतली जात असते. दिल्लीच्या अपयशानंतरही भाजपा नेत्यांचे पाय जमीनीला लागलेले नाहीत. म्हणूनच राज ठाकरे यांनी चितारलेले उत्तम व्यंगचित्रही आशिष शेलार या नेत्याला उमजले नाही आणि त्याने उर्मटपणाची भाषा वापरलेली आहे. त्यात भाजपा धडा शिकला नसल्याची साक्ष मिळते, तर इतक्या अपुर्व विजयानंतरही केजरीवाल धडा शिकत असल्याचा पुरावा मिळतो. मागल्या वर्षभरात आम्ही केजरीवालना इशारे देत होतो, ते त्यांच्या समर्थकांना भाजपाची प्रशंसा वाटली होती. आज त्याच केजरीवालची पाठ थोपटली, तर भाजपावाल्यांना आम्ही बाजू बदलली असेही वाटू शकते. त्याने कुठलाच फ़रक पडणार नाही. मुद्दा लोकशाहीत राजा असलेल्या मतदाराच्या निर्णायक अधिकाराचा आहे. त्याच्यापेक्षा शिरजोर होऊ बघणार्‍यांना तो इशारा देतो, तो भाजपाने आज शिकला नाही, तर बिहार व अन्य राज्यात काय वाढून ठेवले आहे, ते वेगळे सांगण्याची गरज उरणार नाही.

3 comments:

  1. Not everywhere but AAP should fight Punjab!. Yadav is right here that AAP should not limit to Delhi. Changing only Delhi would not change countries politics!

    Sorry for English. Marathi typing takes time.

    ReplyDelete
  2. एकदम जबरदस्त भाऊ……… शेवटच्या ६ ओळी मधून खूप काही सांगितलेत तुम्ही. तुमचे लेख वाचणार्या भाजपवाल्यांना हेच वाटत होते कि, तुम्ही भाजपच्या विरोधात लिहिता म्हणून.

    ReplyDelete
  3. भाऊराव,

    मोदी शाह जोडगोळी अगदीच डफ्फड नाही. मोदींना कळंत असणार की आपण गोत्यात येताहोत ते. जो माणूस आजवर नेहमी साधासुधा राहिलाय तो केवळ ओबामासमोर जायचं म्हणून स्वत:च्या नावाचा सूटकोट कसाकाय घालेल? वर त्या कोटाच्या किंमतीची माध्यमांत चर्चा होईल याचीही खबरदारी घेईल?

    एकंदरीत भाजप हरावा अशीच मोदींची नीती होती की काय असं वाटतंय. लेनिनचं विधान आठवलं : The best way to control the opposition is to lead it ourselves.

    निवडणुकीच्या सुरवातीला संघपरिवारातून प्रसृत माहितीनुसार, दिल्लीशेजारच्या मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश या राज्यांमधून ३० हजार स्वयंसेवकांना भाजपच्या मदतीला बोलावल्याचं सांगण्यात आलं; परंतु अचानकपणे या सर्व स्वयंसेवकांना माघारी घेण्यात आल्याची माहितीही देण्यात येऊ लागली (संदर्भ : http://www.esakal.com/Tiny.aspx?K=RCHLF)

    संघानेही भाजपऐवजी आआपला पसंती दिली होती की काय? नक्की काय अन्वयार्थ लावायचा यातून? काँग्रेसमुक्त भारत अभियान जोरात चालू ... ?

    आपला नम्र,
    -गामा पैलवान

    ReplyDelete