Tuesday, April 28, 2015

ही माणसे माध्यमात कशाला बसलीत?



चार दिवसांपुर्वी नेपाळमध्ये भीषण भूकंप झालेला असताना माध्यमातून जे हादरे बसत आहेत, ते प्रत्यक्ष भूकंपापेक्षा अधिक भीषण आहेत. कारण तिथे डोंगराळ भागात जाऊन पिडीत व भूकंपग्रस्तांना सोडवणे सोपे काम नाही. पण बहुतांश वाहिन्यांच्या पत्रकारांना ते ब्रेकिंग न्युज देण्याइतके सोपे काम वाटते आहे. तसे असेल तर ही मंडळी इथे कॅमेरे घेऊन अकारण बातम्या देण्यात कशाला अडकून पडली आहेत? त्यांनी बातम्या सोडून, धावत जाऊन भूकंपग्रस्तांसाठी मदतकार्य हाती घ्यायला नको काय? म्हणजे सरकारला दोष देण्यापेक्षा अधिक वेगाने लोकांना दिलासा मिळू शकेल. कदाचित एकही माणुस भूकंपात मारला जाणार नाही. किंबहूना असे लोकच सत्ता संभाळत असतील, तर देशाला अत्यंत चांगले सरकार मिळू शकेल आणि लोकांना सुसह्य जीवन गुण्यागोविंदाने जगता येईल. निदान ज्या प्रकारच्या बातम्या व चर्चा चालू आहेत, त्या बघितल्या तर असेच कोणालाही वाटू शकेल. मात्र तसे कधीच होत नाही. तसे होत असते, तर लोकांना निवडणूकीत मतदान करावे लागले नसते, की कोणा पक्ष वा नेत्याच्या नावाने बोटे मोडत बसायची पाळी आली नसती. पण दुर्दैव असे आहे, की ज्यांना जगातल्या तमाम समस्या सहज सोडवता येऊ शकतात आणि ज्यांना जगातल्या सर्वच प्रश्नांची नेमकी उत्तरे ठाऊक आहेत; अशी माणसे माध्यमात कॅमेरे लावून बसली आहेत व नाकर्त्या लोकांवर पिडितांना मदत देण्याचे काम येऊन पडले आहे. ही अर्थात नाकर्त्या राजकारण्यांची चुक नाही. वाहिन्या व माध्यमात आळशी वाचाळता करणार्‍यांची चुक आहे. आपली गुणवत्ता कुठे वापरावी त्याचीच या शहाण्यांना अक्कल नसल्याने नाकर्त्यांच्या हाती सत्तासुत्रे गेलेली आहेत. अन्यथा आपल्याला किती सुखात जीवन कंठता आले असते ना? नेपाळमध्ये भूकंप झाला नसता किंवा उत्तराखंडात त्सुनामीही आली नसती ना?

कुठल्याही गोष्ट वा घटनेला किती सनसनाटी बनवावे, याला मर्यादा असतात. माध्यमे हाती आहेत आणि कामात गुंतलेले लोक उत्तर देण्याच्या परिस्थितीत नाहीत, म्हणून हे उपटसुंभ काय काय तोंडाच्या वाफ़ा दवडतात? दोन वर्षापुर्वी उत्तराखंडात असाच त्सुनामी वादळाने हाहा:कार माजला होता. हजारो पर्यटक उत्तराखंडातल्या पर्वतराजींमध्ये फ़सलेले होते आणि तिथले प्रशासन व सरकार चक्क ढाराढूर झोपलेले होते. खुद्द मुख्यमंत्रीच जागेवर नव्हते आणि जी मदत पथके सर्वात आधी तिथे पोहोचली, त्यांना हिमाचलच्या मुख्यमंत्र्यांनी ओलिस ठेवले होते. आधी आपल्या कुटुंबियांना सुखरूप बाहेर काढायला त्यांनी जुंपले होते. अनेकजागी जिल्हाधिकारी व अन्य अधिकारी पळून गेलेले होते. अशावेळी अक्षरश: देवावर भरवसा ठेवून लोकांना आपले जीव वाचवणे भाग पडले होते. तेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी दिल्ली येथे कुठल्या बैठकीला आलेले होते. त्या संकटात मोठ्या संख्येने गुजराती पर्यटक फ़सल्याची बातमी मिळाली आणि मोदींनी तिकडे धाव घेतली. त्यांना तिथे जायला गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी प्रतिकार केला होता. तरी कुठल्याही लव्याजम्याला सोबत न घेता मोदी उत्तराखंडात पोहोचले आणि पाठोपाठ त्यांची गुजरातची आपत्ती व्यवस्थापनाची टिम तिथे आलेली होती. स्थानिक अधिकार्‍यांच्या मदतीने त्यांनी गुजरातच्या हजारो पर्यटकांना सुरक्षित जागी पाठवण्याचे नियोजन करून दिले होते. तर मोदींच्या त्या प्रयत्नांची ‘राम्बो’ म्हणून हेटाळणी करण्यात हीच माध्यमे आघाडीवर होती. कुणीतरी एक अफ़वा पिकवली, की मोदींनी एका दिवसात पंधरा हजार गुजराती लोकांची उत्तराखंडातून मुक्तता केली. त्यानंतर आकडेवारी तपासून मोदींची टवाळी करताना माध्यमातले दिवटे प्रसंगाचे गांभिर्यही विसरून गेलेले होते. पुढे ती बातमी वा माहिती अफ़वा असल्याचे निष्पन्न झाले.

मुद्दा इतकाच, की आज जे कोणी पोटतिडकीने नेपाळच्या मदतकार्यात त्रुटी असल्याचे सांगण्यासाठी आपली बुद्धी पणाला लावत आहेत, तेच तेव्हा मोदींच्या टवाळी करण्यात गर्क होते आणि हजारो लोकांचा बळी पडल्याचेही त्यांना भान नव्हते. यापैकी कितीजणांना भूकंपाविषयी जाण आहे? गुजरातचा भूकंप जगभर गाजला. त्यात हजारो लोकांचा बळी गेला होता आणि त्याचे पुनर्वसन करण्याचे काम मुख्यमंत्री होताच मोदींना हाती घ्यावे लागले होते. त्यांनी मोठ्या निष्ठेने ते काम इतके उत्तम करून दाखवले, की राष्ट्रसंघानेही मोदींच्या गुजरात सरकारची वहावा केलेली होती. त्यानंतर मोदींनी प्रयत्नपुर्वक गुजरात सरकारची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अशी उभी केली, की जगात त्याला मान्यता मिळालेली आहे. किंबहूना त्यामुळेच उत्तराखंडात संकट आले, तर तिथे फ़सलेल्या गुजराती नागरिकांना मदत द्यायला विनाविलंब मोदी धाव घेऊ शकले होते. बाकीच्या मुख्यमंत्र्यांनी तेव्हा केंद्राकडे हात पसरले होते. आज तोच गुजरातचा माजी मुख्यमंत्री देशाचा पंतप्रधान आहे आणि कालपरवाच त्याच्या सरकारने युद्धग्रस्त येमेनमधून हजारो नागरिकांना सुरक्षित बाहेर काढले आहे. ते काम एका दिवसात झाले नाही आणि फ़क्त भारतीयांपुरते झाले नाही. जगातल्या ४३ देशांच्या फ़सलेल्या नागरिकांना येमेनमधून सुखरूप बाहेर काढण्याचा पराक्रम मोदी सरकारने करून दाखवला आहे. त्याचे जगभर कौतुक होत असताना त्यातला हिरो असलेल्या राज्यमंत्री व्ही. के. सिंग याची हेटाळणी करण्यात हीच माध्यमे रमलेली होती. आज त्यांना भूकंपग्रस्तांच्या मदतीची चिंता ग्रासते आहे, मग महिनाभर आधी येमेनमध्ये फ़सलेल्यांच्या मदतीसाठी यापैकी कोणीच अश्रू कशाला ढाळलेले नव्हते? माध्यमांचे आजचे अश्रू खरे मानायचे, की महिनाभर आधी येमेनप्रकरणी दाखवलेली उदासिनता खरी म्हणायची? प्रेताच्या टाळूवरील लोणी खाणे वेगळे असते काय?

पहिली बाब म्हणजे नेपाळ हे स्वतंत्र राष्ट्र आहे आणि तिथे भारताला कितपत परस्पर निर्णय घेऊन कामे करता येतील, याला मर्यादा आहेत. तिथले सरकार व प्रशासन पुर्णपणे ढासळून पडलेले आहे. अशा वेळी माहिती अभावी मदतकार्य वेगाने होऊ शकत नाही. स्थानिक भूप्रदेशाची माहिती, खाचखळगे ठाऊक असल्याशिवाय पुढे जाता येत नसते. भूकंपात कुठले भाग ढासळले आहेत, गडप झाले आहेत, त्याचा अंदाज घेतच पुढे सरकावे लागते. मोबाईल संदेश पाठवावे किंवा उपग्रहामार्फ़त चित्रण थेट प्रक्षेपित करावे, तसे भूकंपपिडीतांच्या मदतीचे काम होऊ शकत नाही. कारण ते चित्रण नाही, तर वास्तविक संकट आहे आणि त्याच्या निवारणाआठी साधनांची गरज असते. अशी साधने आकाराने व वजनानेही मोठी असतात. त्यांची नेआण करायला विमाने वापरायची, तरी त्यांना टेकायला काही सपाट सुरक्षित जमीन लागते. यापैकी कशाचे तरी भान माध्यमातल्या शहाण्यांना आहे काय? वातानुकुलीत केबिनमध्ये बसून तोंडाची वाफ़ दवडण्याइतके हे काम सोपे नसते. एक पाऊल चुकले, तर माणुस दरीत कोसळतो आणि एक किरकोळ फ़ांदी आडवी आली तर हेलिकॉप्टर कोसळण्याचा धोका असतो. असे अपघात मदतकार्यात होतात. म्हणजेच मदतकार्य करणार्‍यांना जीवावरचा धोका पत्करून काम करावे लागत असते. त्याचा अभ्यास करून कागदावरचे निर्णय घ्यायचे नसतात किंवा मतप्रदर्शन करायचे नसते. किंबहूना वाचाळ शहाणपणा तिथे कामाचा नसतो, तर जबाबदारीने कामे उरकावी लागतात. टिका करणे व दोष दाखवण्यात गैर काहीच नाही. पण उठसुट नुसतेच दोष काढत बसणे व परिस्थितीचे भान सुटणे, संकटापेक्षा घातक असते. असे लोक प्रत्यक्ष भूकंपापेक्षा त्या संकटात लोकांना भयभीत करून सामान्य जनतेला खाईत लोटायचे काम करतात. लोकांना धीर देण्याच्या वेळी भयभीत करणे हा निव्वळ बेजबाबदारपणा आहे.

3 comments:

  1. अगदी सहमत भाऊ. भारतीय माध्यमातील सिक्युलरांची कीड कधी संपणार असे वाटते. आजच्या सिएनएनच्या मुख्य पानावर भारत नेपाळला कशी मदत करत आहे याचे भरभरुन कौतुक आहे. आज भारतातल्या प्रमुख दैनिकांची व माध्यमांची संकेतस्थळे पाहिली तर लक्षात येते त्यांनी या मदतीचा कुठेही उल्लेख केला नाही. उलट राहुलचे फोटो दोन तीन संकेतस्थळांवर दिसले. आता यावर काय बोलणार?
    http://www.cnn.com/2015/04/28/asia/flight-delhi-nepal-earthquake/

    ReplyDelete
  2. भाऊ , आपण ज्याचा फोटो इथे टाकला आहे त्या न पत्रकाराबद्दल एक संतापजनक घटना आठवते . २७/११ च्या दिवशी ताज चे media coverage जोरात चालू होते. तेव्हा काही chanells वर बातमी आली कि सुरक्षेच्या कारणासाठी police /सुरक्षा दले काही तासांसाठी live प्रसारणावर थांबवू इच्छी तात . हि बातमी घेऊन रा रा अर्णब गोस्वामी यांनी प्रचंड आवाज लावला . " This is the darkest day in the history of Indian journalism /media " इत्यादी . बहुधा असल्या दबावाखाली येउन तो निर्णय मागे घेतला गेला काय कोट जाने . पण live coverage चालूच राहिले .

    अतिरेक्यांचे पाकिस्तानातील handlers , हेच live coverage बघून त्यांना मार्गदर्शन करत होते हे नंतर उघड झाले .

    असल्या पत्रकारांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल का होऊ शकत नाही ??

    ReplyDelete
  3. namaskar bhau,
    tumache lekh roj wachato....
    thet boltat tumhi.... khup bhawata...

    so call leader suttivarun parat birat aali ki kiti gajawaja karto tyancha paksh.... lagech aata amache saheb sakriya bikriy honaar .. asali tukar statement kartat........ pan yudha tun 4500 lokana sukharup gheun sodawun analyachi sadhi charcha dekhil hot nahi aani zalich tar ti sudha erandel pyaylelya sarakha chehara karun.

    shokantika aahe saheb....


    General Singhanchya hya karya baddal marathi madhye kuthe kahi wachayala milel ka? net war shaodhal pan sagali kade trotak mahiti aahe aani ti sudha engraji madhye....


    baki lihita mast

    ek number

    ReplyDelete