Sunday, February 7, 2016

दाऊद, म्हशी आणि आझमखान



मुलायम सिग यादव यांच्या समाजवादी पक्षाचे एक ज्येष्ठ नेता म्हणून आझमखान ओळखले जातात. त्यांनी आजवरच्या राजकारणात वादग्रस्त विधाने करण्यातूनच नाव कमावले आहे. कधी चुकून समजूतदार वक्तव्य केले, म्हणून आझामखान यांना प्रसिद्धी मिळाली असे होऊ शकलेले नाही. किंबहूना समाजवादी पक्षात असेच नमूने मुलयमनी गोळा केलेत, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. म्हणूनच आझमखान यांनी केलेले नवे विधान वा आरोप, गंभीरपणे घेण्याची गरज नाही. पण त्यांच्या विनोदबुद्धीला दाद तर द्यायला हवी ना? मागल्या नाताळच्या मुहूर्तावर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला धावती भेट दिली होती. तिथले पंतप्रधान नवाज शरीफ़ यांच्या घरच्या खाजगी कार्यक्रमासाठी मोदी वाट वाकडी करून काही तासांसाठी लाहोरला गेले आणि मगच मायदेशी परतले होते. त्यावरून तेव्हाच गदारोळ झाला होता. कारण त्या धावत्या भेटीविषयी कमालीची गोपनीयता पाळली गेली होती. मग त्याबद्दल खुप आवया व अफ़वाही पसरल्या होत्या. पण एव्हाना तो विषय मागे पडला आहे. मात्र पंजाबच्या पठाणकोट येथे पाक जिहादींनी हल्ला केल्यावर मोदींची हेटाळणी करण्यासाठी त्या पाकभेटीचा अगत्याने उल्लेख बहुतेक व्रिरोधकांनी केला होता. मात्र पुन्हा तो विषय विस्मृतीत गेला. त्याला आझमखान यांनी नवा उजाळा ताज्या वक्तव्यातून दिला आहे. त्यांच्या मते मोदी तिथे भारतात फ़रारी असलेल्या दाऊद इब्राहीमला भेटले होते. अर्थात हे आझमखान यांचे मत नसून त्यांच्यापाशी त्याचे सज्जड पुरावे आहेत. त्या भेटीचे फ़ोटोही असल्याचा दावा खान यांनी केला आहे. म्हणूनच त्यांच्या विनोदबुद्धीला दाद द्यावी लगते. कारण आजकाल कोणाचेही कोणाही सोबत कुठल्याही स्थितीतले फ़ोटो उपलब्ध करण्याचे तंत्र आलेले आहे, याचे आझमखान यांना भान नसल्याचे दिसते.

मोदी लाहोरला मैत्रीसाठी शरीफ़ यांच्या घरगुती समारंभात हजेरी लावायला गेले. त्यासाठी त्यांच्यावर कडाडून टिका झालेली आहे. त्यातला शिष्टाचार वा वैधताही शोधली गेली आहे. त्यातले यशापयशही तपासले गेले आहे. पण दाऊद-मोदी भेटीचा संशयही कोणी व्यक्त केला नव्हता. तशी किंचीतही शक्यता असती, तर भारतीय माध्यमे वा पाकिस्तानी पत्रकार गप्प बसले नसते, हे वेगळे सांगायला नको. कितीही सुरक्षा राखली गेली असली तरी त्या भेटीचे अनेक फ़ोटो व चित्रण लोकांसमोर आलेले आहे. शिवाय जिथे जाहिर समारंभ चालू असतो, तिथे होणार्‍या भेटीगाठींचे हल्ली अखंड चित्रण चालू असते. तेव्हा चोरून वा मुद्दाम फ़ोटो काढण्याचा जमाना आता अस्तंगत झाला आहे. मग आझमखान यांनी फ़ोटो कुठून मिळवले, असा प्रश्न पडतो. तसा फ़ोटो नसेल अशी शक्यता ठामपणे नाकारता येणार नाही. पण त्या फ़ोटोच्या खरेपणाची खात्री कोणी देवू शकणार नाही. कारण तंत्रज्ञानाच्या मदतीने तसे खरे भासू शकणारे तद्दन भ्रामक फ़ोटो तयार करता येतात. कोणीतरी आझमखान यांच्या बरळण्याचा लाभ उठवण्यासाठी त्यांना तसे फ़ोटो बनवूनही दिलेले असू शकतील. पण जबाबदार पदावर असलेल्या आझमखान यांनी त्यावर किती विश्वास ठेवून जाहिर बोलावे? तर आझमखान तसे संयमासाठी प्रसिद्धच नाहीत. म्हणूनच त्यांनी हाती आलेल्या बनावट फ़ोटोच्या आधारे असे विधान केलेले असू शकते. कारण तर्कबुद्धी व व्यवहारी शहाणपणा त्यांच्यापाशी अजिबात नाही. कुठलेही वादग्रस्त विधान करणे व आपल्याला विचारलेल्या प्रश्नाला हुलकावणी देण्यात ते वाकबगार आहेत. म्हणूनच त्यांनी इतकी ‘मोठी मजल’ मारली आहे. पण असे वक्तव्य करताना क्षणभर तरी त्यांनी तर्काशी सांगड घालण्याचा प्रयत्न करायला हरकत नव्हती. मोदींना पाकमध्ये जाऊन दाऊदला भेटण्यातून काय साधणार होते?

जो माणूस पाकिस्तानात असल्याचा भारताचा आरोप आहे आणि त्याच्यावर कठोर कारवाई करावी, असा भारताचा जागतिक व्यासपीठावरचा आरोप आहे, त्याला देशाचा पंतप्रधान लपलेल्या जागी जाऊन कशाला भेटू शकतो? भेटलाच तर त्यातून काय साध्य करू इच्छितो? दाऊद तरी मोदींना काय अशी मदत करू शकतो, की त्याची मनधरणी करण्यासाठी मोदी शिष्टाचार मोडून पाकिस्तानात जातील? जिथे मोदींना सर्वात मोठा जीवाला धोका आहे, तो पत्करून दाऊदला भेटण्यातून मोदींना असे काय साधाणार होते? इत्यादी प्रश्न संभवतात. पण ते प्रश्न मनाला पडण्यासाठी माणसापाशी सामान्य बुद्धी असायला हवी. आझमखान हे असामान्य बुद्धीचे गृहस्थ आहेत. शिवाय समाजवादी पक्षाचा मुस्लिम चेहरा आहेत. सहाजिकच त्यांना सामान्य बुद्धीने विचार करण्याची मोकळीक नसते. कविता कृष्णन नावाच्या एक पुरोगामी महिलाही अशा असामान्य बुद्धीच्या आहेत. म्हणूनच आपल्या कन्येचा फ़ोटो काढून पंतप्रधानांना पाठवण्याच्या विरोधात बरळल्या होत्याच ना? आझमखान त्यांच्याच वंशावळीतले गृहस्थ आहेत. तेव्हा त्यांच्याकडून यापेक्षा वेगळी अपेक्षा बाळगता येत नाही. पण जेव्हा देशाच्या पंतप्रधानावर नामवंत म्हटली जाणारी माणसे असे काही बोलतात, तेव्हा त्यांना गंभीरपणे फ़ैलावर घेण्य़ाइतका बुद्धीवादही देशात शिल्लक उरलेला नसला, मग दुसरे काय व्हायचे? कोणीही काहीही बरळण्याला अविष्कार स्वातंत्र्य वा संहिष्णूता ठरवले गेल्यावर, असे प्रकार नित्यनेमाने व्हायचेच. आझमखान त्याच विकृत स्वातंत्र्याचे एक बळी आहेत. अन्यथा प्रसिद्धीच्या हव्यासापोटी त्यांनी तरी असली बकवास कशाला केली असती? ज्यांचे गुरूदेव मुलायमसिंग यांनी बलात्कार ही कोवळ्य़ा वयात मुलांकडून होणारी चुक असल्याचा पुरोगामी शोध लावलेला आहे, त्याच्या शिष्याकडून काय अपेक्षा करावी?

दोनतीन वर्षापुर्वी उत्तरप्रदेशात गुन्हेगारी शिगेला पोहोचली असल्याचा ओरडा चालू होता. एकदोन पोलिस अधिकार्‍यांच्याही हत्या झाल्या असताना त्याचा शोध लागू शकला नव्हता. इतकी कायदा व्यवस्था डबघाईला आलेली असताना व लोक जीव मुठीत धरून जगत असताना, तिथले पोलिस कशाचा कसून तपास घेत होते? त्यावर काहुर माजलेले होते. आझमखान यांच्या खानदानी घराच्या गोठ्य़ातून काही म्हशी चोरीला गेल्याचा गवगवा झाला होता. त्या म्हशी चोरीला गेल्याची बातमी झाली नव्हती. तर स्थानिक पोलिस यंत्रणा सर्व कामे बाजूला ठेवून म्हशींच्या शोधात गढल्याने बातम्या झळकल्या होत्या. तर आपल्या म्हशींची काळजी ज्यांना घेता येत नाही, अशी आझमखान यांची ख्याती आहे. आपल्या घरात वा गोठ्यात काय होते, याचा ज्याला थांगपत्ता नसतो, त्याने पाकिस्तानच्या कुठल्या शहरात वा गावामध्ये कोणाच्या भेटी घेतल्या, याविषयी बोलणे किती विनोदी असेल ना? मोदी पाकिस्तानात वा लाहोरला जाऊन कोणाला भेटले वा कोण त्यांना भेटले, त्यांचे फ़ोटो मिळवू शकणार्‍या माणसाला उत्तर प्रदेशची पोलिस यंत्रणा म्हशींचा शोध घेण्यासाठी राबवावी लागेल काय? पाकिस्तानातून गोपनीय फ़ोटो मिळवू शकणार्‍याला गावात नुसता फ़ेरफ़टका मारून आपल्या म्हशींचा वास काढता आला असता ना? पण तेही ज्याला शक्य झाले नाही, त्याने आज असल्या फ़डतूस वल्गना करणे हास्यास्पद आहे. पण भारतात त्यालाच सध्या कमालीची तेजी आहे. मोदी विरोधात काहीही बरळावे, कोणतेही आरोप करावेत, त्यावर माध्यमे तुटून पडतात. म्हणून असे विनोद निर्माण होत असतात. म्हणून आझम खान यांना राजकारण सोडून कॉमेडीयन व्हायचा मोह आवरला नसेल ना? त्याच आझमखान यांना पुरोगामी म्हणून व्यासपीठावर अनेक सेक्युलर नेते गळाभेट करतात. पुरोगामी शब्द त्यामुळेच हास्यास्पद व विनोदी होत गेला आहे.

4 comments:

  1. हास्यास्पद बाबा आजम खान आणि तेवढेच हास्यास्पद त्यांचे पुरोगामीत्व.

    ReplyDelete
  2. असामान्य हास्यास्पद आजम खान; भाऊ

    ReplyDelete
  3. बेभरवशी आझमखानच्या म्हशीचा बिनडोक टोणगा अत्यंत समर्पक शब्दात मांडल्या बद्दल भाऊ धन्यवाद !!!

    ReplyDelete
  4. aaZAMKHAN HYANA JAR HE PHOTO KIMVA BATMAYA KONI PURAVAT ASEL TAR TYACHA ARTH TYANCHYE CONTACTS PAKISTANANT AAHET ASSACH HOTO JYATUN TYANI PANTPRADHANANVAR HERGIRI KELI AAHE ASE SIDDHA HOU SHAKATE.
    aSHA PARDESHI "CONTACTS" ASANARYANNA KAAY MHANAVE HE JAHIR AAHE. BHAU TYAVAR KAHEE BOLAT NAAHEE KA?

    ReplyDelete