आणखी सहा महिन्यांनी अमेरिकेच्या भावी अध्यक्षांची निवड व्हायची आहे. त्यासाठी दोन्ही प्रमुख पक्षांच्या उमेदवार निवडीची प्रक्रिया सुरू आहे. हा प्रकार काहीसा मजेशीर असतो. जे कोणी त्या पदासाठी इच्छुक असतील, त्यांना आपापल्या पक्षाची उमेदवारी मिळवण्यासाठी आधी खुप आटापिटा करावा लागतो. २००८ मध्ये माजी अध्यक्षांच्या पत्नी हिलरी क्लिंटन मैदानात उतरल्या होत्या आणि त्यांनाच डेमॉक्रेटीक पक्षाची उमेदवारी मिळणार असे गृहीत धरले जात होते. पण अकस्मात त्या शर्यतीत सिनेटर ओबामा उतरले आणि त्या लढतीचा चेहरामोहराच बदलून गेला. ते दोन्ही उमेदवार एकदम वेगळे होते. हिलरी ह्या प्रथमच महिला उमेदवार म्हणून पुढे आल्या होत्या आणि ओबामा हे गौरेतर उमेदवार म्हणून पहिलेच होते. त्यांच्या लढतीमध्ये इतका धुरळा उडाला, की अखेरच्या टप्प्यात हिलरींनी माघार घेतली आणि पुढे ओबामा यांच्या सरकारमध्ये परराष्ट्रमंत्री म्हणूनही काम केले. मात्र दुसर्यांदा ओबामा निवडून आले, तेव्हा हिलरी बाजूला झाल्या आणि चार वर्षे आधीच त्यांनी २०१६ च्या अध्यक्षीय निवडणूकीची तयारी सुरू केली होती. प्रत्यक्षात ती लढत आता रंगात आली आहे. अनेक उमेदवार पुन्हा मैदानात आले आणि त्यात हिलरी आघाडीवर आहेत. रागरंग बघता, त्यांनाच यावेळी डेमॉक्रेटीक पक्षाची उमेदवारी मिळेल असे दिसते. मात्र अजून एक स्पर्धक त्यांच्याशी टक्कर देत आहे. दुसरीकडे रिपब्लिकन पक्षाने मागल्या दोन लढतीमध्ये मार खाल्ला होता. कारण त्यांना ओबामांशी झुंज देऊ शकेल, असा उमेदवारच मिळाला नव्हता. यावेळी अकस्मात डोनाल्ड ट्रंप नावाचा आक्रमक उमेदवार त्या पक्षात समोर आला आहे आणि त्याने स्वपक्षासह अनेक राजकीय नेते व अभ्यासकांची झोप उडवून दिली आहे. ट्रंप फ़टकळ आणि आक्रमक म्हणून ओळखले जातात. पण अजून तरी तेच स्वपक्षात आघाडीवर आहेत.
रिपब्लिकन पक्षात उमेदवारीची झुंज सुरू झाली आणि जे आठदहा स्पर्धक मैदानात आले, त्यातले फ़ारसे टिकू शकले नाहीत. त्यातला चमत्कारीक असा उमेदवार म्हणजे डोनाल्ड ट्रंप होय! त्या पक्षाच्या विद्यमान नेत्यांमध्येही ट्रंप यांचे अनेक विरोधक आहेत आणि ट्रंप यांना पक्षाची उमेदवारी मिळू नये, म्हणून पक्षांतर्गत अनेक कारस्थानेही चालू आहेत. प्राथमिक प्रचाराच्या रणधुमाळीत या माणसाने फ़टकळपणा व आक्रमक भूमिका घेताना, अनेक समाजसमुह वा घटकांना दुखावले असे म्हटले जाते. पण दुसरी बाजू अशी, की अन्य रिपब्लिकन इच्छुकांपेक्षा ट्रंप यांना वाढता कौल मिळालेला दिसतो आहे. किंबहूना त्यांनी अन्य स्पर्धकांना मागे टाकून मोठीच आघाडी घेतली आहे. त्यामुळे काहीही झाले तरी ट्रंपच रिपब्लिकन उमेदवार होणार, असे मानले जात आहे. पण जनतेचा पाठींबा पुरेसा नसतो. पक्षातल्या बुजुर्ग प्रतिनिधींचा कौलही पारडे फ़िरवू शकतो. लोकमताचा कौल मिळवून ट्रंप यांनी मात केल्यास त्यांना पक्षाच्या प्रतिनिधींकडून पराभूत करायचे व पक्षाची उमेदवारी मिळू द्यायची नाही, असाही प्रयत्न आहे. त्याची चाहुल लागल्याने फ़टकळ ट्रंप यांनी पक्षालाही दमदाटी करण्यास मागेपुढे बघितलेले नाही. आपल्याला पक्षातून विरोध झाल्यास पक्ष सोडून स्वतंत्र उमेदवार म्हणूनही अध्यक्षीय लढतीमध्ये उतरण्याची शक्यता ट्रंप यांनी आधीच बोलून दाखवली आहे. आजवर असे कधी झालेले नाही. दोन प्रमुख पक्ष असून त्यांच्याच उमेदवारात लढत होते. तिसरा उमेदवार नसतो. ही निवडणूक प्रक्रिय़ाही थेट मतदानाची नसते. त्यामुळेच तिरंगी लढत झाली तर काय होईल, याचा अंदाज कोणी बांधू शकत नाही. मात्र ट्रंप यांनी जे वादळ उभे केले आहे, त्याने राजकारणीच नव्हेतर अभ्यासकांचीही झोप उडवली आहे. कारण ट्रंप जसे बोलतात व वागतात, त्यामुळे त्यांच्याकडे माथेफ़िरू म्हणूनच बघितले जाते.
वरकरणी लोकमताने अमेरिकेचा अध्यक्ष निवडून येतो असे मानले जात असले, तरी नुसत्या मतांनी ही निवड होत नसते. अध्यक्षीय उमेदवार निश्चीत झाले, मग त्यांचे राज्यवार प्रतिनिधी नेमले जातात. प्रत्यक्ष मतदान त्या प्रतिनिधींना केले जाते. म्हणजे २० नोव्हेंबरच्या प्रत्यक्ष मतदानाने अध्यक्षीय मतदारसंघ निवडला जातो. नंतर त्यांचे मतदान होऊन रितसर अध्यक्ष निवडला जातो. मतदानात ज्या उमेदवाराला त्या राज्यात पन्नास टक्केहून अधिक मते पडली असतील, त्याचे त्या राज्यातले सर्व प्रतिनिधी निवडले गेले, असे मानले जाते. तर विरोधातल्या उमेदवाराने ते राज्य गमावले असे मानले जाते. असे प्रतिनिधी कोणाचे किती निवडून आले. त्यावर मग कोण अध्यक्ष झाला, हे आधीच ताडले जाते. त्यालाच नियुक्त अध्यक्ष म्हणून मानले जाते. पण प्रत्यक्ष प्रतिनिधींचे मतदान पुर्ण होईपर्यंत तो अध्यक्ष होत नसतो. अशी प्रक्रीया आहे. त्यामुळे आज जशा उमेदवारीसाठी प्रचारसभा व मोहिमा चालू आहेत, तशा देशव्यापी मोहिमा होतात. तेव्हा पक्ष सर्वशक्तीनिशी आपल्या उमेदवाराच्या मागे उभा रहातो. रिपब्लिकन पक्षातच ट्रंप यांना विरोध असेल, तर त्यांना तेवढ्या शक्तीनिशी लढता येणार नाही. उलट पक्षातून दगाबाजी होऊन हिलरींना जिंकणे सोपे होईल, असे अनेकांचे मत आहे. पण ट्रंप यांचा झंजावात बघितला, तर हा माणूस सुखासुखी पराभव मानणारा नाही. त्यात त्याने तिसरा किंवा स्वतंत्र उमेदवार म्हणून उभे रहायचे ठरवले, तर काम अवघड आहे. कारण मग पन्नास टक्के मतदान वा पाठींबा पहिल्याच फ़ेरीत कुठला उमेदवार मिळवू शकणार नाही आणि निवडणूक प्रक्रीया गुंतगुंतीची होऊन जाईल. शिवाय पक्षाने ट्रंप यांची उमेदवारी एकदिलाने मान्य करून लढायचे ठरवले, तर हिलरींना कुठल्या थराला जाऊन लढावे लागेल, त्याचा नेम नाही. त्यामुळेच अवघे अमेरिकन राजकीय विश्व थक्क होऊन या माणसाकडे बघते आहे.
अर्थात सध्या जगभर बदलाचे वारे वहात आहेत, ते विसरून चालणार नाही. १९८० सालात अशीच काहीशी प्रतिक्रीया तेव्हाचे रिपब्लीकन उमेदवार रोनाल्ड रेगन यांच्याविषयी होती. मुळचा अभिनेता असलेले रेगन राजकीय मैदानात उतरले आणि सर्वांना धक्का बसला होता. मग ती गव्हर्नर पदाची निवडणूक जिंकलेल्या रेगन यांनी कठोरपणे कारभार करताना कॅलिफ़ोर्नियाची आर्थिक घडी बसवली होती. म्हणूनच त्यांचे अध्यक्षीय पदासाठी नाव पुढे आले आणि लागोपाठ दोनदा त्यांनी ते पद जिंकले होते. पण तेव्हाही आपल्या आक्रमक शैलीने त्यांनी उदारमतवादी राजकारणी व अभ्यासकांना चिंतेत टाकले होते. रेगन तिसरे महायुद्धही सुरू करतील, अशी भिती तेव्हा व्यक्त झाली होती. पण प्रत्यक्षात तसे काही झाले नाही. प्रचारात आक्रमक असलेले रेगन अध्यक्ष झाल्यावर तुलनेने खुपच सौम्य वागले होते आणि सोवियत राजकारणाशी त्यांनी समर्थपणे लढत दिली होती. किंबहूना त्यांच्याच कारकिर्दीत जागतिक राजकारणातून रशियाचा दबदबा संपत गेला आणि सोवियत युनियन खिळखिळे होण्याची प्रक्रीया सुरू झाली होती. अमेरिका समर्थ असली पाहिजे, अशा आग्रहाचे रेगन पाठीराखे होते आणि आज तीच भाषा डोनाल्ड ट्रंप सतत बोलत असतात. त्यांना लोकांचा मिळणारा पाठींबा म्हणूनच वेगळ्या संदर्भाने समजून घेतला पाहिजे. उदारमतवादाचा अतिरेक व ढासळलेली अमेरिकन अर्थव्यवस्था, ह्यावर ट्रंप यांचा हल्लाच लोकांना भावतो आहे. त्यामुळे ट्रंप लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचले आहेत. पण प्रचारात आक्रमक होताना जितके बोलले जाते, तितके जबाबदार पदावर आल्यानंतर वागले जात नाही, हा जगभरचा अनुभव आहे. म्हणूनच ट्रंप आज काय बोलतात, त्यावरून त्यांचे मोजमाप करणे योग्य नाही. पण बुश यांच्या नंतरचे समर्थ रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार म्हणून तेच एकमेव आहेत, हे नाकारण्यात अर्थ नाही.
भाऊ धन्यवाद. एका वेगळया लेखाकरीता.
ReplyDeletehttp://www.web-value.net/jagatapahara.blogspot.in
ReplyDeleteइथे अस म्हटलय की वार्षीक १३८० डॉलर इतके उत्पन्न मिळू शकेल.
ट्रंप अध्यक्ष झालेतर भारतावर काय परिणाम होइल?
ReplyDelete