Friday, May 13, 2016

केजरीवाल बेमिसाल

दिल्ली विधानसभेच्या निवडणुकात केजरीवाल यांनी एक छान घोषणा दिलेली होती. ‘पाच साल केजरीवाल’! त्याचे कारण होते आधीच्या विधानसभेत मुख्यमंत्री होऊनही त्यांनी उतावळेपणाने दिलेला राजिनामा. त्यामुळे आपण यावेळी गंभीरपणे कारभार करू, असे आश्वासन त्यांनी दिलेले होते. म्हणूनच पाच साल टिकून रहाण्याची हमी त्यांनी दिली, तेव्हा उत्तम कारभार करण्याचे आश्वासन दिलेले होते. पण स्वभाव धरसोडपणाचा असल्याने शांतपणे कुठलेही काम करण्याचे या माणसाला वावडे आहे. म्हणून तर त्यांच्या पक्षातले त्यांचेच सहकारी नित्यनेमाने आरोप करून बाहेर पडत गेले आहेत. जे बाहेर पडले नाहीत, पण प्रश्न विचारतात, त्यांना केजरीवाल यांनी मारेकरी घालून बाहेरचा रस्ता दाखवलेला आहे. मग एक वर्ष कारकिर्दीला पुर्ण झाल्यावर केजरीवाल यांनी आपलीच टिमकी वाजवणार्‍या जाहिरातींचा रतिब घालून ‘पहिला साल बेमिसाल’ अशी घोषणाबाजी केली. बहुधा देशातला हा पहिला मुख्यमंत्री वा सरकार असे असावे, की ज्याच्या जाहिरातबाजीला कोर्टाने चाप लावला. लोकांचा पैसा उधळला जातो, म्हणून आंदोलन पुकारून सार्वजनिक जीवनात आलेल्या या माणसाने आपल्याला काही नको म्हणून केलेली नाटके लोक विसरलेले नाहीत. बंगला गाडी नको म्हणत राजकारणात येऊन, सार्वजनिक पैशाची सर्वाधिक लूटमार करण्याचे निर्णय घेण्याची तत्परता केजरीवाल यांनीच दाखवली होती. एका फ़टक्यात त्यांनी आमदार व लोकप्रतिनिधींच्या वेतनात ५०० टक्के वाढ संमत करून घेतली. पण महापालिका कर्मचार्‍यांना पगार द्यायला पैसे नाहीत, म्हणून दिल्लीत तेव्हा कचर्‍याचे ढिग साचलेले होते. ही ज्याची ख्याती आहे त्याने आता नवी टुम काढली आहे. मोदी पंतप्रधान असूनही सोनियांना घाबरतात. त्यांची हिंमत असेल तर मोदी सरकारने सोनियांना अटक करून दाखवावी, असे आव्हान केजरीवाल यांनी दिले आहे. कायदा ह्या माणसाला गंमत वाटते काय?
सोनियांवर आजकाल अनेक आरोप होत आहेत. तसेच आरोप अनेकांवर अनेकदा झालेले आहेत. पण कोणालाही नुसत्या आरोपासाठी बेछूट अटक सहसा होत नाही. जे आरोप होतात, त्याचा तपास होतो आणि पुरावे गोळा केल्यावरच अटकेपर्यंत मजल जात असते. मनात आले म्हणून कोणाला अटक केली जाऊ शकत नाही. मग ती करणार्‍याच्या हाती कितीही मोठी सत्ता असो किंवा अधिकार असो. त्यावरून कुठल्या सत्ताधार्‍याच्या हिंमतीची गणती होत नसते. हे अर्थातच केजरीवाल किंवा त्यांच्या आम आदमी पक्षाला कळत नाही, असे अजिबात नाही. कळत नसते, तर गोष्ट वेगळी होती. हिंमतीचीच गोष्ट असेल, तर मग केजरीवाल व त्यांचा आम आदमी पक्ष सर्वात डरपोक म्हणावा लागेल. कारण राजकारणात उतरल्यापासून व दिल्लीच्या विधानसभा पहिल्यांदा लढवताना, केजरीवाल यांनी सतत माजी मुख्यमंत्री शीला दिक्षीत यांना लक्ष्य केले होते. तीनचारशे पानांचे आरोपपत्र सभांमधून फ़डकावत आपल्या हाती सत्ता आल्यास शीला दिक्षीत यांना विनाविलंब गजाआड टाकण्याची भाषा तेव्हा हेच केजरीवाल सदोदित बोलत होते. विविध प्रकरणात दिक्षीत कशा भ्रष्ट व गुन्हेगार आहेत, त्याची किर्तने केजरीवाल यांनी केलेली होती. पण सत्ता मिळाली त्यानंतर हे महाशय ती गोष्ट विसरून गेले. जेव्हा त्यासाठी विचारणा झाली, तेव्हा हिंमतीच्या गोष्टी विसरून केजरीवाल पुरावे मागू लागले. म्हणजे लोकांकडून मते मागताना त्यांनी फ़डकावलेले कागदपत्रे पुरावे, निव्वळ थापेबाजी नव्हती काय? पहिल्यांना मुख्यमंत्री झाले, तेव्हा त्यांनी दिक्षीतांना अटक करण्यात टंगळमंगळ केल्यास समजू शकते. कारण कॉग्रेसच्या पाठींब्यावर ते सत्तेत बसले होते. आज त्यांच्यापाशी प्रचंड बहूमत आहे. मग अजून शीला दिक्षीत बाहेर कशा? साधी त्यांची चौकशीही केजरीवाल यांनी कशाला केलेली नाही? की निवडणूकीपुर्वीची हिंमत केजरीवाल गमावून बसले आहेत?
आधीच मर्कट त्यात मद्य प्याला असे म्हणतात. तशी केजरीवाल यांची स्थिती आहे. राजकारणात त्यांना अफ़ाट प्रसिद्धी मिळाली आणि अन्य कारणाने दिल्लीमध्ये विधानसभेत त्यांना यशही मिळाले. पण ते पचवण्याची कुवत त्यांच्यापाशी नाही. मुंबईसारख्या एका महानगराचा महापौर असण्यापेक्षा दिल्लीच्या मुख्यमंत्र्याची कुवत नाही. पण तरीही पद मुख्यमंत्र्याचे असल्याने केजरीवाल किती बरळत असतात? देशातल्याच नव्हेतर जगातल्या कुठल्याही घटनेवर त्यांना प्रतिक्रीया देण्याचा मोह आवरत नाही. ऑगस्टा वेस्टलॅन्ड हे प्रकरण किरकोळ नाही. अशा विषयात काय बोलावे, याचे भान प्रत्येकाने ठेवायला हवे. ज्यांनी या संदर्भात आरोपबाजी केली आहे, त्यांनीही अजून सोनियांना अटक करण्याची मागणी केलेली नाही, तर चौकशी व तपासाचा आग्रह धरला आहे. कारण काही ठोस पुरावे असल्याशिवाय खटला भरता येत नाही, की चालविता येत नाही. मग जो खटला भरणे वा चालविणे अशक्य आहे, त्या संदर्भात थेट अटकेची भाषा हास्यास्पद नव्हे काय? जंतरमंतर येथे गर्दी जमवून धरणे वा घोषणाबाजी करणे आणि सरकार चालवणे यात मोठा फ़रक असतो. पण अजून केजरीवाल यांना त्याचे आकलन झालेले नाही. म्हणूनच त्यांच्याच अधिकारी व्यक्तीला अटक झाली व धाड घालण्यात आली, तेव्हा याच माणसाचे कांगावा केलेला होता. विविध प्रकरणात कोर्टाने यांचे कान उपटलेले आहेत. अशा माणसाने उठून सोनियांना अटक करून मोदींना हिंमत दाखवण्याचे आव्हान द्यावे, यासारखा दुसरा विनोद नाही. तसे असते तर केजरीवाल यांनी शीला दिक्षीत यांना कधीच अटक करून आपली हिंमत दाखवली असती. इतरांकडे त्याचे पुरावे मागितले नसते. पोलिस खाते दिल्ली सरकारच्या अखत्यारीत नसले, तरी लाचलुचपत विरोधी खाते जरूर केजरीवाल यांच्या अधिकारात आहे. मग तिथे त्यांची हिंमत कुठल्या बिळात जाऊन बसली आहे?
सवाल हिंमतीचा नसतो, तर कायद्याच्या कक्षेत राहून कारभार करण्याचा असतो. लोकांनी सत्ता हाती सोपवली, तर ती घटना व नियमांच्या चौकटीतून कारभार करावा म्हणून दिलेली असते. हिंमतीचे प्रदर्शन मांडण्यासाठी नव्हे. केजरीवाल यांना त्याचे भान नसले तरी मोदींना आहे. म्हणूनच नियम-कायदे यांचे भान राखूनच कुठल्याही विषयात मोदी सरकार हातपाय हलवते असते. हिंमतीचेच कौतुक केजरीवाल यांना असते, तर त्यांनी उत्तराखंडातील राष्ट्रपती राजवटीच्या निर्णयावर दाद देऊन मोदींची पाठ थोपटली असती. पण तेव्हा तर हेच केजरीवाल मोदी सरकारवर लोकशाहीचा गळा घोटल्याचा आरोप करीत होते. आताही त्यांनी तर्काचा अतिरेक केला आहे. म्हणे सोनियांपाशी मोदी विरोधातले काही पुरावे आहेत, म्हणून मोदी सोनियांना घाबरतात. म्हणून सोनियांना हात लावण्याची मोदींमध्ये हिंमत नाही. तसे असते तर मोदींना लोकसभा निवडणूकांना उभे रहाण्याची हिंमत झाली नसती. कारण ते पुरावे वापरूनच सोनियांनी मोदींना राजकारणातून संपवले असते. विरोधी पक्षात बसून व मोदींना पंतप्रधान व्हायची संधी देऊन, पुरावे झाकून ठेवण्याइतक्या सोनिया दूधखुळ्या नाहीत. हातात सत्ता असताना मोदी विरोधातील कित्येक डावपेच खेळूनही सोनियांना मोदींना रोखणे शक्य झाले नाही. काल्पनिक गोष्टी व नसलेले पुरावे दाखवून मोदींना गुंतवण्याचे डाव सोनियांवर उलटले आणि मोदींचे काम सोपे झाले. पंतप्रधानपद त्यांच्याकडे चालत आले. त्याला सोनियांसह केजरीवाल यांच्या बिनबुडाच्या पुराव्यांनी व आरोपांनी मोठा हातभार लावला, हे विसरून चालणार नाही. देशात चारशे लोकसभेच्या जागा लढवून तोंडघशी पडण्याला केजरीवाल हिंमत समजत असतील, तर गोष्ट वेगळी. म्हणून तर भारतीय राजकारणात केजरीवाल यांचा मुर्खपणा वेगळा आहे. त्या अर्थाने केजरीवाल बेमिसाल आहेत. तसे दुसरे कुठले उदाहरण नाही.
(तांत्रिक त्रुटीमुळे गेले दहा दिवस मला लेख लिहूनही प्रसिद्ध करता आले नाहीत. त्यामुळे वाचक मित्रांची अडचण झाली त्यासाठी क्षमस्व. सर्व लेख आता पाठोपाठ इथे देत आहे.  - भाऊ)

3 comments:

 1. भाऊ,केजरीवाल सरकार दिल्ली मध्ये आहे,त्याच्या कामगिरीचे ढोल तमाम मराठी व इतर भाषक. वृत्तपत्रात पूर्ण पानभर जाहिराती करून पिटले जाते आहेत.हा पैसा कोणाचा? सम विषम दिल्लीत प्रायोगिक तत्वावर सुरू आहे,त्याची तथाकथित यशस्विता जनतेचा पैसा खर्च करून देशाला सांगण्याचे प्रयोजन काय? हा सार्वजनिक पैशाचा गैरवापर नाही का? या माणसाला यासाठी कोर्टात खेचायला हवे.

  ReplyDelete
 2. म्हणे इटलीच्या कोर्टाने सोनिया गांधींचे नाव भ्रष्टाचारप्रकरणी घेतले म्हणून मोदींनी सोनियांना ताबडतोब अटक करावी आणि तशी अटक केली नाही तर मोदी सोनियांना घाबरतात!!

  पहिले म्हणजे याच माणसाने सोनियांना अशी अटक केली असती तर मोदी सरकार विरोधकांचा आवाज दडपायचा प्रयत्न करत आहे असे म्हणायलाही कमी केले नसते. उत्तराखंडमध्ये मुख्यमंत्र्यांनी भ्रष्टाचार केला हे स्पष्ट होऊनही राष्ट्रपती राजवट लावली त्याचा विरोध याने केलाच ना?

  आणि दुसरे म्हणजे सध्या इटलीमध्ये कोर्टाचा आदेश आला आहे तो त्या देशातील कंपनीच्या लोकांनी लाच दिली म्हणून. आणि ती लाच भारतातील तत्कालीन सत्ताधाऱ्यांनाच दिली गेली याचा पब्लिक डोमेनमध्ये अजून स्पष्ट पुरावा नसून circumstantial पुरावा मिळाला आहे. तो सोनियांना अटक करण्याइतका प्रबळ आहे का? सरकारने सर्व पुरावे गोळा करून जो कोणी दोषी असेल त्याला नक्कीच अटक करावी. पण अशी धसमुसळ्यासारखे अटक करायला गेले आणि कोर्टाने सोनियांना पाच मिनिटात सोडून दिले तर त्यातून साध्य काहीच होणार नाही आणि उलट सोनियांविषयी सहानुभूती वाढेल त्याचे काय?

  १ ऑक्टोबर १९७७ रोजी जनता सरकारने (विशेषत: गृहमंत्री चरणसिंगांच्या हट्टामुळे) इंदिरा गांधींना अशीच घाईघाईने अटक केली आणि त्यांना कोर्टाने असेच लगेच सोडून दिले. इंदिरा गांधींचे पुनरागमन झाले त्यात या घटनेचा वाटा नक्कीच आहे. जुलै २००० मध्ये महाराष्ट्रात छगन भुजबळांनी बाळासाहेब ठाकऱ्यांना १९९३ च्या दंगलीदरम्यान प्रक्षोभक लेख लिहिला म्हणून अटक केली.तेव्हा कोर्टाने काय म्हटले?हा खटला तीन वर्षात दाखल करायला हवा होता आणि आता असा खटला दाखल करायला खूप उशीर झाला आहे आणि बाळासाहेबांना पाच मिनिटात सोडून दिले. त्यानंतर वर्षभरातच ३० जून-१ जुलै २००१ च्या रात्री जयललितांनी एम.करूणानिधींना चेन्नईतील फ्लायओव्हर पूल बांधण्यात भ्रष्टाचार केला म्हणून अशीच अटक केली. ७८ वर्षांच्या करूणानिधींना फरपटत नेत असतानाचे व्हिडिओ (त्यावेळी whatsapp किंवा Facebook नसूनही) सर्वांनी बघितले. यातूनच करूणानिधींविषयी लोकांची सहानुभूती मिळाली नाही का? सोनियांना घाईघाईत अटक करून असेच काहीतरी व्हावे अशी केजरीवालांची इच्छा आहे का?

  एकूणच या केजरीवालांची आणि त्यापेक्षाही जास्त त्यांच्याविषयी कणभरही सहानुभूती असलेल्यांची ही एक गोष्ट अत्यंत शिसारी आणणारी आहे. जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी जिथे तिथे मोदींचा चेहरा दिसतो यांना. ऑगस्टा प्रकरणी कॉंग्रेसवर टिका करणे समजू शकतो. पण इटलीमधील घडामोड होऊन एक आठवडाही उलटला नसताना मोदींची सोनियांना अटक करायची हिंमत नाही वगैरे गोष्टी बोलणे खरोखरच मूर्खपणाचे आहे.

  ReplyDelete
 3. भाऊ मस्त छानच

  ReplyDelete