Friday, May 13, 2016

भुजबळांची किंमत किती?

छगन भुजबळ तुरूंगात जाऊन आता तब्बल दोन महिने झाले आहेत आणि या कालावधीत सहसा त्यांच्या नेत्यांनी त्यांची फ़ारशी दखल घेतल्याची कुठे बातमी नव्हती. पण परवा अकस्मात ज्येष्ठ नेते शरद पवार यांना आपल्या या ‘पहिल्या फ़ळीतल्या’ नेत्याचे स्मरण झाले. तोपर्यंत पवारसाहेब छगन भुजबळ नावाचा आपल्या पक्षाचा कुणी नेता असल्याचे साफ़ विसरून गेले असावेत. अन्यथा त्यांनी या कालावधीत आकाशपाताळ एक करून भुजबळांना तुरूंगातून बाहेर काढायचा प्रयत्न केला असता. पण तेव्हा भुजबळांची किंमत किती, तेच बहुधा ठरलेले नसावे. मग साहेब त्या अटकेला किती किंमत देतील? त्यापेक्षा मागल्या दोन महिन्यात इंडीयन प्रिमीयर लिग या क्रिकेट स्पर्धेची किंमत अधिक असावी. म्हणून साहेबांचे भुजबळांकडे पुर्णपणे दुर्लक्ष झाले. कोणीतरी हायकोर्टात गेले आणि महाराष्ट्रात दुष्काळ असल्याने इथे क्रिकेटचे सामने भरवू नयेत, अशी याचिका त्याने केली. त्यावरून सरकारला कोर्टाने इतके फ़ैलावर घेतले, की पवारसाहेब कमालीचे विचलीत होऊन गेले. आयपीएल म्हणजेच ती क्रिकेट स्पर्धा भयंकर किंमतीची आहे. त्यात करोडो रुपयांची गुंतवणूक झालेली आहे. तितकी गुंतवणूक साहेबांनी वा अन्य कुणी भुजबळांमध्ये केलेली नसावी., म्हणून असेल, भुजबळ तुरूंगात असल्याचे साहेबही पुरते विसरून गेले. मे महिन्यात एकही सामना महाराष्ट्रात होऊ नये आणि क्रिकेटच्या मैदानासाठी पाणी वापरू नये, असा फ़तवाच कोर्टाने काढल्याने किंमती असलेले क्रिकेट वांद्यात आले. मग त्याची किंमत कोणी भरायची, असा पेचप्रसंग निर्माण झाला. पवारसाहेबांना वस्तुच्या किंमती खुप छान कळतात. त्यामुळेच भुजबळांपेक्षा आयपीएलची किंमत मोठी असल्याचे त्यांनाच कळू शकले आणि त्या स्पर्धेपेक्षा त्यांना भुजबळांची किंमत कमी असल्याचे लक्षात आले. अन्यथा दोन महिने त्यांनी भुजबळांकडे कशाला दुर्लक्ष केले असते? भुजबळांच्या अटकेची किंमत सरकारला मोजावी लागेल, हा सिद्धांत सुचायला म्हणूनच इतका उशीर झाला.
सातारा येथे आले असताना अकस्मात भुजबळांचे स्मरण साहेबांना झाले. सरकारने सत्तेचा गैरवापर करून भुजबळांना तुरूंगात डांबले असल्याचाही शोध लागला. बहुधा इतके दिवस भुजबळ आत असल्याचे साहेबांना ठाऊक नसावे. किंवा ठाऊक असेल, तर त्यात सत्तेचा गैरवापर झाल्याचे साहेबांच्या लक्षात आले नसावे. अन्यथा तेव्हाच साहेबांनी भुजबळांसाठी हालचाल केली असती. पण काहीच माहिती नसताना हालचाल तरी काय करणार ना? म्हणून साहेब क्रिकेटमध्ये गुंतुन पडले. मात्र आता क्रिकेटमधून साहेबांना मोकळा वेळ मिळाला आहे, तेव्हा दुय्यम किंमतीच्या भुजबळांकडे त्यांचे लक्ष गेले. अतिशय निरखून बघितल्यावर त्यांना भुजबळांची दाढी वाढल्याचेही दिसून आले. सरकार भुजबळांना तुरूंगात डांबते आणि साधी दाढीही करू देत नाही, हे कळले आणि साहेब खवळले. त्यांनी सरकारला शाप देण्यासाठी हात उचलला. भुजबळ यांना अटक केल्याची किंमत सरकारला मोजावी लागेल, असा शापही देऊन टाकला. मात्र साहेब धुर्त असल्याने या भुजबळ अटकेची किंमत किती होईल, ते बोलायचे त्यांनी टाळले. साहेब दिर्घकाळ सत्तेत राहिलेले आहेत, त्यामुळे सरकार आणि न्यायालय यातला फ़रक त्यांना कळत असावा, असे गृहीत धरावे लागते. तसे असते तर भुजबळांच्या अटकेचा सरकारशी संबंध नसल्याचे कोणालाही माहिती असू शकते. पण कोणी सामान्य माणूस आणि पवारसाहेब, यात मोठा फ़रक आहे. सामान्य माणूस सामान्य बुद्धीचा असतो आणि पवार साहेब अतिशय चतुर राजकारणी आहेत. म्हणूनच त्यांना न्यायालय व सरकार यातला फ़रक उमजू शकत नाही. अन्यथा सरकारला शाप देण्याचा प्रमाद साहेबांकडून कशाला झाला असता? भुजबळांवर सरकारने कुठलीही कारवाई केलेली नाही, तर कोर्टाच्या आदेशानुसार त्यांना तुरूंगात जावे लागले आहे. मग त्याची किंमत सरकार कशाला मोजणार? सरकारचा यात दुरान्वयेही कुठे संबंध नाही. म्हणजेच किंमत मोजायची तर कोर्टालाच मोजावी लागेल ना?
पवार साहेब हल्ली कोणाविषयी काय बोलतात, तेच समजत नाही. भुजबळ यांच्या विरोधातील कारवाई महाराष्ट्र सदन या प्रकरणातील आहे. पण त्यात सरकारचा कुठलाच संबंध नाही. कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार पोलिस कारवाई करीत आहेत आणि त्यात हस्तक्षेप करायचाही अधिकार सरकारला नाही. हे साधे सत्य पवार साहेबांना ठाऊक नसेल काय? अर्थात़च ठाऊक आहे. पण पेडगावला जाऊन वेड पांघरण्याला धुर्तपणा म्हणतात. तसे पवार कुठलेही कारण घेऊन आपण भुजबळांकडे काणाडोळा केला नसल्याचे भासवत आहेत. प्रत्यक्षात त्यांना भुजबळांविषयी काडीचीही आस्था नाही. असती तर केव्हाच हातपाय हलवून काही केले असते. पण अटकेच्या वेळी सुप्रियाताई इशारे देऊन गप्प बसल्या आणि आम्ही मराठे अटकेला घाबरत नाही, असे सांगून अन्य कामात गढून गेल्या. त्यानंतर कोणी भुजबळांकडे बघितले नाही. दरम्यान सचिन तेंडूलकरला बारामतीला नेऊन नव्या स्टेडीयमचे उदघाटन पवार साहेबांनी कशाला करून घेतले असते? भुजबळ गजाआड दाढी वाढवून पडलेले असतानाच, बारामतीचा समारंभ थाटामाटात पार पडला. तेव्हा कोणाला तरी भुजबळांची आठवण आली काय? कशी येईल? भुजबळांची किंमत ती किती? सचिनला बारामतीत आणण्यापेक्षा भुजबळांची किंमत नक्कीच कमी असेल. म्हणून ह्या सगळ्या किंमती गोष्टी व घटना उरकेपर्यंत साहेब भुजबळांसाठी दोन अश्रू ढाळायलाही तयार नव्हते. शेवटी अश्रू देखील किंमती असतात ना? ते कोणासाठी ढाळावेत, याचेही तारतम्य साहेबांकडे आहे. म्हणून त्यांनी भुजबळांसाठी कुठली किंमत मोजायचे प्रयास केले नाहीत. तशी वेळ आलीच, तर आपण भुजबळांसाठी कवडी मोजणार नाही, असेच साहेबांना मुळात सांगायचे आहे. किंमत मोजायची असेल, तर अन्य कोणी मोजावी. आणि त्यालाही कोणी तयार नसेल, तर भरपाई म्हणून सरकारने किंमत मोजावी, असे़च त्यांनी सुचवलेले नाही काय? खरेतर पवारांसोबत गेल्यामुळे भुजबळांची आजच्या बाजारात काय किंमत आहे, तेच साहेबांनी सांगिवले आहे.
सतेचा गैरवापर करून भुजबळांना अटक झाल्याचे पवार सांगतात, तेव्हा त्यांना कर्नल पुरोहित वा साध्वी प्रज्ञा कशी आठवत नाही? त्यांनाही मागल्या साडेसात वर्षापासून गजाआड ढकललेले आहे. ती कारवाई पवारांच्याच प्रेरणेने चाललेल्या सरकारने केलेली होती. आजपर्यंत त्यांच्यावरील खटला चालू शकलेला नाही. पण त्यांच्यासह अनेकजण तुरूंगात खितपत पडलेले आहेत. त्याच मालेगाव प्रकरणात आठ मुस्लिम तरुणांना अटक करण्यात आलेली होती, अलिकडेच आठ वर्षांनी त्यांना पुरावे नसल्याने सोडून देण्यात आले. त्यांच्या आयुष्यातील आठ वर्ष अकारण निकामी करण्याचे पापकर्म कोणाचे आहे? पवारप्रणित कॉग्रेस राष्ट्रवादी सरकारनेच त्यांना दिर्घकाळ तुरूंगात डांबले ना? त्याची किंमत कोणी मोजायची? भुजबळांच्या अटकेची किंमत वा बाजारभाव पवार साहेब विचारतात, मग त्या मालेगावच्या मुस्लिम नागरिकांचे काय? त्याची किंमत पवार साहेब किंवा त्यांचे सरकारमधील सहकारी मोजणार आहेत काय? सत्तेचा तो गैरवापर नव्हता काय? पाच दशके शरद पवार सरकारी वा सत्ताधारी पक्षात राहिले आहेत आणि अशा शेकडो अटका त्यांच्याच सरकारने केलेल्या आहेत. त्यापैकी किती अटकांची किंमत त्यांच्या पक्षाने वा सरकारने मोजलेली आहे? एका बाजूला भुजबळांच्या अटकेच्या किंमतीची भाषा बोलायची आणि त्या अटकेने पक्षावर कोणताही परिणाम होणार नसल्याचीही ग्वाही द्यायची, हा विरोधाभास नाही काय? भुजबळांच्या अटकेचा पक्षावर कसलाही परिणाम होणार नाही, म्हणजे पक्षाच्या लेखी भुजबळ हे नगण्य व्यक्तीमत्व ठरते ना? अशा नगण्य व्यक्तीची किंमत मात्र पवारांना वसुल करायची आहे आणि पक्षाकडून भुजबळांना किंमत द्यायची वेळ आली, मग त्यांना ‘अमूल्य’ ठरवण्याचाही धुर्तपणा साहेब करतात. छगन भुजबळ हे पवारांसाठी नेमके कोण व किती किंमतीचे आहेत, त्याचा खुलासाच यातून होत नाही काय? छगनरावांनी वेळीच आपली ‘किंमत’ ओळखावी. कारण आज त्यांनाच ‘किंमत मोजावी’ लागते आहे.
(तांत्रिक त्रुटीमुळे गेले दहा दिवस मला लेख लिहूनही प्रसिद्ध करता आले नाहीत. त्यामुळे वाचक मित्रांची अडचण झाली त्यासाठी क्षमस्व. सर्व लेख आता पाठोपाठ इथे देत आहे. – भाऊ)

1 comment: