Tuesday, May 24, 2016

‘म्युझियमच्या वाटेवर ‘डावे’ राजकारण

डोळ्यांना सर्वकाही दिसत असते, पण आपण बघायला राजी नसलो, तर दिसूनही उपयोग नसतो. गुन्हेगारी सत्यकथांचे नाट्यमय रुपांतर सादर करणार्‍या एका वाहिनीची जाहिरात फ़ार नेमकी आहे. त्यातला आवाज म्हणतो, ‘पुरावे आपल्याकडे बघत असतात. पण आपण त्या पुराव्यांकडे बघू शकतो काय?’ दुसरी एक अशीच जाहिरात म्हणते, वेळोवेळी प्रसंगातून आपल्याला धोका इशारा देत असतो. आपण त्याची दखल घेतो काय? ती दखल वेळीच घेण्याचा विवेक असेल, तर पुढला गुन्हा पुर्णत्वास जाऊ शकत नसतो. वरकरणी अशा इशार्‍यांना असलेले महत्व लक्षात येत नाही. पण घटना घडून गेली, मग आधीचे संदर्भ शोधताना त्यातले इशारे लक्षात येतात. पण वेळ टळून गेलेली असते. टाळता येऊ शकणारे नुकसान होऊन गेलेले असते. विधानसभांचे निकाल बघितले व अभ्यासले, तर निदान आधीचे इशारे दुर्लक्षित करणार्‍यांना हानी सोसावी लागली, असाच त्यातून अर्थ निघतो. प्रामुख्याने डाव्या मार्क्सवादी राजकारणातल्या चुकांमुळे त्या विचारसरणीचे भवितव्य धोक्यात आलेले लपून रहात नाही. त्या डाव्या प्रदेशात भाजपाची डाळ शिजली नाही, म्हणून आपली पाठ थोपटून घेणारे डावे नेते, प्रत्यक्षात आत्महत्येच्या दिशेने वाटचाल करीत आहेत. किंबहूना डाव्यांना या पुढल्या निवडणूकांमध्ये काय व किती स्थान असेल, असाही प्रश्न या निकालांनी उभा केला आहे. की विद्यापीठातल्या विद्यार्थी राजकारण व प्राध्यापकीय संघर्षापुरताच डाव्यांचा प्रांत मर्यादित होऊन जाणार आहे? केरळात सत्ता पुन्हा मिळवताना आणि बंगालमध्ये तिसर्‍या क्रमांकावर फ़ेकले जाताना, डाव्या पक्षांची मतांच्या टक्केवारीतील घसरगुंडी त्यांच्या राजकारणावर प्रश्नचिन्ह लावून गेली आहे. त्याच आकडेवारीने मार्क्सवादी नेतृत्वावरही प्रश्नचिन्ह लावले आहे. कारण आता डावे पक्ष त्याच मार्क्सवादी नेतृत्वाच्या मागे फ़रफ़टत चालले आहेत.
केरळमध्ये भाजपाला अवघी एक जागा आणि बंगालमध्ये तीनचार जागा मिळाल्या, म्हणजे त्याची डाळ शिजली नाही, असा दावा कोणाची दिशाभूल करतो आहे? बंगालमध्ये मागल्या म्हणजे २०११ च्या विधानसभा निवडणूकीत भाजपाला एकही जागा जिंकता आलेली नव्हती आणि खात्यात फ़क्त ४ टक्के मतेच पडलेली होती. पण त्यावेळी ममता नावाच्या झंजावाताने डाव्यांचा बंगाली बालेकिल्ला पत्त्याच्या बंगल्यासारखा विस्कटून गेला होता. म्हणजे तसे मानले गेले. कॉग्रेस ममताच्या युतीने अफ़ाट बहूमत संपादन करून डाव्या आघाडीला धुळीस मिळवले, असेच तेव्हा सांगितले गेले व मानले गेले. पण प्रत्यक्षात तशी स्थिती नव्हती. डाव्यांचा पराभव झालेला असला तरी धुळधाण उडालेली नव्हती. कारण डाव्यांचा मतांचा हिस्सा तेव्हाही ४१ टक्के इतका होता आणि ममताचा हिस्सा त्यापेक्षाही तीन टक्के कमी होता. यावेळी ममतांनी ४५ टक्के इतकी मजल मारताना, डाव्यांची टक्केवारीही पुरती ढासळून टाकली आहे. मध्यंतरी लोकसभेच्या निवडणूका होऊन गेल्या आणि तेव्हाच डाव्यांना त्यांचे अस्तित्व धोक्यात असल्याचा इशारा मिळालेला होता. मागली विधानसभा एकत्रित लढवणार्‍या ममतांनी पुढल्या वर्षभरातच कॉग्रेसची साथ सोडून आपले स्वतंत्र अस्तित्व देशाला दाखवून दिले होत. म्हणूनच लोकसभेच्या वेळी डावे, ममता व कॉग्रेस अशी तिहेरी लढत झाली होती आणि त्यात भाजपा वा मोदीं कोणाच्या गणतीत नव्हते. पण तिथेच भाजपाने घुसखोरी करून ममताचा प्रतिस्पर्धी म्हणून जागा व्यापण्यास आरंभ केला होता. २०११ मध्ये अवघी ४ टक्के मते मिळवणार्‍या भाजपाने लोकसभेत चौपट म्हणजे सोळा टक्के मतांपर्यंत झेप घेतली होती. कॉग्रेसला मागे टाकून अधिक मतांची टक्केवारी संपादन केली होती. राजकीय स्पर्धेतला पक्ष म्हणून मतदार भाजपाला मान्यता देत असल्याचा तो इशारा होता.
कुठल्याही नव्या पक्षाला किती जागा मिळतात, यापेक्षा त्याची मतांची टक्केवारी व मतांचे प्रभावक्षेत्र महत्वाचे असते. जागा तात्पुरत्या आणि मतांचे प्राबल्य दिर्घकालीन असते. वाढत्या मतांच्या टक्केवारीतून पक्ष आपले बस्तान बसवत असल्याचे संकेत मिळत असतात. मोदींसारखा पंतप्रधान पदाचा उमेदवार भाजपाला बंगालमध्ये १६ टक्के मतांपर्यंत घेऊन गेला, तेव्हाच भाजपा तिथल्या राजकारणात आपले बस्तान ठामपणे बसवत असल्याचे स्पष्ट झाले होते आणि म्हणूनच तो डाव्यांना गंभीर इशारा होता. मतदार असे काय भाजपामध्ये बघत होता, की त्याला नव्या पक्षाची भुरळ पडावी? त्याचा विचार करून मागल्या दोन वर्षात डाव्यांनी आपल्या डावपेचामध्ये नेमके बदल केले असते, तर आजच्या इतकी त्यांची दुर्दशा नक्कीच झाली नसती. २००४ मध्ये मनमोहन सरकारला बाहेरून पाठींबा देत डाव्यांनी चुक केली आणि आता कॉग्रेसला थेट सोबत घेऊन आत्महत्याच केली. ज्यांचा पाया बिगरकॉग्रेसी राजकारणाचा होता, त्यांनी कॉग्रेसला सोबत घेतले, तर त्यांची राजकारणातील गरज संपलेली असते. दुसरी गोष्ट क्रमाक्रमाने ममता बानर्जी यांनी बंगाली राजकारणातील कॉग्रेसची जागा आणि कार्यकर्ता-मतदार व्यापला होता. २००१ मध्ये जी मते ममता-कॉग्रेस यांनी एकत्रित मिळवली, तितकी मते आज ममताच्या पारड्यात पडली आहेत. तरीही कॉग्रेस दुसर्‍या क्रमांकाच्या जागा व १२ टक्के मते मिळवू शकली आहे. ममताच्या सोबतही कॉग्रेसला ९ टक्के मते होती आणि आज बारा टक्के मते! म्हणजे वाढीव मते कॉग्रेसने डाव्यांच्या खात्यातून खेचली आहेत. या गडबडीत भाजपाने लोकसभेत सोळा व विधानसभेत १० टक्के मते मिळवताना इतरांची काही मते कायमस्वरूपी आपल्याकडे ओढून आणण्यात यश मिळवले आहे. उलट पाच वर्षात डाव्यांनी ४१ टक्के मतांवरून २६ टक्क्यांवर येताना १५ टक्के मते गमावली आहेत.
केरळातही डाव्यांनी जागा जिंकल्या, पण मते मात्र गमावली आहेत. तो मोठा धोका आहे. लोकसभेत मोदींची भुरळ पडल्याने मते भाजपाकडे झुकली होती आणि नंतर तितका प्रभाव राहिला नव्हता. पण केरळात पाच वर्षात चार टक्के ते चौदा टक्के मजल मारताना भाजपाने लोकसभेपेक्षाही चार टक्के मते अधिक घेतली आहेत. डाव्या आघाडीने पाच वर्षांनी सत्ता मिळवताना सात टक्के मते मात्र आणखी गमावली आहेत. डाव्यांचे बालेकिल्ले मानल्या जाणार्‍या केरळ व बंगाल या दोन्ही राज्यात आजवर भाजपाला पाय रोवण्याची संधी मिळू शकली नव्हती. तोच भाजपा मागल्या दोन वर्षात तिथे आपले बस्तान बसवीत मतपेढी उभी करू शकला आहे. कॉग्रेसमुक्त भारत ही गर्जना करीत देशाची सत्ता काबीज करणार्‍या भाजपाने, बहुतेक राज्यात कॉग्रेसला नामोहरम केले आहे. तरी प्रादेशिक पक्षांच्या प्रभावक्षेत्रात मोठे यश मिळवणे त्याला शक्य झाले नव्हते. पण कॉग्रेसच्या सोबतच डाव्या राजकारणाला भाजपाने शह दिला आहे. त्यामुळे कॉग्रेस इतकेच डाव्यांचे राजकीय अस्तित्व धोक्यात आले आहे. म्हणूनच त्या राज्यात भाजपाला फ़ारशा जागा मिळाल्या नाहीत, याचा आनंद साजरा करण्यापेक्षा डावे राजकारण संदर्भहीन कशाला होऊ लागले आहे, त्याचा शोध घेऊन उपाय योजण्याची गरज आहे. डाव्या पक्षांना व नेत्यांना त्याची जाणिव कितपत झाली आहे, हा प्रश्नच आहे. विद्यापीठीय राजकारणाला नको तितके प्राधान्य, अनाठायी मुस्लिम लांगुलचालन, कन्हैया-वेमुला वा देशद्रोही घोषणांची पाठराखण, यांच्यासह बुद्धीवादी वर्गाच्या कांगावखोरीचा दणका डाव्या राजकीय वाटचालीतला मोठा अडसर झाला आहे. सामान्य गरीबपिडीतांच्या हातातून डावे राजकारण सुखवस्तु दिवाणखान्यातील शिळोप्याच्या गप्पांपुरते मर्यादित झाल्याचा तो परिणाम आहे. आजच्या जगात व युगात आपली उपयुक्तता डाव्यांनी लौकर शोधली नाही, तर डावे राजकारण दुर्मिळ पुरातन वस्तु म्हणून म्युझियममध्ये मांडायची पाळी येऊ शकेल.

2 comments:

  1. सबका साथ सबका विकास।
    काँग्रेसका साथ, सिर्फ सर्वनाश।

    ReplyDelete
  2. तथास्तु। तथास्तु। तथास्तु।

    ReplyDelete