Sunday, May 22, 2016

कॉग्रेसमधले मुर्खनाम शिरो‘मणी’

कॉग्रेसच्या ताज्या पराभवानंतर या पक्षाच्या भवितव्याविषयी राजकीय अभ्यासकात विचार सुरू झाला आहे. मग त्यात पहिले लक्ष्य राहुल गांधी असले तर नवल नाही. कारण २०१३ च्या आरंभापासून त्यांच्याच हाती पक्षाची सुत्रे जवळपास सोपवली गेली होती. २०१३ च्या अखेरीस चार राज्यात पक्षाचा दारूण पराभव झाल्यावर निर्णायकपणे पक्षाचे सर्वाधिकार राहुलना सोपवण्यात आले होते. एका नेत्याचे अपयश समजू शकते आणि त्याच्या डोक्यावर खापरही फ़ोडणे समजू शकते. पण ती कारणमिमांसा नसते. त्या नेत्याचे विविध सल्लागार आणि त्याच्या भोवतीचे सवंगडी मार्गदर्शक, यांच्याही भूमिका समजून घ्याव्या लागतात. तेव्हाच खरे विश्लेषण होऊ शकते. राहुल आघाडीवर येण्याच्या आधीपासूनच कॉग्रेसची घसरगुंडी सुरू झाली होती आणि सोनिया गांधीही त्याला काही प्रमाणात जबाबदार होत्या. किंबहूना त्यांनी मरगळल्या भाजपासोबतच अकस्मात नरेंद्र मोदींना लक्ष्य करण्याचे जे धोरण पत्करले, तिथून कॉग्रेसचा खरा र्‍हास सुरू झाला होता. सोनियांची तीच रणनिती राहुलनी पुढे चालविली. अधिक थिल्लरपणे ती निती राबवली गेली आणि लोकसभेत पक्षाला अभूतपुर्व अपयशाला सामोरे जावे लागले. ती निती किंवा रणनिती कुठली होती? परवा पाच विधानसभांचे निकाल येत असताना, एका वाहिनीवर हजेरी लावलेले कॉग्रेसनेते मणिशंकर अय्यर यांनी त्याचा खुलासा केलेला आहे. देशभर कॉग्रेसचे भवितव्य काय आणि त्या पक्षाचा इतका दारूण पराभव कशाला झाला, याविषयी उहापोह चालू होता. तेव्हा अय्यर यांनी केलेले विधान कॉग्रेसच्या अलिकडल्या राजकीय रणनितीचा गोषवारा आहे. त्याकडे पाठ फ़िरवून हे विश्लेषण होऊ शकत नाही. अय्यर यांना कॉग्रेसच्या र्‍हासाची अजिबात चिंता नव्हती. उलट तीन राज्यात भाजपाला कोणतेही मोठे यश मिळाले नाही, ह्यालाच अय्यर यशस्वी रणनिती मानत होते.
त्या चर्चेत सतत विचारला जाणारा प्रश्न होता, कॉग्रेसचा राष्ट्रीय चेहरा अस्तंगत होतोय आणि त्या पक्षाचे भवितव्य काय? तर मणिशंकर अय्यर यांना कॉग्रेसच्या अपयशाची कुठलीही फ़िकीर नव्हती. किंबहूना कॉग्रेस विजयी व्हायची काहीही गरज नाही. त्यापेक्षा भाजपाचे अपयश त्यांना सुखावत होते. वास्तविक दोन राज्यात कॉग्रेसने सत्ता गमावली आणि त्यापैकी एका राज्यात भाजपाने सत्ता कॉग्रेसकडून हिसकावून घेतली आहे. दुसर्‍या राज्यातील कॉग्रेसची सत्ता जाण्याला भाजपाने मिळवलेली अधिक मतेच डाव्यांच्या यशाचा पाया घालणारी ठरलेली आहेत. म्हणजेच भाजपाचा विस्तार कॉग्रेसचा पाया खणून काढतो आहे. पण त्याविषयी बोलताना अय्यर म्हणाले, कॉग्रेस जिंकण्याची काहीही गरज नाही. भाजपा हरला पाहिजे आणि सर्वांनी मिळून भाजपाला पराभूत केले पाहिजे. ते तीन राज्यात शक्य झाले आहे. याचा अर्थ असा, की कॉग्रेसचा र्‍हास झाला म्हणून बिघडत नाही. भाजपाचे नाक कापले गेले पाहिजे. ही नवी रणनिती वा भूमिका नाही. गेल्या चारपाच वर्षात कॉग्रेस नेमकी तशीच वागते आहे आणि त्यात यश मिळण्यापेक्षा भाजपाने अधिकाधिक राज्यात आपला पाया घातला आहे. तसे करताना भाजपाने अनेक राज्यातून कॉग्रेसचा पाया खोदून काढला आहे. आताही केरळात डाव्या आघाडीला अपुर्व अशा जागा मिळाल्या आहेत. पण तितक्या प्रमाणात मते मिळालेली नाहीत. कॉग्रेसच्या मतांचा मोठा हिस्सा भाजपाकडे वळल्याने, डाव्यांना कमी मतातही अधिक जागा जिंकून सत्ता काबीज करता आलेली आहे. बंगालमध्येही भाजपाच्या मतांचा हिस्सा वाढल्याने मतविभागणीचा लाभ ममतांना मिळाला व त्यात डाव्यांची ससेहोलपट झाली आहे. या दोन्ही कम्युनिस्ट प्रभावाच्या राज्यात भाजपाने प्रथमच १०-१५ टक्के मतांची मजल मारली आहे. जागांपेक्षा ही टक्केवारी दुरगामी गुंतवणूक असते. अय्यर यांना त्याचे भान कितीसे आहे?
१९८३ सालात कर्नाटक या दक्षिणी राज्यात भाजपाला इतकीही मते मिळत नव्हती. एकदोन जागा त्यांना काही ठराविक भागात मिळायच्या. पण ती मतांची टक्केवारी क्रमाक्रमाने वाढवताना भाजपाने २००७ मध्ये स्वबळावर कर्नाटकात सत्ता स्थापन केली होती. त्याला भाजपासाठी दक्षिणद्वार मानले गेले. आज केरळातील जागांपेक्षा भाजपाला मिळालेली १५ टक्केच्या आसपासची मते, त्याच दृष्टीने महत्वाची आहेत. कारण त्याच प्रयासांनी चार दशकात केरळात प्रस्थापित केलेल्या दोन आघाड्यांच्या राजकीय रचनेला तडा दिला आहे. सगळा केरळी मतदार दोन आघाड्यात विभागला गेला होता, त्याला तिसरा पर्याय म्हणून भाजपा पाय रोवून उभा राहिला आहे. दोनतीन समाज घटक ठामपणे भाजपाच्या मागे मतपेढी म्हणून उभे राहिले आहेत. जे समाजघटक भाजपाच्या बाजूने उभे रहात आहेत, ते प्रामुख्याने आजवर या पक्षाला परका, हिंदीभाषिक वा उत्तर भारतीय म्हणून टाळत होते. तो अडथळा भाजपाने बंगाल व केरळात ओलांडला आहे. आपला पाया घालून घेतला आहे. त्यासाठीचे संघटनात्मक कष्ट भाजपाच्या नेते कार्यकर्त्यांनी जरूर घेतले असतील. पण त्याला राजकीय गती देण्याचे काम कॉग्रेसच्या नकारात्मक रणनितीने केलेले आहे. भाजपा पराभूत झाला पाहिजे आणि आपण संपलो तरी बेहत्तर, अशा भूमिकेने भाजपाला इतके मोठे बळ मिळवून दिले आहे. आपले असलेले बळ कॉग्रेसने टिकवले असते, किंवा अधिक बलदंड होण्याचा प्रयास केला असता, तर हाच मतदार पर्याय शोधत अन्य पक्ष वा भाजपाकडे झुकला नसता. म्हणजेच कॉग्रेस सुदृढ करणे व पर्यायाने भाजपाचा राजकीय विस्तार होण्याला पायबंद घालणे, ही रणनिती असू शकते असायला हवी होती. जिथे तसा पर्याय मिळाला तो मतदार नविन पटनाईक, ममता बानर्जी यांच्याकडे गेला आणि तेही नालायक ठरले तर भाजपाकडे जाणार आहे.
भाजपाचा देशातील अलिकडल्या काळातील विस्तार बघितला, तर तो नकारात्मकता नाकारण्यातून झाला आहे. राहुल गांधी वा सोनियांसह तमाम कॉग्रेस नेत्यांना पक्षाच्या ऐतिहासिक राजकीय जबाबदारीचे भान राहिलेले नाही. त्यांचा पाठींबा किंवा विरोध केवळ भाजपाकेंद्रित आहे. अमूक एक गोष्ट लोकहिताची वा राष्ट्रहिताची आहे किंवा नाही, यानुसार पक्षाची भूमिका असायला हवी. पण कॉग्रेसच्या वर्तनात किंवा धोरणात त्याचा लवलेश आढळून येत नाही. आसाममध्ये घुसखोरीने स्थानिक लोक अल्पसंख्य होऊ लागले आणि भाजपा त्यांच्या भावना चुचकारत असताना कॉग्रेसने प्रतिवादी भूमिका घेतली. त्यातून तिथे भाजपा बळावला. ती अस्मितेची भावना ओळखून कॉग्रेस स्थानिकांच्या समर्थनाला उभी राहिली असती, तर तिला इतके मोठे अपयश पचवावे लागले नसते. संसदेतील कामकाजातील व्यत्यय लोकहिताचा नाही हे वेगळे सांगायला नको. राष्ट्रद्रोही घोषणांचे समर्थन पायावर धोंडा पाडून घेण्यासारखे होते. पण या प्रत्येकात भाजपाला विरोध हेच एकमेव समान सुत्र आहे. किंबहूना भाजपाला विरोध करताना आपणही निवडणूका लढवतो आणि आपल्यालाही मतदाराला जपले पाहिजे, याकडे पाठ फ़िरवली गेली आहे. त्यामागचा मेंदू मणिशंकर अय्यर यासारखाच कोणी असला पाहिजे. आपल्या पक्षाचे भवितव्य दुय्यम आणि भाजपाचे नाक कापणे प्राधान्याचे असेल, तर दुसरे काय होणार? आज केरळ बंगालमध्ये भाजपाने मिळवलेली मते सत्तेपर्यंत घेऊन जाणारी नसतील. तरी पाया घालून झाला आहे, ज्यावर सत्तेची इमारत उभी करणे शक्य होणार आहे. पण तिथे कॉग्रेसला तरी भवितव्य काय आहे? तर भवितव्य असण्याची अय्यर यांना गरज वाटत नाही. असे मुर्खनाम शिरो‘मणि’ सल्लागार असतील, तर राहुल गांधीसह कॉग्रेस पक्षाचे भवितव्य किती भयंकर असेल, ते वेगळे सांगण्याची गरज आहे काय?

2 comments:

  1. बरोबर भाऊ उत्तम

    ReplyDelete
  2. आपल्याला मूर्खाणाम् शिरोमणी किंवा मूर्ख शिरोमणी म्हणायचे असावे असे वाटते .

    ReplyDelete