Monday, May 30, 2016

विधान परिषदेत राणे

कॉग्रेसने वा खरे तर सोनियांनी नारायण राणे या आक्रमक नेत्यासमोर गुडघे टेकले असे़च म्हणायला हवे. कारण आज त्यांच्याइतका कोणीही आक्रमक नेता पक्षात उरलेला नाही. विधानसभेत राधाकृष्ण विखेपाटील यांना विरोधी नेतेपद मिळाले आहे. पण तिथे कामकाजावर त्यांना किंचीतही प्रभाव पाडता आलेला नाही. विधान परिषदेत तर राष्ट्रवादीचेच वर्चस्व आहे. त्यामुळे राज्यातील कॉग्रेस पक्ष जवळपास झाकोळला गेला होता. बघायला गेल्यास नारायण राणे एकांडी शिलेदारी केल्यासारखे सताधार्‍यांवर विधान भवनाच्या बाहेर राहून तोफ़ा डागत होते. तितकेही कुणा अन्य कॉग्रेस नेत्याला शक्य झाले नाही. बहुधा त्यामुळेच राणे यांना विधान परिषदेत आणायचा निर्णय श्रेष्ठींनी घेतला असावा. वास्तविक राणे श्रेष्ठींच्या मर्जीतले अजिबात नाहीत. कारण त्यांना बारा वर्षापुर्वी मुख्यमंत्री पदाचे अमिष दाखवून कॉग्रेसमध्ये आणले गेले होते. पण क्रमाक्रमाने त्यांना नामोहरम करण्याचे डावपेच पक्षात खेळले गेले. तेव्हा विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते आणि तात्काळ त्यांना बाजूला करून राणे यांना सत्तेवर बसवणे शक्य नव्हतेच. म्हणून मग महत्वाचे खाते देऊन त्यांची बॊलवण करण्यात आली. पण विलासरावांच्या मागून आपलाच नंबर लागणार, अशा आशेवर राणे टिकून होते. तशी वेळ २००८ सालात आली आणि परस्पर राणेंना खड्यासारखे बाजूला करण्यात आले. बहुतेक आमदारांचाही राणेंना पाठींबा होता. पण सोनियांनी तसे होऊ दिले नाही. श्रेष्ठींनी पक्षनेत्याची निवड करताना हस्तक्षेप केल आणि राणे यांच्या जागी अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्री पदावर बसवले. अशा प्रसंगी मूग गिळून गप्प बसणे, हा कॉग्रेसी बाणा असतो. राणेंना अजून तितके कॉग्रेसजन होता आलेले नाही, म्हणून त्यांची सतत कुचंबणा होत असते. त्याचा शेवट यापुढल्या काळात होईल काय?
राणे कॉग्रेसमध्ये गेले, तेव्हा त्यांना महत्वाचे पद देता यावे म्हणून अशोक चव्हाण यांनी महसुल खाते सोडले होते आणि नगण्य खाते पत्करले होते. आपल्यावर अन्याय झाल्याची तक्रार चव्हाणांनी अजिबात केली नाही. ह्या शरणागतीला कॉग्रेसी बाणा म्हणतात. विलासरावांना मुंबई हल्ल्यानंतर राजिनामा द्यावा लागला, तेव्हा त्याचे फ़ळ अशोक चव्हाणांना मिळाले होते. राणेंच्या बाजूने बहुसंख्य आमदार असतानाही श्रेष्ठींनी चव्हाणांनाच मुख्यमंत्री केले होते. तेव्हा राणे खवळले आणि आपला संताप त्यांनी जाहिरपणे व्यक्त केला होता. त्यावेळी त्यांनी केलेले मोठे पाप, म्हणजे थेट सोनियांवर तोफ़ डागली होती. त्याची किंमत मागली सात वर्षे राणे मोजत आहेत. त्यांची क्षमता असूनही त्यांना पक्षात कुठलेही मोक्याचे पद सोनियांनी दिले नाही. सोनिया व चव्हाणांना शिव्याशाप देत, तेव्हा राणे मंत्रिमंडळातून बाहेर राहिले आणि शेवटी सत्तेत सहभागी झाले. पण यावेळी त्यांना नगण्य खाते घेऊन समाधान मानावे लागले. सोनिया दिर्घद्वेषी आहेत. त्यामुळे राणे जुने विसरून गेले असले तरी सोनियांनी त्याकडे कधी पाठ फ़िरवली नाही. त्यांनी राणेंना झुंजणारा नेता असूनही पक्षात मोठे स्थान मिळणार नाही अशी काळजी घेतली. आताही विधानसभेत राणे पराभूत झाल्यावर त्यांना बळीचा बकरा म्हणून पुर्व वांद्रा येथून पोटनिवडणूकीला उभे करण्यात आले आणि सेनेकडून दुसर्‍यांना पराभूत व्हायची नामूष्की त्यांच्यावर आणलेली होती. शिवसैनिकाचा स्वभाव असलेले राणे त्यात अलगद फ़सले. शिवसेनेचा दुसरा मुख्यमंत्री म्हणून काम केलेल्या राणेंनी १९९९ ते २००५ पर्यंत विरोधी नेता म्हणून विधानसभा गाजवली होती. आज त्यांच्या इतका खमक्या विरोधी नेता महाराष्ट्रात दुसरा नाही. तरीही त्यांना योग्यरितीने वापरण्याचा विचार सोनियांनी केला नाही. कारण राणे स्वयंभू स्वभावाचे आहेत.
विधानसभेत पराभूत झालेल्या कॉग्रेसला राज्यात पुन्हा नव्याने उभे रहायचे असेल, तर अतिशय आक्रमक वृत्तीचा नेता हवा आहे. पण तसा अन्य कोणी नेता नव्हता. अशोक चव्हाण यांची हयात सत्ताधारी गटात गेली आणि अन्य नेते तितके पुढाकार घेणारे नाहीत. अशा वेळी राणे हाच राज्यात भाजपा सरकारला सतावून सोडणारा नेता होऊ शकला असता. म्हणूनच माणिकराव ठाकरे यांच्या जागी प्रदेशाध्यक्ष म्हणून नारायण राणे यांची दिड वर्षापुर्वीच नेमणूक व्हायला हरकत नव्हती. तो काळ राणे यांना मिळाला असता, तर त्यांनी गेल्या वर्षभरात दुष्काळ व शेतकरी आत्महत्येचा विषय घेऊन राज्यभर रान उठवले असते. किंबहूना त्यांनी आपल्या बळावर तशी मुसंडी मारूनही बघितली. पण पाठीशी पक्षाची संघटनाही उभी रहात नसेल, तर राणे किती झुंजणार? अशोक चव्हाण प्रदेशाध्यक्ष म्हणून व विखेपाटील विरोधी नेता म्हणूनही तोकडे पडले. त्यापैकी एका जागी जरी राणे असते, तर त्यांनी या प्रश्नांवर देवेंद्र सरकारला सळो की पळो करून सोडले असते. पण त्यांना बहिष्कृत असल्याप्रमाणेच कॉग्रेसने बाजूला फ़ेकले होते. आता विधान परिषदेत त्यांची वर्णी लागली, त्यामागे श्रेष्ठींची अगतिकता अधिक आहे. पक्षाला राज्यात नव्याने संजीवनी द्यायची असेल, तर कोणीतरी जबाबदारी घेणारा नेता हवा, म्हणून राणे यांना ती संधी देण्यात आलेली आहे. एकूण ५२ इच्छुक होते. त्यातले अनेकजण पुर्वीपासून आमदार होते. पण त्यांनी परिषदेचे कामकाज कधी गाजवल्याचे आपण ऐकलेले नाही. एक राणे त्यासाठी पुरेसा ठरेल हे लक्षात आल्यानेच त्यांची वर्णी लागलेली आहे. मात्र विधान मंडळापुरता या नेत्याला गुंतवून कॉग्रेस वाढण्याची अजिबात शक्यता नाही. त्याला राज्यातील पक्षाची सुत्रे हाती देऊन मोकाट सोडले, तर तो सत्ताधार्‍यांना धाक निर्माण करीलच. पण नव्याने कॉग्रेसला झुंजणारा पक्ष म्हणूनही राणे उभे करू शकतील.
मरगळलेला पक्ष किंवा संघटना उभी करण्यासाठी झुंजार नेता लागतो आणि त्याच्यामध्ये मोठी महत्वाकांक्षा असावी लागते. काहीतरी करून दाखवण्याची जिद्द व इर्षा असलेली माणसेच आक्रमकरित्या कामाला जुंपून घेत असतात. बारा वर्षापुर्वी अशीच आंध्रातली संपलेली कॉग्रेस राजशेखर रेड्डी या नेत्याने पुनरूज्जीवीत केली होती. चंद्राबाबू नायडू यांच्यासारख्या लोकप्रिय नेत्याच्या विरोधात राज्यभर दौरे काढून व मेळावे भरवून रेड्डी यांनी लोकमताचे वादळ उभे केले होते. त्यामुळेच २००४ व २००९ अशा दोन निवडणूकात आंध्रात पुन्हा कॉग्रेस बहूमत मिळवू शकली. अधिक त्याच नेत्याने सर्वाधिक खासदार लोकसभेत पाठवून युपीएच्या सत्तेत हातभार लावला होत. कारण त्या माणसापाशी मुख्यमंत्री व्हायची जबरदस्त महत्वाकांक्षा होती. नारायण राणे हा अशाच महत्वाकांक्षेने पछाडलेला नेता आहे. म्हणूनच आपल्या महत्वाकांक्षेची पुर्तता करण्यासाठी तो महाराष्ट्रात रान उठवू शकतो. त्यात कितपत यशस्वी होईल, हा वेगळा विषय आहे. पण निदान मरगळल्या पक्षात जान फ़ुंकून कडवी झुंज देणारी राजकीय फ़ौज उभी करणे, फ़क्त राणे यांनाच शक्य आहे. त्याची चुणूक विधान परिषदेत निवडून आल्यावर आपल्याला दिसेलच. पण तिथेच अडकून पडल्यास राणे फ़ारसे काही करू शकणार नाहीत. राज्यात नव्याने पक्ष उभारणीचे अधिकार त्यांच्या हाती सोपवून, त्यांनाच प्रदेशाध्यक्ष करणे अधिक लाभदायक असू शकेल. मात्र इतका महत्वाकांक्षी स्वयंभू नेता सोनियांना कितपत मान्य होऊ शकेल याची शंका आहे. त्यामुळे सध्या तरी राणे विधान परिषदेत काय पराक्रम गाजवतात, तिकडे लक्ष ठेवण्यापलिकडे काही करणे शक्य नाही. हा माणूस विधान मंडळात राष्ट्रवादी व कॉग्रेस नेत्यांना झाकोळून टाकेल, याबद्दल शंका बाळगण्याचे कारण नाही. किंबहूना शिवसेनेला ते नवे आव्हान होऊ शकेल.

3 comments:

  1. आता शिवसेना व राणे भांडत बसणार भाजपाचा फायदा होणार

    ReplyDelete
  2. Uddhav Thakernchy steterji fude Rane kahi hi karu shakat nahi ....!!! Karan Shivsainik social Media var changlach active aahe comper than others political party...

    ReplyDelete
  3. भाऊ राणेंचं वय झालंय आता. ते कितपत लढणार ?

    ReplyDelete