Sunday, May 15, 2016

अच्छे दिन आणि बुरे दिन

काही दिवसातच मोदी यांच्या पंतप्रधान कारकिर्दीला दोन वर्षे पुर्ण होतील. आपल्या प्रचारात दोन वर्षापुर्वी मोदींनी अच्छे दिन आनेवाले है, अशी एक घोषणाच केलेली होती. आजही जरा काही इकडेतिकडे झाले, मग तेच शब्द वापरून भाजपाची टवाळी होत असते. पण त्या घोषणेचा जनक होता मोदींना प्रचार सुत्रधार प्रशांत किशोर! मुळचा बिहारी असलेला प्रशांत किशोर, हा तरूण नव्या युगातला व जगातला असल्याने त्याच्या निवडणूक रणनितीची तेव्हा कोणी दखल घेतली नव्हती. त्यातले गांभिर्य ओळखले नव्हते. मात्र मोदींना बहूमत मिळाल्याचा चमत्कार घडला आणि प्रशांतकडे भारतीय राजकारणी व अभ्यासकांचे लक्ष वेधले गेले. पण त्यातही योगायोग असू शकतो, म्हणून त्याला फ़ारसे महत्व मिळाले नाही. मग भाजपासून दुरावलेल्या प्रशांतला आपली कुवत नव्याने सिद्ध करणे भाग होते. म्हणूनच त्याने दिल्लीत केजरीवाल यांच्या संघर्षात सहभागी व्हायचे ठरवले. ‘पाच चाल केजरीवाल’ ही त्याची घोषणा व रणनिती यशस्वी होऊन अभूतपुर्व यश आम आदमी पक्षाला मिळाले. मग त्याच्याकडे भुवया उंचावून बघितले जाऊ लागले. त्याच काळात पराभवाने हबकुन गेलेल्या नितीशकुमारांनी प्रशांतकडे धाव घेतली आणि आपल्या आगामी रणनितीचे अधिकार प्रशांतकडे सोपवले. त्यात नितीश-लालू अशी आघाडी आधीच उभी असली तरी लालूंच्या बदनामीचे चटके किती बसतील अशी भिती होती. अधिक नितीशनी पराभवाची नैतिक जबाबदारी पत्करून मुख्यमंत्रीपद सोडलेले होते. नेमलेला नेता नितीशला दाद देत नव्हता. अशावेळी जीतनराम मांझी यांना बाजूला करून पुन्हा मुख्यमंत्री पदावर आरूढ व्हायची कसरत नितीशना करावी लागली होती. त्यामागे प्रशांत किशोर होता आणि जिंकायचे तर नितीश मुख्यमंत्री हवेत, असा आग्रह त्याने़च धरला होता. त्याची ही रणनिती पुन्हा बिहारमध्येही यशस्वी ठरली. त्याने नितीश-लालूंना मोठे यश मिळवून दिले. किंबहूना त्यातून एकविसाव्या शतकातला चाणक्य म्हणून प्रशांत किशोर नावारूपाला आला.
मग येऊ घातलेल्या प्रत्येक निवडणूकीसाठी राजकीय पक्षांनी प्रशांतचे उंबरठे झिजवले तर नवल नव्हते. ममतापासून कॉग्रेसपर्यंत अनेकांनी प्रशांतची मनधरणी चालवली होती. पंजाब व उत्तर प्रदेशच्या निवडणूका पुढील वर्षाच्या प्रारंभी व्हायच्या आहेत आणि त्यासाठी आतापासून मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. त्यात प्रशांतला कॉग्रेसने मोठे कंत्राट दिल्याच्या बातम्या झळकल्या होत्या. राहुलनेही त्याच्याशी बातचित केल्याचे ऐकू आले. मध्यंतरी प्रशांतने उत्तरप्रदेशातील कॉग्रेसच्या जिल्हा तालुका पातळीवरच्या नेत्यांच्या सलग बैठका घेऊन व्युहरचना चालू केल्याच्याही बातम्या होत्या. आता त्याने अंदाज घेतल्यावर काही सूचना केल्याच्या बातम्या आहेत. त्यामध्ये कॉग्रेसने आपला मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार आतापासून जाहिर करावा आणि तो ब्राह्मण असावा, असा प्रशांतचा आग्रह असल्याचे उघड झाले आहे. ते कितपत मान्य होईल? ही एक बाब झाली. दुसरी महत्वाची बाब म्हणजे सामान्य माणसाला भुरळ घालू शकेल, असा चेहरा नेता म्हणून पुढे करायचाही प्रशांतचा आग्रह आहे. त्यासाठी त्याने राहुल किंवा प्रियंका गांधी यापैकी एकाला मुख्यमंत्री पदाचा उमेदवार करण्याची कल्पना मांडलेली आहे. ही कॉग्रेससाठी मोठीच अडचण आहे. कारण नेहरू खानदानामध्ये फ़क्त पंतप्रधानच जन्माला येत असतात. त्यापैकी कोणालाही मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेत उमेदवार करणे, म्हणजे त्यांचे अवमूल्यन ठरू शकते, ही कुठल्याही कॉग्रेस नेता कार्यकर्त्याची पक्की श्रद्धा आहे. मग एका राज्याचा नेता म्हणून गांधी कुटुंबापैकी कुणाला समोर आणायचे कसे? अर्थात तितकीच समस्या नाही. मरगळलेल्या कॉग्रेसला गेल्या कित्येक निवडणूकात देशातील या सर्वात मोठ्या राज्यात नाव घेण्यासारखे यश वा मते मिळवता आलेली नाहीत. त्यातून सावरायचे असताना यशाही कोणतीही हमी नाही. मग अपेशी ठरल्यास परिणाम काय होतील?
उदाहरणार्थ प्रियंका किंवा राहुल यापैकी एकाला मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून पेश केले आणि त्यात पक्षाची तब्येत सुधारली, पण बहुमत मिळू शकले नाही, तर लोकांनी या नेहरू वारसांना राज्यातही झिडकारल्याचा गवगवा होणार. त्यामुळे अन्य राज्यात प्रचारासाठीही त्यांचे अवमूल्यन होऊन जाईल. राहुल आधीच अपयशी ठरला आहे. पण प्रियंका हा अजून कॅश न केलेला चेक आहे. तो उत्तरप्रदेशच्या राजकारणात वापरला गेला, तर २०१९ च्या लोकसभा निवडणूकीत तिचाही उपयोग उरणार नाही. नेहरू खानदानविषयी सेक्युलर बुद्धीमंत व कॉग्रेसजनांची श्रद्धा समजू शकते. कारण त्यांना यशाचे मानकरी ठरवण्याची प्रथा देशात रुजलेली आहे. अपयशाचे खापर डोक्यावर फ़ोडून घेण्यासाठी बाकीचे कार्यकर्ते नेते असतात. म्हणूनच मागल्या लोकसभेतही राहुल सर्व निर्णय घेत असले तरी पंतप्रधान पदाचा उमेदवार असा कधीही त्यांचा उल्लेख टाळला गेला होता. आता त्यापेक्षाही कमी दर्जाच्या पदासाठी या भावंडापैकी कोणाला पुढे केले आणि तो जुगार फ़सला मग? ही भिती कॉग्रेसला असली तर नवल नाही. म्हणूनच प्रशांत किशोरची कल्पना व रणनिती कितीही समर्पक असो, त्यात पणाला लागण्याची हिंमत मोलाची असते. त्याचा संपुर्ण अभाव या भावंडांमध्ये आहे. मग करायचे काय? राहुलला सुरक्षित ठेवण्यासाठी तडजोड म्हणून प्रियंकाला पुढे केले आणि तरीही जुगार फ़सला, तर हाती उरलेला शेवटचा पत्ताही निकालात निघणार. थोडक्यात प्रशांतची कल्पना चांगली आहे. पण त्यात झोकून देणारा खेळाडू आवश्यक आहे. जी कुवत मोदी, केजरीवाल व नितीशमध्ये होती. पण त्याचा लवलेश राहुल प्रियंकामध्ये आजवर दिसलेला नाही. म्हणूनच रणनितीकार भले चांगला असेल. पण सेनापतीचा दुष्काळ ही कॉग्रेसची मोठी समस्या आहे. कारण आज त्या पक्षाकडे उत्तर प्रदेशात संघटना नाही, की पुढे करण्यासारखा कोणी नेत्याचा चेहराही नाही.
प्रशांत किशोरने खुप अभ्यास करून भारतीय निवडणूकातला बदल शोधून काढला आणि त्याचा पहिला प्रयोग नरेंद्र मोदी यांच्यासाठी लोकसभा मतदानाच्या वेळी केला होता. तेव्हापासून त्याने आपले पत्ते लपवलेले नाहीत. वेळोवेळी त्याच्या मुलाखती प्रसिद्ध झाल्या, तेव्हा त्याने रणनिती जाहिरपणे मांडलेली आहे. नुसती प्रचाराची धमाल किंवा धुमधडाका उपयोगाचा नाही. फ़क्त संघटनाही कामाची नाही. संघटनेच्या जोडीला चेहरा महत्वाचा आहे. अमेरिकेप्रमाणे आता भारतीय निवडणूका व्यक्तीकेंद्री झाल्यात. त्यात मतदाराला होणारा पंतप्रधान, मुख्यमंत्री वा नगरपालिकेचा अध्यक्ष आधीच बघायचा असतो. लोक प्रतिनिधी निवडतात. पण ते प्रतिनिधी कोणाच्या हाती नेतृत्व देतील, त्याचा चेहरा व कर्तृत्व लोकांना बघायचे असते आणि त्यानुसारच लोक कौल देतात. तेच लोकसभेत झाले आणि नंतर दिल्ली बिहारमध्ये झाले. त्याच्याही आधी ममता, मायावती, मुलायम किंवा जयललिता यांच्या बाबतीत तेच झाले होते. जिथे कुठलाच चेहरा नाही, तिथे संमिश्र कौल दिला गेला. म्हणून लोकसभा जिंकणार्‍या भाजपासारख्या पक्षाला दिल्ली बिहारमध्ये मार खावा लागला आणि स्थानिक चेहरा यशस्वी झाला. प्रशांत किशोरचे यश नुसत्या रणनितीमध्ये नाही तर लोकांना भुरळ घालू शकेल, असे नेतृत्व ही त्याची अट आहे. तिथेच मग कॉग्रेसची अडचण झाली आहे. कारण त्यांच्यापाशी उत्तर प्रदेशात संघटना नाही आणि चेहराही नाही. त्या अडचणीवर मात करण्यासाठी प्रशांतने राहुल वा प्रियंकाचा जुगार खेळण्याची कल्पना मांडली आहे. पण कॉग्रेस तितका धोका पत्करणार काय? याचे उत्तर अर्थातच सोनिया गांधींना शोधावे लागणार आहे. नुसता तितका विषय नाही. प्रियंकाला पक्षात आणायची मागणी आहे. पण तसे केल्यास ‘सुपुत्राचे’ भविष्य कितपत उज्वल असेल, याची भितीही सतावते आहे. थोडक्यात ‘अच्छे दिन आणि बुरे दिन’ यांच्या झोक्यावर कॉग्रेस आता बसलेली आहे.

2 comments:

  1. छान भाऊ मस्तच

    ReplyDelete
  2. एक छोटी शंका...
    मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार "ब्राह्मण असावा" की "राहुल-प्रियंका यांच्यापैकी असावा"?
    नक्की काय ? दोन्ही गोष्टी एकाचवेळी कशा शक्य होणार ?

    ReplyDelete