Monday, January 27, 2020

मनसेची खरी ‘राज’निती

Image result for raj thackeray hinduta]wa

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनाचे निमीत्त साधून राज ठाकरे यांनी आपल्या पक्षाचा चेहरामोहरा बदलण्याची घोषणा केली, ती अपेक्षितच होती. कारण तशा बातम्या दोन आठवडे आधीपासून येतच होत्या. त्यांनाही पर्याय नव्हता. गेल्या सहासात वर्षापासून मरगळलेला पक्ष नव्याने उभा करायचा किंवा विसर्जित करायचा, इतकेच पर्याय त्यांच्यासमोर होते. त्यात त्यांनी भगवा रंग परिधान करून पक्षाला नवी संजिवनी देण्याचा पवित्रा घेतला, तर त्यात चकीत होण्यासारखे काहीच नाही. पण त्यानंतर विविध राजकीय पक्ष व विश्लेषकांच्या आलेल्या प्रतिक्रीया अधिक चकीत करणार्‍या आहेत. त्यापैकी काहींनी आपल्या नेहमीच्या कारस्थानी सिद्धांताच्या आहारी जाऊन, त्याही नव्या भूमिकेमागे शरद पवारच असल्याचाही शोध लावला आहे. म्हणे शिवसेनेने पुरोगामी पक्षांशी आघाडीचे सरकार स्थापन केल्यामुळे दुरावलेला दुखावलेला हिंदूत्ववादी मतदार सगळाच्या सगळा भाजपाच्या पारड्यात जाऊ नये, म्हणून पवारांनी केलेली ही खेळी आहे. कधीकधी अशा आरोपांमुळे पवारांची दया येते. कारण बर्‍यावाईट कारणासाठी त्यांच्या माथी कुठलेही खापर फ़ोडले जात असते. हा शोध कोणी कसा लावला, त्याचा जनक ठाऊक नाही. पण काही किमान तर्कसंगत विधाने करावीत, इतकीही क्षमता असे जाणकार गमावून बसलेत काय, याची शंका येते. पवारांना असे वाटणे स्वाभाविक आहे. पण पक्ष रसातळाला गेला असताना राजनी त्याच पवारांच्या इच्छेसाठी आपला बळी कशाला द्यायचा? त्याचेही उत्तर अशा शहाण्यांनी द्यायला हवे ना? उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या हव्यासामुळे शिवसेनेला आपला आत्मा गमावण्याची पाळी येत चालली आहे, यात शंका नाही. पण म्हणून नुसता भगवा झेंडा मनसेने खांद्यावर घेतला तर सगळा हिंदूत्ववादी सेनेचा मतदार तिकडे जाऊ लागेल, ही कल्पनाच खुळेपणाची आहे.

आजवर ज्या कॉग्रेस राष्ट्रवादी पक्षांशी सेनेने शत्रूत्व केले, त्यांच्याशी सत्तेसाठी हातमिळवणी केल्याने शिवसैनिक नाराज असणे समजू शकते. किंबहूना अर्ध्या सत्तेसाठी महायुती तोडल्यानंतर सेनेच्या वाट्याला अर्ध्यातले अर्धेही आले नाही, म्हणूनही अनेक शिवसैनिक प्रक्षुब्ध असू शकतात. पण म्हणून असा निष्ठावान शिवसैनिक वा मतदार, लगेच सेनेला सोडून जात नसतो. त्याला काही कालावधी जावा लागतो. पण ही अन्य पक्षांसाठीची स्थिती असते. शिवसेना हा राजकीय पक्ष म्हणून गणला जात असला, तरी त्यात सहभागी होणार्‍या तरुणांची मानसिकता वेगळी असते. तो युयुत्सू असतो आणि अत्यंत संवेदनाशील असतो. आपल्या या उतावळ्या मनस्थितीमुळेच तो सेनेत आलेला असतो. आपल्याला अमान्य असलेल्या वा रुचत नाहीत, त्या गोष्टींवर तात्काळ प्रक्षुब्ध प्रतिक्रीया देणारा, तो शिवसैनिक असे त्याचे स्वरूप आहे. अन्य पक्षात असा कार्यकर्ता क्वचितच सापडेल. सहाजिकच पक्षाला सत्तेतला वाटा किती मिळाला वा कुठली मंत्रालये मिळाली, हा शिवसैनिकांसाठी जिव्हाळ्याचा विषय असू शकत नाही. पण ज्या भूमिकांसाठी वा आग्रहासाठी तो शिवसैनिक असतो, त्या भूमिकांना तडा जाऊ लागला, मग त्याची चलबिचल सुरू होत असते. तशी चलबिचल गेले दोन महिने शिवसेनेत आहे याबद्दल शंका घेण्याचे कारण नाही. पटले नाही वा मनाविरुद्ध झाले तर तात्काळ हातात दगड घेऊन राडा करणार्‍यांची फ़ौज, ही सेनेची दिर्घकालीन ओळख राहिलेली आहे. गेल्या काही वर्षात वा सुत्रे उद्धव ठाकरेंकडे आल्यापासून ती ओळख क्रमाक्रमाने पुसली गेलेली आहे. किंबहूना त्यामुळेच असा उतावळा व तात्काळ प्रतिक्रिया देणारा वर्ग क्रमाक्रमाने मनसेमध्ये दाखल होत गेला. मात्र त्याला सातत्याने हाताळण्यात व आपल्या भूमिका कायम राखण्यात राज ठाकरे कमी पडले आणि त्यांचा पक्ष मरगळत गेला होता.

अशा स्थितीत त्यांनी शरद पवार यांच्या नादी लागून काही चुका केल्या यात शंका नाही. भाजपा शिवसेना युतीमुळे मनसेच्या विस्ताराला मर्यादा आलेल्या होत्या. त्यामुळे आपली जागा विरोधकात संपादन करण्यासाठी लोकसभा विधानसभेत राज यांनी मोदी विरोधातली कडवी भूमिका घेऊन आक्रमक चेहराही उभा केला. कॉग्रेस व पवार आपल्याला वापरत असल्याचे त्यांच्या लक्षात आले नाही आणि लक्षात आले; तेव्हा खुप उशिर झाला होता. त्यामुळे नवा विचार करणे वा संन्यास घेण्यापेक्षा अन्य पर्याय नव्हता. अनुयायी संन्यास घेण्याच्या मनस्थितीत नव्हते, म्हणून मनसेला विधानसभा अखेरच्या क्षणी लढवावी लागली. पण कुठल्याही खास तयारीशिवाय मनसेला १२ लाखाहून अधिक मते मिळाली आणि अजूनही पक्षाला सावरण्याची संधी असल्याची ती चाहूल होती. पण सावरायचे म्हणजे काय? राजकारणाच्या परिघात नव्या पक्षाला स्थान मिळवायचे असेल वा उभे रहायचे असेल, तर अन्य कुठल्यातरी पक्षाची जागा व्यापूनच सुरूवात करावी लागत असते. जशी शिवसेनेने महाराष्ट्र समितीची जागा गिळंकृत करून आपला तंबू मुंबई ठाण्यात थाटला. त्यानंतर महाराष्ट्रात हातपाय पसरायला दोन दशकांची प्रतिक्षा सेनेला करावी लागलेली होती. कारण मराठीचा मुद्दा मुंबई वा मोजक्या महानगरांपुरता होता. सहाजिकच सेना तितक्याच भागात मर्यादित राहिली. समितीने अमराठी भाषिकांचे समर्थन केल्यामुळे सेनेला मुंबईत बिगरकॉग्रेसी राजकीय जागा व्यापणे शक्य झाले वा संधी मिळून गेली होती. तशीच संधी १९८५ नंतरच्या काळात तमाम विरोधी पक्षांनी आपली बिगरकॉग्रेसी राजकारणातील जागा मोकळी करायचे धोरण घेतले आणि बघता बघता शिवसेना महाराष्ट्रव्यापी पक्ष होऊन गेला. तिच्या समवेतच भाजपालाही महाराष्ट्रात हातपाय व्यापण्याची संधी मिळून गेली. विविध पुरोगामी पक्षांनी असे आत्मघातकी धोरण त्या काळात घेतले नसते, तर शिवसेनेला महाराष्ट्रातला प्रादेशिक पक्ष म्हणून उभे रहाणे सोपे काम नव्हते.

तर सांगायचा मुद्दा इतकाच, की नव्या पक्षाला उभारी येण्यासाठी वा हातपाय पसरण्यासाठी अस्तित्वातील कोणा पक्षाने आपली जागा मोकळी करावी लागते. याचा अर्थ त्या पक्षाने आपल्या लढवायच्या जागा वा मतदारसंघ नव्या पक्षाला द्यायचे नसतात. त्यांना ज्या कारणास्तव लोक मते देत असतात, त्या मतदाराचा भ्रमनिरास होणार्‍या भूमिका संबंधित पक्ष घेऊ लागला, मग मुळच्या भूमिकेशी जुळवून घेणार्‍या पक्षाकडे त्याचा निष्ठावान मतदार क्रमाक्रमाने वळत असतो. एकाच पक्षाचा मतदार विविध कारणांनी त्या पक्षाकडे आकर्षित झालेला असतो. हिंदूत्व, मराठी अस्मिता, तात्काळ मुहतोड जबाब देणारी आक्रमक कार्यकर्त्यांची फ़ौज; अशी ती कारणे असू शकतात. मुंबईत शिवसेनेचा प्रभाव कम्युनिस्टांशी दोन हात करण्यातून वाढला आणि १९८५ नंतरच्या काळात खेड्यापाड्यातल्या तरूणांना आक्रमक नेता म्हणून बाळासाहेब भावले व शिवसेना फ़ोफ़ावत गेली. पण तसे होण्याला जनता दल, शेकाप, डाव्या पक्षांनी आपला कॉग्रेसविरोध बोथट केल्यानेही मोठा हातभार लागला होता. शिवसेनेने आता मुख्यमंत्रीपद मिळवण्याचा हव्यास करताना तीच जागा मोकळी करण्याचे ठरवलेले आहे. तिथे राज ठाकरेंना संधी दिसली तर नवल नाही. दोन्ही कॉग्रेसशी हातमिळवणी करताना सेनेला हिंदूत्व सौम्य करावे लागणार, ही बाब जगजाहिर होती. पण ती भूमिका सौम्य करणे वेगळे व त्याची विटंबना सोसूनही गप्प रहाणे वेगळे असते. सावरकरांवर राहूल गांधींनी गलिच्छ टिका केली, तर सेनेने निमूट सहन करणे म्हणजे त्या कारणाने जो मतदार पाठीशी आलेला आहे, त्याचा भ्रमनिरास करणे होते. इतर प्रसंगी सेनेने धमाल उडवून दिली असती. पण आता मुख्यमंत्रीपद वा सत्ता वाचवण्यासाठी सेना अगतिक झाली आहे. तितके सौजन्य तिने भाजपाशी सत्ता वाटून घेतानाही दाखवले नव्हते. त्यालाच जागा मोकळे करणे म्हणतात.

शिवसेनेचा हिंदूत्ववादी पाठीराखा किंवा मतदार आपल्याऐवजी मनसेकडे जाईल, अशी भाजपाला भिती वाटत असेल, तर तो निव्वळ मुर्खपणा आहे. कारण शिवसेनेचे हिंदूत्व मानणारा वर्ग कमालीचा आक्रमक आहे. त्याला भाजपात लगेच सहभागी होणे शक्य नाही. त्याला आक्रस्ताळेपणा भावतो. नेमकी तीच जागा राज ठाकरे यांनी हेरली आहे. त्यांनी अधिवेशनात आपल्या कार्यकर्त्यांसमोर लांबलचक भाषण केले नाही. पण अखेरच्या टप्प्यात त्यांनी केलेली मोर्चाही घोषणा निदर्शक आहे. नागरिकत्व कायद्याला विरोध करणारे मोर्चे निघत आहेत आणि त्या मोर्चांना ‘मोर्चानेच चोख उत्तर’ असे शब्द त्यांनी योजले. याचा अर्थ किती विश्लेषकांना उलगडला आहे? विरोधातले मोर्चे आक्रमक आहेत आणि भाजपा अजून तितक्या प्रखरपणे वा आक्रमक पवित्रा घेऊन रस्त्यावर उतरलेला नाही. हे काम शिवसेनेने कधीच केले असते. पण सत्ता टिकवायची म्हणून सेनेचे लढवय्ये सैनिक मूग गिळून गप्प आहेत. म्हणून त्यांची खुमखुमी संपली वा मावळली, असा अर्थ होऊ शकत नाही. शाखाप्रमुख वा पदाधिकारी सोडले तर बाकीच्या शिवसैनिकांच्या चेहर्‍यावर कोणी शिक्का मारलेला नसतो. त्यांच्या खुमखुमीला वाव असेल, असा हा मोर्चा किंवा कार्यक्रम आहे. नागरिकत्व कायद्याच्या विरोधात उघडपणे मुस्लिम लांगुलचालन चालू आहे. त्याला आक्षेप घेण्यात नेहमी पुढाकार शिवसेनेचा असायचा. पण ज्यांच्या पाठींब्याने सरकार स्थापले आहे, त्यांची मर्जी मोडणे सेनेला शक्य नाही. भाजपाचा रस्त्यात उतरण्याचा स्वभाव नाही. म्हणून ही जागा मोकळी झाली आहे. मनसेने वा राज ठाकरेंनी ती जागा हेरली आहे. मोर्चाला मोर्चाने उत्तर, याचा अर्थ प्रसंगी राडा असाच असू शकतो व आहे. पण तेवढ्याने मनसेला शिवसेनेची जागा व्यापता येणार नाही. शिवसैनिक जितका निराश व वैफ़ल्यग्रस्त होईल, तितके ते काम सोपे सहज होणार आहे.

पाकिस्तान व बांगला देशातील घुसखोर मुस्लिमांनी इथे अड्डे बनवलेले आहेत आणि त्यांना उचलून पहिले हाकलून लावले पाहिजे; ही मागणी राज यांनी या भाषणातून केली. तशी ती नवी मागणी नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे अनेक वर्षापासून तिचा उच्चार सातत्याने करीत आलेले होते आणि राजनी त्याचाच पुनरुच्चार केला आहे. आता सवाल असा आहे, की तीच मुळ शिवसेनेची मागणी घेऊन मनसे रस्त्यावर उतरणार आहे आणि हाणामारी होण्यापर्यंत प्रकरण जाऊ शकेल. त्यात मनसेला झोडपायला शिवसेना रस्त्यावर येणार नाही. पण सत्तेत असल्याने ते काम शिवसेनेच्या मुख्यमंत्र्याला पोलिस यंत्रणेमार्फ़त करावे लागणार आहे. राज ठाकरे यांचा अविर्भाव बघितला तर त्यांनी ३७० कलमापासून नागरिकतत्व कायद्याला नुसता शाब्दिक पाठींबा दिलेला नाही. ते त्यावरून मोर्चा व आंदोलनाचे रण माजवण्याच्या पवित्र्यात आहेत. त्याचा सरळ अर्थ पोलिस व मनसे यांच्यातील टक्कर असाही होऊ शकतो. त्याचा आणखी एक अर्थ आहे. मागणी कोणाची तर बाळासाहेबांच्या मुळ शिवसेनेची. त्याविषयी सत्तेत बसलेली शिवसेना गप्प आहे आणि तेच मुद्दे घेऊन दुसरी सेना म्हणजे मनसे मैदानात उतरली; तर डोकी फ़ोडणारी पोलिस कारवाई करणारी सेना सत्तेतली असेल. म्हणजे इकडून बाळासाहेबांची मागणी आणि तिकडून आंदोलन चिरडून काढणारी सेनाही बाळासाहेबांचाच वारसा सांगणारी असेल. हा मोठा राजकीय तिढा ठरणार आहे. किंबहूना मनसेच्या नव्या भगव्यातला तोच गुंतागुंतीचा सापळा आहे. अशा मोर्चातून हिंसाचार होण्याची शक्यता असल्याने सरकार वा पोलिस परवानगी नाकारू शकतात. पण कुठल्या मागणी मोर्चाला संमती नाकारली जाणार? बाळासाहेबांच्या भूमिकेच्या मोर्चाला परवानगी नाही आणि त्याच्या भूमिकेला छेद देणार्‍या मोर्चांना मोकळे रान? द्विधा स्थिती निर्माण होईल ना?

दोन्ही कॉग्रेस या विषयात अशा गुरफ़टलेल्या आहेत, की त्यांना आपापल्या भूमिका जपण्यासाठी मनसेच्या अशा मोर्चाला कडाडून विरोध करावाच लागणार. पण शिवसेनेचीच मुळ भूमिका मोर्चासाठी घेतलेली असल्याने, त्याला विरोध व त्यावर पोलिस कारवाई म्हणजे शिवसेनेसाठी सत्वपरिक्षाच होणार ना? बाळासाहेबांचा वारसा कशाला म्हणायचे? त्यांनी आयुष्यभर मांडलेल्या भूमिकेला सत्तेसाठी तिलांजली देण्याला वारसा म्हणायचे? की त्यांच्याच भूमिकेच्या समर्थनाला काढलेल्या मोर्चाला पाठींबा सहानुभूती देऊन वारसा जपायचा? शिवसैनिकांसाठी म्हणूनच हा मोठा पेच असणार आहे. वरकरणी तो चटकन लक्षात येणार नाही. म्हणून सगळी चर्चा हिंदूत्व किंवा बदलत्या भगव्या झेंड्याभोवती रंगली होती. पण भाषणाच्या अखेरीस राजनी घोषित केलेल्या नागरिकत्व कायद्याच्या समर्थनासाठी ‘मोर्चाला मोर्चाने उत्तर’ हा राजकीय सापळा राजकीय पंडितांच्याही नजरेतून निसटला आहे. येत्या ९ फ़ेब्रुवारीला मनसेचा नुसता मोर्चा नाही, तो सत्तेतील शिवसेनेला घातलेला पेच आहे. बाळासाहेबांच्या जीवनभर जपलेल्या भूमिकेला समर्थन द्यायचे? विरोध करायचा? की आपल्या नव्या मित्रांच्या आग्रहाखातर जुन्या भूमिकेला मूठमाती देऊन सत्ता टिकवायची? नजिक कुठल्या निवडणूका नसताना मनसेने बदललेला झेंडा, नवी हिंदूत्वाची भूमिका, म्हणूनच कुणाची मते पळवावी यासाठीचा नाही. दिर्घकालीन राजकारणाची रणनिती असू शकते. अर्थात राज ठाकरे तितका दुरगामी विचार करीत असतील तर. तितका दुरचा विचार त्यांनी केला असेल. तर शिवसेनेच्या मतदारासमोर नवे आकर्षण उभे करण्याचा त्यातला हेतू पवारांनी सुचवलेला असू शकत नाही. राजच्या भूमिकेला अनेक माध्यमातून राष्ट्रीय पातळीवर अफ़ाट प्रसिद्धी मिळणार आहे. त्यातून त्यांचा पक्ष नव्याने उभारी घेऊ शकेल. पण एकदा सुरूवात केली, मग त्यातले सातत्य सर्वाधिक महत्वाचे असेल. निराश शिवसैनिकांना तिकडे येण्याआधी सातत्याचा विश्वासही वाटायला हवा.

19 comments:

 1. जबरदस्त विश्लेषण...👌👌

  ReplyDelete
 2. पण भाऊ सेनेला मुख्यमंत्री पदामुळे बाकीच्यांना वाकवता का येत नाही? करण सेनेने राजीनामा दिला तर दोन्ही काँग्रेस काहीही करू शकणार नाहीत. त्यांना हात चोळत बसावे लागणार ना?? मग मुख्यमंत्री साहेब त्या दोन पक्षांना का वाकवत नाहीत सेनेच्या मूळ अजेंड्यासाठी??? मी सांगतो तसे नाही झाले तर मी राजीनामा देणार हे ठासून का बोलत नाहीत मुख्यमंत्री??? कारण सेनेने राजीनामा दिला की संपलेच सगळे..नाही का??

  ReplyDelete
 3. भाऊ छानच लेख. राज ठाकरे हे वस्तुतथ्य जाणणारे आत्मनिष्ठ मराठी हिंदुत्वनिष्ठ, सचोटी, न्याय्य-बाजू घेणारे, सुवृती बाळगणारे स्वयंभू-अस्तित्व असलेले व नित्य/अनित्य मधले नित्य समोर आणणारे, नियमितपणे फक्त खरे बोलणारे
  वैगैरे वाटतात कि काय? राज ठाकरेंबद्दल त्यांच्यावर इतका आरपार विश्वास ठेवून त्यावर लेख लिहिणे हे गोंधळ वाढवणारे नाही काय? राज ठाकरे शरद पवारांबरोबर चुंबाचुंबी करत राजकीय मंत्रचळेपणात अडकले अन विश्वासाहर्ता घालवून
  बसले. ज्यां रेषेवर टोकांना जाणे हे दुर्गुण असतात, त्याच रेषेवरील सुवर्णमध्य हा सदगुण असतो----अरिस्टॉटल, भगवान बुद्धानेही मझ्झिमनिकाय म्हणजेच मध्यममार्ग यावर भर दिलेला होता. Bjp तेच करते आहे. राज ना ते जमणार नाही

  ReplyDelete
 4. राजनी घोषित केलेल्या नागरिकत्व कायद्याच्या समर्थनासाठी ‘मोर्चाला मोर्चाने उत्तर’ हा राजकीय सापळा राजकीय पंडितांच्याही नजरेतून निसटला आहे.अप्रतिम विश्लेषण. साहजिकच, बाजारू पेपर वाल्यांना किंवा चॅनल वाल्यांना हे लवकर कळणार नाही कारण त्यांना त्यांचे अजेंडे चालवायचे आहेत आणि तितकी बुद्धी त्यांना नाहीच

  ReplyDelete
 5. हिंदुत्ववादी मतदार भाजपकडे वळू नये म्हणून राजना पवारांनी उठवले हा विचार रेस मधील dark horse न ठरो.बारामतीवाले काय भानामति करतील सांगता येत नाही भाजपने डोळ्यात तेल घालून जागता पहारा करावा

  ReplyDelete
 6. मनसे पक्ष रसातळाला गेला असताना राजनी त्याच पवारांच्या इच्छेसाठी आपला बळी कशाला द्यायचा ?..............राज ठाकरेंना यात गमावण्यासारखे आता काहीच उरले नाही. गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाहीतर गाजराचा हलवा करून खायचे ..एवढेच त्यांच्या हाती उरले आहे. जो कोणी अधिवेशनाला आणि मोर्चा काढायला आर्थिक मदत देईल ....त्याच्या नावाने डमरू वाजवला जाईल हे स्पष्ट दिसते आहे. शॅडो कॅबिनेट .....पक्षच आता उरलो ' शॅडो ' पुरता राहिला आहे.जरा वावटळ निर्माण करायची .........परत कस ..शांत शांत होत. ..!!

  ReplyDelete
 7. सातत्य महत्वाचे

  ReplyDelete
 8. As per new statement
  Bangladeshi haklnya sathi morcha pan CAA NRC support nahi. Confusion kayam

  ReplyDelete
 9. Manage can get foothold if Raj Thakre sticks to d policy announced for a long period and develops organizational structure.It is fact that BJP is strong on national issues and weak on local issues.Hence if properly exploited a class of Hindutvavadi people who do not like BJP can get attracted towards MANASE

  ReplyDelete
 10. राज ठाकरे कोणता विचार करीत आहेत ह्यापेक्षा त्यांचा आचार ( प्रत्यक्षातली त्यांची कृती ) कसा असणार आहे हे जास्त महत्वाचे आहे । आजवरची त्यांची बेभरवशाची, अवसानघातकी, लहरी आणि एककल्ली पद्धत तशीच राहिली तर त्यांना यश मिळणे कठीण आहे । त्यांना २४×७×१२ राजकारण करावे लागेल आणि संघटना बांधणीसाठी प्रचंड अंगमेहनत करावी लागेल । ते तशी मेहेनत करतात की त्यांचे हे अवसान औटघटकेचेच ठरते ते पुढच्या काळात समजेलच ।

  ReplyDelete
 11. अत्यंत सत्य

  ReplyDelete
 12. भाऊ, जागता पहारा चे app मिळत नाहीये..
  इथेच मिळेल असे काही करा ना...

  ReplyDelete
 13. भाऊ, आज आपल्या लाडक्या राज ने परत पलटी मारली..नेहमी प्रमाणे. म्हणतात की मी CAA ला समर्थन देण्या साठी मोर्चा काढत नाही आहे. कशासाठीकाढणार अणि कधी काढणार हे काढे पर्यंत काही खरे नाही. आणि त्यांच्या राजकारणाचे ही काही खरे नाही...

  ReplyDelete
  Replies
  1. Same i said. Still he is confused. NRC na karta Bangladeshi ani Pakistani kase baher kadhnar he dev ani raj thakrech jane. Complete confusion

   Delete
  2. बरोबर मी हेच सांगणार होते... दुर्दैव आपल

   Delete
 14. Bhau jasa Maharashtra vidhansabha2014 madhe kontach chehra navta ani Dev fadnavis sarkha changla CM bhetla tasa kahi dilli madhe hoil ka?

  ReplyDelete
 15. Bhau, Raj kadun tumchya apeksha baryach aslya tari to tyas paatra nahi. Dharsod vrutti ani alshipana yamule to kadhich pudhe jau shaknar nahi. Tyala naavapeksha ani Rajkarna peksha paise kamavnyat jasta interest ahe. Tyamule tyawar vishwas thevne ashakya ahe.

  ReplyDelete