
हळुहळू आम आदमी पक्षाची झिंग उतरू लागलेली दिसते. कारण त्या पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली वगळता आगामी विधानसभा निवडणूका न लढवण्याची घोषणा केली आहे. त्याचे कारणही त्यांनी स्पष्ट केले आहे. दिल्लीत गेल्या डिसेंबरच्या विधानसभा निवडणूकीत अनपेक्षीत यश संपादन केलेल्या या पक्षाने पुढल्या काळात लोकांचा पुरता अपेक्षाभंग केला होता. अन्य तीन राज्यात भाजपाने दणदणित यश मिळवताना, दिल्लीत मात्र केजरीवाल यांच्यामुळे भाजपाचे घोडे अडले होते. मात्र आपल्या त्या अपुर्या यशानेही केजरीवाल यांना मोठी नशा चढली. लौकरच होणार्या लोकसभा निवडणूकीत केजरीवालच मोदींचा विजयरथ रोखू शकतील, अशी भाषा मग माध्यमातून सुरू झाली. असे नेहमीच होते. माध्यमातून कुठल्याही गोष्टीवर अवास्तव टिका तरी होते, किंवा राईचा पर्वत केला जातो. पण त्यात गुंतले आहेत, त्यांनी आपली कुवत विसरून चालत नसते. केजरीवाल यांना त्याचे भान उरले नाही. त्यांचे निकटवर्तिय व निवडणूकांचे अभ्यासक योगेंद्र यादव सुद्धा त्यात भरकटले व त्यांना लोकसभेत मोठे यश मिळवण्याची दिवास्वप्ने पडू लागली. त्यामुळेच पक्षाचा विस्तार व देशभर कुणालाही उमेदवार करण्याचा सपाटा त्यांनी लावला होता. शिवाय अफ़ाट प्रसिद्धीमुळे त्याच आधारावर पक्ष चालविला जातो, अशीच समजू्त त्यांनी करून घेतली. तमाम नवखे नेते पक्षाला फ़रफ़टत घेऊन जाऊ लागले. अखेर निकाल लागून पराभवाचा दणका बसेपर्यंत खुद्द नेत्यांचे पाय जमिनीला लागत नव्हते. बालेकिल्ला मानल्या जाणार्या दिल्लीतही एक जागा पदरात पडली नाही, तेव्हा अक्कल ठिकाणावर आलेली आहे. पण तेवढ्यासाठी केजरीवाल यांना शहाणपणा सुचला असे अजिबात म्हणता येत नाही. पक्ष व जनलोकपाल यापेक्षा आता त्यांच्यासाठी प्रशस्त बंगला प्रतिष्ठेचा झाला आहे अशी शंका येते. त्यासाठी पुन्हा दिल्लीची सत्ता त्यांना हवी आहे.
महाराष्ट्र व हरीयाणाच्या विधानसभा लौकरच व्हायच्या आहेत. त्या दोन्ही राज्याच्या लोकसभेत आम आदमी पक्षाला आपला कुठला प्रभाव दाखवता आलेला नाही. इथे महाराष्ट्रात ४८ जागा लढवून ४७ डिपॉझीट गमावण्याचा पराक्रम आधीच झाला आहे. त्यात ज्याने अनामत रक्कम वाचवली, तो एकमेव उमेदवार वामनराव चटप पक्ष सोडून गेला आहे. हरीयाणात खुद्द योगेंद्र यादवच अनामत रक्कम गमावून बसले आहेत. सहाजिकच त्या दोन्ही राज्यात कुठल्याही यशाची अपेक्षा त्यांना बाळगता येणार नाही. पण तेवढ्यासाठीच तिथून या पक्षाने काढता पाय घेतला म्हणायचे काय? यादव यांच्याच शब्दात सांगायचे; तर ध्येय निवडून येण्याचे नव्हतेच. पहला चुनाव हारनेके लिये, दुसरा चुनाव हरानेके लिये और तिसरा चुनाव जीतनेके लिये; असे तत्वज्ञान यादव अनेक वाहिन्यांच्या चर्चेत सांगत होते. मग आता हरण्याच्या भयाने पळ कशाला काढला जातोय? त्यागासाठी व तत्वासाठी लढणार्यांनी पराभवाच्या भयाने मैदान सोडण्याचे कारण काय? त्याची मिमांसा करावीच लागणार ना? केजरीवाल यांनी या विषयात केलेले निरूपण बघता, त्यांचे लक्ष आता बदलले आहे. त्यांना जनलोकपाल, भ्रष्टाचार निर्मूलन वा दिल्लीचा आम आदमी याविषयी कर्तव्य उरलेले नाही. आता सगळी लढाई दिल्लीत मिळवलेला प्रशस्त सरकारी बंगला कायम ताब्यात राखणे, हेच केजरीवाल यांचे एकमेव उद्दीष्ट शिल्लक राहिलेले आहे. ४९ दिवसात सत्तेची खुर्ची कुर्बान करणार्या केजरीवाल यांना, त्याच खुर्चीमुळे लाभलेला सरकारी बंगला सोडायची हिंमत चार महिने उलटून गेल्यावरही झालेली नाही. कुठले ना कुठले कारण देऊन प्रशस्त बंगला अडवून राखण्यासाठी त्यांनी आपली बुद्धी पणाला लावलेली आहे. आता आम आदमी पक्षाचे दिल्ली केंद्रीत राजकारण त्यापेक्षा किंचितही वेगळे असण्याची शक्यता दिसत नाही. बंगला राखायचा तर मुख्यमंत्रीपद आवश्यक आहे ना?
लोकसभा निवडणूकीपुर्वी आपल्या मुलीची बारावीची परिक्षा असल्याने अभ्यासात व्यत्यय नको म्हणून बंगला कब्जात ठेवायचे कारण त्यांनी दिले होते. मग दुसरे घर शोधतोय सांगत वेळ काढला. आता सरकारकडून दबाव येऊ लागल्यावर हे गृहस्थ नवे घर शोधत असल्याच्या बातम्या पसरवत राहिले. दरम्यान पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी राजकीय कसरती चालू होत्याच. कधी राज्यपालांना भेटून तश्या हुलकावण्या दिल्या, तर कधी कॉग्रेसचा पाठींब्यासाठी दार ठोठावून झाले. कुठूनही दाद मिळेना, तेव्हा दिल्ली कायम राखण्यासाठी नव्या विधानसभा निवडणूकीची तयारी सुरू झाली आहे. त्यात बहूमत मिळवण्यासाठी बाकीच्या पक्षाला गुंडाळून फ़क्त दिल्लीत शक्ती पणाला लावायची भाषा सुरू झाली आहे. आम आदमी पक्ष आपली सर्व ताकद व स्वयंसेवकांची फ़ौज दिल्लीसाठीच पणाला लावेल, असे केजरिवालनी सांगितले आहे. ही शक्ती व फ़ौज लोकसभेच्या वेळी कुठे होती? तेव्हा दिल्लीत एक जागा जिंकता यावी, इतकीही ताकद कशाला कामाला लावली नव्हती? तेव्हा वारणशीमध्ये सगळी फ़ौज उतरवलेली होती आणि दिल्लीला वार्यावर सोडून दिलेले होते. दिल्लीकरांना सोडा, आपच्या दिल्लीतील उमेदवारांनाही वार्यावर सोडून सगळी फ़ौज थेट वारणशीत अखंड राबत होती. यातून एकच निष्कर्ष निघतो. पक्षाचे कार्यकर्ते व स्वयंसेवक म्हणून राबणारे लोक, प्रत्यक्षात केवळ केजरीवाल यांच्या हितासाठी राबवले जात असतात. आताही दिल्लीतील पक्षाच्या यशापेक्षा केजरीवालांना मुख्यमंत्री बनवून पुन्हा प्रशस्त बंगल्यातच स्थानापन्न करणे; हेच त्या पक्षासाठी राजकीय सामाजिक ध्येय बनून गेले आहे. जुन्या काळातील अभिनेता गायक कुंदनलाक सहगल याच्या प्रसिद्ध गीतासारखी केजरीवाल व आम आदमी पक्षाची अवस्था होऊन गेली आहे. एक बंगला चाहिये न्यारा.