Monday, June 9, 2014

सुंभ जळले तरी पीळ जात नाही

   राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या स्थापना दिवशी आपल्या सहकार्‍यांना अध्यक्ष शरद पवार यांनी मार्गदर्शन केले आणि विधानसभा निवडणूकीसाठी धीराने उभे ठाकण्याचा सल्ला दिला. त्यात त्यांनी मुख्यमंत्री पदासाठी आपल्या नावाच्या वावड्या उडवणार्‍यांना कानपिचक्या दिल्या, हे योग्यच होते. पण लोकसभा निवडणूक निकालासंबधाने व नंतरच्या परिस्थितीबद्दल केलेली विधाने निराश करणारी आहेत. देशातील जुन्याजाणत्या मोजक्या राजकारण्यांपैकी एक असलेल्या पवारांनी; इतकी उथळ मिमांसा करावी याचे नवल वाटते. लोकसभेतील भाजपाच्या विजयानंतर आजपर्यंत दबून असलेल्या धर्मांध आणि सांप्रदायिक शक्‍तींचा आत्मविश्‍वास वाढल्याची खंत पवार यांनी व्यक्‍त केली. यातील धर्मांध व जातीय शक्ती कोण, त्याचे विवेचन त्यांनी करायला हवे होते. कारण असली भाषा व असले शब्द आता नवे राहिलेले नाहीत. अगदी दोन महिन्यापुर्वीही पवारांनी हेच शब्द लोकांशी ‘हितगुज’ साधताना वापरले होते. ‘अर्धी चड्डीवाल्यांच्या हाती सत्ता देणार काय’, असा खुला सवाल त्यांनी मतदाराला केलेला होता. त्याचे उत्तर जनतेने आपल्या मतदानातून दिले आहे. अगदी वारामती या पवारांच्या बालेकिल्ल्यातही पवारकन्येचे घटलेले मताधिक्य पुरेसे बोलके आहे. लोकांना कुठल्या भाषेचा वीट आला आहे, त्याची स्पष्ट कल्पना यावेळच्या मतदानाने दिलेली आहे. इतके झाल्यानंतरही पवार पुन्हा धर्मांध व सांप्रदायिक शक्ति असल्या भाषेचा वापर करतात, तेव्हा त्यांच्या अनुभवाविषयी शंका येऊ लागते. अनुभवी माणूस वा नेता घटनांचा अन्वयार्थ लावून आपल्या वाटचालीत सुधारणा करीत असतो. पवार त्यापैकीच एक म्हणून अगदी विरोधकातही त्यांच्याविषयी आदराची भावना आहे. असे असताना त्यांनी एका दारूण पराभवानंतर तीच जनतेने झिडकारलेली भाषा व मुद्दे नव्याने मांडावेत याचे नवल वाटते. त्याचा अर्थ त्यांनाही पराभवाचा अर्थ अजून उमगला नाही असेच म्हणावे लागते.

   जातीय, धर्मांध वा सांप्रदायिक या शब्दांचा जो प्रस्थापित अर्थ गेल्या दशकात लोकांच्या माथी मारला गेला आहे, त्यालाच नाकारण्यावर यंदाची लोकसभा निवडणूक लढवली गेली. त्यात लोकांनी ठामपणे असल्या पाखंडी शब्दांच्या विरोधात मतदान केलेले आहे. भाजपा किंवा नरेंद्र मोदींना लोकांनी जो अभूतपुर्व कौल व एकपक्षीय बहूमत दिलेले आहे, तो सांप्रदायिक शक्ती वा हिंदूत्वाला दिलेला कौल नाही. तर सेक्युलर शब्दाला जे धर्मांधतेची वस्त्रे चढवण्यात आलेली आहेत, त्याच्या विरोधात दिलेला कौल आहे. भाजपा म्हणजे जातीय, धर्मांध वा सांप्रदायिक असे जे गृहीत आजवर मांडले गेले, तेच मतदाराने फ़ेटाळून लावले आहे. पण त्याकडे डोळसपणे बघायचे सोडून पवार उलटे जुनीच टाकावू रेकॉर्ड वाजवतात, त्याचे नवल वाटते. आणि मग त्यात जनरल व्ही. के सिंग वा माजी पोलिस आयुक्त सत्यपाल सिंग अशा अधिकार्‍यांवर राळ उडवण्यापर्यंत पवार मजल मारतात; तेव्हा खरेच वैषम्य वाटते. त्यांची बुद्धी खरेच काम करीनाशी झाली आहे, काय याचीच शंका येते. कारण पवार पुढे जाऊन म्हणतात, ‘या अधिकार्‍यांनी आयुष्यभर अत्यंत महत्त्वाच्या पदावर प्रमुख म्हणून काम करताना, या लोकांनी सामाजिक न्यायाची भावना ठेवलीच नसेल.’ असले विधान करताना आपण इतिहासाचे विकृतीकरण करतोय याचेही भान पवारांनी सोडावे, ही खरेच दु:खाची बाब आहे. जनरल सिंग यांनी कोणत्या सामाजिक न्यायाच्या विरोधात सेनाधिकारी असताना काम केले? पवार त्याचा एकतरी पुरावा देऊ शकतील काय? नसतील तर फ़ौजेच्या धर्मनिरपेक्ष बाण्यालाच आपण सुरूंग लावतोय, याची जाणीव त्यांनी ठेवायला नको काय? दुसरे मुंबईचे माजी पोलिस आयुक्त डॉ. सत्यपाल सिंग. त्यांच्याविषयी शरद पवार काय जाणतात? कोणत्या परिस्थितीत तडकाफ़डकी सिंग यांना आयुक्तपदी आणले गेले, त्याचे तरी भान असायला नको काय?

   पावणे तीन वर्षापुर्वी आझाद मैदान येथे रझा अकादमीच्या मोर्चाने जो हिंसाचाराचा धुमकुळ घातला होता, त्यात महिला पोलिसांचीही अब्रू सुरक्षित राहिली नव्हती. तो सगळा घटनाक्रम साक्षीदार म्हणून बघणार्‍या पण पोलिसांना कुठलीही कारवाई करण्यात अडथळा बनलेल्या अरूप पटनाईक या ‘सेक्युलर’ पोलिस आयुक्ताच्या विरोधात तेव्हा मुंबईत प्रचंड काहुर माजले होते. जो आपल्याच पोलिस शिपाई व महिला पोलिसांच्या बेअब्रू बघत गप्प बसतो, त्याच्या हाती मुंबईकरांचे जीवन सुरक्षित नसल्याचे बोलले जाऊ लागले आणि पटनाईक यांच्या उचलबांगडीची मागणी जोर पकडू लागली. तेव्हा जनक्षोभ कमी करण्यासाठी विनाविलंब त्यांना पिटाळून लावण्याची वेळ आली. अशावेळी पुन्हा मुंबईत कायदा सुव्यवस्था कडेकोट करून जनतेचा विश्वास संपादन करायची जबाबदारी ज्या व्यक्तीवर सोपवली गेली, त्याचे नाव डॉ सत्यपाल सिंग होय. आणि त्यानेच पवारांच्या लाडक्या नाकर्त्या गृहमंत्र्याची अब्रू आपल्या कर्तबगारीतून वाचवली होती. तेव्हा धर्मांध व सांप्रदायिकतेचा आरोप निदान सत्यपाल सिंग यांच्यावर तरी लागू शकत नाही. फ़ार कशाला, आयुक्त होताच त्यांनी विविध पोलिस ठाण्यात चालणार्‍या देवादिकांच्या पूजाअर्चेला प्रतिबंध घातला म्हणून हिंदूत्व मानणार्‍यांचा रोष याच अधिकार्‍याला सोसावा लागला होता. अशा कर्तव्यदक्ष पोलिस आयुक्ताबद्दल तो निवृत्त होऊन भाजपामध्ये गेला; म्हणून पवार शंकासंशय घेणार असतील, तर त्यांची कींव करावी लागेल. अर्थात त्यात नवे काहीच नाही. भाजपात जाऊन धर्मनिरपेक्ष काम केले, तरी ती सांप्रदायिकता असते आणि सेक्युलर पक्षांमध्ये राहून जातीय वणवे पेटवले, तरी त्याला धर्मनिरपेक्षता म्हणायचे असते. त्यालाच मतदाराने आता साफ़ झिडकारलेले आहे. मोदींचा विजय त्याचेच लक्षण आहे. पवार हे ओळखून आपल्या अनुयायांना समजावू शकणार नसतील आणि कालबाह्य पोपटपंचीच करणार असतील, तर म्हणावे लागेल, सुंभ जळले तरी पीळ जात नाही.

4 comments:

  1. aatishay marmik nemke... phar awadale.....

    ReplyDelete
  2. खुप योग्य विश्लेषण केले आहे. भाजपचे सरकार आले म्हणून आज पर्यंत दबून असलेल्या धर्मांध शक्ती डोके वर काढतात असे म्हननारे पवार हे विसरतात की महाराष्ट्रात अजूनही त्यांचेच राज्य आहे. आणि गृहमंत्रीही त्यांचाच आहे. महाराष्ट्रात जर भाजपाचे सरकार असते तर ही गोष्ट पचली असती. कदाचित पवारांनी पक्के जाणले आहे की महाराष्ट्रातही शिवसेना-भाजपचे सरकार नक्कीच येणार आहे. जी गोष्ट ओक्टोबर नंतर बोलायची ती ते अगोदरच बोलले एव्हढाच फरक आहे.

    ReplyDelete
  3. काय केल्याने विरोधक नामोहरम होतील हेच आमच्या बारामती च्या जाणत्या राजा ला आता कळत नसावे. आम्हीच काय ते मुसलमान ( हो अल्प संख्य म्हणजे मुस्लिम बाकी कोणी नाही) लोकांचे कर्ते धर्ते मायबाप .... हीच वृत्ती ह्या टोली ल संपवेल

    ReplyDelete
  4. भाऊराव,

    आराराबा कंपनीचा डाव उघड आहे. नोव्हेंबरमध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत. तेव्हा मुस्लिमांची एकगठ्ठा मतं मिळायला हवीत. याकरिता त्यांच्या मनात भय उत्पन्न होणं अत्यावश्यक आहे. हे भयोत्पादन दंगलींद्वारे साधायचं आहे. म्हणूनच बाळासाहेब, शिवाजीमहाराज इत्यादिंची विटंबना करणारं फेसबूक पान बंद केलं नाही. २८ मे ला तक्रार आली तरी सरकारने ५ जूनपर्यंत केवळ बघ्याची भूमिका घेतली. नाहीतर सरकार जालसेवादारांना (इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर) आदेश देऊन अवघ्या तासाभरात कुठलेही जालपान (वेबपेज) भारतातून दाखवणे अडवू शकते.

    काँग्रेस आणि राकाँचे डावपेच गलिच्छ आणि बटबटीत होऊ घातले आहेत.

    आपला नम्र,
    -गामा पैलवान

    ReplyDelete