मला खात्री आहे, की हे पत्र वाचायला आज तू हयात नाहीस. कारण तीन आठवड्यापुर्वी तुझी पुण्याजवळ हडपसर येथे अत्यंत निर्धृणपणे हत्या करण्यात आलेली आहे. लाठ्याकाठ्यांनिशी हल्ला करणार्यांनी आपल्या अमानुषतेचा जणु साक्षात्कारच घडवला होता. कुणाच्याही काळजाचा थरकाप उडावा, अशीच ती घटना होती. आणि झालेही तसेच. वृत्तवाहिन्यांच्या संयोजकापासून फ़ेसबुक, इंटरनेटच्या जगातल्या शेकडो रुदाल्या टाहो फ़ोडून तीनचार दिवस ओक्साबोक्शी रडत होत्या. तुझ्या आत्म्याने तेही पाहिले असेल, तर त्या आत्म्याचाही नसलेला ऊर भरून आलेला असेल. कारण आप्तस्वकीयांपेक्षा हेच हजारो लोक तुझ्यासाठी असे आक्रोश करताना बघून, आपण किती मूल्यवान जीव होतो, याचेही तुला प्रथमच दर्शन घडले असेल. कदाचित आपण मुस्लिम असल्याने आपल्यासाठी कितीजण मायेने, ममतेने रडतात हे जाणावून तुझेही लौकिकार्थाने नसलेले डोळे पाणावले असतील ना? पण खरेच यापैकी कितीजणांना तुझ्या माणूस असण्याचे वा मुस्लिम असण्याचे भान होते? कितीजण खरोखर एका निष्पाप जीवाच्या हत्येसाठी असे व्याकुळ झाले होते? त्यांना हकनाक मारल्या गेलेल्या मोहसिनविषयी खरेच इतकी आत्मियता होती, म्हणून त्या रुदाल्या मिळेल त्या मंचावर येऊन टाहो फ़ोडत होत्या का? असतील तर आज इतक्या दिवसानंतर त्यापैकी कुणालाच तुझी साधी आठवण सुद्धा का राहिलेली नाही? तुझे जन्मदाते आप्तस्वकीय अजून सुतकातच असतील. पण या तमाम रुदाल्या कुठल्या कुठे बेपत्ता झाल्या रे? कदाचित हे प्रश्न तुझ्याही देहहीन आत्म्याला आज सतावत असतील. म्हणूनच हे अनावृत्त पत्र लिहिले आहे. ते तुझ्यासाठी नाहीच. असते तर तुझ्या घरच्या पत्यावर पाठवले असते, असे जाहिरपणे प्रसिद्ध केले नसते. कारण हे पत्र तुझ्यासाठी नाही, तर त्याच रुदाल्यांसाठी आहे, ज्यांच्या डोळ्यात पाण्याचा टिपूस नसताना ज्या आक्रोशाचे थरारक नाटक रंगवू शकतात. आज त्यांना अशाच शेकडो हजारो मोहसिनांची हत्या राजरोस चालू आहे आणि टाहो फ़ोडायचा विसर पडलाय, त्याची आठवण करून देण्यासाठी हे पत्र लिहावे लागतेय.
मोहसिन तुला किंवा तुझ्या आप्तस्वकीयांना तेव्हा नक्कीच वाटले असेल, की टाहो फ़ोडून आपल्या न्यायासाठी रडणार्या या सर्वच क्षेत्रातील रुदाल्यांना एका माणसाच्या हत्याकांडाने विचलीत केले आहे. नसेल तर किमान एका मुस्लिमाला मारल्याच्या वेदना असह्य झाल्या आहेत. पण यापैकी काहीच वास्तवाशी जुळणारे नाही रे मोहसिन. त्यापैकी कोणाही रडणार्याला माणसाच्या जीवाची किंमत नाही, की हकनाक मारल्या जाणार्या मुस्लिमाविषयी आपुलकी आस्था नसते रे. त्यांच्यासाठी अकारण मारला जाणारा मुस्लिम कामाचा नसतोच. त्याचा जीव कवडीमोल असतो. त्यांच्यासाठी मारणारा महत्वाचा असतो. मारणारा कोण आहे आणि त्याच्यासह मरणार्याचा धर्म वा राजकीय भूमिका काय असतात, त्यानुसार त्या रुदाल्यांना भावनांचे कड येत असतात. त्याचा मानवी भावभावनांशी काडीमात्र संबंध नसतो. मरणारा जीव कुठल्या धर्माचा आहे, त्याच्याशी त्यांच्या भावना निगडीत नसतात, तर मारणार्याशी त्यांच्या वेदना जोडलेल्या असतात. तुला मारणारे त्यांच्यासाठी भावनेचा वा वेदनेचा विषय होते. मारला गेलेला मोहसिन त्यांच्यासाठी उपयोगाचा नसतो. समज तुझ्याजागी कोणी मोहन तसाच मारला गेला असता, तर यापैकी एकाही रुदालीला कंठ फ़ुटला नसता. मग त्याला मारणारे कुठल्या धर्माचे वा पक्ष संघटनेचे आहेत, त्याकडेही कोणी ढुंकून बघितले नसते. फ़ार कशाला तुलाच मारणारे कोणी हिंदू राष्ट्र सेना नावाच्या संघटनेचे नसते, तर चार ओळीची बातमी छापून त्यांनी तुझा मृत्यूही निकालात काढला असता. तुझी महत्ता अशी, की तुला त्या हिंदू संघटनेच्या मारेकर्यांनी मारहाण करून ठार केले. त्याजागी कुणा जिहादी हल्लेखोराने तुझा खात्मा केला असता, तर मोहसिन शेख जगाला कधी कळला सुद्धा नसता. तुझे मातापिता दारोदार न्यायासाठी भटकले तरी त्यांची दखल कोणी घेतली नसती. हिंदू राष्ट्रसेनेच्या हल्लेखोरांनी तुझ्या हत्येला हौतात्म्य बहाल केले, मोहसिन. त्यांच्याजागी तोयबा वा तसाच कुणी असता तर तुझ्यासाठी दोन अश्रूही ढाळले गेले नसते.
खरे वाटत नाही ना तुला मोहसिन? मग थोडा पश्चिमेकडे वळून बघ. तिकडे इराकमध्ये सध्या काय रणकंदन माजले आहे. शेकडो निरपराध माणसे नित्यनेमाने मारली जात आहेत. सरकारी नोकरी करणारे वा पोलिस फ़ौजेत काम करणारे पकडून त्यांना सरसकट गोळ्या घातल्या जात आहेत. शेकडो मोहसिन रोजच्यारोज हकनाक जीवाला मुकत आहेत. पण तुझ्यासाठी ताहो फ़ोडणार्या रुदाल्यांनी साधा हुंदका तरी घशातून बाहेर येऊ दिला आहे काय? कसा येईल? काय बिशाद आहे त्या हुंदक्याची आणि त्या घशाची? इराकमध्ये सध्या मारले जात आहेत, ती माणसेच आहेत कारे मोहसिन? तेही मुस्लिमच आहेत नारे मोहसिन? आमच्या माहितीप्रमाणे त्या मारल्या जाणार्यांना जग शियापंथीय मुस्लिम म्हणून ओळखते. त्यांचा गुन्हा नेमका काय आहे रे? ते मुस्लिम आहेत असे म्हणतात, हाच त्यांचा गुन्हा आहे ना? कारण शियांनी स्वत:ला मुस्लिम म्हणवून घेणे, हाच मोठा गुन्हा आहे आणि त्यासाठीच त्यांना अस्सल मुस्लिम सुन्नीपंथीय ठार मारून टाकत आहेत. सुन्नी नसणे वा शिया असणे, हाच त्यांचा गुन्हा आहे. तेवढ्यासाठी त्यांना गुराढोरासारखे एकत्र करून त्यांच्यावर गोळ्यांचा वर्षाव करून यमसदनी पाठवले जाते आहे. मग तीन आठवड्यापुर्वी गळा काढून सर्वत्र टाहो फ़ोडत सुटलेल्या भारतातल्या त्या तमाम रुदाल्यांचे काय? त्यांनाही सुन्नी हल्लेखोर जिहादींप्रमाणेच, इराकचे शिया गुन्हेगार म्हणून ठार मारण्यायोग्यच जीव वाटतात काय? नक्कीच वाटत असणार ना? अन्यथा एव्हाना त्यांनी जग डोक्यावर घेऊन गदारोळ करायला हवा होता. पण सर्वत्र कशी नीरव शांतता आहे बघ. एका मोहसिनसाठी दिवसरात्र ऊर बडवणारे इतके शांत कशाला? काय रहस्य असावे या शांततेचे? मोहसिन जरा बारकाईने बघ. मरणारे महत्वाचे नाहीत, मारणारे महत्वाचे असतात. इराकमध्ये हकनाक मरणार्यांना, मारणार्यांची नावे बघ, त्यांच्या संघटनेची नावे तपास.
आले लक्षात? त्यात कोणी हिंदू शब्दाचा वापर केलेला नाही. त्या संघटनेत हिंदू वा तत्सम शब्दाचा समावेश नाही. बस्स, उलगडले रहस्य? मारणार्यात हिंदू असा शब्द असावा लागतो, तरच मरणार्यांना हौतात्म्य प्राप्त होते. तरच गमावलेला जीव बहुमोलाचा होऊन जातो. मारणारे हिंदू या शब्दाशी निगडीत असले, तरच मरणार्या जीवाचे मोल वाढते. त्याच कारणास्तव तुझी महत्ता मोठी होती आणि त्याच कारणास्तव या रुदाल्यांना आज इराकमध्ये मारल्या जाणार्या शेकडो निरपराधांचे कुठलेही दु:ख जाणवलेले नाही. माणूसकीने किती चमत्कारीक स्वरूप धारणे केले आहे रे मोहसिन. तिथे माणसाला सामान्य जीव म्हणूनही किंमत राहिलेली नाही. मारला जातो तो माणुसच असतो. तो कधी भारतीय असतो, काश्मिरी असतो वा कधी इराकी असतो. पण तो कुठल्या धर्माचा वा त्याला मारणारे कोण, यानुसार त्याच्या जीवनाने जीवाचे मूल्यमापन होते रे. अन्यथा मरणारा माणूसही कवडीमोल असतो. दोन वर्षापुर्वी दूर तिथे म्यानमारमध्ये रोहिंग्या मुस्लिमांवर अत्याचार झाले, म्हणून इथल्या रझा अकादमीने मोठा मोर्चा काढून धुमाकुळ घातला. पोलिसांसह चॅनेलच्या गाड्या जाळल्या. महिला पोलिसांशी लैंगिक चाळे केले. पण कोणी सेक्युलर रुदाल्यांनी तेव्हा अश्रू ढाळले होते काय? आज इराकमध्ये शिया मुस्लिमांची सरसकट कत्तल होतेय, तरी इथल्या कोणा मुस्लिम संघटनेला मैदानात येऊन आवाज उठवण्याची गरज वाटलेली नाही. पुन्हा निकष तोच. म्यानमारमध्ये मारणारे कोण व त्यांचा धर्म कुठला, त्यावरून प्रतिक्रिया उमटतात. तिथे मारणारे बौद्धधर्मिय होते आणि हडपसरला मोहसिन, तुला मारणारे हिंदू संघटनावाले होते. पण सुन्नी जेव्हा अशीच निर्धृण हत्याकांडे करतात, तेव्हा सगळ्या सेक्युलर रुदाल्यांचे अश्रू डोळ्यांच्या पापण्यातच सुकून जातात रे. मरणार्याला किंमतच नसते रे मोहसिन. मारणार्यावरून मरणार्याच्या जीवाचे मोल करण्याला सेक्युलर मूल्यव्यवस्था म्हणतात. त्याच्या बाहेर असलेल्या माझ्यासारख्यांना माणूस कुठल्याही धर्माचा, प्रांताचा वा देश, संस्कृतीचा असो, त्याच्या हकनाक मरण्याच्या खुप वेदना होतात रे. म्हणून लिहीले इतके. कदाचित अखेरच्या क्षणी त्याच यातना व वेदना तुलाही जाणवल्या असतील. म्हणूनच तुलाच उमजू शकतील, या भावना, म्हणून हे पत्र. जन्माला येताना आणि मरताना अखेरच्या क्षणी सगळीच माणसे असतात. मध्यंतरीच्या जगण्यात त्यांना धर्म, भाषा, प्रांत, देश संस्कृती वा इतर अनेक मुखवटे असतात. जन्माला येताना आणि जगाचा निरोप घेताना प्रत्येकजण फ़क्त माणूस असतो. त्यालाच असल्या भेदभावाच्या, पक्षपाताच्या मरणयातना अधिक समजू शकतात. म्हणून तुझ्यासमोर मन असे मोकळे केले. तिकडे इराकमध्ये रोज हकनाक मारल्या जाणार्या शेकडो मोहसिनांपर्यंत माझ्या वेदना पोहोचत्या करशील एवढीच अपेक्षा.
_/\_
ReplyDeletePawar saaheb bhoga aata phale
ReplyDelete