Saturday, June 28, 2014

हिच्या आयला सोडणार नाय

 

  पत्रकारितेला माझा थोरला सहकारी पंढरीनाथ सावंत कधीकधी त्याच्या दिग्विजय मिल पत्राचाळीतले किस्से मोठे रंगवून सांगायचा. प्रामुख्याने त्यात तात्कालीन गिरणगावातल्या कामगार ‘संस्कृती’चे प्रतिबिंब पडलेले असायचे. आता लौकरच गटारी ‘अमुषा’ येईल. ही गटारी गिरणगावात मोठ्या जोशात साजरी व्हायची. पुढला श्रावण महिना कडक पाळण्याची ती संस्कृती होती. सहाजिकच गटारीसुद्धा तितकीच कडक व भडक साजरी व्हायची. अशा गटारीत मोठेपणा अर्थातच तिथल्या मोठ्यांचा असायचा आणि गिरणगावातला मोठा असे तो मिलमधला जाबर. त्याच्या हाताखाली अनेक गिरणीकामगार असायचे म्हणूनच तो आपापल्या वस्तीतला मोठा माणूस मानला जायचा. कारण गावातून मुलखातून नव्याने मुंबईत दाखल झालेल्या गड्याला पोटापाण्याला रोजंदारीला लावणारे स्वयंभू असे ते एम्प्लॉयमेन्ट एक्सचेंज असायचे. असा जाबर बहुधा स्वच्छ शुभ्र मांजरपाटाचा शर्ट-लेंगा वापरायचा. आजकाल जसे खेडोपाडी ‘दादा’ किंवा ‘भाऊ’ शुभ्र वस्त्रांमध्ये आपले फ़्लेक्स झळकवतात, तितका शुभ्र लेंगा-शर्ट परिधान करील त्याला गिरणगावात आपोआपच जाबर म्हणून ओळखले जायचे. अशा बहुतांश जाबरच्या घरी गटारीचा मोठा उत्सव असायचा. त्यातले काही कोकणातले तर काही घाटावरचे. त्यातल्या कोकणी जाबरची ही गोष्ट.

   गटारी निमित्त कधीकधी आसपासचे नात्यातले लोक जेवायला आमंत्रित असायचे. सकाळी जाबर महोदय उठून अंधोळ प्रातर्विधी उरकून मटन आणायची प्राथमिक जबाबदारी पार पाडायचे. घरी एकदोन किलो (अर्थात तेव्हा दशमान पद्धती रुढ झालेली नसल्याने चारपाच रत्तल) मटन आणून टाकले, मग जाबर जीवाची गटारी करायला मुक्त व्हायचे. याचा अर्थ जीव जाईपर्यंत दारू ढोसणे. मजेची गोष्ट म्हणजे त्या काळात देशात दारूबंदी होती आणि अधिकृतरित्या दारू कुठे उपलब्ध नसायची. सहाजिकच बेकायदा दारूचे गुत्ते, चालायचे तिकडे जाऊन दारू ढोसावी लागायची. कुठल्याही गल्लीत उकडलेली अंडी वा हरभरे परातीत घेऊन बसलेला पोरगा दिसला, की समजावे इथूनच जवळपास हातभट्टीचा धंदा आहे. गल्लीचाळीतल्या शेंबड्या पोरालाही ते ठाऊक असायचे. फ़क्त नजिकच्या पोलिस चौकी वा ठाण्यांना त्याचा कधीच ठावठिकाणा लागत नसे. कारण असे अड्डे हप्तेबंदीच्या टेंडरवर पोलिस ठाण्याच्या संमतीने चालत असायचे. असल्या कुठल्या अड्ड्यावर जाऊन मग जाबर आपल्या अन्य मित्रांना पाजून स्वत: भरपूर दारू ढोसूनच तिथून बाहेर पडायचा. अर्थात इतकी गटारी साजरी झाल्यावर, त्याला आपल्याच पायांनी माघारी घरी परतण्याचे त्राण राहिलेले नसायचे. अशी जबाबदारी मग त्यांच्या थोरपणाला संभाळण्यासाठी आसपासच्या चाळीगल्लीतली तरूण मुले पार पाडीत.

   सकाळी अंधोळ करून शुचिर्भूत होऊन गटारी साजरी करायला निघालेले जाबर महोदय आसपासच्या चिखलात लोळल्याखेरीज घरी जाण्याचे नाव काढत नसत. शेवटी त्यांच्या इच्छेचा मान राखण्याइतकीही शुद्ध त्यांना उरली नाही मगच समाजसेवी तरूणांना आपले कर्तव्य बजावणे शक्य होत असे. पण ही शुद्ध हरपल्याचे कसे ओळखायचे, त्याचेही काही निकष होते. सकाळी गटारीच्या उत्सवासाठी शुभ्र मांजरपाटाचे अंगावर चढवलेले लेंगा-शर्ट चिखलघाणीने माखलेले दिसत, तेव्हाच जाबरना घरी पोहोचते करण्याचा मुहूर्त आल्याचे तरूण मंडळींच्या लक्षात येत असे. असा तीन चार तासांनी दुपार उलटत येण्य़ाच्या वेळी, जाबर हा कर्ता पुरूष घरी परतायचा. त्याच सुमारास त्याच्या घरातून मटनाचा घमघमाट सुटलेला असे. घरात आमंत्रणामुळे आलेली सासूबाई जावयाच्या चिंतेने व्याकुळ झालेली असे आणि पत्नी मात्र निर्धास्तपणे तांदळाच्या भाकर्‍या आंबोळ्या करण्यात गर्क असे. जेव्हा जावयाची वरात घरी पोहोचायची, तेव्हा सगळी धांदल उडून जायची. कारण जावईबापू शुद्धीत नसायचे. तेव्हा त्याला आधी खायला घालून झोपवावे आणि मगच घरातल्यांची पंगत घ्यावी; असा गृहीणीचा खाक्या असायचा. सहाजिकच तशा चिखल माखल्या नवर्‍याने कपडे काढून हातपाय कसेबसे धुतले, की पहिले ताट त्याच्या पुढे मांडले जाई आणि त्या मेजवानीला दाद म्हणून जाबर साहेब अस्सल ठेवणीतल्या शिव्यांचा साठा बाहेर काढीत. एक घासही तोंडात घालण्यापुर्वी शिवीगाळ सुरू होई. ताटातले पदार्थ हाताने उचलण्याचीही शक्ती नसलेल्या जावयाची थेरं बघून म्हातारी सासू काळजीत पडल्यासारखी बोलू लागे, तर तसाच तिच्या पाया पडल्यासारखा भाव आणून जावई तिचा मानही राखत असे. संवाद मोठा मनोरंजक असायचा.

   च्या मायला, होया काय मटान केलाव? गुवाची चव नाय......
   सासूचा हस्तक्षेप व्हायचा. सणाचा दिवस हाय चांगला बोलावा ना.
   तुमी आमच्या आईसारखे, पण हिच्या मायला, आज सोडत नाय.

   असे संवाद होतच राहायचे आणि कधीतरी दोनचार घास पोटात गेलेल्या जाबरची विकेट उपाशीपोटीच पडायची. पण पत्नीला त्याची काडीमात्र फ़िकीर नसायची. शुद्ध नसलेला नवरा थोड्याच वेळाचा सोबती आहे. मग त्याला झोपवून पंगत घेण्याचा तिचा बेत वर्षानुवर्षाचा ठरलेला. व्हायचेही तसेच. मग झोपेत काही तास गेले आणि झिंग उतरलेला जाबर अंधारताना कधी शुद्धीत येईल; तेव्हा त्याला सकाळी शिजलेला स्वैपाक नव्याने गरम करून ताटात वाढला जाई. तोही निमूटपणे ओशाळल्यागत सासू व पाहुण्यांना पोटभर जेवलात की नाही, अशी चौकशी करून सकाळच्या प्रसंगावर पांघरूण टाकत असे.

   मात्र अशा गटारीच्या आठवणी, मग आमच्यासारखी शाळकरी पोरे किंवा पंढरीसारखा उत्तम कथा सांगणारा रंगवून इतरांना सांगत असे. त्यातली खरी मजा असायची ती संवादातली. तेच तेच शब्द जावई व सासू यांच्यात बोलले जायचे आणि त्यातच खरा विनोद सामावलेला असायचा. हा जाबर जावई अगत्याने ताटात समोर जेवण वाढले असताना पत्नीला शिव्या मोजायचा आणि पलिकडे बसलेल्या सासूला आईसुद्धा म्हणायचा.

   पत्नीला आईवरून शिव्या मोजायच्या आणि त्याचवेळी त्याच तिच्या आईला आपली आईसुद्धा म्हणायचे?
   तुमी आईसारख्या, पण हिच्या आयला आज सोडत नाय.

   काही असे अनुभव माझ्याही गाठी आहेत. पण पंढरीने अनेक बैठकीत ते इतके रंगवून नकला करून सांगितलेत, की वास्तवाचाही किस्सा होऊन मनात शिल्लक राहिलेत. आज अचानक गटारीचा हा किस्सा कशाला? परवा रात्री अनेक वाहिन्यांवर वेगवेगळ्या विषयावरच्या चर्चा बघत होतो आणि अनेकदा बघत असतो. पण परवा अर्णब गोस्वामीच्या ‘टाईम्स नाऊ’ वाहिनीवर नॅशनल हेराल्ड वृत्तपत्राच्या मालमत्ता विषयावरच्या खटल्या संबंधाने चर्चा चालू होती. त्यात कॉग्रेसचा सुरजेवाला नावाचा प्रवक्ता सहभागी झाला होता. कुठलाही प्रश्न विचारला, मग त्याला हवे तेच हा गडी बोलत रहातो आणि मग त्याला थांबवताना अर्णबच्या नाकी नऊ येतात. हा सुरजेवाला, संजय झा किंवा अखिलेश प्रताप सिंग, अमी याज्ञिक असे कॉग्रेस प्रवक्ते आहेत, की कुठलाही विषय, मुद्दा किंवा प्रश्न असो, त्यांना हवे तेच ही मंडळी बोलत रहातात आणि एकूणच चर्चेचा पुरता विचका करून टाकतात. आपण लोकांपुढे पक्षाच्या विरोधी सत्य येण्यात अडथळा निर्माण केल्याचे समाधान त्यांना नक्की मिळत असेल. पण अशा चर्चा बघणार्‍यांचा जो विरस होतो, त्यांच्या मनात रागच येत असतो.  बहुधा असल्याच प्रवक्त्यांनी लोकसभा निवडणूकीत कॉग्रेसच्या दारूण पराभवाला हातभार लावला असावा असेही मला वाटते. सुरजेवाला ‘बडी विनम्रतापुर्वक’ असे शब्द बोलतो, तेव्हा तर मला ‘तुमी आईसारखे’ हे शब्द आठवतात. म्हणूनच परवा सुरजेवालाने एन्कर अर्णबच्याही नाकी दम आणल्यावर मला बालपणी बघितलेल्या व पंढरीकडून ऐकलेल्या गटारी साजरी करणार्‍या जाबरचे स्मरण झाले. किंचितसा फ़रक आहे. तो जाबर हातभट्टी पिवून शुद्ध हरवलेला असायचा. सुरजेवाला जागेपणी तसा वागत होता.

12 comments:

  1. खुप छान. मजा आली वाचायला.

    ReplyDelete
  2. भाऊ, हसता हसता पुरेवाट झाली हो...

    ReplyDelete
  3. Shashikant Oak
    भाऊ, सुरजेवाला ने त्या कार्यक्रमात कहर केलान. अशा वेळी स्टूडियो तून त्यांच्या आवाजाला कमीकरून नियंत्रण आणावे असे मी सुचवले होते. . . तीच गोष्ट पाकी बड़बोले यांची - ते एक थांबता थांबत नाहीत. ते नेहमी डिनायल मोड मधून बाहेर पडू इच्छित नाहीत. शिवाय आपल्या पाहुण्या तज्ज्ञ लोकांना मूर्खात काढायला पाहतात. त्यामुळे मारूफ रज़ा ला वेळ कमी मिळतो.

    ReplyDelete
  4. भाऊ...
    अत्यंत समर्पक तुलना...

    ReplyDelete
  5. एकदम मस्त भाऊ हे लोक टीव्हीवर चर्चा कशावर करीत आहे हेच कळत नाही मजा आली वाचतांना

    ReplyDelete
  6. Bhau dolyasmor एकदम प्रसंग निर्माण केलात.लोकाना समजले आहे की कॉंग्रेस वाले नेहमी वेळ मारून नेन्याचा praytna kart at pan to nehmi फस्तो

    ReplyDelete
  7. सुंदरच एकदम गिरणगावात पोहचल्यासारखे वाटले , सर्वकाही समोरच घडत आहे असे वाटते.

    ReplyDelete
  8. ज्यांची बाजु लंगडी तेच चर्चेत गोंधळ घालतात. हे दृश्य सर्वच चॅनल वर दिसतं.

    ReplyDelete
  9. भाऊ जय हो काय फर्मास लिहिले ...

    ReplyDelete