राजकारणाच्या अभ्यासकाला कोणाला आवडणारे लिहून चालत नाही, की कोणाला नावडेल याच्यासाठी भीड बाळगून चालत नाही. कारण शेवटी त्याचे अभ्यासू मत किंवा केलेले अंदाज काळाच्या कसोटीवर खरे वा खोटे पडणार असतात. जेव्हा असे अंदाज वा मते बारगळतात, तेव्हा त्याच्या राजकीय अभ्यासाची विश्वासार्हता संपून जाते. आज नरेंद्र मोदींचा विजय व भाजपाला थेट स्वत:चे ऐतिहासिक बहूमत मिळाल्याने, म्हणूनच जवळपास सर्वच भारतीय राजकीय विश्लेषकांची बेअब्रू झाली आहे. कारण त्यांनी राजकीय मतप्रदर्शनापेक्षा प्रचारी पक्षपाती अंदाज व्यक्त करण्याची चुक केली आहे. दिसणारे वास्तव नाकारताना बहुतांश माध्यमांची विश्वासार्हता पुरती लयास गेली आहे. पत्रकार वा राजकीय अभ्यासकाने कुठल्याही बाजूने पक्षपाती असता कामा नये. त्याचे मतप्रदर्शन कधी एका बाजूला आवडणरे असू शकते, तर कधी दुसर्या बाजूला झुकते माप देणारे असू शकते. सहाजिकच ज्यांच्या बाजूला झुकते त्यांना ते आवडू शकते, तर विरुद्ध असेल तर नावडू शकते. त्याची अभ्यासकाने पर्वा करता कामा नये. त्याचवेळी त्याचा पक्षपात अन्यायकारकही असता कामा नये. मुळातच विश्लेषकाची भूमिका डॉक्टरसारखी विधायक असायला हवी, डॉक्टरही रोग्यावर शस्त्रक्रिया करताना इजा करतो किंवा कडू औषधाचे घोट देत असतो. त्याला रोग्याच्या आरोग्याची चिंता असायला हवी. आवडीनिवडीची नव्हे. पत्रकार विश्लेषकाचे काम नेमके तसेच असते. त्यामुळेच टिका करताना दोष दाखवून त्यात चुकणार्याला सुधारायला सुचवण्याची भूमिका असायला हवी. जेव्हा तशी मांडणी असते, तेव्हा कोणाला तुमची मते आवडणार नाहीत. पण शहाणा असेल, तो त्यापासून चुका सुधारून संकट टाळू शकतो. उलट त्याच्या चुकांवर पांघरूण घालणे त्याला आवडणारे असले, तरी अंतिमत: त्याची ती फ़सवणूकच असते आणि विश्लेषकाने स्वत:शी केलेली दगाबाजीही असते. आता विधानसभेचे वेध महाराष्ट्राच्या राजकारणाला लागले असताना विविध पक्षांची स्थिती व क्षमता यांची समिकरणे मांडताना अनेकांचा रोष होऊ शकतो. पण त्याची पर्वा करून चालणार नाही.
कालच्याच लेखात राज ठाकरे यांच्या निवडणूक रिंगणात उडी घेण्याच्या घोषणेचा परामर्ष घेतला होता. त्यामुळे अनेक मनसे कार्यकर्त्यांचा हिरमोड झालेला असू शकतो. पण त्यांनी त्यातले गंभीर मुद्दे विचारात घेऊन भविष्यातली वाटचाल करायची ठरवली, तर लाभ त्यांच्याच पक्षाच होऊ शकेल. ते मुद्दे नाकारून मात्र फ़ायदा होण्याची अजिबात शक्यता नाही. लोकसभा निवडणूक निकाल त्याचाच पुरावा आहे. मोदींची त्सुनामी येतेय, असे म्हटल्यावर त्यांची टवाळी करणार्यांचे काय कल्याण झाले, ते आपण बघतोच आहोत. त्यावेळेस आम्हीही त्सुनामीचे विश्लेषण केलेले अनेक कॉग्रेसजनांना व त्यांच्या सेक्युलर समर्थकांना आवडलेले नव्हते. म्हणून काय फ़रक पडला? जर त्या विधानाचा व दाखवलेल्या धोक्याचा गंभीरपणे विचार कॉग्रेसने वेळीच केला असता, तर निदान यापेक्षा कमी नुकसान झाले असते. पण मस्तीत असताना सारासार विवेकी विचार म्हणजे शामळूपणा वाटतो आणि कपाळमोक्ष अपरिहार्य होऊन जातो. जी स्थिती निवडणूकीपुर्वी मनसेची होती, तशी़च काहीशी अवस्था आज शिवसेनेची झालेली दिसते. तसे नसते तर विजयाचा जल्लोष आयोजित केलेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपले भाषण मोजूनमापून केले असते. ‘आपल्याला सगळे विजयाचा शिल्पकार म्हणतात, पण शिवसैनिकच खरे विजयाचे शिल्पकार आहेत’, असे उद्धवराव म्हणाले आहेत. खरेच का नुसत्या शिवसेनेच्या बळावर इतके यश मिळणे शक्य होते? शक्य असते तर पंधरा वर्षे सेना भाजपा युतीला सत्तेच्या बाहेर बसावे लागले असते का? मागल्या लोकसभा व विधानसभा निवडणूकीपुर्वी मुंबईतील २६/११ ची भीषण घटना घडून गेलेली होती. त्या पार्श्वभूमीवरही युतीला आपल्या प्रभावक्षेत्रात दारूण पराभव पत्करावा लागला होता. उलट सेनेमुळे भाजपालाही दणका बसला होता. त्याकडे पाठ फ़िरवून आजच्या निकालांचे मूल्यांकन होऊ शकेल काय?
लोकसभा व विधानसभा अशा निवडणूका २६/११ च्या घटनेनंतर सहा सहा महिन्यांच्या अंतराने झाल्या; तरी युतीला मुंबई महानगर प्रदेशात जबरदस्त मार खावा लागला होता. मग त्या पराभवाचा शिल्पकार कोण होता? आजवरच्या बालेकिल्ल्यातच सेनेला फ़टका बसला होता. तेव्हा शिवसैनिक विजयाचे शिल्प बनवायला नकार देऊन घरी बसला होता असे समजायचे काय? ज्या हल्ल्यमुळे मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांना राजिनामे देऊन बाहेर पडावे लागले, इतक्या भीषण परिस्थितीचा राजकीय लाभ सेना भाजपा युती तेव्हा उठवू शकली नव्हती. ज्यांना इतके सोपे काम साध्य झाले नाही, त्यांनी आजचा विजय साकारला, असे श्रेय घेणे कितपत रास्त आहे? किंबहूना आजच्या दैदिप्यमान यशामधला महत्वा़चा घटक नाकारण्याने आपला अहंकार सुखावणे शक्य असले, तरी तीच पुढल्या काळासाठी दिशाभूल होऊ शकते. मोदींनी उठवलेले देशव्यापी प्रचाराचे रान हा मोठा घटक होता आणि त्याचे फ़ळ मिळवण्यासाठी भाजपा कार्यकर्त्यांसह सेनेच्या सैनिकांनी केलेले काबाडकष्ट नक्कीच फ़लद्रुप ठरले. म्हणूनच ह्या विजयाचे अनेक भागिदार आहेत आणि ते ओळखूनच पुढली वाटचाल सर्वांना करावी लागणार आहे. त्यात खोडा घालण्याचीच राजकीय खेळी राज ठाकरे यांनी सोमय्या मैदानावरच्या सभेतून केलेली आहे. थेट महाराष्ट्राचे नेतृत्व करण्याची तयारी व निवडणूक लढवायची गर्जना, हा उद्धव ठाकरे यांच्यासाठी लावलेला सापळा आहे. आपल्याप्रमाणे उद्धवनेही थेट जनतेला सामोरे जावे, असे आव्हान त्यात आहेच. पण तसे करायचे तर उद्धव ठाकरे राजप्रमाणे स्वयंभू घोषणा करू शकत नाहीत. मनसे स्वबळावर मैदानात उतरणार आहे. त्यामुळे त्यांना कुणाची संमती घेऊन आपली उमेदवारी घोषित करण्याचे बंधन नाही. मात्र उद्धव तशी घोषणा परस्पर करू शकत नाहीत. कारण शिवसेना युतीधर्माने बांधलेली आहे.
म्हणून तर उद्धव यांना दुसर्याच दिवशी जल्लोष करतानाही आपल्या उमेदवारीची गर्जना करून राजना चोख उत्तर देता आले नाही. शिवसैनिकांची इच्छा असल्याचे गोलमाल बोलावे लागले. दुसरीकडे भाजपाही देवेंद्र वा गोपिनाथ मुंडे यांचे प्यादे पुढे करीत आहेत. म्हणजेच युतीमध्ये मुख्यमंत्री पदाचा उमेदवार वा चेहरा साफ़ नाही याहीपुर्वी तो नव्हता व नसायचा. ज्याचे आमदार जास्ती तोच मुख्यमंत्री पदाचा दावे;दार असे सुत्र पंचवीस वर्षापासून युतीमध्ये प्रस्थापित झालेले आहे. जागावाटपही लोकसभेला भाजपा अधिक तर विधानसभेला सेना अधिक असे राहिले आहे. त्यात मग अधिक जागा जिंकल्या, तर सेनेचाच अधिकार सिद्ध होतो. मात्र त्यासाठी अधिक जागा लढवूनही सेनेला मागल्या खेपेस कमी आमदार निवडून आणता आले, हे विसरता कामा नये. उलट कमी जागा लढवून अधिक आमदार आणणार्या भाजपाला विरोधी नेतेपद देण्याची नामुष्की सेनेवर आली. त्याचा अर्थच असा, की नुसत्या जागा अधिक असून भागत नाही, जितक्या लढवायच्या त्यातून अधिक जागा जिंकण्याला प्राधान्य असायला हवे. दुर्दैवाने त्याचा विसर सेनेला पडलेला आहे. म्हणून आताही जागा अधिक मिळाव्यात असाच अग्रह चालू आहे. त्यात हमखास पराभूत होतील, अशा जागा घेण्याने काय पदरात पडणार असते? पावणे दोनशे जागांपेक्षा फ़क्त सव्वाशे दिडशे असतील आणि त्यातल्या शंभरहून अधिक निवडून आणल्या; तर मुख्यमंत्री पदावर दावा सांगावा लागणार नाही. ते पद आपल्या पायांनी सेनेकडे चालत येऊ शकते. आज अडीचशे जागी युती आघाडीवर असेल तर सेनेला महायुतीमध्ये शंभर जागांचा पल्ला ओलांडणे अशक्य नक्कीच नाही. त्यासाठी अधिक जागांचे भांडण करत बसण्यापेक्षा तीन महिने आधीच आपल्या जागा वाटून कामाला लागण्यात शहाणपणा आहे. जिथे युतीला आघाडी आहे आणि जिथे सेनेचे संघटनात्मक बळ जास्त प्रभावी आहे; अशा जागा शोधण्याचे काम विनाविलंब हाती घेण्याला भाषणापेक्षा अधिक महत्व आहे. मग वाट्याला येणार्या जागा मागल्या खेपेपेक्षा पंधरावीस कमी झाल्या तर बिघडत नाही. मिळतील त्यातल्या निवडून येणार्या जागांना प्राधान्य असायला हवे. तेवढी काळजी घेतली तर उद्धवरावांचे नाव जाहिर न करताही त्यांना मुख्यमंत्रीपदी आरुढ होता येऊ शकेल. तसली भाषा आतापासून करून मित्रांना दुखावण्यापेक्षा, इतका चाणाक्षपणा निर्णायक ठरू शकतो. अर्थात वास्तवाचा ‘सामना’ करणे शक्य असेल तर. ‘जल्लोषा’त त्याचेच भान राहिले नाही, तर ‘या तुमच्याशी बोलायचंय’ असे आमंत्रण द्यायची वेळ यायची.
भाजपकडे संघाचे समर्पित कार्यकत्यांची फौज आहे, तर सेने मनसे कडे फक्त 'करू कंपनी' !
ReplyDelete