१९७५ सालात आणिबाणी लागली होती आणि तेव्हाच १०+२+३ अशी नवी शिक्षण व्यवस्था महाराष्ट्रात आली. त्यामुळे त्यावर्षी दोन शालांत परिक्षा झाल्या होत्या. दहावीची पहिली आणि अकरावी मॅट्रीक शेवटची. त्या काळात आजच्याप्रमाणे इंटरनेट वगैरे भानगडी नव्हत्या. शाळांमध्ये निकाल यायचे आणि आदल्या दिवशी वृत्तपत्रांना सकाळी निकालाचे जाडजुड पुस्तक वाटले जायचे. मग उद्या शाळेत निकाल मिळण्यापर्यंत संयम नसलेल्यांची वृत्तपत्राच्या कार्यालयात झुंबड उडायची. रांग लावून लोक आपापला सीट नंबर सांगायचे आणि तिथे बसलेला कोणी कर्मचारी पास-नापास सांगायचा. त्याला आजच्याप्रमाणे हॉलतिकीत म्हटले जात नव्हते. मग वृत्तपत्रात कामाला असलेल्यांना त्या दिवशी भाव मिळायचा. निकालाचे पुस्तक कार्यालयात येण्यापुर्वीच प्रत्येक कर्मचार्याने आपापली यादी सज्ज ठेवलेली असायची. त्याच्या नातलग व शेजारीपाजार्यांनी त्याला दिलेली असायची. अशा लोकांना मग तो फ़ोन करून रिझल्ट कळवायचा किंवा त्यांचे तरी फ़ोन यायचे. तेव्हा फ़क्त लॅन्डलाईनच होती आणि फ़ोनवर खर्च करण्याला उधळपट्टी मानले जायचे. तर आधी त्या कर्मचार्यांचा निचरा व्हायचा आणि मगच कार्यालयाबाहेर ताटकळणार्यांचा ‘निकाल’ लावला जायचा. तेव्हा मी दैनिक ‘मराठा’त उपसंपादक म्हणून नोकरी करीत होतो. तिथेच ‘सिंधू’ समाचार नावाचे एक सिंधी भाषिक दैनिक निघायचे. त्यात ‘टाई’म्समधून निवृत्त झालेले मिरचंदानी म्हणून सत्तरी पार केलेले गृहस्थ होते. त्यांनी निकालाची सांगितलेली मजा आठवते.
१९७५ साली ते सत्तरी ओलांडलेले होते, म्हणजे त्यांच्या पदवी परिक्षेचे वर्ष साधारण १९२५-३० दरम्यानचे असावे. आपल्या बीएच्या परिक्षेच्या निकालाचा किस्सा त्यांनी सांगितला. तेव्हा ते स्वत: विद्यार्थी असूनही तात्कालीन परंपरेनुसार विवाहित होते. निकाल असला तरी त्यांनी आपल्या कुटुंबियांना अंधारात ठेवलेले होते. मेहूणा व ते एकाच वर्गात होते. निकालाच्या दिवशी त्यांनी गुपचुप टाईम्स चाळला आणि त्यात आपला नंबर नाही, म्हटल्यावर गुपचुप बाकीच्या कामात गर्क होऊन गेले. कुठूनही आपल्या घरच्यांना नापास झाल्याचे कळू नये, इतकीच त्यांची इच्छा होती. पण मेहुण्याने सर्व घोटाळा केला. तो अकस्मात दुपारी घरी येऊन पोहोचला आणि त्याने गडबड करू नये, म्हणून हे गृहस्थ त्याला तसाच बाहेर घेऊन गेले. त्याने हसत हसत यांचे अभिनंदन केले. कशाचे विचारता, तो म्हणाला बीए उत्तीर्ण झाल्याचे. यावर मिरचंदानी थक्क झाले. त्यांना ती मस्करी वाटली. कारण त्यांनी टाईम्समध्ये आपला नंबर नसल्याचे वारंवार तपासून खात्री करून घेतली होती. नंबर प्रसिद्ध झाला नाही, म्हणजेच आपण नापास हे तेव्हाचे सोपे समिकरण होते. पण मेहूण्याने यांना चुक दाखवून दिली. मिरचंदानी यांचा नंबर खरेच टाईम्समध्ये प्रसिद्ध झाला होता. मग तो मिरचंदानी यांना का दिसला नव्हता? त्याचे कारण सोपे होते. हे गृहस्थ तिसर्या वर्गात वा पास क्लासमध्ये आपला नंबर बघून गप्प बसले होते. त्यांनी प्रथम वर्गाचा निकाल बघितलाच नव्हता. पण मेहूण्याला जिजाजीच्या हुशारीची खात्री होती. त्यामुळे त्याने प्रथम वर्गाचा निकालही तपासला आणि मिस्टर मिरचंदानी फ़र्स्टक्लास बीए झाल्याचा शोध लागला होता.
इतके झाल्यावर अटकेपार झेंडा लावल्याची झिंग चढणे स्वाभाविक होते. त्याच मस्तीत त्या दोघांनी पुन्हा घरात प्रवेश केला आणि मोठ्या रुबाबात ही खुशखबर पित्याच्या कानी घातली. आता वडील खुशीने पाठ थोपटतील व बक्षीस मिळेल, ही अपेक्षा मोठी नव्हती. ती पुर्णही झाली, पण भलत्याच प्रकारे. मिरचंदानी यांच्या सणसणित कानफ़टात वाजली. पित्याला पहिल्या वर्गाचे वा उत्तीर्ण होण्याचे अजिबात कौतुक नव्हते. आज निकाल असून ती गोष्ट मुलाने आपल्यापासून लपवून ठेवली, याचाच संताप अनावर होऊन खोटेपणाचे बक्षीस त्यांना मिळाले होते. मग गाल चोळत हे गृहस्थ आईकडे गेले. तिला आपल्या यशाची बातमी दिल्याचा फ़ारसा उपयोग झाला नाही. तिचे म्हणणे सोपे होते. कशाला पुढले शिक्षण करायचे आणि बापाचा मार खायचा? मॅट्रीक झाले तेवढे पुरे होते. चांगली नोकरी लागली होती, कॉलेजमध्ये जाऊन बापाच्या थपडा खाऊन काय मिळते, असा त्या माऊलीचा सवाल होता. इतके नामोहरम झाल्यावर निदान पत्नीला आपल्या यशाचे कौतुक असावे, या आशेवर त्यांनी ती खुशखबर तिच्या कानावर घातली. तिचा प्रतिसाद आणखीच निराश करणारा होता. क्लास वा पदवीमुळे पगारात वाढ होणार आहे काय? नसेल तर फ़ालतूगिरी कशाला केली?
एकूणच बीएच्या परिक्षेत प्रथम वर्ग मिळवल्याचे असे कौतुक मिरचंदानी यांनी कथन केले. आज दहावीच्या शालांत परिक्षेच्या निकालाच्या गप्पा फ़ेसबुकवर वाचून मिरचंदानी आठवले. आज कदाचित ते हयातही नसतील. पण तो स्वत:ची फ़जिती मस्त रंगवून सांगणारा सिंधी गृहस्थ, कित्येक वर्षांनी आठवला. त्याच्या कोवळ्या वयात गुणवत्तेचे इतके कौतुक करणारे वा निकालासाठी उत्सुक असलेले पालक नव्हते, याचे वैषम्य त्याच्या चेहर्यावर बघितले, कधीच विसरू शकलो नाही.
Priya Bhau,
ReplyDeletemi 1993 la ssc pass zalo nagar madhun, tya veli nagarche kahi lok punyahun result papers ghevun yet asat, tyachi zerox copy kadun chauka chaukat saklai 7 pasun basat, pratek seat no. mage result sangnyastahi 5 rs. ghet. jyacha list madhe no. ase to pass ani nasel to napas, result aikun zalivar mag dupari shalemadhe javun marlist collect karat asu. 5 te 6 tasat hi lok result sangnyache bakkal paise kamavat.