Sunday, June 15, 2014

अडला नितीश लालूचे पाय धरी


राजकारणात कधी कुठले पारडे वर जाईल आणि कुठली खेळी तुम्हाला जमीनदोस्त करील याचा भरंवसा नसतो. म्हणूनच ज्यांच्यात लढण्याची क्षमता नसते त्यांनी उगाच ‘लढायचे’ अवसान आणण्यात अर्थ नसतो. जे पदरात पडेल, त्याच्यात समाधानी रहावे. शिवाय अशा शिकारी खेळात संयमाला खुप महत्व असते. त्याच्याही पुढला धोका असतो यशाची नशा चढण्याचा. बिहारचे माजी मुख्यमंत्री नितीशकुमार यांना असे सगळे धडे एकामागून एक शिकायची वेळ सध्या आलेली आहे. पंतप्रधान व्हायला निघालेल्या नितीशकुमार यांना अवघ्या एका वर्षात आपले मुख्यमंत्रीपद गमवावे लागलेच आहे. पण जो काही पक्ष आहे, तोही टिकवताना त्यांच्या नाकी दम आलेला आहे. मागल्या विधानसभा निवडणूकीपासून त्यांनी कुवत नसलेला राजकीय खेळ सुरू केला होता. तेव्हा भाजपाचे पाटण्यात राष्ट्रीय अधिवेशन व्हायचे होते. पक्षाचे सर्वच मुख्यमंत्री तिथे यायचे होते. त्याच निमित्ताने गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी नितीश सोबतच्या एका छायाचित्रासह जाहिरात देऊन मैत्रीची साक्ष देण्याचा प्रयास केला. त्यामुळे आपल्या सेक्युलर छब्बीला धक्का लागतो, म्हणून नितीशनी मोदींशी पंगा घेतला. आधी त्यांनी ती जाहिरात मागे घ्यायला लावली आणि मग भाजपा नेत्यांना देऊ केलेली मेजवानी रद्द केली. एनडीए शाबुत ठेवण्यासाठी भाजपाला तेव्हा पडते घ्यावे लागले. कारण बिहारमध्ये मोठा भाऊ असलेल्या नितीशना दुखावण्याची भाजपा नेतृत्वाची हिंमत झाली नाही. पर्यायाने नितीशची मस्ती वाढत गेली. लौकरच आलेल्या विधानसभा निवाणूकीत भाजपाने मोदींना बिहारमध्ये प्रचारालाही आणू नये, अशी अट नितीशनी घातली आणि मोदींना डिवचण्याची एकही संधी आपण सोडत नसल्याचे जगाला दाखवून दिले. मोदींनी त्यावर एकही शब्द बोलायचे टाळून संयम म्हणजे काय त्याचा वस्तुपाठच घालून दिला. आज त्याचे परिणाम आपण बघत आहोत.

   गेल्याच वर्षी भाजपाने मोदींना पक्षाचे राष्ट्रीय प्रचारप्रमुख म्हणून नेमले होते. तेव्हापासून नितीश यांनी डावपेच सुरू केले. आधी तो भाजपाचा पक्षांतर्गत प्रश्न असल्याचे सांगून झटकणार्‍या नितीशनी एनडीएने लौकरच पंतप्रधान पदाचा उमेदवार घोषित करायचा ससेमिरा भाजपाच्या मागे लावला. थोडक्यात मोदींचे नाव जाहिर करताच त्यांना एनडीएतून बाहेर पडायचे होते. पण त्यासाठीही त्यांनी प्रतिक्षा केली नाही. एकेदिवशी भाजपाशी फ़ारकत घेऊन वेगळी चुल मांडली आणि बिहारमध्ये आपण भाजपाशिवाय सत्तेत कायम राहू शकतो; हा खेळ यशस्वी करून दाखवला होता. बेरीज वजाबाकीच्या लोकशाहीत त्यात गैर काही मानता येणार नाही. पण नुसत्या आकड्याच्या लोकशाहीपलिकडे जनादेशाचीही लोकशाही असते आणि मतदानाच्या वेळी तिचा साक्षात्कार घडत असतो. लालूंचे जंगलराज संपवण्यासाठी जनतेचा कौल मागून सत्तेवर आलेल्यांनी नंतर मोदींसाठी तोच जनादेश पणाला लावला. तो विधानसभेच्या आवारात चालून गेला. पण वर्षभरातच लोकसभा निवडणूक आली आणि नितीशना मागल्या वर्षीच्या डावपेचाचे हिशोब मतदाराला सादर करायची वेळ आली. त्यात बिहारच्याच मतदाराने गेल्या चार वर्षापासून नितीशनी चालविलेल्या सेक्युलर खेळाला चोख उत्तर दिले. नितीशनी ज्या मोदींविरोधात आघाडी उघडली व भाजपाशी संगत सोडली होती, त्यांची खरी जागा मतदाराने दाखवली. २० खासदारावरून नितीशचा पक्ष अवघ्या दोन खासदारापर्यंत खाली आला आणि आता नितीशना आपली अब्रु राखण्यासाठी मुख्यमंत्री पदावर पाणी सोडावे लागले आहे. त्यासाठीही कट्टर दुष्मन लालूप्रसाद यादव यांचे पाय धरावे लागत आहेत. आपल्या जागी कठपुतळी मुख्यमंत्री नेमून कारभार हाकायचा डाव लोकसभा निकालानंतर नितीशनी टाकला व त्याचेही बहूमत दाखवण्यासाठी लालूंना शरण जावे लागले. मग यातून नितीशनी मिळवले काय?

   भारतातल्या कुठल्याही राजकीय पक्षाच्या नेत्याला इथला राजकीय इतिहास एकच धडा शिकवतो. ज्याच्यापाशी आपल्या अनुयायांना निवडून आणायची क्षमता व कुवत असते, त्यालाच इथे नेता मानला जातो. ज्या ज्येष्ठ नेता लालकृष्ण अडवाणींच्या अपमानाची कड घेऊन नितीश गेले वर्षभर मोदींवर तोफ़ा डागत होते, त्या अडवाणींना त्यांच्याच जुन्या चेले शिष्य़ांनी कशाला झुगारून दिले आणि मोदींना खांद्यावर घेतले होते? मागल्या दोन लोकसभा निवडणूकीत अडवाणी पक्षाच्या असलेल्या नेत्यांना वा खासदारांना पुन्हा निवडून आणू शकले नव्हते. प्रत्येक निवडणूकीत त्यांच्या पक्षाची घसरणच झाली होती. यावेळीही त्यापेक्षा काहीही वेगळे होण्याची शक्यता खुद्द अडवाणींनाही नव्हती. म्हणूनच जेव्हा नितीश मोदींवर तोफ़ा डागत होते, तेव्हाच अडवाणी त्रिशंकू लोकसभेची भाकिते करीत होते. पण मोदींवर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी विश्वास ठेवला आणि मोदींनी तो विश्वास खरा करून दाखवला. तसे झाले नसते, तर आज मोदींना गुजरातचे मुख्यमंत्रीही रहाणे शक्य झाले नसते. मोदींना आव्हान द्यायला उभे ठाकताना नितीशनी निदान आपल्या कुवतीचा विचार करायला हवा होता. त्यांना एकट्याने लालूंनाही शह देता आलेला नव्हता आणि त्यासाठी बिहारमध्ये भाजपाशी सोबत घ्यावी लागली होती. मग आता उगाच नखरे व मस्ती करण्याची काय गरज होती? आणि डावपेच खेळायचे होते, तर निदान आपलीच शिकार होऊ नये; याचे तरी भान ठेवायचे होते. तेव्हा नुसता प्रचारप्रमुख असलेल्या मोदींविरोधी आघाडी उघडली नसती आणि नितीश एनडीएत कायम राहिले असते; तर भाजपाला मोदींने नाव इतक्या लौकर पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून घोषित करता आले नसते. परिणामी मोदींना दिग्विजयाला बाहेर पडण्यास खुप विलंब झाला असता आणि चार विधानसभांच्या प्रचारात आपली छापही पाडता आली नसती. पण नितीशचा उतावळेपणा मोदींच्या पथ्यावर पडला.

   नितीश सोडून गेल्यावर भाजपाने विनाविलंब मोदींच्या गळ्यात उमेदवारीची माळ घातली आणि पुढल्या तीन महिन्यात मोदींनी निवडणूकीच्या चार राज्यांसह अन्य राज्यातही प्रचाराची रणधुमाळी उडवून दिली. त्याचा लाभ भाजपाला मिळाला तसाच मोदींना आपली राष्ट्रीय प्रतिमा उभारण्यास झाला. तिथून मग नितीशच्या पक्षात चलबिचल सुरू झाली होती आणि महिन्यापुर्वी लोकसभेचे निकाल लागल्यानंतर त्या पक्षाची बिहारमध्येच धुळधाण उडाल्यावर नितीश विरोधात बंडाळी माजली आहे. त्याच बंडाला शमवताना नितीशना सत्ता सोडावी लागली आणि आता आमदारांचे बंड मोडण्यासाठी लालूंचे पाय धरावे लागत आहेत. राज्यसभेच्या निवडणूकीत बंडखोरांनी नितीशना आव्हान दिले असून, पक्षाचे अधिकृत उमेदवार निवडून आणण्यासाठी नितीश लालूंना शरण गेले आहेत. उलट ऐन निवडणूकीच्या तोंडावर मोदींशी हातमिळवणी केलेल्या रामविलास पासवान यांनी बाजी मारली. त्यांनी आपल्या पक्षाचे चांगले सहा खासदार निवडून आणले व केंद्रात मंत्रीपदही मिळवले आहे. लालूंची सत्ता गेलेली असली व निवडणूक लढवण्यास त्यांना प्रतिबंध असला, तरी उमेदवार निवडून आणायची किमान कुवत त्यांच्यापाशी आहे. म्हणून ते राजकारणात टिकून आहेत. नितीशचे राजकारण भाजपा नावाच्या कुबड्यांवर उभे होते. त्याच लंगड्या पायांनी त्यांनी कुबड्यांना लाथा मारल्या, तर दुसरे काय व्हायचे? आता वर्षभरातच विधानसभेच्या निवडणूका होऊ घातल्या आहेत आणि त्यात नितीशच्या करिष्म्याने निवडून येण्याची खात्री त्यांच्याच आमदारांना वाटेनाशी झाली आहे. म्हणूनच पक्ष सोडून भाजपाकडे धावणार्‍यांची संख्या नितीशच्या अनुयायात वाढत चालली आहे. ज्या लालूंशी सोळा वर्षापुर्वी व्यक्तीगत दुष्मनी करण्यासाठी नितीशनी भाजपाशी कास धरली होती, त्याच भाजपाच्या विरुद्ध आज आपली उरलीसुरली अब्रु झाकायला नितीशना लालूंच्या पायावर लोळण घ्यावी लागते आहे. संयमाने मोदींना कुठे नेऊन ठेवले आणि उतावळेपणाने नितीशकुमार यांच्यावर किती केविलवाणी वेळ आणली ना?

No comments:

Post a Comment